सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १६७६ ते १७०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1676-18
कीं श्लोक सर्वतीर्थ संघातु । आला श्रीगीतेगंगे आंतु । जे अर्जुन नर सिंहस्थु । जाला म्हणौनि ॥1676॥

किंवा, नर जो अर्जुन हाच जणु सिंहस्थ पर्वणीचा योग म्हणून गीतागंगेला मिळण्यासाठी हा श्लोकरूपी सर्वतीर्थमेळाच आला आहे ! 76
1677-18
कीं नोहे हे श्लोकश्रेणी । अचिंत्यचित्तचिंतामणी । कीं निर्विकल्पां लावणी । कल्पतरूंची ॥1677॥
किंवा ही श्लोकपंक्ति नसून अचिंत्य वस्तूची चित्ताला प्राप्ति करून देणारा हा चिंतामणीच होय, अथवा निर्विकल्प ब्रह्मप्राप्ति करून देणारे हे कल्पतरूच होत. 77
1678-18
ऐसिया शतें सात श्लोकां । परी आगळा येकयेका । आतां कोण वेगळिका । वानावां पां । ॥1678॥
असे एकापेक्षां एक बहारीचा असे सातशे श्लोक आहेत तेव्हा त्यांतील कोणता एकच श्लोक पुढे घेऊन त्याची प्रशंसा करावी?78
1679-18
तान्ही आणि पारठी । इया कामधेनूतें दिठी । सूनि जैसिया गोठी । कीजती ना ॥1679॥
कामधेनु म्हटल्यावर मग, तान्ही की पारठी ही दृष्टि ठेवून जशा कोणीही तिच्या गोष्टी बोलत नाही. 79
1680-18
दीपा आगिलु मागिलु । सूर्यु धाकुटा वडीलु । अमृतसिंधु खोलु । उथळु कायसा । ॥1680॥
दिवा पहिला कोणता व मागील कोणता, सूर्य धाकटा की वडील, अमृतसागर खोल कां उथळ ह्या चौकशीचा उपयोग काय? 1680

1681-18
तैसे पहिले सरते । श्लोक न म्हणावे गीते । जुनीं नवीं पारिजातें । आहाती काई? ॥1681॥
त्याप्रमाणे हे पहिले, (उत्तम) हे अखेरचे, (सामान्य) असा गीतेच्या श्लोकांचा श्रेष्ठाश्रेष्ठतेचा क्रम लावणे शक्य नाही; स्वर्गतरू पारिजाताचीं नवीजुनी पुष्पे असा भेद असतो काय? 81
1682-18
आणि श्लोका पाडु नाहीं । हें कीर समर्थु काई । येथ वाच्य वाचकही । भागु न धरी ॥1682॥
आणि इलोकांमध्ये न्यूनाधिक भाव नाहीं हें काय सिद्ध केलें पाहिजे? शिवाय तिच्यांत वाच्य व वाचक असा भेदभाव म्हणण्यासही अवसर नाही. 82
1683-18
जे इये शास्त्रीं येकु । श्रीकृष्णचि वाच्य वाचकु । हें प्रसिद्ध जाणे लोकु । भलताही ॥1683॥
कारण ह्या शास्त्रांत श्रीकृष्णच वाच्य व श्रीकृष्णच वाचक आहेत हें सामान्य जनही जाणतात. 83
1684-18
येथें अर्थें तेंचि पाठें । जोडे येवढेनि धटें । वाच्यवाचक येकवटें । साधितें शास्त्र ॥1684॥
गीतेच्या अर्थाने जे फल जोडतें तेच पाठानेही जोडतें; ह्या फलाच्या एकाच मापावरूनही वाच्य व वाचक ह्यांचे ऐक्य गीताशास्त्रानेंच सिद्ध केले आहे. 84
1685-18
म्हणौनि मज कांहीं । समर्थनीं आतां विषय नाहीं । गीता जाणा हे वाङ्ग्मयी । श्रीमूर्ति प्रभूचि ॥1685॥
म्हणून तें आतां मी सिद्ध करण्याचे कारण नाहीं; ही गीता म्हणजे दुसरे कोणी नसून प्रभूची वाङमयीमूर्ती होय असें निश्चित समजा. 85

1686-18
शास्त्र वाच्यें अर्थें फळे । मग आपण मावळे । तैसें नव्हें हें सगळें । परब्रह्मचि ॥1686॥
कोणतेही शास्त्र वाच्यपद व नंतर त्याचा अर्थ असें फलद्रूप होऊन मग आपण मावळतें; गीताशास्त्राची तशी गोष्ट नाही. हे सर्व परब्रह्मस्वरूपच आहे. 86
1687-18
कैसा विश्वाचिया कृपा । करूनि महानंद सोपा । अर्जुनव्याजें रूपा । आणिला देवें ॥1687॥
प्रभूनें विश्वकरुणत्व काय सांगावें? अर्जुनाच्या निमित्ताने लोकांना महानंदाची (ब्रह्मानंदाची) सहज प्राप्ति व्हावी म्हणन त्या निर्गुणालाही गीतेच्या रूपानें रूपास आणिलें आहे.87
1688-18
चकोराचेनि निमित्तें । तिन्ही भुवनें संतप्तें । निवविलीं कळांवतें । चंद्रें जेवीं ॥1688॥
चकोरांच्या निमित्तानें पूर्णकलायुक्त चंद्रानें तिन्ही संतप्तलोक जसे शांत करावे; 88
1689-18
कां गौतमाचेनि मिषें । कळिकाळज्वरीतोद्देशें । पाणिढाळु गिरीशें । गंगेंचा केला ॥1689॥
किंवा गौतम मुनींच्या निमित्तानें कलिकाळदोष ज्वरयुक्त जीवांच्या उद्धारार्थ शंकरांनीं गंगा मृत्युलोक आपल्या जटांपासून सोडली. 89
1690-18
तैसें गीतेचें हें दुभतें । वत्स करूनि पार्थातें । दुभिन्नली जगापुरतें । श्रीकृष्ण गाय ॥1690॥
त्या प्रमाणे, ही श्रीकृष्णधेनु आपलें वत्स जो पार्थ त्याच्यासाठीं पण जगाला पुरून उरेल अशा गीतारूपी दुग्धाचा पान्हा सोडती झाली. 1690

1691-18
येथे जीवें जरी नाहाल । तरी हेंचि कीर होआल । नातरी पाठमिषें तिंबाल । जीभचि जरी ॥1691॥
ह्या ग्रंथांत जीवाभावाने बुडी द्याल तर तद्रूपच (मोक्षरूप) व्हाल अथवा पठणाच्या निमित्ताने नुसत्या जिभेला जरी श्रम द्याल, 91
1692-18
तरी लोह एकें अंशें । झगटलिया परीसें । येरीकडे अपैसें । सुवर्ण होय ॥1692॥
तरी, लोखंड एका अंगाने परिसाला लागले तरी जसे सर्वांगाने आपोआप सुवर्णत्व पावतें. 92
1693-18
तैसी पाठाची ते वाटी । श्लोकपाद लावा ना जंव वोठीं । तंव ब्रह्मतेची पुष्टी । येईल आंगा ॥1693॥
त्याप्रमाणे, श्लोकाच्या पठणाची वाटी नुसती ओंठाला लावतां न लावतां तोंच अंगाला ब्रह्मतेची पुष्टि येईल. (आंगें ब्रह्म व्हाल) 93
1694-18
ना येणेसीं मुख वांकडें । करूनि ठाकाल कानवडें । तरी कानींही घेतां पडे । तेचि लेख ॥1694॥
किंवा पठण न करण्याच्या उद्देशाने तोंड मिटून धरून नुसते एक कुशीवर पडून रहाल तरीही, (दुसऱ्याने म्हटलेली) गीतेची नुसती अक्षरे कानावर आलीं तरी हेच म्हणजे पठनाचे फल मिळेल. 94
1695-18
जे हे श्रवणें पाठें अर्थें । गीता नेदी मोक्षाआरौतें । जैसा समर्थु दाता कोण्हातें । नास्ति न म्हणे ॥1695॥
कारण, समर्थ दाता जसा कोणाही याचकाला नकार देत नाही, त्याप्रमाणे, तिचे श्रवण घडो, पठण घडो अथवा अर्थ व्युत्पत्ति होवो, मोक्षाच्या अलीकडील फल देण्याचे गीतेला माहीतच नाहीं. 95

1696-18
म्हणौनि जाणतया सवा । गीताचि येकी सेवा । काय कराल आघवां । शास्त्रीं येरीं ॥1696॥
म्हणून, जाणत्यांसुद्धां सर्वानीं (जाणत्या नेणत्यांनी) एक गीतेचीच सेवा करावी; दुसरी सर्व शास्त्रे घेऊन करावयाचे आहे काय? 96
1697-18
आणि कृष्णार्जुनीं मोकळी । गोठी चावळिली जे निराळी । ते श्रीव्यासें केली करतळीं । घेवों ये ऐसी ॥1697॥
आणि कृष्णार्जुनांनी मोंकळेपणे ज्या स्वैर गोष्टी केल्या या जणू करतलावर घेतां याव्या इतक्या व्यासमहर्षींनी सोप्या करून ठेवल्या. 97
1698-18
बाळकातें वोरसें । माय जैं जेवऊं बैसे । तैं तया ठाकती तैसे । घांस करी ॥1698॥
माता बाळाला प्रेमाने जेऊ घालू बसली, की त्याच्या बेताचेच जसे घांस करिते.98
1699-18
कां अफाटा समीरणा । आपैतेंपण शाहाणा । केलें जैसें विंजणा । निर्मूनियां ॥1699॥
किंवा अमर्याद वायुरूपाचा आपल्या पुरता भोग घडावा म्हणून चतुर मनुष्य जसा पंखा निर्माण करितो. 99
1700-18
तैसें शब्दें जें न लभे । तें घडूनिया अनुष्टुभें । स्त्रीशूद्रादि प्रतिभे । सामाविलें ॥1700॥
त्याप्रमाणे, विस्तृत व सुट्या शब्दांनीं जो बोध होणे कठीण, तो स्त्रीशूद्रादिकांच्या बुद्धींत सहज आरूढ व्हावा अशा प्रकारची सुटसुटित अनुष्टुभ छंदात श्रीव्यासांनी त्या शब्दांची रचना केली. 1700

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *