सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ६५१ ते ६७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

651-18
तया परी जो अशेषा । विश्वाचिया अभिलाषा । पायपाखाळणिया दोषां । घरटा जाला ॥651॥
त्याप्रमाणे वस्तूत: पाहिले असता ही जगांतील सर्व कामाची पाय धुण्याची जागा होय, 651
652-18
म्हणौनि फळाचा लागु । देखे जिये असलगु । तिये कर्मीं चांगु । रोहो मांडी ॥652॥
म्हणून ज्या कर्मापासून इच्छित फलप्राप्ती होईल ते कर्म करण्याकडे रोख ठेवतो, 652
653-18
आणि आपण जालिये जोडी । उपखों नेदी कवडी । क्षणक्षणा कुरोंडी । जीवाची करी ॥653॥
आणि संपादन केलेल्या पदार्थांपैकी एका कवडीही खर्च करीत नाही व क्षणोक्षणी त्या पदार्थांवरून आपला जीव ओवाळून टाकतो.653
654-18
कृपणु चित्तीं ठेवा आपुला । तैसा दक्षु पराविया माला । बकु जैसा खुतला । मासेयासी ॥654॥
कृपण मनुष्य आपल्या ठेवीवर जसे नेहमी लक्ष ठेवतो, तसा हा दुसऱ्याचे पदार्थ मिळविण्याविषयी दक्ष असतो. जसा बगळा मासा धरण्याविषयी मोठा तत्पर असतो, 654
655-18
आणि गोंवी गेलिया जवळी । झगटलिया अंग फाळी । फळें तरी आंतु पोळी । बोरांटी जैसी ॥655॥
आणि बोरीचे झाड जशी जवळ गेले असता वस्त्र अडकून गुंतविते, दांडगाईने काढू लागल्यावर अंगास ओरखडते व तिची फळे पाहू गेले असता त्यात काही सार नाही, 655

656-18
तैसें मनें वाचा कायें । भलतया दुःख देतु जाये । स्वार्थु साधितां न पाहे । पराचें हित ॥656॥
तसे काया-वाचा-मने करून जो दुसऱ्यास दुःख देतो व आपले हित साधण्याकरिता दुसऱ्याचे हिताकडे लक्ष देत नाही; 656
657-18
तेवींचि आंगें कर्मीं । आचरणें नोहे क्षमी । न निघे मनोधर्मीं । अरोचकु ॥657॥
तसेच स्वतः जे कर्म आरंभिले ते निरंतर चालविण्याचा नेम नसतो व त्या कर्माविषयी ज्याच्या मनात कंटाळा येत नाही, 657
658-18
कनकाचिया फळा । आंतु माज बाहेरी मौळा । तैसा सबाह्य दुबळा । शुचित्वें जो ॥658॥
धोत्र्याच्या फळास जशी आतून भूल व बाहेरून काटे असतात, तसा जो शुचित्वाविषयी अंतर्बाह्य दरिद्री असतो; 658
659-18
आणि कर्मजात केलिया । फळ लाहे जरी धनंजया । तरी हरिखें जगा यया । वांकुलिया वाये ॥659॥
आणि अर्जुना, केलेल्या कर्माची फळ प्राप्ती झाली असता त्या आनंदाच्या भरात दुसऱ्यासं वेडावून दाखवितो, 659
660-18
अथवा जें आदरिलें । हीनफळ होय केलें । तरीं शोकें तेणें जिंतिलें । धिक्कारों लागे ॥660॥
अथवा आरंभिलेले कर्म फलद्रूप न झाले म्हणजे शोकाने त्या कर्माचा धिक्कार करतो; 660

661-18
कर्मीं राहाटी ऐसी । जयातें होती देखसी । तोचि जाण त्रिशुद्धीसी । राजस कर्ता ॥661॥
अशा रीतीने कर्माविषयी ज्याची वागणूक दृष्टीस पडेल तो राजस कर्ता होय, असे खचित खचित समज.661
662-18
आतां यया पाठीं येरु । जो कुकर्माचा आगरु । तोही करूं गोचरु । तामस कर्ता ॥662॥
आता यानंतर वाईट कर्माची खाणच असा जो तामस कर्ता, याची लक्षणे तुला कळतील, अशी सांगतो.662
अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः ।
विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते ॥18.28॥

663-18
तरी मियां लागलिया कैसें । पुढील जळत असे । हें नेणिजे हुताशें । जियापरी ॥663॥
आपल्या स्पर्शामुळे समोर येणारी जिन्नस कसे जळतात हे जसे अग्नीस समजत नाही, 663
664-18
पैं शस्त्रें मियां तिखटें । नेणिजे कैसेनि निवटे । कां नेणिजे काळकूटें । आपुलें केलें ॥664॥
अथवा आपल्या धारेने दुसऱ्याचा जीव कसा जातो, हे जसे शस्त्राला समजत नाही; किंवा आपल्या योगे दुसऱ्याचा नाश कसा होतो हे काळकुट विषाला समजत नाही, 664
665-18
तैसा पुढीलया आपुलया । घातु करीत धनंजया । आदरी वोखटिया । क्रिया जो कां ॥665॥
तसा हे धनंजया, ज्या क्रियेने आपला व दुसऱ्याचा नाश होईल, अशा वाईट क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो; 665

666-18
तिया करितांही वेळीं । काय जालें हें न सांभाळी । चळला वायु वाहटुळी । चेष्टे तैसा ॥666॥
ज्याप्रमाणे वावटळ सुटल्यावर वायू हवा तसा वाहतो, त्याप्रमाणे ती कर्मे करतेवेळी, यात काय लाभ झाला याची तो काळजी बाळगीत नाही, 666
667-18
पैं करणिया आणि जया । मेळु नाहीं धनंजया । तो पाहुनी पिसेया । कैंचीं त्राय? ॥667॥
हे बघ अर्जुना, ज्याच्या कृतीला व इच्छेला काही मिळत नसतो, असल्या तामस कर्त्याला पाहून त्याचे पुढे वेड्याची काय किंमत आहे? 667
668-18
आणि इंद्रियांचें वोगरिलें । चरोनि राखे जो जियालें । बैलातळीं लागलें । गोचिड जैसें ॥668॥
आणि बैलाचे कासरे गोचीड अगदी चिटकून राहतात, तसे इंद्रियांनी दिलेले भोग भोगून जो आपले जीवित रक्षण करतो, 668
669-18
हांसया रुदना वेळु । नेणतां आदरी बाळु । राहाटे उच्छृंखळु । तयापरी ॥669॥
ज्याप्रमाणे लहान मुलांस हासण्यास व रडण्यास वेळ लागत नाही, त्याप्रमाणे ज्याचा कृतीत काही मिळत नसतो; 669
670-18
जो प्रकृती आंतलेपणें । कृत्याकृत्यस्वादु नेणे । फुगे केरें धालेपणें । उकरडा जैसा ॥670॥
प्रकृतीचे आधीन असल्यामुळे काय करावे व काय न करावे याविषयी ज्याला ज्ञान नसते व केराने जसा उकिरडा फुगतो, तसा जो कुकर्माचा तृप्तीने फुगलेला असतो; 670

671-18
म्हणौनि मान्याचेनि नांवें । ईश्वराही परी न खालवे । स्तब्धपणें न मनवे । डोंगरासी ॥671॥
म्हणून गर्वाच्या भरांत ईश्वरास ही नम्र होत नाही व ताठ्याने डोंगराला ही तुच्छ करतो; 671
672-18
आणि मन जयाचें विषकल्लोळीं । राहाटी फुडी चोरिली । दिठी कीर ते वोली । पण्यांगनेची ॥672॥
ज्याचे मन म्हणजे केवळ विषयांच्या लाटा होत; ज्याचे आचरण नेहमी चोरटे, वरकांती दिसण्यात चांगले पण अंतर्यामी दुसऱ्याचा घात करणारे आणि दृष्टी केवळ वेश्यांच्या मालिकेप्रमाणे दिसण्यात गोड पण दुसऱ्याचे सर्वस्व हरण करणारी होय; 672
673-18
किंबहुना कपटाचें । देहचि वळिलें तयाचें । तें जिणें कीं जुंवाराचें । टिटेघर ॥673॥
किंबहुना ज्याचा सर्व देह कपटाचाच बनलेला आहे, व त्याचे आयुष्य जुगाराचे वाईट कृत्याचे माहेरघरच होय; 673
674-18
नोहे तयाचा प्रादुर्भावो । तो साभिलाष भिल्लांचा गांवो । म्हणौनि नये येवों जावों । तया वाटा ॥674॥
त्याची प्रसन्नता म्हणजे केवळ अभिलाषरूप भिल्लाचें गावच होय म्हणून त्या वाटेने कोणीही जाऊ नये.674
675-18
आणि आणिकांचें निकें केलें । विरु होय जया आलें । जैसें अपेय पया मिनलें । लवण करी ॥675॥
आणि दुसर्‍याचे चांगले झालेले पाहून ज्या स्वैर उत्पन्न होते, ज्याप्रमाणे दुधात मीठ मिळाले असता ते पिण्यास अयोग्य होते; 675

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *