सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५५१ ते ५७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

551-18
जें गा ज्ञान ऐसें । गुणग्रहें तामसें । घेतलें भवें पिसें । होऊनियां ॥551॥
जे ज्ञान तमोगुणरुपी ब्रह्मराक्षसाचा संचार झाल्यामुळे वेड्याप्रमाणे फिरते; 551
552-18
जें सोयरिकें बाधु नेणें । पदार्थीं निषेधु न म्हणे । निरोविलें जैसें सुणें । शून्यग्रामीं ॥552॥
जे शरीरसंबंधाची अडचण बाळगीत नाही; व पदार्थाच्या ठिकाणी निषेधपणा ओळखत नाही; जसे ओसाड गावात सोडले कुत्रे स्वेच्छेने वागते; 552
553-18
तया तोंडीं जें नाडळे । कां खातां जेणें पोळे । तेंचि येक वाळे । येर घेणेचि ॥553॥
त्याच्या तोंडात सापडत नाही अथवा जे खाल्ले असता तोंड भाजते तीच वस्तू ते टाकते, बाकी सर्व वस्तू त्याजपाशी खपतात, 553
554-18
पैं सोनें चोरितां उंदिरु । न म्हणे थरुविथरु । नेणे मांसखाइरु । काळें गोरें ॥554॥
उंदीर सोन्यासारखी पदार्थ नाश करीत असता चांगले अथवा वाईट हे तो जाणत नाही, अथवा मांस खाणारा हा मांसाचे ठिकाणी काळे व गोरे हा भेद जाणत नाही; 554
555-18
नाना वनामाजीं बोहरी । कडसणी जेवीं न करी । कां जीत मेलें न विचारी । बैसतां माशी ॥555॥
किंवा रानास वनवा लागल्यावर त्यास जसा कसलाच विचार राहात नाही अथवा प्राणी जिवंत मेलेला याचा विचार न करता माशी वाटेल त्यावर बसते; 555

556-18
अगा वांता कां वाढिलेया । साजुक कां सडलिया । विवेकु कावळिया । नाहीं जैसा ॥556॥
अरे कावळ्यास जसे अन्न ओकलेले किंवा वाढलेले, साजूक किंवा सडलेले हा विचार नसतो, 556
557-18
तैसें निषिद्ध सांडूनि द्यावें । कां विहित आदरें घ्यावें । हें विषयांचेनि नांवें । नेणेंचि जें ॥557॥
तसे अपवित्र वस्तूचा त्याग करावा, अथवा शास्त्रांत सांगितलेल्या गोष्टींचा आदराने स्वीकार करावा, हे विषयांच्या भरात जे ज्ञान जाणत नाही, 557
558-18
जेतुलें आड पडे दिठी । तेतुलें घेचि विषयासाठीं । मग तें स्त्री-द्रव्य वाटी । शिश्नोदरां ॥558॥
जी जी वस्तू दृष्टीस पडेल, त्या त्या वस्तूचा उपभोग घेते; आणि मग स्त्री असल्यास शिश्नास व द्रव्य असल्यास उदरास वाटून देते; 558
559-18
तीर्थातीर्थ हे भाख । उदकीं नाहीं सनोळख । तृषा वोळे तेंचि सुख । वांचूनियां ॥559॥
उदकाच्या ठिकाणी हे तीर्थ किंवा हे अपवित्र ही ज्यास ओळख नसते, परंतु त्यापासून तहान भागते एवढेच सुख जे मानते, 559
560-18
तयाचिपरी खाद्याखाद्य । न म्हणे निंद्यानिंद्य । तोंडा आवडे तें मेध्य । ऐसाचि बोधु ॥560॥
त्याचप्रमाणे भक्ष्य व निंद्यानिंद्य यांचा जे विचार करीत नाही, परंतु आपल्यास जे आवडेल तेच पवित्र आहे, असा ज्याचा निश्चय झालेला असतो, 560

561-18
आणि स्त्रीजात तितुकें । त्वचेंद्रियेंचि वोळखे । तियेविषयीं सोयरिकें । एकचि बोधु ॥561॥
आणि स्त्रीजात म्हणून जेवढी आहे तीजविषयी भोग्य विषय एवढीच त्याची ओळख आहे व तिच्या ठिकाणी आप्तपणा करण्याविषयी जे तत्पर असते; 561
562-18
पैं स्वार्थीं जें उपकरे । तयाचि नाम सोयिरें । देहसंबंधु न सरे । जिये ज्ञानीं ॥562॥
हे पहा, आपल्याला जे उपयोगी पडतील तेच आपले सोयरे आहेत, व देह संबंध ज्यांच्याशी झालेले आहेत, ते सोयरे आहेत असा बोध नाही, अशी ज्या ज्ञानाची समजूत असते, 562
563-18
मृत्यूचें आघवेंचि अन्न । आघवेंचि आगी इंधन । तैसें जगचि आपलें धन । तामसज्ञाना ॥563॥
मृत्यूला सगळेच आपले खाद्य आहे असे वाटते, अग्नीला सगळेच इंधन वाटते, तसे या तामस ज्ञानाला सर्व जगत हे आपले धन आहे असे वाटते. 563
564-18
ऐसेनि विश्व सकळ । जेणें विषयोचि मानिलें केवळ । तया एक जाण फळ । देहभरण ॥564॥
याप्रमाणे सर्व जग हे उपभोगाकरितांच निर्माण केले आहे अशी ज्या ज्ञानाची समजूत झालेली आहे, त्यास भरणा शिवाय दुसरा पुरुषार्थच नसतो; 564
565-18
आकाशपतिता नीरा । जैसा सिंधुचि येक थारा । तैसें कृत्यजात उदरा- । लागिंचि बुझे ॥565॥
आकाशांतून पडलेल्या पाण्यास समुद्र हा एक जसा थारा आहे, त्याप्रमाणे जे ज्ञान कोणतेही कृत्य केले तरी ते पोटासाठीच आहे असे समजते; 565

566-18
वांचूनि स्वर्गु नरकु आथी । तया हेतु प्रवृत्ति निवृत्ती । इये आघवियेचि राती । जाणिवेची जें ॥566॥
स्वर्ग किंवा नरक यांच्या प्राप्तीकरीता विहित व निषिद्ध आचरण हेच कारण होय, या जाणिवेची ज्या ज्ञानाला मुळीच ओळख नसते; 566
567-18
जें देहखंडा नाम आत्मा । ईश्वर पाषाणप्रतिमा । ययापरौती प्रमा । ढळों नेणें ॥567॥
देहाच्या तुकड्यासच आत्मा हे नाव आहे व ईश्वर ही दगडाचीच मूर्ती आहे यापलीकडे ज्याच्या बुद्धीची धाव नसते; 567
568-18
म्हणे पडिलेनि शरीरें । केलेनिसीं आत्मा सरे । मा भोगावया उरे । कोण वेषें । ॥568॥
आणि ते असे म्हणते की, हे शरीर पडल्यावर आत्मा केलेल्या कर्मा सह नाश पावतो; मग कर्माची फळे भोगावयास या मृत्यूलोकी कोणत्या रूपाने आत्मा राहातो? 568
569-18
ना ईश्वरु पाहातां आहे । तो भोगवी हें जरी होये । तरी देवचि खाये । विकूनियां ॥569॥
किंवा पाहू गेल्यास ईश्वर आहे असे दिसत नाही, तथापि तो कर्माची फळे भोगवीतो म्हणून जर म्हणावे, तर एखादा देवाच्या सोन्यारूप्याच्या मूर्ती विकून खातो त्याची वाट काय? 569
570-18
गांवींचें देवळेश्वर । नियामकचि होती साचार । तरी देशींचे डोंगर । उगे कां असती? ॥570॥
गावातील प्रमुख देव जर कर्माबद्दल शासन करतील म्हणावे, तर त्या मूर्तीच्या ज्या डोंगरातील दगडांच्या तयार केलेल्या असतात, ते डोंगर स्वस्थ का बसतात. 570

571-18
ऐसा विपायें देवो मानिजे । तरी पाषाणमात्रचि जाणिजे । आणि आत्मा तंव म्हणिजे । देहातेंचि ॥571॥
याप्रमाणे कदाचित देव आहे असे मानले, तरी तो दगडाचीच मूर्ती आहे असे समजते आणि आत्मा म्हणजे देहच आहे असे समजते. 571
572-18
येरें पापपुण्यादिकें । तें आघवेंचि करोनि लटिकें । हित मानी अग्निमुखे । चरणें जें कां ॥572॥
याशिवाय पाप किंवा पुण्य ही सर्व लटकी आहेत अग्नि पेटल्यावर पुढे येणार्‍या सर्व जिनसांचे भक्षण करतो, त्याप्रमाणे जी जी गोष्ट भोगण्यास मिळेल, तिचा भोग घेण्यातच हित आहे असेही समजते 572
573-18
जें चामाचे डोळे दाविती । जें इंद्रियें गोडी लाविती । तेंचि साच हे प्रतीती । फुडी जया ॥573॥
चर्मचक्षूंनी जे जे पदार्थ दृष्टीस पडतील व इंद्रिये ज्या विषयांची गोडी लावतील, त्याच गोष्टी खर्‍या आहेत असा त्याचा पक्का अनुभव आहे, 573
574-18
किंबहुना ऐसी प्रथा । वाढती देखसी पार्था । धूमाची वेली वृथा । आकाशीं जैसी ॥574॥
किंबहुना पार्था, आकाशात धुराचे लोट व्यर्थ जातात, त्याप्रमाणे ज्याची बुद्धी अशा रीतीने वाढतच जाते; 574
575-18
कोरडा ना वोला । उपेगा आथी गेला । तो वाढोनि मोडला । भेंडु जैसा ॥575॥
बरुंतील भेंड कोरडे किंवा ओले असले तरी मोठे वाढल्यावरही कशाच्या उपभोगास येत नाही, 575

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *