लवकर परमार्थ का करावा ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर मनुष्याने आपल्या आध्यात्मिक जीवनाला सुरवात करावी….आपल्या अंतरात्म्यात आध्यात्मिकतेचे बीज जीवनाच्या आरंभी जर पेरले नाही तर उत्तरायुष्यात आध्यात्मिक भाव निर्माण होऊ शकणार नाही….म्हणून …झडझडोनि वहिला निघ ! इये भक्तिचिये वाटे लाग….असे माउली सांगतात. मनुष्य एकदा आपल्या सहज-प्रवृत्तींचा दास झाला की त्यांच्या

सापळ्यातून स्वत:ची सुटका करुन घेणे खूपच कठीण जाते. या अशा प्रवृत्तींपासून मुक्त होण्यासाठी वृद्धावस्थेचा काळ फार अल्प असतो. या सर्व बंधनापासून दु:खापासून सुटका करुन घेणे हेच जर मनुष्याचे ध्येय आहे किंवा असेल तर मनुष्याने आत्ताच आध्यात्मिक जीवनास प्रारंभ करणे श्रेयस्कर होय….

सर्व लोक सुखाचे सोबती आहेत हे मनुष्याने लक्षात ठेवणे खूप जरुरीचे आहे. अंतकाली कोण कुणाचे नाही .. एकदा का शारिरीक आणि आर्थिक हानि झाली क्षीण झाली म्हणजे जवळ कुणिच फिरकणार नाही….तुकोबाराय म्हणतात….जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे ! अंत हे काळीचे नाही कोणी !! झाल्या हीन शक्ति नाक डोळे गळती ! सांडोनिया पळती रांडापोरे !! बाईल म्हणे खरे मरतां तरी बरे ! नासिले हे घर थुंकोनियां !! तुका म्हणे माझी नव्हतील कोणी ! तुज चक्रपाणी वांचूनियां !!….

त्रिकालाबाधित सत्यसिद्धान्त या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी मनुष्य जीवांना उघड करुन सांगिलय….एका चक्रपाणी भगवंत विठ्ठलावांचून मनुष्यजीवाचे कुणिही नाही व नसते हा परम गुह्योपदेश महाराजांनी तथा अनेक संतमहात्म्यांनी समजावून सांगितलय….म्हणून मनुष्याने मनातील प्रपंचाची आशा कमी करुन लवकरात लवकर आपले चित्त भगवंत चरणी तल्लीन करावे….आणि लाभलेल्या या नरदेहाचे कल्याण करुन घ्यावे….

ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर

माणसाने परमार्थ कधी करावा ? वयाच्या कितव्या वर्षापासून पारमार्थिक चिंतन करावे? याबद्दल मतभेद असू शकतात.कोणी म्हणेल की आयुष्याच्या शेवटच्या काऴामध्ये परमार्थ केला पाहिजे.आयुष्यभर संसार,व्यवहार करावा आणि उत्तरार्धात परमार्थ करावा.म्हणून कोणी तारूण्यातच देवधर्माच्या गप्पा मारू लागला तर त्याला त्याचे सहकारी ‘म्हातारा’ म्हणून संबोधतात.म्हणजे देवधर्म फक्त म्हातारपणातच करावयाचा असतो.तारूण्य हे केवऴ विषयांच्या उपभोगासाठी असते.

कारण तारूण्यातच इंद्रिये सक्षम असतात.म्हातारपणामध्ये इंद्रिय विषयांचा उपभोग घेऊ शकत नाही.त्यामुऴे देवधर्म हा म्हातारपणात करायचा असतो.जगामध्ये असा विचार करणारे लोकच अधिक आहेत.त्यामुऴे प्रवचन-कीर्तनांना वयोवृद्ध लोकांची अधिक गर्दी असते.परमार्थ हा रिटायर्ड झाल्यानंतर करायचा असतो,हीच अनेकांची भावना असते.


पण ही भावना योग्य नाही. परमार्थाचे चिंतन बालवयातही होऊ शकते.संतांची चरित्रे पाहिली तर बालपणीच त्यांना परमार्थाची आवड होती असे आढऴते.समर्थ श्रीरामदासस्वामी बालपणी विश्वाची चिंता करीत असत.श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी वयाच्या सोऴाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला.त्यांना परमार्थात वयाची अडचण आली नाही.त्यांनी सोऴाव्या वर्षी लिहिलेले आपणांस वाचायला एकसष्ठावे वर्ष का ? असा प्रश्न नेहमीच पडतो.वास्तविक परमार्थाला वयाचे बंधन नसते.श्रीशुकाचार्यांनी तर गर्भातच संसाराचे स्वरूप ओऴखले होते.परमार्थ कधी करावा ? याचे उत्तर आहे की, ज्या क्षणी हा प्रश्न निर्माण होईल त्याच क्षणी प्रारंभ करावा ! कारण हा प्रश्न संसाराचे दु:ख कऴल्याशिवाय निर्माण होणार नाही.परमार्थ त्याच क्षणी करावा.योगवसिष्ठांत प्रभू श्रीरामचंद्रांना उपदेश करताना वसिष्ठ म्हणतात,

‘अद्यैव कुरू यच्छ्रेयो वृद्ध : सन् किं करिष्यसि ।
स्वगात्राण्यपि भाराय भवन्ति हि विपर्यये
।।’

आजच आपले कल्याण करून घे.वृद्धापकाऴी काय होणार? म्हातारपणी आपल्या इंद्रियांचेच ओझे होते ! ज्याला आनंदाची प्राप्ती लवकर व्हावी असे वाटते तो तेवढ्या लवकर परमार्थाचे चिंतन करतो.म्हणून परमार्थ कधीही करता येतो.त्याला वयाचा विचार करण्याचे कारण नाही.परमार्थ कधी करावा ? उत्तर एकच – आत्ता !

।।राम कृष्ण हरी ।।

संदर्भ – संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.
मुळात परमार्थ ही करण्याची बाब नाही तर केवळ त्या
परात्पर सिद्ध तत्त्वाला पूर्णतः जाणून घेण्याची गोष्ट आहे. मग हे साठी बुद्धी नाठी झाल्यावर कसे साध्य करता येईल. म्हणून हे ऐन तारुण्यात साध्य करणे आवश्यक आहे.


रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *