सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १ ते २५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

॥ सार्थ ज्ञानेश्वरी:॥ अथ अष्टादशोऽध्यायः अध्याय अठरावा ॥ मोक्षसंन्यासयोग ॥

अध्याय अठरावा
1-18
जयजय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ । जन्मजराजलदजाळ । प्रभंजन ॥1॥
हे देवा ! तुम्ही निर्मळ असून आपल्या भक्तांचे सर्वथैव मंगल करणारे आहा. आणि जन्म व वार्धक्य एतद्रूपी मेघांचा नाश करणारे वायूच आहा. तुमचा जयकार असो. ॥1॥
2-18
जयजय देव प्रबळ । विदळितामंगळकुळ । निगमागमद्रुमफळ । फलप्रद ॥2॥
देवा ! तुम्ही सर्वात बलवान असून दुःखाचा समूळ नाश करणारे आहा. वेद व शास्त्ररुपी वृक्षांचे फळ असून लाभदायक आहा. तुमचा जयजयकार असो. ॥2॥
3-18
जयजय देव सकल । विगतविषयवत्सल । कलितकाळकौतूहल । कलातीत ॥3॥
देवा ! तुम्ही सम्पूर्ण असून ज्यांनी विषयाचा त्याग केला आहे, त्याच्यावर कृपा करणारे आहा व लीलेने कालाच्या क्रीडेस आपण कारण असून कालातीत असे पूर्ण आहा, तुमचा जयजयकार असो. ॥3॥
4-18
जयजय देव निश्चळ । चलितचित्तपानतुंदिल । जगदुन्मीलनाविरल । केलिप्रिय ॥4॥
देवा, तुम्ही अचल असून चंचल चित्ताच्या प्राशनाने तुमचे दोंद वाढले आहे आणि वरचेवर जग उत्पन्न करून क्रिया करण्याची तुम्हास आवड आहे, तुमचा जयजयकार असो. ॥4॥
5-18
जयजय देव निष्कळ । स्फुरदमंदानंदबहळ । नित्यनिरस्ताखिलमळ । मूळभूत ॥5॥
देवा,तुमचे रूप निव्वळ शुद्ध असून तुम्ही आनंदाला स्फूर्ती देणारे व सर्व पापांचे निरसन करणारे आहा व सर्व जगाला कारणीभूत आहा, तुमचा जयजयकार असो. ॥5॥

6-18
जयजय देव स्वप्रभ । जगदंबुदगर्भनभ । भुवनोद्भवारंभस्तंभ । भवध्वंस ॥6॥
हे देवा, तुम्ही स्वयंप्रकाश आहा; तसेच जगद्रूप मेघांचे धारण करणारे आकाशच आहा; तसेच जगद्रूप उत्त्पतीचे मूळस्तंभ असून संसाराचा नाश करणारे आहा, तुमचा जयजयकार असो. ॥6॥
7-18
जयजय देव विशुद्ध । विदुदयोद्यानद्विरद । शमदम-मदनमदभेद । दयार्णव ॥7॥
हे देवा! उपाधिरहित आहा व अविद्यारुपी बागेचा नाश करणारे हत्तीच आहा आणि शमदमेकरून काममदाचा नाश करणारे व दयेचा समुद्रच आहा, तुमचा जयजयकार असो. ॥7॥
8-18
जयजय देवैकरूप । अतिकृतकंदर्पसर्पदर्प । भक्तभावभुवनदीप । तापापह ॥8॥
हे देवा ! तुमचे एकच रूप असून तुम्ही कामरूपी सर्पाच्या गर्वाचा तिरस्कार करणारे आहा व भाविक भक्तांचे चित्तरुपी मंदिरातील दीप आहा आणि संसारतापाचा नाश करणारे आहा, तुमचा जयजयकार असो. ॥8॥
9-18
जयजय देव अद्वितीय । परीणतोपरमैकप्रिय । निजजनजित भजनीय । मायागम्य ॥9॥
हे देवा! तुमची असून तुमचे रूप अद्वितीय असून तुम्ही पूर्ण नम्र झालेल्या मनुष्यावर प्रेम करणारे आहा; व भजभक्ताधीन असून भजनास योग्य व मायेस अगम्य आहा, तुमचा जयजयकार असो. ॥9॥
10-18
जयजय देव श्रीगुरो । अकल्पनाख्यकल्पतरो । स्वसंविद्रुमबीजप्ररो । हणावनी ॥10॥
हे देवा गुरुराया, तुम्ही कल्पनातीत वस्तूंचे कल्पवृक्ष आहा व आपल्या ज्ञानवृक्षाच्या बीजाचे उत्पत्ती स्थान, आहा, तुमचा जयजयकार असो ॥10॥

11-18
हे काय एकैक ऐसैसें । नानापरीभाषावशें । स्तोत्र करूं तुजोद्देशें । निर्विशेषा ॥11॥
याप्रमाणे अनेक प्रकारच्या प्रत्यायांनी विशेषणे देण्यास योग्य नाही, असे जे सर्वविशेष भावरहित तुम्ही. त्या तुमची स्तुती किती काय? ॥11॥
12-18
जिहीं विशेषणीं विशेषिजे । तें दृश्य नव्हे रूप तुझें । हें जाणें मी म्हणौनि लाजें । वानणा इहीं ॥12॥
ज्या विशेषणाने तुमची स्तुती करावी, ते तुमचे स्पष्ट रूप नव्हे, हे मी जाणतो, म्हणून तुमच्या ह्या वर्णाची लाज वाटते. ॥12॥
13-18
परी मर्यादेचा सागरु । हा तंवचि तया डगरु । जंव न देखे सुधाकरु । उदया आला ॥13॥
परंतु समुद्राला, मर्यादा आहे, असा जो ज्याचा लौकिक आहे तो जो पर्यंत चंद्र उगवला नाही तोपर्यंतच. ॥13॥
14-18
सोमकांतु निजनिर्झरीं । चंद्रा अर्घ्यादिक न करी । तें तोचि अवधारीं । करवी कीं जी ॥14॥
सोमकांत मणी हा आपल्या स्वतःच्या उदकाने चंद्रास अर्घ्य देत नाही. तर चंद्रच त्याच्याकडून करवितो. ॥14॥
15-18
नेणों कैसी वसंतसंगें । अवचितिया वृक्षाचीं अंगें । फुटती तैं हे तयांहि जोगें । धरणें नोहे? ॥15॥
वसंत ऋतू सुरु झाल्याबरोबर वृक्षास एकदम पालवी कशी फुटते, हे समजत नाही, त्या प्रमाणे माझी हि स्थिती झाली असे का समजू नये? ॥15॥

16-18
पद्मिनी रविकिरण । लाहे मग लाजें कवण? । कां जळें शिवतलें लवण । आंग भुले ॥16॥
सूर्यविकासिनी कमल सूर्यकिरण पडताक्षणीच लज्जा सोडून प्रफुल्लीत होतो, किंवा मीठ पाण्यात घातल्यावर तद्रूप होते. ॥16॥
17-18
तैसा तूतें जेथ मी स्मरें । तेथ मीपण मी विसरें । मग जाकळिला ढेंकरें । तृप्तु जैसा ॥17॥
तसा जेंव्हा मी तुमचे स्मरण करतो, तेंव्हा आपले स्वरूप विसरून जातो. मग भोजनापासून तृप्त झालेला मनुष्य इच्छेवाचून जसा ढेकारावर ढेकर देतो. ॥17॥
18-18
मज तुवां जी केलें तैसें । माझें मीपण दवडूनि देशें । स्तुतिमिषेंच पां पिसें । बांधलें वाचे ॥18॥
तसे, हे श्रीगुरुराया माझ्या मीपणात देशांतराला दडवून म्हणजे नाहीसा करून स्तुतीच्या रूपाने माझ्या वाचेला वेड लावले आहे, अशी माझी स्थिती केली. ॥18॥
19-18
ना येऱ्हवीं तरी आठवीं । राहोनि स्तुति जैं करावी । तैं गुणागुणिया धरावी । सरोभरी कीं ॥19॥
किंवा जर मी आपल्या आठवणीने स्तुती करावी, तर तुमचे गुण व तुम्ही याची निवड केली पाहिजे. ॥19॥
20-18
तरी तूं जी एकरसाचें लिंग । केवीं करूं गुणागुणीं विभाग । मोतीं फोडोनि सांधितां चांग । कीं तैसेंचि भलें ॥20॥
तर हे प्रभो, तुम्ही एक रसाचेच बनलेले लिंग आहा, त्या आपले ठिकाणी गुणागुणी विभाग कसा करू? हे पहा, मोती फोडून ते सांधीत बसण्यापेक्षा ते मूळचे अखंड असलेले चांगले नव्हे काय?. ॥20॥

21-18
आणि बाप तूं माय । इहीं बोलीं ना स्तुति होय । डिंभोपाधिक आहे । विटाळु तेथें ॥21॥
आणि तुम्ही मायबापा आहा असे म्हटले तर या बोलण्याने स्तुती तर होणार नाहीच, पण माझ्या लेकुरपणाच्या उपाधीने आपल्या ठिकाणी भेदाचा विटाळ लागतो. ॥21॥
22-18
जी जालेनि पाइकें आलें । तें गोसावीपण केवीं बोलें? । ऐसें उपाधी उशिटलें । काय वर्णूं ॥22॥
मी तुमचा चाकर होईन असे म्हटले तर तुम्हास धनी म्हणून कसे म्हणून अशा रीतीने आपल्या उपाधीच्या योगाने उष्टे झालेले रूप त्याचे काय वर्णन करू?. ॥22॥
23-18
जरी आत्मा तूं एकसरा । हेंही म्हणतां दातारा । तरी आंतुल तूं बाहेरा । घापतासी ॥23॥
हे प्रभु तुम्ही जगदात्मा आहात असे जर एकदम तुम्हाला म्हटले तर माझ्या अंतर्यामी वास करणार्‍या तुम्हाला मी बाहेर काढल्याप्रमाणे होते. ॥23॥
24-18
म्हणौनि सत्यचि तुजलागीं । स्तुति न देखों जी जगीं । मौनावांचूनि लेणें आंगीं । सुसीना मा ॥24॥
म्हणून खरोखर पाहू गेले असता या जगात तुमची स्तुती करता येत नाही आणि मौनाशिवाय तुमच्या अंगावर इतर दागिने चढविता येत नाहीत. ॥24॥
25-18
स्तुति कांहीं न बोलणें । पूजा कांहीं न करणें । सन्निधी कांहीं न होणें । तुझ्या ठायीं ॥25॥
तर काही न बोलणे हीच आपली स्तुती काही न करणे हीच आपली पूजा आणि वेगळेपणाने न होणे या गोष्टी तुमच्या ठिकाणी संभवतात. ॥25॥

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading