सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २६ ते ५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

26-18
तरी जिंतलें जैसें भुली । पिसें आलापु घाली । तैसें वानूं तें माऊली । उपसाहावें तुवां ॥26॥
तर तसा एखादा मनुष्य भ्रांतीयुक्त होऊन वेडेपणाने बडबड करितो त्याच प्रकारचे माझे वर्णन आहे तर हे गुरुमाऊली तुम्ही ते सहन करावे. ॥26॥
27-18
आतां गीतार्थाची मुक्तमुदी । लावीं माझिये वाग्वृद्धी । जे माने हे सभासदीं । सज्जनांच्या ॥27॥
आता तुम्ही माझ्या वाणी कडून गीतार्थ वाढेल म्हणून जे स्पष्ट होईल अशी मुद्रा (शिक्का) लावा म्हणजे मी सांगितलेला अर्थ या सज्जनांचे सभेत मान्य होईल.॥27॥
28-18
तेथ म्हणितलें श्रीनिवृत्ती । नको हें पुढतपुढती । परीसीं लोहा घृष्टी किती । वेळवेळां कीजे गा ॥28॥
तेव्हा श्री निवृत्ति महाराज म्हणाले की, “तू अशी वारंवार आमची विनंती करू नको अरे लोखंडाचे सुवर्ण करण्याकरिता परी सावरते लोखंड वरचेवर का घालावे लागते”॥28॥
29-18
तंव विनवी ज्ञानदेवो । म्हणे हो कां जी पसावो । तरी अवधान देतु देवो । ग्रंथा आतां ॥29॥
तेंव्हा ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केली की महाराज आपला हाच प्रसाद व्हावा की, मी जो आता गीतेचा अर्थ सांगणार आहे त्याकडे देवांनी लक्ष द्यावे. ॥29॥
30-18
जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा । सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊं जो ॥30॥
गीताग्रंथ हे रत्नखचित देवालय असून त्याचा कळस अर्थरूपी चिंतामणीचा आहे, तो असा की, ज्याचे दर्शनाने गीतेच्या दर्शनाचे फळ मिळते. ॥30॥

31-18
लोकीं तरी आथी ऐसें । जे दुरूनि कळसु दिसे । आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये ॥31॥
जगात रूढीही अशीच आहे की कळसाचे दुरून दर्शन घेतले असता देवालयातील देवतेच्या भेटीचे फळ प्राप्त होते. ॥31॥
32-18
तैसेंचि एथही आहे । जे एकेचि येणें अध्यायें । आघवाचि दृष्ट होये । गीतागमु हा ॥32॥
तसाच येथेही प्रकार आहे की जो एकच अध्याय वाचला असता सर्व गीता शास्त्रच वाचल्याचे श्रेय येते ॥32॥
33-18
मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें । उवाइला बादरायणें । गीताप्रासादा ॥33॥
याच कारणास्तव मी या अठराव्या अध्यायास कशाची कळसाची उपमा दिली आहे कारण जो कळस वेदव्यासांनी गीतारूपी देवालयावर बसविला आहे, ॥33॥
34-18
नोहे कळसापरतें कांहीं । प्रासादीं काम नाहीं । तें सांगतसे गीता ही । संपलेपणें ॥34॥
देवालयावर कळस चढविल्यावर मग त्याचे जसे कोणतेही काम करावयाचे उरत नाही तसेच हा अठरावा अध्याय गीता संपविली असे दर्शवितो. ॥34॥
35-18
व्यासु सहजें सूत्री बळी । तेणें निगमरत्नाचळीं । उपनिषदार्थाची माळी- । माजीं खांडिली ॥35॥
व्यास हे स्वभावताच श्रेष्ठ त्यांनी मोठ्या कुशलतेने सूत्रे रचली आणि वेदरूपी रत्नाच्या पर्वतावर उपनिषदार्थाच्या माळ जमिनीत खणती केली. ॥35॥

36-18
तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु । तो महाभारतप्राकारु । भोंवता केला ॥36॥
त्या माळ जमिनीत धर्म, अर्थ व काम एतदृपी भिन्नभिन्न आकाराचे पुष्कळ गडगळ गोटे निघाले, त्या धोंड्यांचा महाभारतरुपी देवालयाचे भोवती तट बांधला. ॥36॥
37-18
माजीं आत्मज्ञानाचें एकवट । दळवाडें झाडूनि चोखट । घडिलें पार्थवैकुंठ- । संवाद कुसरी ॥37॥
नंतर आत्मज्ञानरुपी एकसारखे उत्तम चिरे कृष्णार्जुन संवादरूपी चातुर्याने घडले. ॥37॥
38-18
निवृत्तिसूत्र सोडवणिया । सर्व शास्त्रार्थ पुरवणिया । आवो साधिला मांडणिया । मोक्षरेखेचा ॥38॥
मग निवृत्तीरूपी दोरीने आणखी करून सर्व शास्त्राची पुरणी घालून मोक्षमार्यादेचा आकार साधाला. ॥38॥
39-18
ऐसेनि करितां उभारा । पंधरा अध्यायांत पंधरा । भूमि निर्वाळलिया पुरा । प्रासादु जाहला ॥39॥
याप्रमाणे देवालयाची रचना करीता करीता पंधरा अध्यायापर्यंत पंधरा थर होऊन गाभाऱ्याच्या भिंती डेऱ्यापर्यंत येवून ठेपल्या. ॥39॥
40-18
उपरी सोळावा अध्यायो । तो ग्रीवघंटेचा आवो । सप्तदशु तोचि ठावो । पडघाणिये ॥40॥
पुढे सोळावा अध्याय हा गळमण्याचा आकार असून. सतरावा अध्याय पडघानी कळसाची बैठक होय. ॥40॥

41-18
तयाहीवरी अष्टादशु । तो अपैसा मांडला कळसु । उपरि गीतादिकीं व्यासु । ध्वजें लागला ॥41॥
त्यात पडघाणीवर अठरावा अध्यायरुपी सहजच कळस उत्तम रीतीने बसवून त्यावर व्यासकृत गीता हा ध्वज उभारला आहे ॥41॥
42-18
म्हणौनि मागील जे अध्याये । ते चढते भूमीचे आये । तयांचें पुरें दाविताहे । आपुल्या आंगीं ॥42॥
म्हणून मागचे जे अध्याय ते एकावर एक चढते थर असून त्यांचे आपल्या योगाने पूर्णता झाली, हे हा अठरावा अध्याय दाखवतो ॥42॥
43-18
जालया कामा नाहीं चोरी । ते कळसें होय उजरी । तेवीं अष्टादशु विवरी । साद्यंत गीता ॥43॥
कोणतेही पुरे झालेले काम चोरून न ठेवता कळसाच्या योगाने स्पष्ट दृष्टीस पडते, तसे अठराव्या अध्यायात साद्यंतगीतेचे वर्णन आहे ॥43॥
44-18
ऐसा व्यासें विंदाणियें । गीताप्रासादु सोडवणिये । आणूनि राखिले प्राणिये । नानापरी ॥44॥
याप्रमाणे व्यासांनी कुशलतेने गीतारूपी देवालय तयार करून प्राणीमात्रांचा नानाप्रकारे उद्धार केला ॥44॥
45-18
एक प्रदक्षिणा जपाचिया । बाहेरोनि करिती यया । एक ते श्रवणमिषें छाया । सेविती ययाची ॥45॥
कोणी बाहेरून प्रदक्षिणा करून जप करितात, (गीतेचा पाठ करितात) कोण श्रवणरूप छायेत देवालयाचे भिंतीस टेकून बसतात ॥45॥

46-18
एक ते अवधानाचा पुरा । विडापाऊड भीतरां । घेऊनि रिघती गाभारां । अर्थज्ञानाच्या ॥46॥
कोणी अवधानरुपी विडा व पैसा घेऊन देवळाच्या अर्थ ज्ञानरूपी गाभार्‍यात शिरतात ॥46॥
47-18
ते निजबोधें उराउरी । भेटती आत्मया श्रीहरी । परी मोक्षप्रासादीं सरी । सर्वांही आथी ॥47॥
ते आत्मबोधाच्या योगाने जगदात्मा श्रीहरीची सत्वर भेट घेतात; परंतु मोक्षरुपी देवालयात सर्वांची योग्यता सारखीच आहे ॥47॥
48-18
समर्थाचिये पंक्तिभोजनें । तळिल्या वरील्या एकचि पक्वान्नें । तेवीं श्रवणें अर्थें पठणें । मोक्षुचि लाभे ॥48॥
समर्थांचे घरी भोजनास गेले असता पंगतीत वरच्या खालच्या पानावर ज्याप्रमाणे एक सारखीच पक्वाने असतात (पंक्तीभेद नसतो) त्याप्रमाणे गीता श्रवण करणारास, अर्थ जाणणारास, व पठण करणारास, मोक्ष प्राप्त होतो ॥48॥
49-18
ऐसा गीता वैष्णवप्रासादु । अठरावा अध्याय कळसु विशदु । म्यां म्हणितला हा भेदु । जाणोनियां ॥49॥
असो; गीता ग्रंथ हा विष्णूचे देवालय असून अठरावा अध्याय हा त्यावरील उघड कळस आहे, असा भेद मी जाणूनबुजून केला ॥49॥
50-18
आतां सप्तदशापाठीं । अध्याय कैसेनि उठी । तो संबंधु सांगो दिठी । दिसे तैसा ॥50॥
आता सतराव्या अध्यायापर्यंत सर्व अध्यायांची कशी उभारणी झाली आहे ते तुमच्या दृष्टीस पडेल असे समजून सांगतो ॥50॥

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

2 Comments

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading