सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

351-2
म्हणोनि आपुलीं आपणपेया । जरी ये इंद्रिये येती आया । तरी अधिक कांही धनंजया । सार्थक असे ॥351॥
म्हणून हे धनंजया ! आपली ही इंद्रियें आपल्याच स्वाधीन झाली, (इंद्रियावर विजय प्राप्त केला,) तर यापेक्षा जीवनाचे अधिक सार्थक ते काय आहे?? (याहुन मोठे मिळवावयाचें आहे काय??)
352-2
देखे कूर्म जियापरी । उवाइला अवयव पसरी । ना तरी इच्छावशें आवरी । आपणपेंचि ॥352॥
असे पाहा की, ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले (हातपाय इत्यादी) अवयव पसरते किंवा मनात आले, तर अवयव आवरून घेत असते. (स्वइच्छेने)
353-2
तैसीं इंद्रिये आपैती होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥353॥
त्याप्रमाणे ज्यांची इंद्रियें ताब्यात असतात (स्वाधीन), व तो म्हणेल त्या आज्ञेनुसार वागतात, त्यांची बुद्धी स्थिरत्वास पावली आहे, असे समज.
354-2
आता आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह । अर्जुना तुज सांगेन । परिस पां ॥354॥
अर्जुना ! आता स्थिरबुद्धी प्राप्त झालेल्या (पूर्णावस्थेस प्राप्त झालेल्या) पुरुषाला ओळखण्याची आणखी एक सूक्ष्म गूढ (सहसा लक्षात न येणारी) लक्षण तुला सांगतो. ऐक हो.
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानां सा निशा पश्यतो मुनेः॥2.69॥
भावार्थ :- सर्व भूतमात्रांची जी रात्र आहे, अशा वेळी संयमी पुरुष जागरूक असतो व ज्याठिकाणी प्राणिमात्र जागृत असतात त्यावेळी ज्ञानवान मुनि निद्रेत असतो. (म्हणजेच क्षणभंगूर अशा सांसारिक सुखामध्ये सर्व भूतमात्र जगतात, ती ज्ञानी मुनींची रात्र असते.)
355-2
देखे भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें । आणि जीव जेथ चेइले । तेथ निद्रित तो ॥355॥
सर्व प्राणीमात्र ज्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी निजलेले (अज्ञानी) असतात. (स्थिरबुद्धि पुरूषांना) त्याठिकाणी ज्याला (आत्मस्वरूपाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्याला) उजाडलेले असते; आणि जीव ज्या (व्यवहारिक, देहादि विषयसुखाच्या) प्रपंचाच्या प्राप्ती साठी (प्राणीमात्र) जागे असतात, त्या विषयसुखाचे ठिकाणी जो (स्थिरबुद्धी पुरुष) निजलेला असतो.(विषयसुखात रस नसलेला)]


356-2
तैसा तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि । तोचि जाणे निरवधि । मुनीश्वर ॥356॥
हे अर्जुना ! तोच खरा उपाधिरहित (आत्मज्ञानी पुरुषाला कोणत्याही प्रकारची उपाधी नसते) होय.त्याचीच बुद्धी स्थिर झालेली आहे आणि तोच मुनीं विश्वचैतन्याशी एकरूप झालेला असतो. (तोच मुनींश्वर आहे) असें समज.
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी॥2.70॥
भावार्थ :- ज्याप्रमाणे समुद्रात, सर्व बाजुंनी किंवा समुद्र चोहो बाजुंनी भरत असतानाही जो आपली मर्यादा सोडत नाही, तो स्थिर असतो. त्याप्रमाणे ज्या पुरुषामध्ये सर्व भोग कसल्याच प्रकारचा विकार उत्पन्न न करता प्रवेश करतात, तोच पुरुष परम शांती प्राप्त करतो. भोगांची (विषयांची) इच्छा करणारा मात्र अशांत असतो.
357-2
पार्था आणिकही परी । तो जाणो येईल अवधारीं । जैसी अक्षोभता सागरीं । अखंडित ॥357॥
पार्था ! स्थिरप्रज्ञ मनुष्य ओळखता येईल अशी अजूनही एक खूण आहे ती ऐक, समुद्राचे ठिकाणी जशी (चोहो बाजुंनी भरत असताना सुद्धा) अखंड शांतता असते, (तशी शांतता या पुरूषाचे ठायी असते)
358-2
जरी सरिताओघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत । तरी अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ॥358॥
जरी समुद्रात अनेक नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून मिळतात, तरी त्यामुळे तो किंचित ही मोठा होत नाही व आपल्या मर्यादेचे उल्लंघन करीत
359-2
नाही;
ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाति समस्ता । परी न्यून नव्हे पार्था । समुद्रु जैसा ॥359॥
किंवा उन्हाळ्यात सर्व नद्यांचे प्रवाह आटले,तरी पण हे अर्जुन, तो सागर जसा मुळीच कमी होत नाही.
360-2
तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धी । तयासि क्षोभु नाहीं बुद्धी । आणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ॥360॥
त्याप्रमाणे ऋद्धिसिद्धि प्राप्त झाल्या असतानाही त्या पुरूषाचे बुद्धीला हर्ष होत नाही, आणि त्या प्राप्त (रिद्धी- सिद्धी) नाही झाल्या तरी त्याला (असंतुष्टता) विषाद होत नाही आणि त्याचे धैर्य कमी होत नाही.


361-2
सांगे सूर्याचां घरी । प्रकाशु काय वातीवेरी । की न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ॥361॥
सांग बरे, सूर्याच्या घरी दिवा लावला तर प्रकाश असतो आणि दिवा नाही लावला, तर तो सूर्य अंधारात कोंडला जातो काय???
362-2
देखें ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी । तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ॥362॥
त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरूषाचे घरी ऋद्धिसिद्धि आल्या काय नी गेल्या काय, त्याचे त्याला भानही नसते; कारण तो अंतःकरणाने महासुखात (परमात्मसुखात किंवा स्वस्वरूपात) निमग्न (रमून गेलेला असतो) झालेला असतो.
363-2
जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे । तो केवि रंजे पालविणें । भिल्लांचेनि ॥363॥
जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ मानतो, तो भिल्लाच्या पालांच्या झोपडीत कसा रमेल??
364-2
जो अमृतासि ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥364॥
जो अमृताला नांवे ठेवतो, तो ज्याप्रमाणे भातावरची पेज पीत नाही, त्याप्रमाणे आत्मानंदाचा अनुभव घेणारा, क्षुल्लक ऋद्धिसिद्धिच्या ऐहिक ऐश्वर्याचा उपभोग घेत नाही.
365-2
पार्था नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाही । तेथ ऋद्धिसिद्धि कायी । प्राकृता होती ॥365॥
अर्जुना ! काय आश्चर्य आहे पाहा, ज्या पुरुषांना स्वर्गसुखाची परवा नाही, तेथे त्याला क्षुल्लक (सामान्य) ऋद्धिसिद्धिची काय किंमत असणार?
366-2
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निस्पृहः ।
निर्ममो निरहंकरः स शान्तिमधिगच्छति॥2.71॥
भावार्थ :- जो पुरुष सर्व विषय वासना सोडून निरिच्छ, ममत्वशून्य आणि अभिमान सोडून कर्तव्यकर्म करीत राहतो, त्याला शांती (स्थितप्रज्ञेला) प्राप्त होते.
ऐसा आत्मबोधें तोषला । जो परमानंदें पोखला । तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळख तूं ॥366॥
असा जो आत्मज्ञानाने संतोष पावलेला आणि परमानंदाने पुष्ट (पोसलेला) झालेला आहे. तोच खरा (स्थिरबुद्धी) स्थितप्रज्ञ झाला आहे, असें तू जाण.
367-2
तो अहंकाराते दंडुनी । सकळ काम सांडोनि । विचरे विश्व होऊनि । विश्वाचिमाजीं ॥367॥
तो स्थितप्रज्ञ दृढपणाने अहंकाराला दूर करून (आपले ठिकाणी असलेला मी पणा घालवुन), व मनातील सर्व कामनांचा त्याग करून (विषय वासना टाकून), (सर्वजग ब्रम्हरूप समजून) विश्वचैतन्याशी एकरूप होऊन विश्वात वावरतो. (जगात संचार करतो).
368-2
एष ब्राह्मो स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति । स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति॥2.72॥
भावार्थ :- हे अर्जुना ! हि ब्राम्हविषयक आस्था आहे.ही प्राप्त झाल्यावर मोह होत नाही. अंतकाळीदेखील या अवस्थेत स्थिर होऊन तो ब्रह्मांनदाप्रत पोचतो.
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्ययोगो
नाम द्वितीयोऽध्यायः ॥2॥
हे ब्रह्मस्थिती निःसीम । जे अनुभवितां निष्काम । पातलें परब्रह्म । अनायासें ॥368॥
अशा प्रकारची ब्रम्हस्थिती आहे. जे निष्काम पुरूष या अमर्याद ब्रम्हस्थितीचा अनुभव घेतात ते अनायासेच परब्रम्हाशी एकरूप होतात.(परब्रम्हाला प्राप्त होतात)
369-2
जे चिद्रूपीं मिळतां । देहांतीची व्याकुळता । आड ठाकों न शके चित्ता । प्राज्ञा जया ॥369॥
कारण की, चिद्रुपता प्राप्त होत असताना (ज्ञानस्वरूपी) देहांताच्या वेळी होणारी व्याकुळता (चित्ताची तळमळ) ज्या ब्रम्हस्थितीमुळे ज्ञानाच्या चित्तात लुडबुड करीत नाही, (स्थितप्रज्ञाच्या चिताच्या आड येऊ शकत नाही),
370-2
तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति । सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ॥370॥
तीच ही ब्राम्हस्वरूपाशी एकरूप होण्याची स्थिती, असें श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुनाला सांगितली, हे संजय धृतराष्ट्रास म्हणाला.


371-2
ऐसे कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुने मनीं म्हणितलें । आतां आमुचियाचि काजा आलें । उपपत्ति इया ॥371॥
असें श्रीकृष्णांचे बोलणे ऐकून अर्जुन मनात म्हणाला, आता देवाच्या ह्या विचारसरणीने आमचेच आयते कार्य झाले. (कोणते कार्य तर युद्ध न करण्याविषयीचे जे मत अर्जुनाने मांडले त्याला आधारच मिळाला असा त्याचा समज झाला)
372-2
जे कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें । तरी पारुषलें म्यां झुंजावें । म्हणूनियां ॥372॥
कारण, आत्मस्वरूपाचे वर्णन करताना श्रीकृष्णांनी सर्वच्या सर्व कर्माचा (आता पर्यंतच्या निरूपणात) निषेध केला आहे. आणि त्या निषेधामुळे माझे युद्ध करणे (हे कर्म) सहजच थांबले आहे.
(असा समज अर्जुनाने करून घेतला आहे. एकीकडे श्रीकृष्ण म्हणतात आत्मस्वरूप प्राप्त पुरूषांना कर्मात अडकण्याची गरज नाही. पण मला मात्र म्हणतात की,”तू युद्ध कर.” या द्विधा मनस्थितीत अर्जुन आला आहे.)
373-2
ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धरु उवायिला । आतां प्रश्नु करील भला । आशंकोनियां ॥373॥
ह्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे बोलणे ऐकून अर्जुन अंतर मनात फारच आनंदित झाला. आता त्याची शंका तो उत्तम प्रश्नाच्या द्वारे प्रगट करील.
274-2
तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासि आगरु । कीं विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ॥374॥
(पुढं येणारा) तो प्रसंग फारच सुदंर असा आहे, जणू कांही सर्व धर्माचे उत्पत्तीस्थान अथवा विचाररूपी अमृताचा अमर्याद असा सागरच आहे.
375-2
जो आपणपे सर्वज्ञनाथु । निरुपिता होईल श्रीअनंतु । ते ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तीदासु ॥375॥
त्या सुखसंवादाचे निरूपण सर्वज्ञांनाचा शिरोमणी सर्वश्रेष्ठ राजा श्रीअनंत ‘श्रीकृष्ण’ स्वतः करतील.ती ज्ञानकथा (ती हकीकत) निवृत्तीनाथांचा शिष्य (निवृत्तीदास) ‘ज्ञानदेव’ सांगेल.

॥ इति श्री ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां – सांख्ययोगोनाम्
द्वितीयोऽध्यायः॥2॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 72 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 375 ॥

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *