सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ८७६ ते ९०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

876-18
नातरी सप्तगुणार्णवीं । परीवारली बरवी । हे क्रिया नव्हे पृथ्वी । भोगीतसे तो ॥876॥
किंवा सत्वगुणरुपी समुद्रांनी वेष्टित केलेली ही क्षात्रप्रकृतीरूप पृथ्वी होय. 876
877-18
कां गुणांचे सातांही ओघीं । हे क्रिया ते गंगा जगीं । तया महोदधीचिया आंगीं । विलसे जैसी ॥877॥
अथवा सप्तगुणरूपी ओघांनी क्षात्रक्रियारुपी गंगा ही क्षात्रप्रकृती धारण करणार्‍या ह्या महोदधिला मिळवून शोभते. 877
878-18
परी हें बहु असो देख । शौर्यादि गुणात्मक । कर्म गा नैसर्गिक । क्षात्रजातीसी ॥878॥
या सर्व गोष्टी राहू दे.क्षात्र प्रकृतीची शौर्याधिक गुणात्मक कर्मे ही स्वाभाविक आहेत. 878
879-18
आतां वैश्याचिये जाती । उचित जे महामती । ते ऐकें गा निरुती । क्रिया सांगों ॥879॥
आता हे महामते, वैश्य जातीला जे योग्य कर्म आहे ते तुला सांगतो,ऐक. 879
कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् ।
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ॥18.44॥

880-18
तरी भूमि बीज नांगरु । यया भांडवलाचा आधारु । घेऊनि लाभु अपारु । मेळवणें जें ॥880॥
(कृषी) शेत,बीज, नांगर इत्यादी साहित्य मिळवून त्यांच्यायोगे पुष्कळ नफा मिळविणे, 880

881-18
किंबहुना कृषी जिणें । गोधनें राखोनि वर्तणें । कां समर्घीची विकणें । महर्घीवस्तु ॥881॥
किंबहुना कृषिकर्म करून अथवा (गोरक्ष्य) गाईचं संरक्षण करून किंवा (वाणिज्य) सवंग वस्तू घेऊन महाग दराने विकणे, 881
882-18
येतुलाचि पांडवा । वैश्यातें कर्माचा मेळावा । हा वैश्यजातीस्वभावा । आंतुला जाण ॥882॥
अर्जुना,वैश्य जातीने ह्या तीन प्रकारे कर्म करून निर्वाह करणे, हाच त्यांचा स्वाभाविक धर्म होय. 882
883-18
आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । हे द्विजन्में तिन्ही वर्ण । ययांचें जें शुश्रूषण । तें शूद्रकर्म ॥883॥
आणि वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण या तिन्ही वर्णास द्विज हे नाव आहे व यांची सेवा करणे हाच शूद्र वर्णाचा स्वाभाविक धर्म आहे. 883
884-18
पैं द्विजसेवेपरौतें । धांवणें नाहीं शूद्रातें । एवं चतुर्वर्णोचितें । दाविलीं कर्में ॥884॥
परंतु द्वीजांच्या सेवे वाचून शूद्रांना दुसरे कर्मच नाही. या प्रकारे करून चारी वर्णांची कर्मे तुला सांगितली. 884
स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः ।
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु ॥18.45॥

885-18
आतां इयेचि विचक्षणा । वेगळालिया वर्णा । उचित जैसें करणां । शब्दादिक ॥885॥
आता, या चार वर्णांची निरनिराळी उचित कर्मे तुला स्पष्ट करून सांगतो. ज्याप्रमाणे कर्मादि इंद्रियांना शब्दादिक विषयच योग्य उचित होत, 885

886-18
नातरी जळदच्युता । पाणिया उचित सरिता । सरितेसी पंडुसुता । सिंधु उचितु ॥886॥
अथवा मेगा पासून पडलेल्या उदकास योग्य स्थान नदीच होय. आणि अर्जुना नदीस उचित स्थान समुद्र, 886
887-18
तैसें वर्णाश्रमवशें । जें करणीय आलें असे । गोरेया आंगा जैसें । गोरेपण ॥887॥
तसे वर्णाश्रमधर्माप्रमाणे जे आवश्यक कर्म, ते केले असता, गौर अंगास जसे गोरेपण शोभा देते, तशी त्या वर्णांला अत्यंत शोभा येते. 887
888-18
तया स्वभावविहिता कर्मा । शास्त्राचेनि मुखें वीरोत्तमा । प्रवर्तावयालागीं प्रमा । अढळ कीजे ॥888॥
हे विरोतमा त्या स्वभावजन्य कर्माचे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याविषयी आपली बुद्धी निश्चित करावी. 888
889-18
पैं आपुलेंचि रत्न थितें । घेपे पारखियाचेनि हातें । तैसें स्वकर्म आपैतें । शास्त्रें करावीं ॥889॥
परंतु आपल्याजवळ असलेले रत्न जसे रत्न पाख्याच्या हातून पारखून घ्यावे लागते, तसे आपले स्वकर्म शास्त्राच्या आधाराने समजून घ्यावे. 889
890-18
जैसी दिठी असे आपुलिया ठायीं । परी दीपेंवीण भोग नाहीं । मार्गु न लाहतां काई । पाय असतां होय? ॥890॥
जशी आपल्याजवळ दृष्टी असूनही दिव्यावाचून तिचा उपयोग होत नाही आणि मार्ग न सापडला तर पाय असताही त्याचा काय उपयोग? 890

891-18
म्हणौनि ज्ञातिवशें साचारु । सहज असे जो अधिकारु । तो आपुलिया शास्त्रें गोचरु । आपण कीजे ॥891॥
म्हणून जातीप्रमाणे जो जो योग्य अधिकार असेल, तो आपण आपल्या शास्त्राप्रमाणे समजून घ्यावा. 891
892-18
मग घरींचाचि ठेवा । जेवीं डोळ्यां दावी दिवा । तरी घेतां काय पांडवा । आडळु असे? ॥892॥
मग अर्जुना, दिवा जसा आपल्या घरातील ठेवा आपल्या डोळ्यास दाखवितो, तेव्हा तो घेण्याविषयी प्रतिबंध असतो काय? 892
893-18
तैसें स्वभावें भागा आलें । वरी शास्त्रें खरें केलें । तें विहित जो आपुलें । आचरे गा ॥893॥
तसे स्वभावतः आपल्या वाट्यास आलेले व शास्त्राने खरे केलेले असे जे विहित कर्म त्यांचे जो आचरण करतो; 893
894-18
परी आळसु सांडुनी । फळकाम दवडुनी । आंगें जीवें मांडुनी । तेथेंचि भरु ॥894॥
पण आळस सोडून व फलेच्छा टाकून मोठ्या हौसेने शरीराने जीव लावून त्या ठिकाणी जो आपला सर्वकाळ घालवितो; 894
895-18
वोघीं पडिलें पाणी । नेणें आनानी वाहणी । तैसा जाय आचरणीं । व्यवस्थौनी ॥895॥
पाणी ओघात पडल्यावर जसे भलतीकडेच जात नाही तसे त्याचे आचरण यथाशास्त्र होते; 895

896-18
अर्जुना जो यापरी । तें विहित कर्म स्वयें करी । तो मोक्षाच्या ऐलद्वारीं । पैठा होय ॥896॥
अर्जुना, याप्रमाणे जो विहित कर्मांचे स्वतः आचरण करितो, तो पुरुष मोक्षाच्या अलीकडले दार वैराग्य तेथे प्राप्त होतो. 896
897-18
जे अकरणा आणि निषिद्धा । न वचेचि कांहीं संबंधा । म्हणौनि भवा विरुद्धा । मुकला तो ॥897॥
जो अकरण व निषिद्ध या कर्मांचा संबंध होऊ देत नाही, म्हणून आत्मप्राप्ती विरुद्ध जो संसार, त्याच्या भयापासून मुक्त होतो; 897
898-18
आणि काम्यकर्मांकडे । न परतेचि जेथ कोडें । तेथ चंदनाचेही खोडे । न लेचि तो ॥898॥
तसेच चंदनाचाही खोडा पायात घालण्यास आणिला तरी पाय अडकवून घेत नाही, तसे काम्य कर्माकडे जो कौतुकानेहि पहात नाही; 898
899-18
येर नित्य कर्म तंव । फळत्यागें वेंचिलें सर्व । म्हणौनि मोक्षाची शींव । ठाकूं लाहे ॥899॥
आणि दुसरे जे नित्यकर्म, त्याचा फलत्याग् केल्यामुळे तेही तो संपवितो; त्यामुळे तो मोक्षाचा शिवेजवळ प्राप्त होतो. 899
900-18
ऐसेनि शुभाशुभीं संसारीं । सांडिला तो अवधारीं । वौराग्यमोक्षद्वारीं । उभा ठाके ॥900॥
अशा युक्तीने कर्माचे निरसन करून शुभाशुभ संसारापासून तो सुटतो व मोक्षाचे द्वार जे वैराग्य तेथे येऊन उभा राहतो. 900

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading