सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

101-5
तैसें नाम रुप तयाचें । एऱ्हवीं ब्रह्मचि तो साचें । मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥101॥
त्याप्रमाणे त्यांचे शरीर आणि नाव जगाप्रमाणे असले, तरीदेखील साक्षात ब्रम्हरूप आहेत, आणि त्यांचे मन सर्व ठिकाणी साम्याप्रत झालेले असते.
102-5
ऐसेनि समदृष्टी जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे । अर्जुना संक्षेपे सांगेन पाहें । अच्युत म्हणे ॥102॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! अशी ज्यांची विश्वात्मक समदृष्टी झालेली असते, त्या पुरुषाचे लक्षण तुला संक्षेपाने सांगतो, तरी तू एक.
(म्हणजेच त्या पुरुषला ओळखण्याचे लक्षण थोडक्यात सांगतो. त्याचा तू विचार कर)
न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य् चाप्रियम् ।
स्थिरबुध्दिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः॥5.20॥
भावार्थ :- जो प्रिय वस्तू प्राप्त झाली असता आनंद हर्ष पावत नाही अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्वेग / दुःख मानत नाही, असा स्थिर बुद्धी ज्याची आहे तोच स्थिरबुद्धी, मोहराहित, ब्रह्मज्ञ व परमेश्वराच्या / ब्रह्मच्या ठिकाणी सदैव स्थित असतो.
103-5
तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें । तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलां जो ॥103॥
ज्याप्रमाणे मृगजलाच्या पुराणे डोंगर वाहून जात नाही, त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाली असता तिच्यापासून विकार पावत नाही,
104-5
तोचि तो निरुता । समदृष्टी तत्वता । हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥104॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! तोच खरा समदृष्टीचा पुरुष होय आणि तोच ब्रम्हाशी एकरूप झालेला होय. (तोच खरा समदृष्टीचा होय असे तू जाण)
ब्राह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते॥5.21॥
भावार्थ :- बाह्य विषयांच्या ठिकाणी ज्याचे अंतःकरण आसक्त झाले नाही त्याला आत्म्याच्या (स्वतःच्या अंतःकरणात आनंदाची प्राप्ती करून घेतो) ठिकाणी जे सुख आहे ते मिळते, तो ब्रम्हाशी समरस झालेला योगी अक्षयसुखाच्या अनुभव घेतो.
(परब्राम्हशी एकरूप होऊन अखंड आनंदाचा अनुभव घेतो)
105-5
जो आपणपे सांडुनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं । तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥105॥
जो आत्मस्वरूपाला सोडून केंव्हाही इंद्रियरूपी गावांत / इंद्रियांच्या आधीन येत / होत नाही (म्हणजे इंद्रयांशी तादात्म्य करीत नाही), त्याने विषयांचे सेवन केले नाही, यात आश्चर्य ते काय आहे.


106-5
सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडे अंतरें । रचिला म्हणऊनि बाहिरें । पाउल न घली ॥106॥
अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंतः करणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकीत नाही.
(बाहेर म्हणजे इतर विषय सुखाकडे वळत नाही कारण त्याचे अंतःकरणं स्वाभिकच संतुष्ट असते)
107-5
सांगे कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटे । तो चकोरु काई वाळुवंटे । चुंबितु आहे ॥107॥
सांग बरे, कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो चकोर पक्षी शुद्ध शीतल चंद्रकिरणाचे सेवन / भोजन करतो, तो वाळवंटातील वाळूचे खडे चाटीत बसेल काय??
108-5
तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपणपेचिं फावलें । तया विषयो सहजे सांडवले । म्हणो क ई ॥108॥
त्याप्रमाणे ज्याला स्वतःच आपल्या ठिकाणी आत्मानंद / उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाला, त्याच्याकडून विषयांचा त्याग सहजच घडतो, हे काय सांगावयास पाहिजे काय??
109-5
एऱ्हवीं तरी कौतुकें । विचारुनि पाहें पां निकें । या विषयांचेनि सुखे । झकविती कवण॥109॥
एरवी सहज कौतुकाने थोडा विचार करून पाहा की, या विषयाच्या सुखाने कोण बरे फसतात.??
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः॥5.22॥
भावार्थ :- हे कुंतीनंदना ! विषय व इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग हे दुःखाला कारण होतात. ते भोग निर्माण होतात आणि नाहीसे होतात. म्हणून ज्ञानी पुरुष त्या भोगांमध्ये रममाण होत नाहीत.
110-5
जिहीं आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले । जैसें रंकु का आळुकैलें । तुषातें सेवी ॥110॥
ज्यांनी आपल्या आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही, ते इंद्रियाकडून प्राप्त होणाऱ्या विषयात रंगून जातात. ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेला मनुष्य कोंडा देखील खातो.


111-5
नातरी मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळांते । मग तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती ॥111॥
किंवा तहानेने व्याकुळ झालेली हरणे भ्रमामुळे खऱ्या पाण्याला विसरून जातात आणि मृगजळाला पाणी समजून माळरानावर धावत येऊन पोहचतात.
112-5
तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे । तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥112॥
त्याप्रमाणे ज्यांना आत्मस्वरूप पाहण्याची दृष्टी नसते आणि ज्याला स्वरूप- आनंदाची सदैव कमतरता असते, त्यांना हे विषय सुखरूप वाटतात.
(ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही, किंवा परमआनंदचा नेहमी पूर्ण अभाव असतो)
113-5
एऱ्हवीं विषयीं काइ सुख आहे । हे बोलणेंचि सारिखें नोहे । तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥113॥
एरव्ही विषयांमध्ये सुख आहे, हे म्हणणे बोलण्याच्या सुद्धा योग्यतेचे नाही. नाहीतरी विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजडत नाही.
(माऊली काय सांगतात.विजेचे चमकने हे क्षणिक आहे, त्याप्रमाने कांही वेळा विषय आनंद देतात पण ते आनंद क्षणिक / विनाशी आहे. हे आपण जाणावे)
114-5
सांगें वातवर्षआतपु धरे । ऐसे अभ्रछायाचि जरी सरे । तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां ॥114॥
सांग बरे, वारा, पाऊस, ऊन, यांच्यापासून रक्षण करण्याचे काम जर ढगांच्या सावलीने होत असेल, तर मजबूत / तीन माजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा खटाटोप का करावा???
115-5
म्हणोनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे । जैसें महूर कां म्हणिजे । विषकंदातें ॥115॥
विषयांचे स्वरूप न कळल्यामुळे विषयांत सुख आहे, असे व्यर्थ बोलले जाते; म्हणून का विषाच्या कांद्याला मधुर म्हणावे??


116-5
नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु । तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥116॥
भूमिपुत्र (मंगळ) हा सर्व ग्रहात पीडाकारक दिसून येतो, तरीपण त्याला मंगळ असे म्हणतात; किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात. त्याप्रमाणे विषयापासून मिळणाऱ्या अनुभवाला सुख असे म्हणणे व्यर्थ आहे.
117-5
हे असो आघवी बोली । सांग पा सर्पफणीची साउली । ते शीतल होईल केतुली । मूषकासी ॥117॥
हे सर्व बोलणे राहुं दे. असे सांग की, नागाच्या फणीची छाया उंदराला कितपत शीतल होऊ शकेल??
118-5
जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा । तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणें ॥118॥
जोपर्यँत गळाला लावलेल्या मांसाच्या तुकड्यास मासा तोंड लावीत नाही, तोपर्यन्त तो ठीक असतो. त्याप्रमाणे सर्व विषयांची आपला संबंध येत नाही, तोपर्यंतच बरे, हे, पांडवा, तू निःसंशय समजून घे.
119-5
हे विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी । तैं पांडुरोगाचिये पुष्टि- । सारिखें दिसे ॥119॥
वीरक्त पुरुषाच्या दृष्टीने हे विषयसुख जेंव्हा पहिले जाते, तेंव्हा पंडुरोगात येणाऱ्या लठ्ठपणासारखे वरून चांगले, पण आतून घातक दिसू लागते.
120-5
म्हणोनि विषयभोगी जें सुख । तें साद्यंतचि जाण दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥120॥
म्हणून विषयभोगात जे सुख मानले जाते, ते प्रारंभापासून शेवटपर्यँत दुःखदायक आहे. परंतु अज्ञानी लोक काय करणार?? सवयीमुळे त्यांना विषयसेवन केल्याशिवाय चालत नाही.


121-5
तें अंतर नेणती बापुडे । म्हणोनि अगत्य सेवणें घडे । सांगे पूयपंकीचे किडे । काय चिळसी घेती ॥121॥
ते बिचारी अज्ञानी, विषयांच्या आतले दुःख स्वरूप जाणत नाहीत, म्हणून त्यांच्या कडून विषयसेवन घडत असते. पुवाच्या चिखलातील किड्याना पुवाची कधी किळस येते काय??
122-5
तयां दुःखियां दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर । ते भोगजळींचे जलचर । सांडिती केवी ॥122॥
त्या दुःखी लोकांचे दुःख हेच जीवन बनलेले असते. कारण, ते विषयरुपी चिखलात राहणारे बेडूक असतात, भोगरूपी पाण्यातील जलचर असतात, तर मग ते विषयांचे सेवन कसे बरे सोडतील.??
123-5
आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती । जरी विषयांवरी विरक्ती । धरिती जीव ॥123॥
जर विषयांच्या ठिकाणी जीवमात्र हे विरक्ती धारण करतील, तर मग जेवढ्या म्हणून दुःख दायक योनी आहेत, तेवढ्या व्यर्थ होणार नाहीत का??
124-5
नातरी गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचे कष्ट । हे विसांवेवीण वाट । वाहावी कवणें ॥124॥
अथवा गर्भवासात होणारी दुःख, जन्म मरणाचे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी बरे चालवा??
125-5
जरी विषयीं विषयो सांडिजेल । तरी महादोषी कें वसिजेल । आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं ॥125॥
जर विषयासक्त लोकांनी विषय सोडून दिले, तर मग महापातकांनी कोठे बरे राहावे?? आणि मग संसार हा शब्द खोटा ठरणार नाही का??

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *