सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी २५१ ते २७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , ,

251-1
जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळीं । तैसीं महापापें कुळीं । संचरती ॥251॥
ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूनी कावळे येऊन पडतात, त्याप्रमाणे महापापें (अशा) कुळात सर्व बाजूनी प्रवेश करतात. ॥251॥
252-1
सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः॥1.42॥
भावार्थ :- वर्णसंकर हा कुलक्षय करणाऱ्यांना आणि सर्व कुळाला नरकात टाकण्यास कारण होतो; कारण पिंडदान आणि तर्पणादि इत्यादी क्रियांचा लोप(लुप्त) झाल्यामुळे त्यांचे पितरसुद्धा पतन पावतात ॥42॥
मग कुळा तया अशेखा । आणि कुळघातकां । येरयेरां नरका । जाणें आथी ॥252॥
मग त्या (वर्णसंकर) संपूर्ण कुळाला आणि कुळाचा घात करणाऱ्या अशा दोघांनाही नरकात जावे लागते. ॥252॥
253-1
देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित । मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥253॥
पाहा या प्रमाणे वंशात वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते; आणि स्वर्गात असलेले पूर्वज सहजच पतन पावतात. ॥253॥
254-1
जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक क्रिया पारुखे । तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी? ॥254॥
ज्यावेळी रोज करावयाची धार्मिक कार्य (कृत्यें) बंद पडतात, विशेष प्रकारची करावयाची कर्मेही बंद पडतात. अशा परिस्थितीत पितरांना कोण बरे तिलोदक देणार? ॥254॥
2551
तरी पितर काय करिती? । कैसेनि स्वर्गीं वसती? । म्हणौनि तेही येती । कुळापासीं ॥255॥
असे झाल्यावर पितर तरी काय करणार? ते स्वर्गात कसे राहणार? म्हणून ते देखील नरकात पडलेल्या आपल्या (भ्रष्ट) कूळाजवळ येतात. ॥255॥


256-1
जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें । तेवीं आब्रह्म कुळ अवघें । आप्लविजे ॥256॥
ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष ताबडतोब (हां हां म्हणता) शेंडीपर्यंत सर्वत्र पसरते, त्याप्रमाणे एका कुळात पाप घडले, तर (ब्रम्हदेवापासूनचें पुढील सर्व) ते मूळ पुरुषापर्यंत सर्वांस पापात बुडविते. ॥256॥
257-1
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः॥1.43॥
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम॥1.44॥
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः॥1.45॥

भावार्थ :- कुलक्षय करणाऱ्यांच्या या वर्णसंकर करणाऱ्या दोषांनी शाश्वत अशा जातीधर्माचा आणि कुलधर्मचा नाश होतो. ॥43॥
हे जनार्दना ! ज्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहे त्यांना निश्चितच नरकवास भोगावा लागतो, असे आम्हीं ऐकले आहे. ॥44॥
अहो,ज्या अर्थी आम्ही राज्यसुखाच्या लोभाने स्वजनांना ठार मारण्यास तयार (उदुक्त) झालो आहोत (त्या अर्थी खरोखरच) मोठे पाप करण्यास सिद्ध (तयार) झालो आहोत. ॥45॥
देवा अवधारी आणीक एक । एथ घडे महापातक । जे संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे ॥257॥
हे देवा ! आणखीन एक गोष्ट ऎक, या वर्णसंकरामुळे आणखी एक महापातक घडते ते असे की, पतितांच्या संसर्गदोषाने इतर लोकांचे आचार-विचार भ्रष्ट होतात. ॥257॥
258-1
जैसा घरीं आपुला । वानिवसें अग्नि लागला । तो आणिकांहीं प्रज्वळिला । जाळूनि घाली ॥258॥
ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नि लागला (आग लागली) म्हणजे तो भडकलेला अग्नि दुसऱ्या घरांनाही जाळून भस्म करते. ॥258॥
259-1
तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती । तेही बाधा पावती । निमित्तें येणें ॥259॥
त्याप्रमाणे दुष्ट कुळाचा (संसर्गाने) संगतीमध्ये राहून जे जे लोक आपली कर्मे करतात, ते देखील त्या संसर्गदोषाने दूषित होऊन जातात. ॥259॥
260-1
तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे तें कुळ । मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥260॥
अर्जुन म्हणतो, त्याप्रमाणे अनेक दोषामुंळे मग त्या सर्व कुळाला भयंकर अशा नरकयातना भोगावे लागतात. ॥260॥


261-1
पडिलिया तिये ठायी । मग कल्पांतीही उकलु नाही । येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ॥261॥
अर्जुन पुढे म्हणाला, एकदा त्या नरकयातना भोगाव्या लागल्यानंतर (त्या ठिकाणी पडल्यानंतर) कल्पांतदेखील त्यांची सुटका होत नाही. इतके या कलक्षयापासून पतन होते. ॥261॥
262-1
देवा हें विविध कानीं ऐकिजे । परी अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारीं पां ॥262॥
हे देवा ! नानाप्रकारची बोलणी कानांने ऐकतोस, पण अजूनपर्यंत तुला काहीं त्रास (शिसारी येत)होत नाही. तू आपले हृदय वज्रसारखे कठोर केले आहेस काय? ॥262॥
263-1
अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक । ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना? ॥263॥
ज्या शरीरकरिता राज्यसुखाची इच्छा करायची, ते शरीर तर क्षणभंगुर आहे, असें कळत असतांनाही, अशा या घडणाऱ्या महापातकांचा त्याग करू नये काय? ॥263॥
264-1
जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां काय थेंकुलें । घडलें आम्हां? ॥264॥
हे जे समोर सर्व वाड-वडील जमले आहेत, त्यांचा वध करावा, या दृष्टीने त्यांच्या कडे पहिले, तरीसुद्धा थोडे पाप घडले काय? हे तूच सांगावे. ॥264॥
265-1
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्॥1.46॥

भावार्थ :- जर हातात शस्त्रे धारण करणारे कौरव प्रतिकार न करणाऱ्या आणि निःशत्र अशा मला, रणांगणावर ठार मारतील, तर माझे अधिक कल्याण होईल. ॥46॥
आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवें । जे शस्त्र सांडुनि साहावे । बाण यांचे ॥265॥
असे करून जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून कौरवांचें वार सहन करावेत, हे उत्तम ! ॥265॥


266-1
तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें । परी येणें कल्मषें । चाड नाहीं ॥266॥
असे केल्याने जितके दुःख भोगावे लागले तितके सहन करावे इतकेच काय; शेवटी मृत्यू जरी प्राप्त झाला, तरी (तथापि) तो अधिक चांगला; परंतु यांचे (तिथे जमलेल्या आप्तजनांचे) वध करून पातक करण्याची माझी इच्छा नाही. ॥266॥
267-1
ऐसें देखून सकळ । अर्जुनें आपुलें कुळ । मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु ॥267॥
याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हंटले की, यांचा नाश करून मिळविलेले राज्य म्हणजे केवळ नरकभोग आहे. ॥267॥
सञ्जय उवाच ।
एवमुक्त्वाऽर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः॥1.47॥

भावार्थ :- संजय म्हणाला, “रणांगणावर याप्रमाणे बोलून शोकाकुल चित्ताने धनुष्य व बाण टाकून देऊन अर्जुन रथाखाली उडी टाकून रथामागच्या भागाजवळ बसला. ॥47॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‍भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगोनाम प्रथमोऽध्यायः॥1॥
268-1
ऐसे तिये अवसरी । अर्जुन बोलिला समरीं । संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥268॥
संजय म्हणाला, हे धृतराष्टरा ! इकडे लक्ष दे. याप्रमाणे रणांगणावर उभा असलेला अर्जुन असे बोलला. ॥268॥
269-1
मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहींवरु आला । तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥269॥
मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला गहिवर आवरता आला नाही; मग त्याने रथावरून खाली उडी घातली. ॥269!!
270-1
जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहतु । कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥270॥
ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व दृष्टीने (प्रकारांनी) निस्तेज होतो किंवा जसा राहूनें ग्रासलेला सूर्य तेजरहित होतो; ॥270॥

271-1
नातरी महासिद्धिसंभ्रमें । जिंतिला तापसु भ्रमें । मग आकळूनि कामें । दीनु कीजे ॥271॥
अथवा, महासिद्धीच्या मोहाने पछाडलेला तपस्वी भुलून जातो (भुलतो) आणि मग तप सोडून कामनेच्या तडाक्यात सापडून दीन होतो. ॥271॥
272-1
तैसा तो धर्नुधरु । अत्यंत दुःखें जर्जरु । दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥272॥
त्याप्रमाणे अर्जुनाने जेंव्हा रथाचा त्याग केला, तेंव्हा तो धनुर्धारी अर्जुन दुःखाने फार पीडलेला (व्याप्त झालेला) दिसला. ॥272॥
273-1
मग धनुष्य बाण सांडिले । न धरत अश्रुपात आले । ऐसें ऐक राया वर्तलें । संजयो म्हणे ॥273॥
संजय म्हणाला, हे राजा (धृतराष्टरास) ! ऎक. तेथे (रणांगणावर) अशी गोष्ट घडली की, अर्जुनाने धनुष्यबाण टाकून दिले त्याला रडू आवरेनासे झाले. (म्हणजेच त्याच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहू लागल्या) ॥273॥
274-1
आतां यापरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणेपरी परमार्थु । निरूपील ॥274॥
आता यावर (पुढे) तो वैकुंठपती श्रीकृष्ण अर्जुनाला खिन्न, (दुःखी) झालेले पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करतील, ॥274॥
275-1
ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां । ज्ञानदेव म्हणे आतां । निवृत्तिदासु ॥275॥
ती आतां पुढे येणारी सविस्तर कथा श्रवण करण्यास फार कौतुककारक आहे, असे निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणतात. ॥275॥


॥ इति श्री ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां – अर्जुनविषादयोगोनाम् प्रथमोऽध्यायः॥1॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 47 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 275 ॥
संकलक : धनंजय महाराज मोरे
सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥

, , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *