सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ७६ ते १०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

76-6
जैसी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोविन्नली एरी मोहरें । तेणें उडावें परी न पुरे । मनशंका ॥76॥
पारधी हा पोपटाला पकडण्यासाठी दोरीत नळी ओवून झाडाला बांधतो. पोपट त्यावर बसतात. नळी कोणत्या तरी एका बाजूला फिरते. त्यावेळी वास्तविक पाहता पोपटाने उडून जाणे आवश्यक आहे; परंतु नळी सोडल्यास आपण पडून मरून जाऊ, अशी शंका आल्यामुळे तो नळी सोडत नाही.
77-6
वायांचि मान पिळी । अटुवें हियें आंवळी । टिटांतु नळी । धरुनि ठाके ॥77॥
तो पोपट मानेला व्यर्थ पिळे देतो. छातीने व चवड्याने ती नळी चोचीने आवळून धरून ओरडतो.
78-6
म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडां । कीं मोकळिया पायांचा चवडा । गोंवी अधिकें ॥78॥
मग तो मनात समजतो की, खरोखरच मी बांधला गेलो आहे. अशा भ्रामक कल्पनेच्या खोड्यात तो सापडतो आणि मोकळ्या असलेल्या आपल्या पायाचा चवडा अधिकच गुंतवितो.
79-6
ऐसा काजेंवीण आतुंडला । तो सांग पां काय आणिकें बांधला । मग नोसंडी जऱ्ही नेला । तोडुनि अर्धा ॥79॥
असा तो कारणाशिवाय अडकून राहतो. त्याला कोणी अर्धा तोडून नेण्याचा प्रयत्न जरी केला, तरी तो नळी सोडत नाही. आता तूच सांग की, त्या पोपटाला दुसऱ्या कोणी बांधून ठेवलं आहे काय??
80-6
म्हणऊनि आपणयां आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु । येर स्वंयबुध्दी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ॥80॥
म्हणून ज्याने मी शरीर आहे, असा संकल्प वाढविलेला आहे, तो आपणच आपला शत्रू होय. परंतु जो मिथ्या देहाचा अभिमान धरत नाही, तो स्वतःच्या आत्मस्वरूपाचा विचार करणारा होय.
जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः॥6.7॥

भावार्थ :- शीत- उष्ण व सुख-दुःख वगैरेमध्ये, तसेच मान व अपमान यामध्ये ज्याच्या वृत्ती पूर्णपणे शांत, विकाररहित असतात, अशा आपल्या आत्म्याला स्वाधीन केलेल्या पुरुषाच्या ज्ञानामध्ये परमात्म्याशिवाय दुसऱ्या कशाचेही अस्तित्व राहत नाही.


81-6
तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता । परमात्मा परौता । दुरी नाहीं ॥81॥
ज्याने आपले मन जिंकलेले आहे, ज्याच्या सर्व विषयवासना नष्ट झाल्या आहेत, त्याला परमात्मा कोठे पलीकडे दूर नाही.
82-6
जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी पंधरे तेंचि होये । तैसें जीवा ब्रम्हत्व आहे । संकल्पलोपीं ॥82॥
सोन्याचा हिणकस पणा अग्नीत तापवून नाहीसा झाल्यावर ते शंभर नंबरी सोने होते, त्याप्रमाणे संकल्प नाहीसे झाल्यावर अहंभाव, भ्रम नाहीसे होऊन जीव हा ब्रम्हस्वरूप आहे, याची जाणीव होते
83-6
हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा । नलगे मिळो जाणें आकाशा । आना ठाया ॥83॥
ज्याप्रमाणे घटाचा आकार नाहीसा झाल्यानंतर त्यातील पोकळीला महाआकाशाची एकरूप होण्यासाठी दुसरीकडे जावे लागत नाही.
84-6
तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला । तोचि परमात्मा संचला । आधींचि आहे ॥84॥
त्याप्रमाणे ज्याच्या देहाच्या ठिकाणी असलेला मिथ्या अहंकार अज्ञानासह नष्ट झाला आहे, तो पुरुष अज्ञान-निवृत्तीपूर्वीसुद्धा परमात्माच होतो आणि नंतरही परमात्माच आहे.
85-6
आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुःखाची कडसणीं । इयें न समाती कांही बोलणीं । मानापमानांची ॥85॥
शीत उष्णचा ओघ, सुख दुःखाचा विचार, मान – अपमानाची बोलणी हे काहीही त्या पुरुषाच्या अंतःकरणात प्रवेश करू शकत नाही; कारण त्याचे अंतःकरण परब्रम्हभावनेने परिपूर्ण भरलेले असते.


86-6
जे जिये वाटा सुर्यु जाये । तेउतें तेजाचें विश्व होये । तैसे तया पावे तें आहे । तोचि म्हणऊनि ॥86॥
ज्या वाटेने सूर्य जात असतो, तिकडेच सर्व विश्व प्रकाशमान होत असते. त्याप्रमाणे योगी पुरुषाला जे जे प्राप्त होते, ते ते त्याचेच स्वरूप असते.
87-6
देखैं मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा । तैशी शुभाशभें योगीश्वरा । नव्हती आनें ॥87॥
मेघातून सुटणाऱ्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला टोचत नाहीत, त्याप्रमाणे योगी पुरुषाला शुभ-अशुभ द्वंद्ववे आत्मस्वरूपापेक्षा भिन्न नसतात, म्हणून त्रास देत नाहीत.
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेद्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाज्चनः॥6.8॥

भावार्थ :- ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञान यांनी तृप्त झाले आणि ज्याची स्थिती विकाररहित आहे, जो जितेंद्रिय आहे, तसेच ज्याला दगड, माती, सोने वगैरे सर्व समान वाटतात, असा योगी सिद्ध बनला जातो.
88-6
जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विचारितां जाहला वावो । मग लागला जंव पाहों । तंव ज्ञान तें तोचि ॥88॥
जो योगरुढ पुरुष दृश्य प्रपंचाचा विचार करू लागतो, तेंव्हा त्याच्या दृष्टीने तो प्रपंच मिथ्या झालेला असतो. मग अनुभवाने तो ज्या वेळी आत्मस्वरूपाला पाहू लागतो, त्यावेळी ते अनुभव- ज्ञानदेखील त्याचे स्वरूप झालेले दिसते.
89-6
आतां व्यापकु कीं एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी । ते करावी ठेली आपैशी । दुजेनवीण ॥89॥
मी व्यापक आहे का मर्यादित आहे, अशी चर्चा द्वैत संपल्यामुळे आपोआपच थांबलेली असते.
90-6
ऐसा शरीरीचि परी कौतुकें । परब्रह्माचेनि पाडें तुके । जेणें जिंतलीं एके । इंद्रिये गा ॥90॥
ज्यांनी आपली सर्व इंद्रिये पूर्णपणे जिंकलेली आहेत, तो देहधारी असला, तरी त्याची परब्रह्मच्या बरोबरीने तुलना होते.
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेद्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाज्चनः॥6.8॥

भावार्थ :- ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञान यांनी तृप्त झाले आणि ज्याची स्थिती विकाररहित आहे, जो जितेंद्रिय आहे, तसेच ज्याला दगड, माती, सोने वगैरे सर्व समान वाटतात, असा योगी सिद्ध बनला जातो.


91-6
तो जितेंद्रियु सहजें । तोचि योगयुक्तु म्हणिजे । जेणें सानें थोर नेणिजे । कवणें काळीं ॥91॥
ज्याने आपली सर्व इंद्रिय सहजपणे जिंकलेली असतात, त्याला योगयुक्त म्हणतात. त्याला हा लहान, हा मोठा अशा प्रकारचा भेद कोणत्याच वेळी जाणवत नाही.
92-6
देखे सोनियाचें निखळ । मेरुयेसणें ढिसाळ । आणि मातियेचें डिखळ । सरिसेंचि मानी ॥92॥
असे बघ की, शुद्ध सोन्याचा मेरू पर्वताऐवढा ढीग आणि मातीचे ढेकूळ जो सारखेच मानतो,
93-6
पाहता पृथ्वीचें मोल थोडें । ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें । देखें दगडाचेनि पाडें । निचाडु ऐसा ॥93॥
पृथ्वीची किंमत ज्याच्यापुढे काहीचं नाही, असे अनमोल रत्न देखील जो दगडासमान मानतो, त्याचे अंतःकरण निरिच्छ बनलेले असते.
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुध्दिर्विशिष्यते॥6.9॥

भावार्थ :- सुहृद, मित्र, वैरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेषी, बंधू, साधुपुरुष आणि पापिजनाविषयी जो समानबुद्धी ठेवतो, तो सर्वश्रेष्ठ होय.
94-6
तेथ सुहृद आणि शत्रु । कां उदासु आणि मित्रु । हा भावभेद विचित्रु । कल्पुं कैंचा ॥94॥
त्याच्या ठिकाणी आप्त आणि शत्रू, उदासीन आणि मित्र अशा वेगवेगळ्या द्वैताच्या विचित्र कल्पना कशा येणार??
95-6
तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा । मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ॥95॥
मीच विश्वाच्या रूपाने सर्वत्र पसरलेलो आहे, असे ज्याला विश्वव्यापक ज्ञान प्राप्त झाले आहे, त्याला कोण कोणाचा बंधू असणार; आणि त्याला द्वेषी तरी कोण असणार??


96-6
मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरीटी । काय परिसाचिये कसवटी । वानिया कीजे ॥96॥
मग त्याच्या दृष्टीने अर्जुना ! (त्याच्या अंतःकरणात) हा चांगला हा वाईट, असा भेद असू शकेल काय? परीसाच्या कसोटीवर घासले असता सुवर्णाचे चांगले – वाईट असे प्रकार करता येतील काय??
97-6
ते जैशी निर्वाण वर्णुचि करी । तैशी जयाचि बुध्दी चराचरीं । होय साम्याची उजरी । निरंतर ॥97॥
त्या कसोटीपासून जसे शुद्ध सोनेच निर्माण होते, त्याप्रमाणे त्याच्या बुद्धिमध्ये चारचराविषयी समता उदय पावलेली असते.
98-6
जे ते विश्वाळंकाराचें विसुरे । जरी आहाती आनानें आकारें । तरी घडले एकचि भांगारें । परब्रह्में ॥98॥
विश्वातील प्राणिरूप अलंकारचे समुदाय जरी वेगवेगळ्या आकाराचे असले, तरीपण ते एकाच परब्रम्हरूपी सोन्याचे बनलेले आहेत,
99-6
ऐसें जाणणें जें बरवें । ते फावलें तया आघवें । म्हणौनि आहाचवाहाचें न झकवे । येणे आकारचित्रें ॥99॥
असे सर्वश्रेष्ठ आत्मज्ञान योगारूढ पुरुषाला प्राप्त झालेले असते; म्हणून तो वरवरच्या या विविध प्रकारच्या आकारांनी फसत नाही.
100-6
घापे पटामाजी दृष्टी । दिसे तंतूंचि सैंघ सृष्टी । परी तो एकवांचुनि गोठी । दुजी नाहीं ॥100॥
सूक्ष्म दृष्टीने वस्त्र पहिले असता, त्यामध्ये उभ्या-आडव्या तंतूंची रचना दिसते. स्थूल दृष्टीने पट दिसत असला, तरीदेखील त्यात एका तंतूंवाचून दुसरी गोष्ट नसते.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *