सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ११७६ ते १२०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1176-18
दीपातें दीपें प्रकाशिजे । तें न प्रकाशणेंचि निपजे । तैसें कर्म मियां कीजे । तें करणें कैंचें? ॥1176॥
दिव्यानेच दिव्याला प्रकाशिलें ही जशी केवळ भाषा, वास्तवता नव्हे, तसे मद्रूप स्थितीत केल्या गेलेल्या कर्माला कर्म कसे म्हणतां येईल? 76
1177-18
कर्मही करितचि आहे । जैं करावें हें भाष जाये । तैं न करणेंचि होये । तयाचें केलें ॥1177॥
तो कर्म करीतच असतो किवा त्याजकडून कर्म होणारच, ‘पण हे मी करावें आणि हें मी करू नये’ अशी विधिकिकरता जेथे अस्त पावलेली असते, त्याने केलेल्या कर्माची न केल्यांतच शास्त्र गणना करिते. 77
1178-18
क्रियाजात मी जालेपणें । घडे कांहींचि न करणें । तयाचि नांव पूजणें । खुणेचें माझें ॥1178॥
मद्रूपता आली कीं जी जी कांहीं क्रिया घडेल ती ती न केल्यासारखीच होते व माझी खरी खुणेची पूजा ती हीच होय 78
1179-18
म्हणौनि करीतयाही वोजा । तें न करणें हेंचि कपिध्वजा । निफजे तिया महापूजा । पूजी तो मातें ॥1179॥
म्हणून अर्जुना, तो आस्थापूर्वक जें कर्म करितो तेंही न करण्यांतच पडतें; हीच त्याने मला बांधलेली महापूजा होय. 79
1180-18
एवं तो बोले तें स्तवन । तो देखे तें दर्शन । अद्वया मज गमन । तो चाले तेंचि ॥1180॥
सारांश, तो बोलेल तें माझे स्तवन, तो पाहील तें माझे दर्शन, व तो जिकडे जिकडे जाईल तिकडे त्याला माझा अद्वय परमात्म्याची यात्रा घडते. 1180

1181-18
तो करी तेतुली पूजा । तो कल्पी तो जपु माझा । तो असे तेचि कपिध्वजा । समाधी माझी ॥1181॥
अर्जुना, त्याची सर्व कृति ही माझी पूजा होय, तो कल्पना करील तोच माझा जप; व तो असेल तीच माझी समाधि होय 81
1182-18
जैसें कनकेंसी कांकणें । असिजे अनन्यपणें । तो भक्तियोगें येणें । मजसीं तैसा ॥1182॥
सुवर्णपाशी त्याचाच अलंकार जें कांकण हे नेहमींच जसे अनन्य (एकरूप) असते त्याप्रमाणे ह्या भक्तियोगेकरून तो माझ्याशीं अनन्य असतो. 82
1183-18
उदकीं कल्लोळु । कापुरीं परीमळु । रत्नीं उजाळु । अनन्यु जैसा ॥1183॥
पाण्याशी लाट कापुरापाशी परिमळ । व रत्नाशी जसे त्याचे तेज अनन्य असतें,83
1184-18
किंबहुना तंतूंसीं पटु । कां मृत्तिकेसीं घटु । तैसा तो एकवटु । मजसीं माझा ॥1184॥
किंबहुना, तंतूशी पट, मृत्तिकेपाशी घट हे जसे एकरूप असतात तसा तो माझा भक्त मजपाशी एकवट म्हणजे मद्रूप असतो. 84
1185-18
इया अनन्यसिद्धा भक्ती । या आघवाचि दृश्यजातीं । मज आपणपेंया सुमती । द्रष्टयातें जाण ॥1185॥
या स्वयंसिद्ध अभेद भक्तीने दृश्यमात्राकडे, जो भक्त, त्यावरील नामरूपात्मक दृश्यत्वाचा पडदा बाजूस सारून, अधिष्ठान द्रष्टा जो मी, तदेकदृष्टीने पहातो. 85

1186-18
तिन्ही अवस्थांचेनि द्वारें । उपाध्युपहिताकारें । भावाभावरूप स्फुरे । दृश्य जें हें ॥1186॥
जागृति, स्वप्न व सुषुप्ति ह्या तीन अवस्थांद्वारां, उपहित अधिष्ठान व नामरूपादि उपाधि ह्यांच्या द्वारा, अभावरूपाने स्फुरणारे ( प्रत्ययास येणारें) जें कांहीं तें दृश्य होय.86
1187-18
तें हें आघवेंचि मी द्रष्टा । ऐसिया बोधाचा माजिवटा । अनुभवाचा सुभटा । धेंडा तो नाचे ॥1187॥
तें, जें हे सारें दृश्य त्याचा तात्विक (अंतापयंत ) विचार करून, त्याचे खरें स्वरूप, अधिष्ठानरूप परमात्मा जो मी किंवा पहाणाराचा आत्मा तेंच आहे, असा त्या योग्याच्या अपरोक्षानुभवाचा धेडा नाचू लागतो. 87
1188-18
रज्जु जालिया गोचरु । आभासतां तो व्याळाकारु । रज्जुचि ऐसा निर्धारु । होय जेवीं ॥1188॥
रज्जुस्वरूपदर्शनानें तिजवर दिसलेला जो सर्पाचा आकार तोही तेव्हां रज्जुस्वरूपच होता असा निश्चय जसा व्हावा. 88
1189-18
भांगारापरतें कांहीं । लेणें गुंजहीभरी नाहीं । हें आटुनियां ठायीं । कीजे जैसे ॥1189॥
सुवर्णालंकारांत, अलंकाराला गुंजभरही पृथक् सत्ता नसते, हे विचाराने किंवा अलंकार आटुनही जसें पहात येईल. 89
1190-18
उदका येकापरतें । तरंग नाहींचि हें निरुतें । जाणोनि तया आकारातें । न घेपे जेवीं ॥1190॥
एका उदकावाचून लाट म्हणून कांहीं स्वतंत्र वस्तूच नाहीं हें जाणणारा जसा तिच्या आकाराने फसत नाही. 1190

1191-18
नातरी स्वप्नविकारां समस्तां । चेऊनियां उमाणें घेतां । तो आपणयापरौता । न दिसे जैसा ॥1191॥
किंवा जागा झाल्यावर सकलस्वप्नव्यवहाराची मोजदाद करू पहाणाराला आपल्या शिवाय जसे दुसरें तेथे कांहींच आळत नाहीं, 91
1192-18
तैसें जें कांहीं आथी नाथी । येणें होय ज्ञेयस्फुर्ती । तें ज्ञाताचि मी हें प्रतीती । होऊनि भोगी ॥1192॥
तसा जगांत’ “आहे, नाही,” असा जो कांहीं ज्ञानाचा व्यवहार चालतो, तो सर्व माझ्याच ज्ञानस्वरूपाचा विलास होय, असा त्याचा अपरोक्षानुभव असतो. 92
1193-18
जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु । अपूर्वु मी अपारु । आनंदु मी ॥1193॥
मी जन्मरहित, वार्धक्यरहित, नाशरहित, व्ययहित, अपूर्व आणि अनंत व आनंदरूप असे जो जागतो. 93
1194-18
अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु । आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी ॥1194॥
मी.अचल, अच्युत, अनंत, अद्वैत, आद्य, निराकार, व साकारही आहे असे जो समजतो. 94
1195-18
ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु । अभय मी आधारु । आधेय मी ॥1195॥
नियम्य मी, नियामक मी, अनादि, अमर, अभय, आधार व आधारावर असलेला मी आहे. 95

1196-18
स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु । सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥1196॥
मी नित्य स्वामी (धनी) आहे; सहज व सतत आहे; मी सर्व व सर्वव्यापक आहे व मी. सर्वात न सापडणारा असा त्यांच्या पलीकडील स्वरूपाचा आहे.96
1197-18
नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु । स्थुलु मी अणु । जें कांहीं तें मी ॥1197॥
मी, नवा, जुना, शून्य, संपूर्ण,स्थूल, सूक्ष्म, जे कांही दिसते ते मी आहे. 97
1198-18
अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु । व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ॥1198॥
अक्रिय, एक, असंग, अशोक, व्याप्य, व्यापक, पुरुषोत्तम मी आहे.98
1199-18
अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु । समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु ॥1199॥
अशब्द (शब्दरहित), श्रोत्ररहित, अरूप, अगोत्र, सम, स्वतंत्र व परब्रम्ह्स्वरूप आहे.99
1200-18
ऐसें आत्मत्वें मज एकातें । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें । आणि याही बोधा जाणतें । तेंही मीचि जाणें ॥1200॥
याप्रमाणे, मला एकाला या अद्वैयभक्तीने योग्यरीतीने जाणतो व याही बोधाचे अधिष्ठान जे शुद्ध परमात्मतत्व तेच माझे स्वरूप होय असाही त्याचा स्पष्ट बोध असतो. 1200

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *