सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

326-18
प्रकृति करी कर्में । तीं म्यां केलीं म्हणे भ्रमें । येथ कर्ता येणें नामें । बोलिजे जीवु ॥326॥
देहाकडून जी जी कर्मे होतात, ती मीच केली असे भ्रमाने म्हणतो, म्हणून जीवाला कर्माचा कर्ता आहे असे म्हणतात. 326
327-18
मग पातेयांच्या केशीं । एकीच उठी दिठी जैसी । मोकळी चवरी ऐसी । चिरीव गमे ॥327॥
मग दृष्टी ही एकच असून ज्याप्रमाणे पापण्यांच्या केसांमुळे चवरीच्या केसांप्रमाणे चिरल्यासारखी दिसते; 327
328-18
कां घराआंतुल एकु । दीपाचा तो अवलोकु । गवाक्षभेदें अनेकु । आवडे जेवीं ॥328॥
अथवा घरात असलेला एकच दिवा पाहिला असता, जसे त्याचे पुष्कळ दिवे दिसतात; 328
329-18
कां एकुचि पुरुषु जैसा । अनुसरत नवां रसां । नवविधु ऐसा । आवडों लागे ॥329॥
किंवा एकच पुरुष असून शृंगार, वीर,करुण, इत्यादी नवरसांचे अविर्भाव दाखवू लागला, म्हणजे तो जसा नऊ प्रकारचा वाटू लागतो, 329
330-18
तेवीं बुद्धीचें एक जाणणें । श्रोत्रादिभेदें येणें । बाहेरी इंद्रियपणें । फांके जें कां ॥330॥
तसे बुद्धीचे एकच ज्ञान असून ते नेत्रादि इंद्रियांच्या निराळीपणाने बाहेर येऊ लागते. 330

331-18
तें पृथग्विध करण । कर्माचें इया कारण । तिसरें गा जाण । नृपनंदना ॥331॥
हे नृपनंदना, ती निरनिराळी इंद्रिये हे कर्माचे तिसरे कारण होय, असे समज; 331
332-18
आणि पूर्वपश्चिमवाहणीं । निघालिया वोघाचिया मिळणी । होय नदी नद पाणी । एकचि जेवीं ॥332॥
आणि पूर्व-पश्चिम वाहिनी नद्या वहात वहात समुद्रास मिळाल्यावर त्या जशा पाण्याच्या रूपाने एकत्र होतात 332
333-18
तैसी क्रियाशक्ति पवनीं । असे जे अनपायिनी । ते पडिली नानास्थानीं । नाना होय ॥333॥
तशी रजोगुणाची कर्तृत्वशक्ती जी संपादनकेल्या शिवाय प्राणवायूत मूळचीच आहे, ती निरनिराळया अवयवांत निरनिराळी भासते. 333
334-18
जैं वाचे करी येणें । तैं तेंचि होय बोलणें । हाता आली तरी घेणें । देणें होय ॥334॥
जेव्हा ती वाच्याद्वारे बाहेर पडते, तेव्हा तिला बोलणे असे आपण म्हणतो हस्ताद्वारे बाहेर पडल्यावर घेण्या देण्याचा व्यापार असे म्हणतात. 334
335-18
अगा चरणाच्या ठायीं । तरी गति तेचि पाहीं । अधोद्वारीं दोहीं । क्षरणें तेचि ॥335॥
अरे, जी पायात आली असता गती असे म्हणतात व मलमूत्राद्वारे आली असता क्षालन असे म्हणतात, 335

336-18
कंदौनि हृदयवरी । प्रणवाची उजरी । करितां तेचि शरीरीं । प्राणु म्हणिजे ॥336॥
नाभीपासून हृदयापर्यंत ॐकाराची शरीरात वृद्धी बुद्धी करते, तिलाच प्राण असे म्हणतात. 336
337-18
मग उर्ध्वींचिया रिगानिगा । पुढती तेचि शक्ति पैं गा । उदानु ऐसिया लिंगा । पात्र जाहली ॥337॥
मग वर जो श्वासोश्वास जातो; त्यात शक्तीला उदान (कंठस्थ वायु) असे नाव प्राप्त होते; 337
338-18
अधोरंध्राचेनि वाहें । अपानु हें नाम लाहे । व्यापकपणें होये । व्यानु तेचि ॥338॥
व गुदद्वाराने आणि बाहेर येऊ लागली म्हणजे अपान (गुदस्थ वायु) हे नाव प्राप्त होते, आणि सर्व शरीरास व्यापक झाली असता (व्यान) (शरीरस्थ वायु) असे म्हणतात. 338
339-17
आरोगिलेनि रसें । शरीर भरी सरिसें । आणि न सांडितां असे । सर्वसंधीं ॥339॥
खाल्लेल्या अन्नाचा रस सर्व शरीरात पसरून जी सर्व सांध्यांत भरलेली असते; 339
340-18
ऐसिया इया राहटीं । मग तेचि क्रिया पाठीं । समान ऐसी किरीटी । बोलिजे गा ॥340॥
अर्जुना, अशा सर्व क्रिया होत असून ह्या शक्तीस नंतर समान म्हणजे (नाभिस्थ वायु) असे म्हणतात. 340

341-18
आणि जांभई शिंक ढेंकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कूर्म कृकर । इत्यादि होय ॥341॥
आणि जांभई, शिंक, ढेकर वगैरे जे वायूचे व्यापार होतात ते नाग, कूर्म, कृकर, इत्यादी उपप्राणांचे होतं. 341
342-18
एवं वायूची हे चेष्टा । एकीचि परी सुभटा । वर्तनास्तव पालटा । येतसे जे ॥342॥
हे सुभटा, याप्रमाणे सर्व वायूंचे खेळ असून त्यांच्या त्यांच्या वर्तनात प्रमाणे नावात बदल होतो. 342
343-18
तें भेदली वृत्तिपंथें । वायुशक्ति गा एथें । कर्मकारण चौथें । ऐसें जाण ॥343॥
अशी जी आपापल्या व्यापाराने वायूंची शक्ती निरनिराळी होते, ते कर्माचे चौथे कारण होय, असे समज. 343
344-18
आणि ऋतु बरवा शारदु । शारदीं पुढती चांदु । चंद्री जैसा संबंधु । पूर्णिमेचा ॥344॥
आणि शरद ऋतू सारखा उत्तम ऋतू असून त्यांत चंद्रोदय व्हावा व तशात पौर्णिमेचा योग असावा; 344
345-18
कां वसंतीं बरवा आरामु । आरामींही प्रियसंगमु । संगमीं आगमु । उपचारांचा ॥345॥
अथवा वसंत ऋतु असून त्यात उत्तम बाग असावी व बागेत प्रिय मनुष्यांचा सहवास आणि तशा अवस्थेत इतर सर्व उपचारांची अनुकूलता असावी; 345

346-18
नाना कमळीं पांडवा । विकासु जैसा बरवा । विकासींही यावा । परागाचा ॥346॥
अथवा अर्जुना, कमळ असून ते उमलावे व मग त्यात पुष्परेणूंचा उद्भव व्हावा; 346
347-18
वाचे बरवें कवित्व । कवित्वीं बरवें रसिकत्व । रसिकत्वीं परतत्व । स्पर्शु जैसा ॥347॥
एखाद्याचे वाणीत कवित्व असावे, त्या कवितेत रसिकता असावी आणि त्या रसिकतेत आत्मतत्वाची भर पडावी, 347
348-18
तैसी सर्ववृत्तिवैभवीं । बुद्धिचि एकली बरवी । बुद्धिही बरव नवी । इंद्रियप्रौढी ॥348॥
तसेच, सर्व वृत्तीच्या ऐश्वर्याने युक्त जी बुद्धी, ती उत्तम प्रकारची असून तशांत सर्व इंद्रिये ही तिला अनुकूल असावी; 348
349-18
इंद्रियप्रौढीमंडळा । शृंगारु एकुचि निर्मळा । जैं अधिष्ठात्रियां कां मेळा । देवतांचा जो ॥349॥
आणि सर्व इंद्रियांना भूषण देणारा त्या इंद्रियांच्या देवतांचा मेळा तोही त्यात अनुकूल असावा, 349
350-18
म्हणौनि चक्षुरादिकीं दाहें । इंद्रियां पाठीं स्वानुग्रहें । सूर्यादिकां कां आहे । सुरांचें वृंद ॥350॥
म्हणूनच चक्षुरादी दहा इंद्रियांच्या ठिकाणी सूर्यादि देवांच्या समुदायाचा अनुग्रह, 350

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *