1126-18
पैं जेव्हांही असे किडाळ । तेव्हांही सोनेंचि अढळ । परी तें कीड गेलिया केवळ । उरे जैसें ॥1126॥
मिश्रित सोने देखील केव्हांही स्वरूपतः सोनेपणांत कमी नसतेच, पण त्यातील कीट गेलें म्हणजे जसे त्याचे शुद्ध स्वरूपदर्शन होते. 26
1127-18
हां गा पूर्णिमे आधीं कायी । चंद्रु सावयवु नाहीं? । परी तिये दिवशीं भेटे पाहीं । पूर्णता तया ॥1127॥
अरे, पौणिमेच्यापूर्वी कोणत्याही तिथीस चंद्र काय संपूर्ण नसतो? परंतु त्याच्या पूर्णत्वचा व्यवहार मात्र पौणिमेच्याच दिवशी होतो. 27
1128-18
तैसा मीचि ज्ञानद्वारें । दिसें परी हस्तांतरें । मग दृष्टृत्व तें सरे । मियांचि मी लाभें ॥1128॥
त्याप्रमाणे, ज्ञानाचा व्यवहार करणाऱ्या अंतःकरणाला होणारे सर्व दर्शन हे माझेच दर्शन होय; पण ते अप्रत्यक्ष किंवा परोक्ष होय, खरें नव्हे; पण जेव्हां माझी मला यथार्थदर्शन होते, त्यावेळीं द्रष्टा दृश्यत्वादि सर्व व्यवहार लोपतो. 28
1129-18
म्हणौनि दृश्यपथा- । अतीतु माझा पार्था । भक्तियोगु चवथा । म्हणितला गा ॥1129॥
म्हणून अर्जुना, हा जो माझा चौथा ज्ञानरूप भक्तियोग, तो कोणत्याही दृष्टीच्या टप्यांत न येणारा (पलीकडील) आहे असे आम्ही सांगितले. 29
भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥18.55॥
1130-18
या ज्ञान भक्ति सहज । भक्तु एकवटला मज । मीचि केवळ हें तुज । श्रुतही आहे ॥1130॥
ह्या सहज ज्ञानभक्तीने माझा भक्त मजपाशी ऐक्य पावतो-नव्हे-तो केवळ मद्रूपच होतो. हें तूही ऐकिलें आहेसच. 1130
1131-18
जे उभऊनियां भुजा । ज्ञानिया आत्मा माझा । हे बोलिलों कपिध्वजा । सप्तमाध्यायीं ॥1131॥
कारण, अर्जुना, (सातव्या अध्यायांत) + “ ज्ञानी हा माझा आत्माच होय ” असे आम्हीं बाहु उभारून प्रतिपादिले आहे. 31
1132-18
ते कल्पादीं भक्ति मियां । श्रीभागवतमिषें ब्रह्मया । उत्तम म्हणौनि धनंजया । उपदेशिली ॥1132॥
म्हणूनच, त्या उत्तम भक्तीचा कल्पारंभीं मीं भागवतरूपाने ब्रह्मदेवास उपदेश केला. 32
1133-18
ज्ञानी इयेतें स्वसंवित्ती । शैव म्हणती शक्ती । आम्ही परम भक्ती । आपुली म्हणो ॥1133॥
हिलाच ज्ञानी ” स्वसंविति ” असे म्हणतात, तर शैव “ शक्ति ” असे म्हणतात; व आम्ही ही आमची ‘ परमभक्ति’ होय असे म्हणतों. 33
1134-18
हे मज मिळतिये वेळे । तया क्रमयोगियां फळे । मग समस्तही निखिळें । मियांचि भरे ॥1134॥
त्या क्रमयोग्यांना,माझ्याशी ऐक्य पावते वेळीं, ही भक्ति फलद्रूप होते व मग सर्व जग मद्रूपच आहे असे त्यांच्या प्रत्ययास येते. 34
1135-18
तेथ वैराग्य विवेकेंसी । आटे बंध मोक्षेंसीं । वृत्ती तिये आवृत्तीसीं । बुडोनि जाय ॥1135॥
अशा स्थितींत वैराग्य विवेकासह व बंध हा मोक्षाच्या कल्पनेसह नाहीसा होतो; आणि वृत्ति ब्रह्माचिंतनादि अभ्यासासह लोप पावते. 35
1136-18
घेऊनि ऐलपणातें । परत्व हारपें जेथें । गिळूनि चाऱ्ही भूतें । आकाश जैसें ॥1136॥
पण आकाशस्वरूपांत जसे एकही भूत नाहीं अथवा यांतील एकाहो भूताशी त्याचा जसा संबंध नाही, त्या-प्रमाणे श्रेष्ठ (परत्व), कनिष्ठ (ऐलपण) भावांचा संबंध जेथे पोंचू शकत नाही, म्हणजे हारपतो. 36
1137-18
तया परी थडथाद । साध्यसाधनातीत शुद्ध । तें मी होऊनि एकवद । भोगितो मातें ॥1137॥
त्याप्रमाणे, अलीकडील अगर पलीकडील साधनांनीं प्राप्त न होणारें असें जें माझे शुद्ध साध्यस्वरूप, हे आपण होऊन, हा चौथ्या भक्तीचा अधिकारी माझा भोग घेतो. (मद्रूप असतो) 37
1138-18
घडोनि सिंधूचिया आंगा । सिंधूवरी तळपे गंगा । तैसा पाडु तया भोगा । अवधारी जो ॥1138॥
समुद्राला मिळेपर्यंत गंगापणाने असणारी गंगा, जशी समुद्राला मिळाल्यावर भिन्न न राहतां प्रकारचा सागरपणा भोगते, तशाच प्रकारचा त्याचा हा भोग होय असे समज. 38
1139-18
कां आरिसयासि आरिसा । उटूनि दाविलिया जैसा । देखणा अतिशयो तैसा । भोगणा तिये ॥1139॥
किंवा एका आरशासमोर दुसरा आरसा स्वच्छ करून ठेविला, तर, त्याने दृश्याःपेक्षां द्रष्टेपणाच्याच भोगांत भर पडल्यासारखें होते. (कारण दोघेही प्रतिबिंबग्राहक द्रष्टेच आहेत ) (तसा नित्यात्मदर्शी दोन व्यक्तींच्या भेटीचा भोग समजावा) 39
1140-18
हे असो दर्पणु नेलिया । तो मुख बोधुही गेलिया । देखलेंपण एकलेया । आस्वादिजे जेवीं ॥1140॥
हा दृष्टान्त असो; समोरील आरस नेल्याने त्यांतील मुखप्रतिबिंबही जरी गेले, तरी, त्याच्या द्वारे झालेल्या आपल्याच मुखाच्या दर्शनाचा भोग जसा एक आपल्याच ठिकाणीं भोगीत असतो. 1140
1141-18
चेइलिया स्वप्न नाशे । आपलें ऐक्यचि दिसे । ते दुजेनवीण जैसें । भोगिजे का ॥1141॥
जागे झाल्यावर स्वप्नांतील द्वैतव्यवहार नाहीसा होऊन आपल्या एकपणाचा भोग जसा द्वैतप्रतीतीवांचून आपणच भोगतो. 41
1142-18
तोचि जालिया भोगु तयाचा । न घडे हा भावो जयांचा । तिहीं बोलें केवीं बोलाचा । उच्चारु कीजे ॥1142॥
भोक्ताच जर भोग्य झाला तर भोग कसा घडणार, अशी ज्यांना शंका असेल त्यांना आम्ही असें विचारतों कीं, तुम्ही ” शब्द ’ ह्या शब्दाचा शब्दानेच कसा बोध अगर उच्चार करितां? 42
1143-18
तयांच्या नेणों गांवीं । रवी प्रकाशी हन दिवी । कीं व्योमालागीं मांडवी । उभिली तिहीं ॥1143॥
त्यांच्या गांवी सूर्योदय झाल्याचे दिव्याच्या सहाय्याने ठरवितात कीं काय न कळे; अथवा आकाश कोसळू नये म्हणून ते कदाचित् मांडवही घालीत असतील. 43
1144-18
हां गा राजन्यत्व नव्हतां आंगीं । रावो रायपण काय भोगी? । कां आंधारु हन आलिंगी । दिनकरातें? ॥1144॥
अहो, ज्याला राजेपणाचे कधीं स्वप्नही पडत नाही, त्याला राजेपणाच्या भोगाची काय कल्पना येणार? अंधकाराला कधीं सूर्यदर्शन घडत असतें कां? 44
1145-18
आणि आकाश जें नव्हे । तया आकाश काय जाणवे? । रत्नाच्या रूपीं मिरवे । गुंजांचें लेणें? ॥1145॥
आकाश नसलेला पदार्थ आकाशाची सर्वव्यापकता कशी जाणणार? गुंजांच्या दागिन्यांना कधी रत्नांच्या दागिन्यांची सर येईल काय? 45
1146-18
म्हणौनि मी होणें नाहीं । तया मीचि आहें केहीं । मग भजेल हें कायी । बोलों कीर ॥1146॥
म्हणून मद्रूप नसणाराला जर माझाच ठावठिकाणा नसतो, तर तो माझे भजन करील ही भाषाच कशी बोलतां यावी? 46
1147-18
यालागीं तो क्रमयोगी । मी जालाचि मातें भोगी । तारुण्य कां तरुणांगीं । जियापरी ॥1147॥
अरे ज्याप्रमाणे तरुण स्त्रीच्या आंगच्या तारुण्याचा तिलाच भोग घडत असतो, तसा, ह्या क्रमयोग्याला मद्रूप होऊनच माझा भोग घडत असतो. 47
1148-18
तरंग सर्वांगीं तोय चुंबी । प्रभा सर्वत्र विलसे बिंबीं । नाना अवकाश नभीं । लुंठतु जैसा ॥1148॥
(औपाधिक भेदांतील भोग असा असतो) तरंगाला जशी सर्वांगानं अगर सर्व पाण्यांची भेट असते, प्रभा सर्वत्र बिंबरूपानेंच मिरवत असते, अथवा आकाशानें लोळण घेणे झाल्यास आकाशांतच जसें ते घेतले पाहिजे. 48
1149-18
तैसा रूप होऊनि माझें । मातें क्रियावीण तो भजे । अलंकारु का सहजें । सोनयातें जेवीं ॥1149॥
त्याप्रमाणे तो मद्रुप होऊन कोणतीही क्रिया न करितां, त्याला माझ भजन घडतें; अरे, अलंकार ही जसा नित्यच सुवर्णाचे भजन करीत असतो म्हणजे त्याच्याशी अनन्य असतो. 49
1150-18
का चंदनाची द्रुती जैसी । चंदनीं भजे अपैसी । का अकृत्रिम शशीं । चंद्रिका ते ॥1150॥
किवा चंदनाच्या सुगंधाला जसे आपोआप चंदनाचे भजन घडत असते, किंवा चंद्रप्रभा सहजच चंद्ररूप असते. 1150
Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण