सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
,

251-18
तैसीं कर्में करितां शरीरीं । लाहती महत्त्वाची फरारी । पाठीं निधनीं एकसरी । पावती फळें ॥251॥
त्याप्रमाणे देहात आहे तोपर्यंत कर्म करीत असता कर्तेपणाचा गर्व वाहवत, मरणानंतर एकसारखी त्यांना फळे भोगावीच लागतात.॥51॥
252-18
तैसा समर्थु आणि ऋणिया । मागों आला बाइणिया । न लोटे तैसा प्राणिया । पडे तो भोगु ॥252॥
जसा समर्थ असून त्याचजवळ ऋण काढले आणि तो वायद्याच्या मुदतीस मागणी करू लागला, तर त्याला जसे नाही म्हणवत नाही, त्याप्रमाणे प्राणिमात्राला कर्माचे फळ भोगणे भाग पडते ( कर्मफल चुकत नाही).॥52॥
253-18
मग कणिसौनि कणु झडे । तो विरूढला कणिसा चढे । पुढती भूमी पडे । पुढती उठी ॥253॥
मग कणसातून दाणा खाली पडल्यावर तो उगवला म्हणजे पुन्हा त्याला कणीस येते व त्याचे दाणे भूमीवर पडले म्हणजे दाण्याचे कणीस व कणसाचे दाणे असा क्रम सुरू होतो॥53॥
254-18
तैसें भोगीं जें फळ होय । तें फळांतरें वीत जाय । चालतां पावो पाय । जिणिजे जैसा ॥254॥
त्याप्रमाणे उपभोगाचे फळ जे शरीर ते फळाच्याशेवटी जन्म घेते, जसा वाट चालणारा मनुष्य एकेक पाऊल टाकून वाट वन बसतो लोकसभा जिंकतो;
255-18
उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी । तेवीं न मुकीजती वोढी । भोग्याचिये ॥255॥
होडी एका तीराहून दुसऱ्या तीरास गेली असता तिला प्रत्येक तीर अलिकडला होय, कारण प्रत्येक तीरास तिला पलीकडेपणा आहेच, म्हणून वाहून न्यावे लागते. तसा फळाच्या उपभोगाला शेवट नाही.॥255॥

256-18
पैं साध्यसाधनप्रकारें । फळभोगु तो पसरे । एवं गोंविले संसारें । अत्यागी ते ॥256॥
हे बघ, साध्य व साधन अशा क्रमाने फळ व फळाचा भोग वाढतात, फळेच्छेचा त्याग न करणारे, याप्रमाणे संसारात गोवले जातात.॥256॥
257-18
येऱ्हवीं जाईचियां फुलां फांकणें । त्याचि नाम जैसें सुकणें । तैसें कर्ममिषें न करणें । केलें जिहीं ॥257॥
एऱ्हवी जाईचे फूल ज्याप्रमाणे प्रफुल्लित होताक्षणी सुकते, त्याप्रमाणे कर्माचा आरंभ करूनही फक्त अभिमान सोडून ते न केल्याप्रमाणे फळा पासून अलिप्त असतात;॥257॥
258-18
बीजचि वरोसि वेंचे । तेथ वाढती कुळवाडी खांचे । तेवीं फळत्यागें कर्माचें । सारिलें काम ॥258॥
बिजा करिता ठेवलेले धान्य जर दररोजच्या खर्चास खाऊन टाकले, तर मग पुढे पेरण्याचा प्रकार जसा बंद होतो, तसे फळाच्या त्यागाने कर्मापासून प्राप्त होणारे जन्म मृत्यू बाजूस राहतात.॥258॥
259-18
ते सत्वशुद्धि साहाकारें । गुरुकृपामृततुषारें । सासिन्नलेनि बोधें वोसरे । द्वैतदैन्य ॥259॥
शुद्ध सत्वाच्या साह्याने गुरुकृपारुपी अमृताच्या तुषाराने सिद्ध झालेला जो आत्मबोध द्वैताचे दैन्य नाहीतसे होते.॥259॥
260-18
तेव्हां जगदाभासमिषें । स्फुरे तें त्रिविध फळ नाशे । एथ भोक्ता भोग्य आपैसें । निमालें हें ॥260॥
मग ज्या तीन प्रकारच्या फळापासून जग उत्पन्न होते, ते आपोआप नाश पावून भोक्ता व भोग्यवस्तू याही आपोआप लयास जातात.॥260॥

261-18
घडे ज्ञानप्रधानु हा ऐसा । संन्यासु जयां वीरेशा । तेचि फलभोग सोसा । मुकले गा ॥261॥
हे विरेशा, त्यांच्या हातून अशा प्रकारच्या कर्माचा ज्ञानप्रमुख संन्यास होतो, त्यांनाच फळाच्या भोगापासून होणारे दुःख होत नाही;॥261॥
262-18
आणि येणें कीर संन्यासें । जैं आत्मरूपीं दिठी पैसे । तैं कर्म एक ऐसें । देखणें आहे? ॥262॥
आणि या संन्यासाने खरोखर जेव्हा आत्मरुपी दृष्टी पोहोचते, तेव्हा कर्म निराळे आई असे दिसते काय?॥262॥
263-18
पडोनि गेलिया भिंती । चित्रांची केवळ होय माती । कां पाहालेया राती । आंधारें उरे? ॥263॥
चित्रे काढलेली भिंत पडल्यावर चित्रे मातीस मिळतात अथवा उजाडल्यावर रात्रीचा अंधार दिसतो काय?॥263॥
264-18
जैं रूपचि नाहीं उभें । तैं साउली काह्याची शोभे? । दर्पणेवीण बिंबें । वदन कें पां? ॥264॥
जर आकृतीच नसली, तर आपल्या मुखाचे प्रतिबिंब कोठे पडेल?॥264॥
265-18
फिटलिया निद्रेचा ठावो । कैचा स्वप्नासि प्रस्तावो? । मग साच का वावो । कोण म्हणे? ॥265॥
झोप पुरी झाल्यावर स्वप्न कुठून पडणार? आणि मग त्याला खरे अथवा खोटे कोण म्हणेल?॥265॥

266-18
तैसें गा संन्यासें येणें । मूळ अविद्येसीचि नाहीं जिणें । मा तियेचें कार्य कोणें । घेपे दीजे? ॥266॥
त्याप्रमाणे कर्मफळाचा संन्यास केला असता मूळच्या अविद्येंच थारा मिळत नाही; मग तिच्या पासून होणारे जे फळ, त्याचा कोण उपभोग घेईल व देईल॥66॥
267-18
म्हणौनि संन्यासी ये पाहीं । कर्माची गोठी कीजेल खई । परी अविद्या आपुलाम् देहीं । आहे जै कां ॥267॥
म्हणून संन्यास केल्यावर कर्माची गोष्ट कुठून बोलता येणार? परंतु जर आपल्या देहात अज्ञान वास करीत असेल;॥267॥
268-18
जैं कर्तेपणाचेनि थांवें । आत्मा शुभाशुभीं धांवें । दृष्टि भेदाचिये राणिवे । रचलीसे जैं ॥268॥
जेव्हा कर्तेपणाच्या बळाने आत्मा चांगले व वाईट कर्मे करण्यास प्रवृत्त होतो व दृष्टीही भेदाच्या ऐश्वर्याने जेव्हा युक्त असते,॥268॥
269-18
तैं तरी गा सुवर्मा । बिजावळी आत्मया कर्मा । अपाडें जैसी पश्चिमा । पूर्वेसि कां ॥269॥
तेव्हा हे सुवर्मा अर्जुना, आत्मा व कर्म यांचे ठिकाणी पूर्व व पश्चिम या प्रमाणे द्वैत विशेष असते.॥269॥
270-18
नातरी आकाशा का आभाळा । सूर्या आणि मृगजळा । बिजावळी भूतळा । वायूसि जैसी ॥270॥
आकाश व आभाळ, सूर्य आणि मृगजळ व पृथ्वी आणि वायू यांच्यात संबंध जरी दिसला, तरी ते फार दूर आहेत.॥270॥

271-18
पांघरौनि नईचें उदक । असे नईचिमाजीं खडक । परी जाणिजे का वेगळिक । कोडीची ते ॥271॥
नदीचे पाणी पांघरूण नदीत खडक असतो परंतु त्या दोहोंत जशी एक कोटपट अंतर असते;
272-18
हो कां उदकाजवळी । परी सिनानीचि ते बाबुळी । काय संगास्तव काजळी । दीपु म्हणों ये? ॥272॥
पाण्यावर असलेले शेवाळ हे पाणी यापासून वेगळे असते; काजळाचा दिव्याची संबंध आहे, म्हणून त्या काजळाला दीप म्हणता येईल काय?
273-18
जरी चंद्रीं जाला कलंकु । तरी चंद्रेसीं नव्हे एकु । आहे दृष्टी डोळ्यां विवेकु । अपाडु जेतुला ॥273॥
जरी चंद्राला कलंक लागला आहे, तरी त्यांचे चंद्राची ऐक्य नाही, तसेच दृष्टी व डोळे यामध्ये जितका भेद आहे;
274-18
नाना वाटा वाटे जातया । वोघा वोघीं वाहातया । आरसा आरसां पाहातया । अपाडु जेतुला ॥274॥
अथवा वाट व तिजवरून चालणारा वाटसरु, ओघ व ओघांत वाहणारे पाणी आणि आरसा व आरशात पाहणारा मनुष्य यांच्यात जितका भेद आहे,
275-18
पार्था गा तेतुलेनि मानें । आत्मेंनिसीं कर्म सिनें । परी घेवविजे अज्ञानें । तें कीर ऐसें ॥275॥
तितक्याच मानाने आत्म्यापासून कर्म भिन्न आहे; परंतु अर्जुना, अज्ञानामुळे ती दोन्ही एकच आहेत, असे वाटते.

,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *