सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी २२६ ते २५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

226-3
हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध । परी कृमीदोषीं विरुद्ध । घेपें केवीं॥226॥
दूध आणि साखर याची गोडी सर्वाना ठाऊकच आहे, परंतु जंतांच्या रोगात (पोटाचा आजार, कृमिदोष) त्यांचा वाईट परिणाम होत असल्यामुळे, असा रोग असणाऱ्या मनुष्याने ते पदार्थ कसे बरे सेवन करावेत.??
227-3
ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते आळुकीची उरेल । जे तें परिणामीं पथ्य नव्हेल । धनुर्धरा ॥227॥
अर्जुना ! असे असूनही रोग्याने त्याचे सेवन केले, तर त्याचा तो हट्टच ठरेल; कारण परिणामी ते पदार्थ हितकारी होणार नाहीत.
228-3
म्हणोनि आणिकांसी जे विहीत । आणि आपणपेयां अनुचित । तें नाचरावे जरी हित । विचारिजे ॥228॥
म्हणून इतरांना जे विहित पण आपणास जे अयोग्य कर्म आहे, त्याचे आचरण करू नये. (हिताचा विचार केला असता त्याचे आचरण करू नये)
229-3
या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जीविता । तोहि निका वर उभयतां । दिसतसे ॥229॥
स्वधर्मचे आचरण करीत असताना आपला जीव जरी अर्पण करावा लागला, तरी तो यालोकी (मृत्युलोकात) आणि परलोकात हा धर्म श्रेष्ठ मानला जातो.
230-3
ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ श्रीशार्ङगपाणी । तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥230॥
सर्व देवांत श्रेष्ठ असलेले देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण ज्या वेळी असे बोलले, त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा ! माझी एक विनंती ऐका.


231-3
हे जे तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसलें । परी आतां पुसेन कांही आपलें । अपेक्षित ॥231॥
तुम्ही जे सर्व आतापर्यंत सांगितलें तें मी सर्व बरोबर ऐकले आहे, पण आता माझी काही विचारायची इच्छा आहे ते मी विचारतो. ॥231॥
अर्जुन उवाच:
अथ केन प्रयुकोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥3.36 ॥

232-3
तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांचीही स्थिति भ्रंशे । मार्गु सांडुनि अनारिसे । चालत देखों ॥232॥
तरी देवा! हे आश्चर्यच आहे की ज्ञानी जे म्हणवितात ते देखिल विहित मार्ग सोडून भलत्या मार्गाने चाललेले व विहित मार्गापासून भ्रष्ट झालेले दिसतात. ॥232॥
233-3
सर्वज्ञुही जे होती । हे उपायही जाणती । तेही परधर्मे व्यभिचरति । कवणें गुणें ॥233॥
जे सर्वज्ञ आहेत व जे आपल्या कल्याणाचा मार्ग जाणतात तेहि स्वधर्म सोडून परधर्माने वागतांना जे दिसतात ते कशामुळे? ॥233॥
234-3
बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणे जेसा । नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ॥234॥
बी आणि कोंडा यांचा निवाडा अंधळ्याला करता येणार नाही, पण केव्हा केव्हा क्षणभर डोळस पुरुषही चुकतो तें कां? ॥234॥
235-3
जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करितां न धाती । वनवासीही सेविती । जनपदातें ॥235॥
जे पुरुष, असलेला आप्तेष्टांचा संग सोडून दुसर्‍याचा संसर्ग लावून घेतांना पुरे म्हणत नाहीत, लोकसंसर्ग सोडून जंगलात राहायला गेलेले पुरुषही पुनः लोकांतच राहू इच्छितात. ॥235॥


236-3
आपण तरी लपती । सर्वस्वे पाप चुकविती । परी बळात्कारें सुइजती। तयाचि माजीं ।।236।।
पाप कर्मे चुकविण्यासाठी लपून बसतात (त्यापासून दूर पळतात) तेच पुन्हा पापाचरणाला वृत्त होतात. ।।236।।
237-3
जयांची जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जिवेंसीं । चुकविती ते गिंवसी । तयातेंचि ।।237।।
ज्या पापाचा मनापासून तिटकारा करतात, त्याचाच ध्यास घेऊन बसतात. आणि ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा, तेच आपल्याला नेमके शोधीत येते. ।।237।।
238-3
ऐसा बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे । हें बोलावें ह्रषिकेशें । पार्थु म्हणे ।।238।।
अशा प्रकारे पापाचरण करण्याविषयी ज्ञानी पुरुषावर बळजोरी केली जाते, तर हा कोणाचा आग्रह आहे? ” ते श्रीकृष्णा, कृपा करून मला सांग ” असे अर्जुन म्हणाला. ।।238।।
श्रीभगवानुवाच:
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥3.37 ॥

239-3
तंब ह्रदयकमळ आरामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ।।239।।
ह्रदयरूपी कमलात राहणारा, योग्याच्या निष्काम मनातील कामना असलेला श्रीकृष्ण म्हणाला, ” अर्जुना, तुला ह्या प्रशनाचे समाधान करणारे उत्तर सांगतो ते ऐक. ।।239।।
240-3
तरी हे काम क्रोधु पाहीं । जयांतें कृपेची साठवण नाहीं । हे कृतांताचां ठायीं । मानिजती ।।240।।
तर असे पहा, हे काम-क्रोध असे आहेत की, ज्याच्या ठिकाणी अंशमात्रसुद्धा दयाबुद्धी नाही. ते केवळ काळाप्रमाणे निष्ठुर आहेत. ।।240।।


241-3
हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरांचे वाघ । भजनमार्गीचे मांग । मारक जे ॥241॥
हे ज्ञानरूपी संपत्तीवर बसलेले विषारी महासर्प आहेत, विषयरूपी पर्वताच्या गुहेत राहणारे महाभयानक वाघ आहेत आणि भजनमार्गाचे ते मारेकरी आहेत.
242-3
हे देहदुर्गीचे धोंड । इंद्रियग्रामीचे कोंड । यांचे व्यामोहादिक बंड । जगामाजि ॥242॥
हे देहरूपी डोंगरी किल्याचे मोठाले दगड आहेत, इंद्रियरूपी गावाच्या भोवती असलेले तट आहेत; आणि सर्व जगामध्ये भ्रम, अविचार इत्यादी उत्पन्न करण्यात ते प्रबळ आहेत.
243-3
हे रजोगुण मानसाचे । समूळ आसुरियेचे । धायपण ययांचे । अविद्या केले ॥243॥
हे मनात असलेल्या (काम, क्रोध) रजोगुणाचे परिणाम आहेत व मुळापासूनच आसुरी संपत्तीचे आहेत; यांचे पालन पोषण अविद्येने केले आहे.(अविद्येने यांना जन्म दिला आहे)
244-3
हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले । तेणें निजपद यां दिधले । प्रमादमोह ॥244॥
हे रजोगुणापासून उत्पन्न झाले असले, तरी ते तमोगुणाला हे अत्यन्त प्रिय आहेत; म्हणून तमोगुणाने प्रमाद व मोह हे आपले निजपद यांना बहाल केली आहेत.
245-3
हे मृत्यूचां नगरीं । मानिजति निकियापरी । जे जीविताचे वैरी । म्हणऊनियां॥245॥
हे मानवाच्या जीवाचे मोठे शत्रू आहेत; म्हणून मृत्यूच्या नगरीत हे श्रेष्ठ मानले जातात.


246-3
जयांसि भुकेलियां आमिषा । हें विश्व न पुरेचि घांसा । कुळवाडी यांची आशा । चाळित असे ॥246॥
यांना भूक लागली असता हे संपूर्ण विश्व त्यांच्या एका घासालादेखील पुरेसे पडत नाही (एक घासाचेही हे विश्व नाही). उपभोगांची इच्छा म्हणजे आशा ही त्यांची (काम, क्रोधांचा) नाशकारक व्यवहार चालवीत असते. (या व्यापाऱ्यांवर देखरेख आशा करते)
247-3
कौतुकें कवळितां मुठीं । जिये चौदा भुवनें थेंकुटीं । तें भ्रांति तिये धाकुटी । वाल्हीदुल्ही ॥247॥
जी आपल्या लीलेने चौदा भुवने मुठीत धरू शकते, हिच्या मुठीपेक्षा चौदा भुवणेदेखील लहान आहेत, अशी ही भ्रांती या आशेची आवडती लहान बहीण आहे.
248-3
जे लोकत्रयाचें भातुके । खेळताचि खाय कवतिकें । तिच्या दासीपणाचेनि बिकें । तृष्णा जिये ॥248॥
ही भ्रांती खेळता खेळता तिन्ही लोक सहज खाऊन टाकते, त्या भ्रांतीच्या दासीपणाचे बळावर इच्छारुपी तृष्णा ही जगत असते.
249-3
हें असो मोहे मानिजे । यांते अहंकार घेपे दीजे । जेणे जग आपुलेनि भोजें । नाचवित असे ॥249॥
हे असो, या काम क्रोधानां मोहाच्या घरी खूप मान आहे. जो अहंकार आपल्या इच्छेप्रमाणे जगाला नाचवीत असतो, तो अहंकार यांच्याशी देवाण घेवाण करतो.
250-3
जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला । तो दंभु रूढविला । जगीं इहीं ॥250॥
ज्याने सत्याचा कोथळा फाडून त्यात असत्याचा पेंढा भरला, तो दंभ, या कामक्रोधानी जगात प्रसिद्धीस आणला.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *