सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी १०१ ते १२५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , ,

101-1
हा सुभद्राहृदयनंदनु । जो अपरु नवार्जुनु । तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखें द्रोणा ॥1-101॥
दुर्योधन पुन्हा म्हणाला, हे द्रोणाचार्य ! सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा तिचा मुलगा प्रतिअर्जुन असा अभिमन्यू पाहा. ॥101॥
102-1
आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर । मिती नेणिजे परी अपार । मीनले असती ॥1-102॥
शिवाय, द्रौपदीचे पुत्रही रणांगणात आले आहेत. हे सर्वही योद्धे महारथी आणि शूरवीर आहेत. पांडवांच्या सेनेत आणखी किती वीर आहेत हे मला माहित नाही; परंतु असंख्य अपरिचित पराक्रमी वीर येथे जमले आहेत. ॥102॥
103-1
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते॥1.7॥

भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च॥1.8॥

भावार्थ :-हे द्विजश्रेष्ठा ! आता आपल्या सैन्यातील जे प्रमुख सेनापती आहेत, त्यांची नावे आपल्या माहिती साठी सांगतो, तरी श्रवण करावे. ॥7॥
स्वतः पितामह भीष्मांचार्य,कर्ण, सदैव विजयी असे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, आणि युद्धजेता सोमदत्ताचा पुत्र भुरिश्रवा हे आहेत. ॥8॥
आतां आमुच्या दळीं नायक । जे रूढवीर सैनिक । ते प्रसंगें आइक । सांगिजती ॥1-103॥
आता आमच्या सैन्यातील प्रसिद्ध असे शूर सैनिक, सेनाप्रमुख जे आहेत त्यांचीही नावे प्रसंगाच्या अनुरोधाने सांगतो, ते आपण ऐकावे. ॥103॥
104-1
उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी । तुम्ही आदिकरूनी । मुख्य जे जें ॥104॥
तुम्ही आदी करून जे प्रमुख वीर आहात, त्यापैकी एक-दोन नावे थोडक्यात सांगतो. ॥104॥
105-1
हा भीष्म गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानु । रिपुगजपंचाननु । कर्णवीरु ॥1-105॥
पराक्रमाने सूर्यासारखा तेजस्वी असणारा असा हा गंगेचा पुत्र म्हणजे भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला जणू काही सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण आपल्या सेनेमध्ये आहे. ॥105॥

106-1
या एकेकाचेनी मनोव्यापारें । हें विश्व होय संहरे । हा कृपाचार्यु न पुरे । एकलाचि ॥1-106॥
या एकाच्याही फक्त मनात आले, तर या विश्वाचा संहार होऊन जाईल. एवढेच काय, एकटे कृपाचार्यदेखील हे कृत्य करू शकतील. ॥106॥
107-1
एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें । याचा आडदरु सदां वाहे । कृतांतु मनीं ॥1-107॥
येथे विकर्ण महावीर आहे. तो पाहा, पलीकडे अश्वत्थामा आहे. काळाला देखील सदैव याची भीती वाटत असते. ॥107॥
108-1
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः॥1.9॥

भावार्थ:- याशिवाय अनेक महावीर आहेत, जे माझ्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देण्यास तयार आहेत. त्यांच्याजवळ विविध प्रकारची शस्त्रास्त्रे आहेत आणि ते सर्व युद्धकलेमध्ये निपुण आहेत. ॥9॥
समितिंजयो सौमदत्ती । ऐसे आणीकही बहुत आहाती । जयांचिया बळा मिती । धाताही नेणें ॥1-108॥
त्याचप्रमाणे विजयश्री प्राप्त करणारा सोमदत्ताचा पुत्र भुरिश्रवा व त्यासारखे असे आणखीन खूप महावीर आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रम्हदेवालाही समजू शकत नाही. ॥108॥
109-1
जे शास्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त । हो कां जें अस्त्रजात । एथूनि रूढ ॥109॥
हे अस्त्रविद्येमध्ये तरबेज आहेत, जणू काही मंत्रविद्येचे प्रत्येक्ष अवतारच आहेत. यांच्यापासूनच अस्त्रविद्देचा प्रसार होऊन ती रूढ झाली आहेत. ॥109॥
110-1
हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगीं । हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगीं । परी सर्व प्राणें मजलागीं । आरायिले असती ॥1-110॥
या जगात हे अप्रतिम योद्धे आहेत. त्यांच्या अंगी पुरेपुर बळ, सामर्थ्य आहे. असे हे सर्व वीर असूनही ते जिवावरती उदार होऊन माझ्या बाजूला येऊन मिळालेले आहेत. ॥110॥

111-1
पतिव्रतेचें हृदय जैसें । पतिवांचूनि न स्पर्शे । मी सर्वस्व या तैसें । सुभटांसी ॥1-111॥
ज्याप्रमाणे पतिव्रतेचे हृदय शुद्ध असते, ते मनाने देखील पतीशिवाय कोणाला स्पर्श करत नाही, त्याप्रमाणे या शूरवीरांना मीच सर्वस्व आहे. ॥111॥
112-1
आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें । ऐसे निरवधि चोखडें । स्वामिभक्त ॥1-112॥
आमच्या या कार्यापुढे यांना आपल्या जीवाचेदेखील काहीं वाटत नाही. ते प्राणाची पर्वा करत नाहीत. ते निस्सीम स्वामिभक्त आहेत. ॥112॥
113-1
झुंजती कुळकणी जाणती । कळे किर्तीसी जिती । हे बहु असो क्षात्रनीति । एथोनियां ॥113॥
हे सर्व युद्धकलेत कुशल आहेत; त्यामुळे जय मिळवून कीर्ती निर्माण करणारे आहेत. क्षात्रधर्म मुळात त्यांच्यापासूनच निर्माण झाला आहे. ॥113॥
114-1
ऐसे सर्वांपरि पुरते । वीर दळीं आमुते । आतं काय गणूं यांतें । अपार हे ॥1-114॥
याप्रमाणे युद्धकलेत परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. ते अपार असल्यामुळे त्यांची गणना करता येत नाही ॥114॥
115-1
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्॥1.10॥

भावार्थ:-आमचे सैन्य अमर्यादित असून तिचे भीष्मांनी रक्षण केले आहे आणि पांडवांचे सैन्य मर्यादित असून तिचे रक्षण भीमाने केले आहे. ॥10॥
शिवाय, क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगात प्रसिद्ध असलेले असे योद्धे जे भीष्माचार्य आहेत, त्यांना सैन्याचे आधिपत्य दिले आहे. ॥115॥
वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु । तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासि पैं ॥1-115॥
शिवाय, क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगात प्रसिद्ध असलेले असे योद्धे जे भीष्माचार्य आहेत, त्यांना सैन्याचे आधिपत्य दिले आहे. ॥115॥

116-1
आतां याचेनि बळें गवसलें । हे दुग जैसे पन्नासिलें । येणें पाडें थेकुलें । लोकत्रय ॥1-116॥
भीष्माचार्यांनी या सैन्याची अशी काहीं रचना केली आहे की, सुरक्षिततेसाठी जणू काही मजबुत असे किल्लेच उभारले आहेत. यांच्यासमोर त्रैलोक्यदेखील तोकडे वाटते. ॥116॥
117-1
आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं । मग वडवानळु तैसे याही । विरजा जैसा ॥1-117॥
समुद्र हा मुळातच सर्वांना भीतिदायक आहे आणि त्या समुद्राला जर वडवानळाने साहाय्य केले, तर तो अधिकच भयानक होणार. ॥117॥
118-1
ना तरीं प्रळयवन्ही महावातु । या दोघां जैसा सांधातु । तैसा हा गंगासुतु । सेनापति ॥1-118॥
प्रलयकाळचा महान अग्नी आणि प्रलयकाळचा महाभयंकर वारा या दोघांचा जसा संयोग घडावा, त्याप्रमाणे हा गंगापुत्र आहे; आणि त्याला सेनापतिपद मिळालेले आहे. ॥118॥
119-1
आतां येणेंसि कवण भिडे । हें पांडवसैन्य कीर थोकडें । परि वरचिलेनि पाडें । दिसत असे ॥1-119॥
तरी आमच्या सैन्याबरोबर कोण बरे लढू शकेल? आम्ही वर्णन केलेल्या सैन्यापुढे पांडवांचे सैन्य अपुरे दिसत आहे. ॥119॥
120-1
वरी भीमसेनु बेथु । तो जाहला असे सेनानाथु । ऐसें बोलोनियां मातु । सांडिली तेणें ॥1-120॥
शिवाय युद्धातील कैशल्य न जाणणारा भीम हा पांडव-सैन्याचा अधिपती झाला आहे. दुर्योधनाने एवढे बोलून सैन्याचे वर्णन थांबविले. ॥120॥

121-1
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥1.11॥

भावार्थ :- म्हणून सर्व प्रवेश मार्गावर आपापल्या नेमलेल्या जगी उभ्या असलेल्या आपण सर्वांनी पितामह भीष्माचार्याचे रक्षण करावे. ॥11॥
मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांतें म्हणितलें । आतां दळभार आपुलाले । सरसे करा ॥1-121॥
मग पुन्हा दुर्योधन सर्व सेनांप्रमुखाना म्हणाला, आता आपापल्या सैन्याला सज्य करा. ॥121॥
122-1
जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आरणी । वरगण कवणकवणी । महारथीया ॥1-122॥
ज्या प्रमुख सेनापतीँच्या सत्तेखाली ज्या अक्षौहिणी सेना आहेत, त्यांनी आपल्या सेनेवर युद्ध संपेपर्यँत पूर्ण नियंत्रण ठेवावे. विशेष सेनापती म्हणून जे महारथी आहेत. ॥122॥
123-1
तेणें तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे । द्रोणातें म्हणे पाहिजे । तुम्ही सकळ ॥1-123॥
त्यांनी सर्व सैन्यावर देखरेख करावी. तसेच प्रमुख सैनिकांनी भीष्म सांगतील, त्याप्रमाणे वागावे. दुर्योधन एवढे बोलून द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वावर लक्ष ठेवावे. ॥123॥
124-1
हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा । येणें दळभारु आघवा । साचु आमुचा ॥1-124॥
भीष्माचार्याचे सर्वांनी मिळून रक्षण करावे. माझ्याप्रमाणे त्याना रक्षणीय मानावे. त्यांच्यामूळे आमची सर्व सेना विजय प्राप्त करण्यास समर्थ आहे. ॥124॥
125-1
तस्य संजनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् ॥1.12॥

भावार्थ:- दुर्योधनाच्या मनात हर्ष निर्माण करणारे, कौरवांत वडील असलेले आणि महापराक्रमी आजोबा भीष्म यांनी मोठ्याने सिंहासमान गर्जना केली आणि शंखनिनाद केला. ॥12॥
या राजयाचिया बोला । सेनापति संतोषला । मग तेणें केला । सिंहनादु ॥125॥
दुर्योधन राजाचे बोलणे ऐकून सेनापती भीष्माचार्यानां संतोष झाला आणि त्यांनी सिहंनादासमान गर्जना केली. ॥125॥

, , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *