सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी ५१ ते ७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

51-3
आणि आपुलालिया चाडे । आपादिले हे मांडे । कीं त्यजिलें हें कर्म सांडे । ऐसें आहे ॥51॥
आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला म्हणजे ते घडते आणि कर्माचा त्याग केला म्हणजे कर्मसंन्यास घडतो, असे आहे का?
52-3
हें वायाचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखों पाहिजे । परी त्यजितां कर्म न त्यजे । निभ्रांत मानी ॥52॥
हे उगीच काहीतरी (अयोग्य) बोलणे आहे. याचा नीट विचार करून पाहिले, तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे ते टाकले जात नाही, हे तू निःसंशय समज.
53-3
न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैगुणैः॥3.5॥
भावार्थ :- कारण कोणीहि (कांहीतरी) कर्म न करता क्षणभारदेखील केंव्हाही राहत नाही, प्रत्येकजण प्रकृतिजन्य गुणांच्या अधीन असल्यामुळे ते गुण प्रत्येकाकडून कर्म करवीतच असतात.(करवून घेत असतात)
जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान । जे चेष्टा गुणाधीन । आपैसी असे ॥53॥
जोपर्यँत जीवाला शरीराचा, प्रकृतीचा आश्रय आहे तोपर्यन्त मी कर्माचा त्याग करीन अथवा कर्म करीन असे म्हणणे अज्ञानपणाचे आहे. कारण, जेवढे म्हणून कर्म घडत असते, तेवढे स्वभावतः (सात्विक, राजस, तामस) प्रकृतीक गुणांच्या अधीन असते.
54-3
देखें विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें । तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥54॥
पाहा, जेवढे म्हणून विहित कर्म आहे, तेवढे जरी करावयाचे सोडून दिले, तरी इंद्रियांचे स्वभाव नष्ट झाले आहे काय??
55-3
सांगे श्रवणीं ऐकावें ठेलें । की नेत्रीचे तेज गेलें । हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे ॥55॥
सांग, कानांनी ऐकण्याचे बंद झाले आहे काय? अथवा, डोळ्यातील पाहण्याचे सामर्थ्य गेले आहे काय? या नाकपुड्या बुजून वास येईनासा झाला आहे काय?


56-3
ना तरी प्राणापानगति । की निर्विकल्प जाहली मति । की क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥56॥
किंवा प्राण व अपान, या दोन्ही वायूच्या क्रिया थांबल्या आहेत काय? किंवा बुद्धीचा कल्पना विलास थांबला आहे काय? किंवा भूक-तहान लागणे इत्यादी पीडा थांबल्या आहेत काय?
57-3
हे स्वप्नावबोधु ठेले । कीं चरण चालो विसरले । हे असो काय निमाले । जन्ममृत्यू ॥57॥
स्वप्न व जागृत अवस्था बंद पडल्या आहेत का? अथवा पाय चालणे विसरले काय? हे सर्व असु दे. जन्म आणि मरण संपली आहेत काय??
58-3
हें न ठकेचि जरी कांही । तरी सांडिले तें कायी । म्हणोनि कर्मत्यागु नाही । प्रकृतिमंतां ॥58॥
हे जर काहींचं बंद पडले नाही, तर मग कर्मत्याग कसला? म्हणून प्रकृतीच्या अधीन असलेल्या पुरुषाला कर्म त्याग करता येत नाही.
59-3
कर्म पराधीनपणे । निपजतसे प्रकृतिगुणें । येरीं धरीं मोकलीं अंतःकरणें । वाहिजे वायां ॥59॥
मनुष्य प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे (सत्व, रज, तम्) शरीरातील सत्वादि प्रकारचे गुण त्याच्याकडून कर्म घडवीतच असतात; म्हणून एखाद्याने मी हे कर्म करतो अथवा या कर्माचा त्याग करतो, असा अंतःकरणात अभिमान बाळगणे, हे व्यर्थ आहे.
60-3
देखें रथीं आरूढिजे । मग निश्चळा बैसिजे । मग चळा होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥60॥
पाहा, एखादा मनुष्य रथावर आरूढ झाला, कांही न करता स्तब्ध झाला (स्वस्थ बसला), तरी तो मनुष्य (रथावर बसलेला) रथाच्या अधीन असल्याने सहजच रथाच्या हालचालीमुळे त्याचाहि प्रवास हा घडतोच.


61-3
कां उचलिलें वायुवशें । चळें शुष्क पत्र जैसें । निचेष्ट आकाशे । परिभ्रमे ॥61॥
एखादे वाळलेले झाडाचे पान कांही न करता पडलेले असते; परंतु जोरात वारा सुटला, की ते वाऱ्यामुळे (स्वतः हालचाल न करता) आकाशात इकडे तिकडे फिरत(उडत) असते.
62-3
तैसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें । मिष्कर्म्युही व्यापारे । निरंतर ॥62॥
त्याप्रमाणे प्रकृतीच्या आधारे (कर्मातीत अवस्थेस प्राप्त झालेला मनुष्य) आणि कर्मेंद्रियांच्या विकाराने निष्काम माणूसही नेहमी कर्म करीत असतो.
63-3
म्हणऊनि संगु जंव प्रकृतिचा । तंव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरें ॥63॥
म्हणून जो पर्यंत प्रकृतीचा (जो पर्यंत शरीराशी) संबंध आहे, तोपर्यन्त कर्माचा त्याग करणे शक्य नाही, असे असूनही जे कर्माचा त्याग करू म्हणतात, त्यांचा तो केवळ बोलण्याचा आग्रह असतो.
64-3
कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।
इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उचयते॥3.6॥
भावार्थ :- जो केवळ कर्मेंद्रियांना जबरदस्तीने ताब्यात घेतो आणि मनात विषयांचे चिंतन करीत असतो, त्याला अज्ञानी किंवा ढोंगी असे म्हणतात.
जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती । परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधूनि ॥64॥
जे उचित (आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म) कर्माचा त्याग करतात आणि कर्मेंद्रियप्रवृत्तीचा निरोध करूनच नैष्कर्म्य होऊ पाहतात, (कर्मातीत अवस्थेला पोहचू पाहतात),
65-3
तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सापडे । वरी नटती तें फुडे । दरिद्र जाण ॥65॥
त्यांना कर्माचा त्याग घडत नसतो; कारण त्यांच्या अंतःकरणात कर्तव्यबुद्धी (म्हणजे विष्यप्राप्तीचे कर्तव्य) दडलेली असते. त्यामुळे कर्मत्यागाचे त्याचे सोंग वरवरचे असते; आणि ते कर्मत्यागाचे दारिद्रच असते, असे समज.


66-3
ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा । वोळखावे तत्वता । येथ भ्रांति नाहीं ॥66॥
हे अर्जुना ! असे ते लोक खरोखरच विषयासक्त (विषयाची आसक्ती) असतात. त्यांचा विषयाच्या आसक्तीबद्दल कांही संशय घेण्याचे काही कारण नाही.
67-3
आतां देई अवधान । प्रसंगे तुज सांगेन । या नैराश्याचे चिन्ह । धनुर्धरा ॥67॥
हे अर्जुना ! प्रसंग आला आहे,म्हणून निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो. इकडे तू लक्ष दे.
68-3
यस्तित्वंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः न विशिष्यते॥3.7॥
भावार्थ :- पण हे अर्जुना ! जो पुरुष मनाने सर्व इंद्रियांना ताब्यात घेऊन (नियमन करून), (आसक्त न होता) अनासक्त बनून कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय.(कर्मेंद्रिय कर्मात राबवतो)
जो अंतरी दृढु । परमात्मरूपीं गूढु । बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा ॥68॥
जो अंतःकरणात सात्विक निश्चयाने दृढ असतो आणि परमात्म्याच्या स्वरूपात रंगून गेलेला असतो; तथापि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करत असतो;
69-3
तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचे भय न धरी । प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जें जें ॥69॥
तो इंद्रियांना आज्ञा करीत नाही. विषय त्यास बाधा करतील अशी भीती (त्याच्या मनात) नसते आणि ज्यावेळी जी कर्मे करायची असतात, त्या वेळी त्या कर्माचा त्याग करीत नाही
70-3.
(अधिकारानुसार प्राप्त झालेली विहित कर्माचा त्याग न करणारा)
तो कर्मेंद्रियें कर्मी । राहाटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि उर्मी । झांकोळेना ॥70॥
कर्मेंद्रिय कर्म करीत असताना तो पुरुष त्यांना आवरीत नाही, परंतु त्यामुळे निर्माण होणाऱ्या विकारांच्या बंधनात तो सापडत नाही.


71-3
(उत्पन्न होणाऱ्या विचारांनी तो लिप्त होत नाही)
तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपे । जैसे जळीं जळें न शिंपें । पद्मपत्र ॥71॥
ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने भिजत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही कामनेने लिप्त होत नाही व अविवेकरूपी (किंवा मोहरूपी) मळाने मालिन होत नाही.
72-3
तैसा संसर्गामाजि असे । सकळांसारिखा दिसे । जैसें तोयसंगे आभासे । भानुबिंब ॥72॥
(त्या कमळाप्रमाणे) त्याप्रमाणे तो प्रपंचामध्ये राहतो. तो दिसण्यास सामान्य लोकांप्रमाणे दिसतो; पण मनाने असंग असतो, जसे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनहि, पाण्याच्या संगतीत राहताना दिसतो.
73-3
तैसा सामन्यत्वें पाहिजे । तरी साधा रणुचि देखिजे । येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची ॥73॥
त्याप्रमाणे वरवर पहिले तर, तो सामान्य माणसासारखा दिसतो. त्याच्या संबंधी निश्चित विचार करू लागलो, तर त्याचे वास्तव स्वरूप काही कळू शकत नाही.(कल्पना करता येत नाही.)
74-3
ऐसां चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि तरी मुक्तु । आशापाशरहितु । वोळख पां ॥74॥
अशा लक्षणांनी युक्त असलेला (मनुष्य) जो तुला दिसेल, तो आशा-पाशरहित व मुक्त आहे, असे तू जण.
75-3
अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं । म्हणोनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूंते ॥75॥
हे अर्जुना ! तोच खरा कर्मयोगी होय. या जगात त्याचीच स्तुती होत असते. म्हणून, तू असा कर्मयोगी हो, असे मी तुला म्हणत आहे.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading