सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी १२६ ते १५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

126-2
या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥126॥
या विश्वामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रुपाने आहे.(असे गुप्त रुपाने असलेले चैतन्य जे) तत्व जाणणारे (तत्वज्ञानी) संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात.
127-2
सलिलीं पय जैसें । एक होऊनि मीनलें असे । परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥127॥
ज्याप्रमाणे दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात मिसळून गेलेलं असते, तरी पण राजहंस ज्याप्रमाणे पाण्यातून दूध निवडून वेगळे करतो.
128-2
कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ । निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥128॥
किंवा (सोनार) सुवर्णजाणकार अग्नीच्या साहाय्याने हिणकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून काढतात;.
129-2
ना तरी जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ॥129॥
अथवा, चतुरपणाने दही घुसळल्यानंतर (दह्यातून लोणी वेगळी करण्याची प्रक्रिया), ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीस पडते.
130-2
कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ॥130॥
किंवा एकत्र झालेले (धान्यात मिसळलेला टरफल, व्यर्थ केर) भूस व धान्य उफणलें (पाकडल्यानंतर) धान्य खाली राहून (व्यर्थ कचरा) फोलकट निघून जाते.
(धान्य निवडण्याची प्रक्रिया).


131-2
तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियांसि ॥131॥
याप्रमाणें विचार केला, तर अनित्य प्रपंच सहजपणे नाहीसा होतो आणि मग ज्ञानी पुरुषांना एक तत्व (ब्रम्ह) मात्र उरते.
132-2
म्हणौनि अनित्याच्या ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं । निष्कर्षु दोहींही । देखिला असे ॥132॥
म्हणून ज्यांनी (ज्ञानी पुरुषांनी) सत आणि असत या दोन्हीमधील सार ओळखले (निष्कर्ष जाणला), त्यांचा अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी, त्या नित्य आहेत, असा निश्चय नसतो.
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥2.17॥

ज्याने हे सारे विश्व व्यापलेले आहे, ते अविनाशी आहे आणि त्याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही.
133-2
देखें सारासार विचारितां । भ्रांति ते पाहीं असारता । तरी सार तें स्वभावता । नित्य जाणें ॥133॥
पाहा सारसाराचा (सूक्ष्म) विचार केला असता, असारता ही भ्रांती आहे आणि सार हे स्वभावतः नित्य आहे, असे जाण.
134-2
हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु । तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाहीं ॥134॥
या तिन्ही लोकांत ज्याचा विस्तार आहे, त्याला नाम, वर्ण, आकार, अशी कांही (लक्षणे) नाहीत.
135-2
जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु । तया केलियाहि घातु । कदा नोहे ॥135॥
जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्ममरणरहित आहे. त्याचा नाश करू म्हटल्यास त्याचा नाश कधीहि होणार नाही.
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥2.18॥

नित्य, अविनाशी व अगम्य अशा जिवात्म्याचे हे देह, त्या सर्व देहास नाशवंत म्हंटले आहे. म्हणून हे अर्जुना या नाशवंत देहाचा विचार मनात न आणता तू युद्ध कर.


136-2
आणि शरीरजात आघवें । हें नाशिवंत स्वभावें । म्हणौनि तुवां झुंजावें । पंडुकुमरा ॥136॥
शरीर म्हणून जेवढे आहे, तेवढे सगळे नाशवंत आहे. म्हणून हे अर्जुना ! तू युद्ध करावे हे हिताचे आहे.
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥2.19॥
हा आत्मा मारणारा आहे असे जो समजतो. मरणारा आहे असें जो समजतो, त्या दोघांनाही खरे कळत नाही, हा कोणाला मारीत नाही किंवा कोणाकडून मारला जात नाही.
137-2
तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि शरीरातें । मी मारिता हे मरते । म्हणतु आहासी ॥137॥
तू देहाच्या जागी मी असा अभिमान ठेवला आहेस. दुसऱ्याच्या शरीरावर हे माझे आहेत, अशा दृष्टी तू ठेवली आहेस. मी मारणारा आहे आणि हे कौरव मरणारे आहेत, असें तू म्हणत आहेस.
138-2
तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी । तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥138॥
तरी अर्जुना, तुला खरे सत्य समजत नाही. जर तू ज्ञानाने सूक्ष्म विचार करून पाहशील, तर मारणारा नाहीस आणि हे मारले जाणार नाहीत, हे तुझ्या लक्षात येईल.
न जायते म्र्यिते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥2.20॥
हा आत्मा कधी जन्म पावत नाही अथवा कधी मृत्यू पावत नाही. हा एकदा उत्पन्न होऊन पुनः नाश होणारा आहे, असेही नाही. हा जन्मरहित, नित्य, क्षयरहित व अनादि आहे. शरीराचा नाश झाला असता याचा नाश होत नाही.
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥2.21॥

हे पार्था ! या आत्म्याला जो नाशरहित, जन्मरहित, नित्य व क्षयरहित असे जाणतो, तो आत्मज्ञानी पुरुष कोणाला मारणार तरी कसा? व कोणाला मारण्यास प्रवृत्त तरी करणार कसा??
139-2
जैसें स्वप्‍नामाजीं देखिजे । तें स्वप्‍नींचि साच आपजे । मग चेऊनियां पाहिजे । तंव कांहीं नाहीं ॥139॥
ज्याप्रमाणे स्वप्नात जे कांही दिसते ते स्वप्नातच खरे वाटते, पण मग जागे होऊन जेंव्हा पाहतो, त्या वेळी ते काहिच दिसत नाही.
140-2
तैसी हे जाण माया । तूं भ्रमतु आहासी वायां । शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगीं न रुपे ॥140॥
त्याप्रमाणे ही केवळ माया आहे असे समज. तू व्यर्थ (या मायेच्या)भ्रमात पडला आहेस. ज्याप्रमाणे एखाद्या शस्त्राने देहाच्या सावलीला मारल्यास शरीराला घाव लागत नाही.


141-2
कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला । परी भानु नाहीं नासला । तयासवें ॥141॥
किंवा पाण्याने भरलेला घडा पालथे केल्यावर त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहिसे झालेले दिसते; पण खरा सूर्य नाहिसा झालेला नसतो.
142-2
ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरले असे । तो भंगलिया आपैसे । स्वरूपचि ॥142॥
किंवा, ज्याप्रमाणे आकाश हे मठामध्ये मठाच्या आकाराचे झालेले दिसते;.(मठाच्या आकृतीचा झालेला दिसतो);पण मठ मोडल्या नंतर (तो आकार नष्ट होत नाही) ते आकाश आपल्या मूळ रूपात राहते.
143-2
तैसें शरीराचां लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं । म्हणऊनि तूं हें नारोपीं । भ्रांति बापा ॥143॥
त्याच प्रमाणे शरीर नाश पावले, तरी मूळ आत्म्याचा कधीच नाश होत नाही. म्हणून बाबा ! तू स्वरूपाच्या ठिकाणी (आत्मा जन्माला आला आणि आत्मा मरण पावला)जन्म- मरण हा भ्रांतीचा आरोप करू नकोस.
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नावानि देही ॥2.22॥

भावार्थ:- ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून दुसरे नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे जीवात्मा हा जीर्ण झालेले शरीर (टाकून देऊन) सोडून देतो आणि दुसरे नवीन शरीर धारण करतो.
144-2
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसे देहांतराते स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥144॥
(मनुष्य) ज्याप्रमाणे, जूनी कपडे टाकून देतो आणि नवीन वस्त्रे घालतो धारण करतो, त्या प्रमाणे हा चैतन्यनाथ आत्मा जीर्ण देह टाकून दुसर्‍या नवीन देहाचा स्विकार करतो.
नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥2.23॥

भावार्थ:- या आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाहीत,अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वायू सुकवू शकत नाही.
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः॥2.24॥
भावार्थ :- हा आत्मा तोडता, जाळता, भिजवता,आणि सुकवताही येत नाही. हा निःसंशय (आत्मा) नित्य, सर्वव्यापी,स्थिर,अचल आणि सनातन आहे.
145-2
हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥145॥
हा आत्मा जन्म-मरणरहित असून नित्य (शाश्वत असणारा) उपाधिरहित व अत्यंत शुद्ध आहे. म्हणून याचा शस्त्रादिकांनी ही घात करता येत नाही.
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि॥2.25॥

भावार्थ :-हा आत्मा अव्यक्त :- (इंद्रियांना अगोचर, अदृश्य), अचिंत्य :- (मनाने न समजणारा, किंवा ज्याचा विचार किंवा तर्क करता येत नाही, गूढ), अविकारी :- (विकाररहित, कधीहि न बदलणारा) असे आहे.म्हणून अशा प्रकारच्या आत्म्याला जाणल्यावर तुला शोक करणे योग्य नाही.


146-2
हा प्रळयोदके नाप्लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥146॥
हा आत्मा प्रलयकाळच्या पाण्यानेही बुडत नाही. हा अग्नीने जळणारा नाही. तसेच वायूमध्ये देखील याला शुष्क करण्याची शक्ती नाही.
147-2
अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु । सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा॥147॥
म्हणून हे अर्जुना ! हा आत्मा नित्य, स्थिर व शाश्वत असून सर्व ठिकाणी (स्वयंप्रकाशित) परिपूर्ण व्यापक रूपाने भरलेला आहे.
148-2
हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरिटी । ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥148॥
आत्मा हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसणारा नाही, ध्यान तर या आत्म्यास भेटण्यासाठी उत्कंठित (उत्कट इच्छा) झालेले असते.
149-2
हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना । निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥149॥
हे अर्जुना ! हा आत्मा मनास नेहमीच दूर्लभ (म्हणजे मनाने जाणता येत नाही), कोणत्याही साधनाने प्राप्त न होणारा आहे. हे पुरषोत्तमा, हा आत्मा अनंत आहे.
150-2
हा गुणत्रयरहितु । व्यक्तीसी अतीतु । अनादि अविकृतु । सर्वरूप ॥150॥
हा आत्मा तीन गुणांनी (सत्व, रज,तम) रहित आहे, अनादि आहे, विकाररहित आहे, आणि आकाराच्या पलीकडचा विकार न पावणारा सर्वव्यापी असा आहे.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading