सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ४७६ ते ४९७ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , ,

476-6
अथवा निलागें निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा । झोंबती तपिये चाडा । जयाचिया ॥476॥
अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक निराश्रित व निसरडे झालेल्या अशा तपोरूप पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरुन प्रवास करितात,
477-6
जें भजतियांसी भज्य । याज्ञिकांचे याज्य । एवं जें पूज्य । सकळां सदा ॥477॥
जे भजन करणारांच्या भजनाचे अधिष्ठान, यज्ञ करणाऱ्यांच्या यज्ञीय विषय, अशा प्रकारे सर्वास पुज्य
478-6
तेंचि तो आपण । स्वयं जाहला निर्वाण । जें साधकांचें कारण । सिद्ध तत्व ॥478॥
आणि साधकांचे सिद्धतत्त्व, ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच बनतो.
479-6
म्हणोनि कर्मनिष्ठां वंद्यु । तो ज्ञानियांसि वेद्यु । तापसांचा आद्यु । तपोनाथु ॥479॥
म्हणून, तो कर्मनिष्ठांना वंद्य व ज्ञान्यांना विचारणीय आणि तपस्व्यांचा मूळ तपोनाथ होय.
480-6
पैं जीवपरमात्मसंगमा । जयाचें येणें जाहले मनोधर्मा । तो शरीरीचि परि महिमा । ऐसी पावे ॥480॥
हे पहा की, जीव व परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्याच्या मनाचे ऐक्य झाल्याकारणाने, तो देही असुनही अशा योग्यतेस पावतो.

481-6
म्हणोनि याकारणें । तूंतें मी सदा म्हणें । योगी होई अंतःकरणें । पंडुकुमरा ॥481॥
म्हणून अर्जुना, याच कारणास्तव ‘ तूं योगी हो.’ असे मनापासुन तुला मी नेहमीं सांगत असतो.
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान् भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥ 47 ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥6॥
482-6
अगा योगी जो म्हणिजे । तो देवांचा देव जाणिजे । आणि सुखसर्वस्व माझें । चैतन्य तो ॥482॥
अरे योगी देवांचा देव, माझे सर्व सुखाचे आगर, आणि केवळ माझा प्राण असे समज
483-6
जया भजता भजन भजावें । हे भक्तिसाधन जें आघवें । ते मीचि जाहलों अनुभवें । अखंडीत ॥483॥
त्याच्या ठिकाणी भजन करणारा, भजनक्रिया व भज्य वस्तु ही भक्तीची त्रिपुटी सदोदित राहते.
484-6
मग तया आम्हां प्रीतीचें । स्वरुप बोली निर्वचे । ऐसें नव्हे गा तो साचें । सुभद्रापती ॥484॥
हे सुभद्रापते, मग त्याच्या आणि माझ्या प्रीतीचे स्वरुप वर्णन करितां येत नाही. तर असे समज की, तो म्हणजे प्रत्यक्ष मीच.
485-6
तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडें पाहिजे उपमा । तरी मी देह तो आत्मा । हेचि होय ॥485॥
अशा रीतीने जें प्रेमाचे ऐक्य झालेले असते, त्याच्या तुलनेला उपमा पाहिजे असली तर मी देह व तो आत्मा याशिवाय दुसरी उपमा नाही!

486-6
ऐसे भक्तचकोरचंद्रें । त्रिभुवनैकनरेंद्रे । बोलिलें गुणसमुद्रें । संजयो म्हणे ॥486॥
संजय म्हणतो :- राजा भक्तरूप चकोरांचा चंद्र किंवा सर्व त्रिभुवनाचा राजा, व गुणांचा समुद्र जो श्रीकृष्ण परमात्मा, तो असे बोलला.
487-6
तेथ आदिलापासोनि पार्था । ऐकिजे ऐसीचि आस्था । दुणावली हें यदुनाथा । पावों सरले ॥487॥
तेथे पार्थाला पूर्वीपासून योगाचे ऐश्वर्य ऐकण्याची आस्था होतीच; ती पुनः दुप्पट झाली, असे यदुनाथाने मनांत जाणले,
488-6
कीं सावियाचि मनीं तोषला । जे बोला आरिसा जोडला । तेणें हरिखें आतां उपलवला । निरुपील॥488॥
आणि ते पाहून श्रीकृष्णाच्या मनांत सहज आनंद झाला की, मी जे सांगतो, ते प्रत्यक्ष पाहण्याचा अर्जुन हा आरसाच होय.तेव्हां आतां या आनंदाचे भरात ते पुढील कथा सांगतील.
489-6
तो प्रसंगु आहे पुढां । जेथ शांतु दिसे उघडा । तो पालविजेल मुडा । प्रमेयबीजांचा ॥489॥
तो प्रसंग पुढे असुन त्यांत शांतिरस स्पष्ट दिसेल; व ज्ञानरुप बीजाचा मुढा उघडा होईल.
490-6
आनजें सात्विकाचेनि वडपें । गेलें आध्यात्मिक खरपें । सहजें निरोळले वाफे । चतुरचित्ताचे ॥490॥
जे ज्ञानबीज पेरण्याकरिंता सत्त्वगुणाची वृष्टि होऊन, व आध्यात्मीक तापांचे गुंतडे वाहून जाऊन, चतुर श्रोत्यांच्या चित्तांचे वाफे सहज तयार झाले,

491-6
वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनयाऐसा । म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृतीसी ॥491॥
त्यावर सोन्यासारखी अवधानाची वाफसा साधल्यामुळे श्रीनिवृत्तिनाथांना ते ज्ञानरूप बीज पेरण्याची उत्कंठा उत्पन्न झाली.
492-6
ज्ञानदेव म्हणे मी चाडें । सद्गुरुंनी केलें कोडें । माथां हात ठेविला तें फुडें । बीजचि वाइलें ॥492॥
ज्ञानदेव म्हणतात :- ते बिज पेरण्याकरिंता सद्गुरूंनी माझी मोठ्या कौतुकाने चाड्याच्या ठिकाणी योजना केली, व माझ्या मस्तकावर हात ठेवून ते बीज चाड्यांत घातले.
493-6
म्हणऊनि येणे मुखें जें जें निगे । तें संतांच्या हृदयीं साचचि लागे । हें असो सांगों श्रीरंगे । बोलिले जें ॥493॥
म्हणून, या माझ्या मुखांतून जे जे काही निघेल, ते संतांच्या मनाला खरेच भासते. हे असो, आता श्रीरंग जे काही बोलले, ते पुढे सांगेन
494-6.
परी ते मनाचा कानी ऐकावें । बोल बुद्धीचां डोळां देखावें । हे सांटोवाटीं घ्यावें । चित्ताचिया ॥494॥
परंतु ते लक्ष देऊन ऐका. बुद्धीने त्याचा विचार करा. त्याला चित्त अर्पण करुन त्याचा अर्थ घ्या,
495-6
अवधानाचेनि हातें । नेयावें हृदयाआंतौते । हे रिझवितील आयणीतें । सज्जनांचिये ॥495॥
व अवधानरूप हाताने ते आपल्या ह्रदयांत सांठवा; म्हणजे सज्जनांच्या मनाला हे रमविणारे आहे.


496-6
हे स्वहितातें निवविती । परिणामातें जीवविती । सुखाची वाहविती । लाखोली जीवां ॥496॥
ह्या बोलापासून नित्य आत्मप्राप्ति होईल, संकटातून मुक्तता होईल, व जीवाला सुखप्राप्ति होईल.
497-6
आतां अर्जुनेंसीं श्रीमुकुंदे । नागर बोलिजेल विनोदें । तें वोंवियेचेनि प्रबंधें । सांगेन मी ॥497॥
आता, श्रीमुकुंद अर्जुनाला विनोदाने जे काही सर्वोत्कृष्ट ज्ञान सांगितील, ते मी ओवी नामक कवितेत तुम्हांला सांगेन.

॥ इति श्री ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां – आत्मसंयमयोगोनाम्
षष्ठोऽध्यायः॥6॥

, , , , , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading