सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ८२६ ते ८५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

826-18
जैसें बापें जोडिलें लेंका । वांटिलें सूर्यें मार्ग पांथिका । नाना व्यापार सेवकां । स्वामी जैसें ॥826॥
ज्याप्रमाणे बापाने मिळविलेली संपत्ती मुलांना वाटून देतात, किंवा सूर्य वाटसरूस त्यांचे त्यांचे मार्ग दाखवून देतो, अथवा स्वामी सेवकांस भिन्नभिन्न व्यवहार सांगतो, 826
827-18
तैसी प्रकृतीच्या गुणीं । जया कर्माची वेल्हावणी । केली आहे वर्णीं । चहूं इहीं ॥827॥
त्याप्रमाणे, प्रकृतीचे जे गुण, त्यांनी कर्मांचा विस्तार करून त्यांची चार वर्णांचे ठिकाणी वाटणी केली; 827
828-18
तेथ सत्त्वें आपल्या आंगीं । समीन-निमीन भागीं । दोघे केले नियोगी । ब्राह्मण क्षत्रिय ॥828॥
त्याठिकाणी सत्वगुणाने आपल्या सम विषम मार्गाने ब्राह्मण व क्षत्रिय हे दोन वर्ण उत्पन्न केले; 828
829-18
आणि रज परी सात्त्विक । तेथ ठेविलें वैश्य लोक । रजचि तमभेसक । तेथ शूद्र ते गा ॥829॥
आणि रजोगुण व सत्वगुण यांच्या मिश्रणाने वैश्य वर्ण उत्पन्न झाला; 829
830-18
ऐसा येकाचि प्राणिवृंदा । भेदु चतुर्वर्णधा । गुणींचि प्रबुद्धा । केला जाण ॥830॥
अशाप्रकारे हे प्रबुद्धा, एकरूपच असा प्राणीमात्रांचा गुणांनी चार प्रकारचा भेद केला आहे, असे समज. 830

831-18
मग आपुलें ठेविलें जैसें । आइतेंचि दीपें दिसे । गुणभिन्न कर्म तैसें । शास्त्र दावी ॥831॥
मग आपली ठेवलेली वस्तू जशी दिव्याच्या उजेडाने सहज दिसते, तसे गुणांनी वेगळे झालेले कर्म शास्त्रांत स्पष्ट सांगितले आहे; 831
832-18
तेंचि आतां कोण कोण । वर्णविहिताचें लक्षण । हें सांगों ऐक श्रवण- । सौभाग्यनिधी ॥832॥
हे भाग्यवंता, कोणत्या वर्णाला कोणती विहित कर्म तेच तुला आता सांगतो. ते ऐक. 832
शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च ।
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ॥18.42॥

833-18
तरी सर्वेंद्रियांचिया वृत्ती । घेऊनि आपुल्या हातीं । बुद्धि आत्मया मिळे येकांतीं । प्रिया जैसी ॥833॥
(शम:) प्रिया ज्याप्रमाणे आपल्या पतीशी एकांती भेटते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातात घेऊन जी बुद्धी आत्मस्वरूपी मिळते; 833
834-18
ऐसा बुद्धीचा उपरमु । तया नाम म्हणिपे शमु । तो गुण गा उपक्रमु । जया कर्माचा ॥834॥
आता जो बुद्धीचा लीनपणा, त्याला ‘ शम’ असे म्हणतात, तो सर्व गुणांमध्ये प्रथम असून त्याजपासून सर्व कर्मांचा आरंभ होतो. 83
835-18
आणि बाह्येंद्रियांचें धेंडें । पिटूनि विधीचेनि दंडें । नेदिजे अधर्माकडे । कहींचि जावों ॥835॥
(दम) आणि जो बाह्य इंद्रियांना विधीचा दंड करून अधर्माच्या मार्गाला कधीही जाऊ देत नाही, 835

836-18
तो पैं गा शमा विरजा । दमु गुण जेथ दुजा । आणि स्वधर्माचिया वोजा । जिणें जें कां ॥836॥
तो शमाला साह्यकर्ता असा दुसरा, ‘दम’ गुण होय. तो इंद्रियांना स्वधर्माने चालवितो. 836
837-18
सटवीचिये रातीं । न विसंबिजे जेवीं वाती । तैसा ईश्वरनिर्णयो चित्तीं । वाहणें सदा ॥837॥
(तप:) जसे षष्ठीपूजनाचे रात्री दिव्याला विसंबत नाहीत, तसे सर्वकाळ चित्तांत ईश्वर स्वरूपाचा विचार करणे, 837
838-18
तया नाम तप । ते तिजया गुणाचें रूप । आणि शौचही निष्पाप । द्विविध जेथ ॥838॥
त्याला ‘तप’ असे म्हणतात; आणि हा ब्राह्मण कर्माचा तिसरा गुण आहे. (शौचम्) आणखी शौच म्हणजे पवित्रपणा. हा निष्पाप असून दोन प्रकारचा आहे. 838
839-18
मन भावशुद्धी भरलें । आंग क्रिया अळंकारिलें । ऐसें सबाह्य जियालें । साजिरें जें कां ॥839॥
मन हे शुद्ध भावाने भरलेले असून सर्व शरीर सत्कर्माने सुशोभित आहे, तसा अंतर्बाह्य शुचिपणा भरलेला आहे. 839
840-18
तया नाम शौच पार्था । तो कर्मीं गुण जये चौथा । आणि पृथ्वीचिया परी सर्वथा । सर्व जें साहाणें ॥840॥
त्याला पार्था,’शौच’ असे म्हणतात व तो ब्रह्म कर्मापैकी चौथा गुण होय. (क्षाती) आणि पृथ्वीप्रमाणे नेहमी सर्व दुःखे सहन करणे. 840

841-18
ते गा क्षमा पांडवा । गुण जेथ पांचवा । स्वरांमाजीं सुहावा । पंचमु जैसा ॥841॥
त्याला अर्जुना,’क्षान्तिक्षमा’ असे म्हणतात सप्तस्वरात पंचमस्वर जसा अति मधुर आहेत असा ब्राह्मण कर्मातील हा पाचवा गुण होय. 8041
842-18
आणि वांकडेनी वोघेंसीं । गंगा वाहे उजूचि जैसी । कां पुटीं वळला ऊसीं । गोडी जैसी ॥842॥
(आर्जवम्) आणि गंगेचा ओघ जरी वाकडा असला, तरी तो ज्याप्रमाणे सरळच आहे; किंवा उसाची पेरी जरी वाकडी असली, तरी त्याची गोडी ज्याप्रमाणे सारखीच असते, 842
843-18
तैसा विषमांही जीवां- । लागीं उजुकारु बरवा । तें आर्जव गा साहावा । जेथींचा गुण ॥843॥
त्याप्रमाणे आपल्यास त्रास देणाऱ्या जीवावरही अत्यंत प्रीति असणे यास आर्जवम् असे म्हणतात; व हा ब्राह्मणकर्मापैकी सहावा गुण होय. 843
844-18
आणि पाणियें प्रयत्नें माळी । अखंड जचे झाडामुळीं । परी तें आघवेंचि फळीं । जाणे जेवीं ॥844॥
(ज्ञानम्) आणि -माळी कष्ट करून झाडांचे मुळास पाणी लावतो, त्याचे श्रम जसे फळे आल्यावर सार्थकी लागतात. 844
845-18
तैसें शास्त्राचारें तेणें । ईश्वरुचि येकु पावणें । हें फुडें जें कां जाणणें । तें येथ ज्ञान ॥845॥
तसे शास्त्रोक्त आचरणाने ईश्वरप्राप्तीच व्हायची हे ज्यांना समजते, ते ज्ञान होय. 845

846-818
तें गा कर्मीं जिये । सातवा गुण होये । आणि विज्ञान हें पाहें । एवंरूप ॥846॥
ते ज्ञान ब्रह्मकर्मापैकी सातवा गुण होय; आणि त्याचप्रमाणे विज्ञानाचे लक्षण असे आहे. 846
847-18
तरी सत्वशुद्धीचिये वेळे । शास्त्रें कां ध्यानबळें । ईश्वरतत्त्वींचि मिळे । निष्टंकबुद्धी ॥847॥
(विज्ञान) तर शास्त्रविचाराने व ध्यानाचा अभ्यासाने ईश्वरस्वरूपी जी बुद्धी, सप्तशुद्धीच्या वेळी निश्चयाने मिळते, 847
848-18
हें विज्ञान बरवें । गुणरत्न जेथ आठवें । आणि आस्तिक्य जाणावें । नववा गुण ॥848॥
तिला विज्ञान असे म्हणतात व ते ब्रह्मकर्मापैकी आठवे गुणरत्न होय. (आरितक्यम्) आणि आस्तिक्य नववा गून असे समज. 848
849-18
पैं राजमुद्रा आथिलिया । प्रजा भजे भलतया । तेवीं शास्त्रें स्वीकारिलिया । मार्गमात्रातें ॥849॥
हे पहा, राजमुद्राकित मनुष्य कोणीही असला, तरी त्याची सर्व लोक सेवा करतात, त्याप्रमाणे शास्त्राने जे मार्ग स्वीकारले आहेत, 849
850-18
आदरें जें कां मानणें । तें आस्तिक्य मी म्हणें । तो नववा गुण जेणें । कर्म तें साच ॥850॥
ते मार्ग आदराने मानून त्याप्रमाणे आचरण करणे, यालाआस्तिक्य असे मी म्हणतो. तो ब्राह्मणकर्मापैकी नववा गुण होय व याच गुणाने ब्राह्मणकर्म सर्व खरे होते. 850

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *