151-3
जे स्वकर्मे निष्कामता । अनुसरले पार्था । कैवल्य पर तत्वतां । पातले जगी ॥151॥
हे पार्था ! जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात, ते श्रेष्ठ अशा कैवल्यपदाला प्राप्त होतात.
152-3
कर्मणैव हि संसिद्धीमास्थिता जनकादयः ।
लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि॥3.20॥
भावार्थ :- कारण, आसक्ती रहित कर्म करूनच जनकादिकांना सिद्धी प्राप्त झाली. यासाठी तू सुद्धा लोकसंग्रहाकडे (लोकहिताकडे) लक्ष देऊन कर्मच करणे योग्य आहे.
देखें पां जनकादिक । कर्मजात अशेख । न सांडिता मोक्षसुख । पावते जाहले ॥152॥
असे पाहा की, कर्माचा मुळीच त्याग न करता, जनकादिकांना मोक्षाचे सुख प्राप्त झाले.
153-3
याकारणे पार्था । होआवी कर्मीं आस्था । हे आणिकाही एका अर्था । उपकारेल ॥153॥
हे अर्जुना ! यासाठी कर्म करण्याविषयी तू आस्था ठेव. कारण त्या आस्थेपासुन आणखी एक उपयोग होणार आहे.
154-3
जे आचरता आपणपेयां । देखी लागेल लोका यया । तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेचि ॥154॥
त्या कर्माचे आचरण केले असता या लोकांना तसे आचरण करण्याची सवय लागेल, आणि कर्मलोपाने होणारी दुःखे सहजच नाहीशी होतील.
155-3
देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥155॥
असे पाहा की, जे कृतकृत्य झाले आहेत आणि निष्काम स्थितीला पोहचले आहेत, (म्हणजे मिळवायचे ते ज्यांनी मिळविले व निरिच्छ झाले), त्या महान पुरुषांनादेखील लोकांना सदाचाराच्या मार्गाकडे आणण्यासाठी कर्म करावे लागते.
156-3
मार्गीं अंधासरिसा । पुढे देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनि ॥156॥
आंधळ्या माणसाला सांभाळून नेणारा डोळस माणूस हा आंधळ्या माणसाप्रमाणे सावकाश चालत असतो, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाने सादाचाराने आणि धर्माचे आचरण करून अज्ञानी माणसास मार्ग दाखवावा.
157-3
हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञानां काय वोजे । तिहीं कवणेपरी जाणिजे । मार्गांते या ॥157॥
ज्ञानी माणसाने धर्माचे आचरण करून धर्माचा मार्ग सांगितला नाही, तर अज्ञानी माणसाला कसे बरे समजेल? त्यांनी कोणत्या मार्गाने या धर्माला जाणावे?
(आपल्याला योग्य असलेला मार्ग त्यांना कसे बरे समजेल)
यद् यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते॥3.21॥
भावार्थ :- श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, त्याचेच अनुकरण इतर लोक करतात. तो पुरुष जे कांही प्रमाण मानतो, लोकदेखील त्याला अनुसरून वर्तन करतात.
158-3
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥158॥
या जगात थोर लोक जे कर्म आचरतात, त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात; आणि इतर सामान्य लोक त्याचेच आचरण करतात.
159-3
हें ऐसें असे स्वभावें । म्हणोनि कर्म न संडावे । विशेषें आचरावें । लागे संती ॥159॥
जगाचा असा स्वभावच आहे. म्हणून श्रेष्ठ लोकांनी (ज्ञानी पुरुषाने) कर्माचा त्याग करू नये. एवढेच नाही, तर संतांनी तर त्यांचे आचरण जगाच्या कल्याणासाठी विशेष काळजीने केले पाहिजे.
न मे पार्थस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥3.22॥
भावार्थ :- हे अर्जुना ! या त्रैलोक्या मध्ये मला कर्तव्य असे कांही नाही, किंवा प्राप्त न झालेली अशी गोष्ट मला प्राप्त करावयाची राहिलेली नाही, तरीपण मी कर्म करतच आहे.
160-3
आता आणिकाचिया गोठी । तुज सांगो काय किरीटी । देखें मीचि इये राहाटी । वर्तत असे ॥160॥
हे अर्जुना ! आता आणखी गोष्टी (दुसऱ्याच्या गोष्टी) तुला कशाला सांगू? मी देखील कर्ममार्गाने वागतो, हे प्रत्येक्ष बघ.
161-3
काय सांकडे कांही मातें । कीं कवणें एकें आर्तें । आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥161॥
मला काही कमी आहे किंवा कोणत्या एखाद्या फळाची इच्छा धरून मी धर्माचे आचरण करत आहे, असे जर म्हणशील,
162-3
तरी पुरतेपणालागी । आणिकु दुसरा नाहीं जगीं । ऐसी सामुग्री माझां अंगी । जाणसी तूं ॥162॥
तर पूर्णतेच्या दृष्टीने पहिले असता माझ्यासारखा दुसरा जगात कोणीही नाही; किंवा सर्व प्रकारचे सामर्थ्य माझ्यामध्ये वसलेले आहे, हे तू जाणतोस.
163-3
मृत गुरूपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला । तोही मी उगला । कर्मीं वर्ते ॥163॥
मी आपल्या (संदीपनी) गुरूचा मेलेला मुलगा परत आणून दिला, तो पराक्रम तू पहिला आहेस. तो मी इतका सामर्थ्य संपन्न असूनही कर्ममार्गाचे आचरण करतो.
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तंते मनुष्याः पार्थ सर्वशः॥3.23॥
भावार्थ :- हे पार्था ! जर मी सावधपणे कर्मे केले नाहीत, तर लोक देखील माझ्या वागण्याचे आचरण करतील.
164-3
परी स्वधर्मीं वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा । तयाचि एका उद्देशा – । लागोनियां ॥164॥
जसा सकाम पुरुष केवळ एका फळाच्या उद्देशानेच तत्पर असतो, त्या तत्परतेने मी स्वधर्म आचरण करीत असतो.
165-3
जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ । ते न व्हावें बरळ । म्हणोनियां ॥165॥
कारण सर्व प्राणीसमूह आमच्या आधीन आहेत. मी जसे कर्म करतो, तेही करतात. तरी हे लोक कर्मभ्रष्ट होऊ नयेत; म्हणून मी सदैव कर्ममार्ग आचरीत असतो.
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् ।
संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः॥3.24॥
भावार्थ :- जर मी कर्म करणार नाही, तर हे सर्व लोक भ्रष्ट होतील; आणि मी वर्णसंकर करणारा होईन, व या लोकांचा नाश करण्यास मी कारण होईन.
166-3
आम्ही पूर्णकाम होऊनी । जरी आत्मस्थिती राहुनी । तरी हे प्रजा कैसेनि । निस्तरेल ॥166॥
जर आम्ही निरिच्छ होऊन आत्मस्थितीत शांतपणे बसून राहिलो, तर ही प्रजा भवसागरातून कशी पार पडेल??
167-3
इहीं आमुची वास पाहावी । मग वर्तती परी जाणावी । ते लौकिक स्थिती अवघी । नासिली होईल ॥167॥
प्रजेने आमच्या मार्गाकडे पाहावे आणि आचरणाची पद्धत समजून घ्यावी, असा प्रकार असल्यामुळे आम्ही जर कर्माचा त्याग केला, तर लोकांचे जीवन सर्व प्रकारे बिघडून जाईल.
168-3
म्हणोनि समर्थु जो एथें । आथिला सर्वज्ञते । तेणे सविशेषें कर्मातें । त्यजावे ना ॥168॥
म्हणून या लोकी जो समर्थ आहे आणि सर्वज्ञान संपन्न आहे, त्याने विशेष करून कर्माचा त्याग कधी करू नये.
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वंति भारत ।
कुर्याद्विवांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकलोसंग्रहम्॥3.25॥
भावार्थ :- हे अर्जुना ! ज्याप्रमाणे अज्ञानी लोक कर्माच्या ठिकाणी आसक्त होऊन कर्म करतात, त्याप्रमाणे लोकसंग्रहांची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्मे करावीत.
169-3
देखे फळाचिया आशा । आचरे कामुकु जैसा । कर्मी बहरु होआवा तैसा । निराशाही ॥169॥
असे पाहा की, फळाच्या आशेने सकाम पुरुष जेवढ्या उत्सहाने कर्माचे आचरण करतो, तेवढ्या उत्सहाने फलाशा नसलेल्या पुरुषांनीही कर्मे केली पाहिजेत.
170-3
जे पुढतपुढती पार्था । हे सकळ लोकसंस्था । रक्षणीय सर्वथा । म्हणऊनियां ॥170॥
कारण अर्जुना ! लोकांचे हे आचरण सर्व प्रकारे नेहमी जतन करून ठेवणे योग्य असते. म्हणून,
171-3
मार्गाधारे वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें । अलौकिक नोहावें । लोकांप्रति ॥171॥
शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्ममार्गाचे आचरण करून सर्वाना सन्मार्ग दाखवावा आणि आपण सामान्य लोकांप्रमाणे राहून आपले जीवन आचरावे.आपले अलौकिकत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये.
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम् ।
जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्॥3.26॥
भावार्थ :- ज्ञानी पुरुषाने कर्मामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये; तर आपण स्वतः परमेश्वराशी एकरूप होऊन सर्व कर्मे उत्तम प्रकारे करावीत आणि अज्ञानी लोकांकडूनही तशीच करवून घ्यावीत.
172-3
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी । म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥172॥
लहान बालक मोठ्या प्रयत्नाने आईचे दूध पिते, तो पक्वान्ने कसे बरे खाईल?? म्हणून अर्जुना ! ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलांना देऊ नयेत;
173-3
तैशी कर्मीं जया अयोग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी खेळतां । आदिकरूनी ॥173॥
त्याप्रमाणे ज्याच्या अंगी कर्मे चांगल्या तऱ्हेने करण्याची योग्यता नाही (शास्त्रात सांगितल्या प्रमाणे कर्मे न करणाऱ्या), त्याना कौतुकानेदेखील नैष्कर्म्यता सांगू नये.
174-3
तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । नैष्कर्मींही दावावी । आचरोनि ॥174॥
त्यांना योग्य कर्माची वागणूक लावून देणे हे योग्य आहे. त्यांच्याजवळ सतक्रियेची स्तुती करावी आणि निष्काम पुरुषाने सतकर्माचे आचरण करून दाखवावे.
175-3
तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगी । तो कर्मबंधु आंगी । वाजेलना ॥175॥
सत्पुरुषाने लोकांच्या कल्याणासाठी जरी कर्मे केली, तरी त्याला कर्माचे बंधन लागत नाही.
