संत नामदेव समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत नामदेव महाराज संपूर्ण चरित्र पहा

येथे संत नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे कथा त्यांच्या परिवाराच्या समाधी सोहळ्याचे अभंग

संत नामदेवराय आषाढ वद्य १३ शके १२७२ रोजी विकृत नाम संवत्सरे या मंगल दिवशी (शनिवार तारीख ३ जुलै, सन १३५० रोजी) वयाच्या ८० व्या वर्षी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात समाधिस्थ झाले. 
संत परसा भागवत आपल्या अभंगात म्हणतात– 

संत श्रीनामदेव महाराज श्रीज्ञानदेवांच्यानंतर चौपन्न वर्षे जगले. त्यांनी या कालात लोकांना भक्त्तिरसामृत पाजून व त्यांच्या अंतःकरणात भक्त्तीचे बीजारोपण करून त्यांस सद्धर्म प्रवृत्त केले. श्रीनामदेवांनी भागवत धर्माचा प्रसार करण्याच्या कामी आपले सर्व जीवन वेचले. ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे त्यांनी अभंग संकीर्तने केली. आपल्या सभोवताली जमलेल्या असंख्य लोकांमध्ये ईश्वरभक्त्ती, परस्पर प्रेमभाव, जनसेवा यांचा प्रादुर्भाव केला. जात-गोत-प्रांत-भाषा आदींचे लौकिक बांध फोडले. परमार्थदृष्ट्या परमेश्वराच्या व लौकिकदृष्ट्या जनता जनार्दनाच्या भजनी अनेकांना लावले. `जनी जनार्दन ऐसा भाव’ हाच त्यांच्या जीवनातला एकमेव स्थायीभाव होता. शूद्रातिशूदांची सेवा करणाऱ्या नामदेवांच्या दृष्टीला मानवातील देवच दिसला.

“आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा / माझिया सकळा हरिच्या दासां // ”

या त्यांच्या पसायदानात हीच मानवतेची विशाल, उदात्त आणि मौलिक कल्पना सामावलेली आहे. उत्तर भारतातील लोकजागृतीचे व लोकसंघटनेचे कार्य आटोपून, अखेरीस ते आपल्या भूतपूर्वस्थळी– श्रीक्षेत्र पंढरपूर येथे–परत आले. पंढरी, पांडुरंग, चंद्रभागा, पुंडलिक इत्यादी नावे त्यांच्या जीवनात आवडती व अविस्मरणीय होती. ऐशी वर्षांच्या प्रदीर्घ जीवनानंतर, आषाढ शुद्ध ११ शके १२७२ या तिथीस, नामदेवराय श्रीपांडुरंगापाशी जाऊन लडिवाळपणे म्हणाले,

“देवा ! आता मला समाधी घेण्यास अनुज्ञा द्या. अंतकाल आता अगदी समीप आला आहे. माझ्या जीवनात मला ज्ञानेशांचा सहवास लाभला. त्यांच्या सहवासात मी तीर्थयात्रा केली. शतकोटी अभंगाचा संकल्प सिद्धीस नेला. सारे लोक भक्त्तिमार्गास लावून भगवद्‍भक्त्तीने त्यांच्या जन्माचे सार्थक झाले. माझी आता कोणतीही वासना उरलेली नाही. तुझ्या कृपेने माझे सारे मनोरथ पूर्ण झाले आहेत. तुझ्या चरणापाशी जागा मिळावी एवढीच माझी तुला अखेरची विनंती आहे.”

नामदेवांचे सत्‌शिष्य परिसा भागवत यांनी
हेच पुढील अभंगात सांगितले आहे–

संत नामदेव महाराज संपूर्ण चरित्र पहा


आषाढ शुद्ध एकादशी।
नामा विनवी विठ्ठलासी।
आज्ञा द्यावी वो मजसी।
समाधि विश्रांती लागीं॥१॥

आयुष्य कळसासी आलें।
अभंग त्वां सिद्धीसी नेलें।
ज्ञानेश्वर संगती घडले।
तीर्थ मिसें जगदोद्धार॥२॥

जन्मा आलियाचे कृत्य।
जन लावावें सुपंथ।
विठ्ठल मंत्र त्रिभुवनांत।
जग जाणत महिमा हें॥३॥

सर्वसिद्धी मनोरथ।
तुझेनि कृपा पावलों समस्त।
म्हणे परिसा भागवत।
नामा नाम जपतसे॥४॥


महाद्वारीं सुख असे या सुखाचें।
लागती संतांचे चरणरज॥१॥
म्हणोनियां स्थळ पाहिलें निवांत।
झाले चित्त तेथे समाधान॥धृ॥
सकळ वैष्णवासहित बोळवण करा।
तुम्हीं वो दातारा मजलागीं॥३॥
देव म्हणेनाम्याराहें पक्षभरी।
पुरतील अंतरी कोड तुझे॥४॥


रुसलासे नामा उभा गरुडपारी।
पीतांबरधारी पालवितो॥१॥
आपुल्या सुखाचा तुज देईन वाटा।
जरी येसीं वैकुंठा याची वेळा॥धृ॥
आपुलें निजपदीं तुज बैसविण।
उभा मी राहीन मागे पुढे॥३॥
पीतांबर छाया धरीन तुजवरी।
तुज मी क्षणभरी न विसंबें॥४॥
व्यास अंबऋषी ध्रुव रुक्मांगद।
तयाहुनी वंद्य करीन तुज॥५॥
ऐसे माझे मनीं होतें बहुत दिवस।
तुं कां रे उदास कवण्या गुणे॥६॥
नामा म्हणे ऐसेनाही माझे चित्तीं।
मज आहे विश्रांति तुझे पायी॥७॥


वैकुंठासी आम्हां नको धाडू हरी।
वास दें पंढरी सर्व काळ॥१॥
वैकुंठ कोपट जुनाट झोपडी।
नको आडाआडीं घालू मज॥धृ॥
वैकुंठा जाऊनि काय बा करावें।
उगीच बैसावें मौनरूप॥३॥
नामा म्हणे मज येथेचि वो ठेवीं।
वास सदा देईं चरणांजवळीं ॥४॥


वतन आमुची मिरासी पंढरी । विठोबाच्या घरीं नांदणूक ॥१॥
सेवा करुं नित्य नाचूं महाद्वारीं । नामाची उजरी जागऊं तेथें ॥२॥
साधुसंता शरण जाऊं मनोभावें । प्रसाद स्वभावें देती मज ॥३॥
नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे । संत पाय हिरे देती वरी ॥४॥


वैष्णवांचे थाट पताकांचे भार । करिती जयजयकार महाघोष ॥१॥
पुष्पांचा वरुषाव विमानांची दाटी । नामघोष सृष्टि न समाये॥२॥
‌ऋषिगण गंघर्व इंद्र प्रजापती । धन्य धन्य म्हणती नामयासी ॥३॥
देवे वेळाईत केलासी बा ‌ऋणें । अनन्य अनन्य भक्ती तुझी ॥४॥
अलंकापुरी ज्ञानिया इंद्रनील सोपान । निवृत्तीचा जाण त्रिंबकेश्वरीं ॥५॥
नामा महाद्वारी श्रेष्ठ हे पंढरी । प्रत्यक्ष भूवरी वैकुंठ हें॥६॥
देवें नामयासी पोटासी धरिले । नेत्रोदकें न्हालें सर्वाग हे॥७॥
जन्मोनी सार्थक तुवा बरवें केले । वनी मोकलिलें मजलागी ॥८॥
राही रखुमाबाई सत्यभामा सती । नामा आलिंगिती प्रेमें करूनी ॥९॥
धन्य दिन सुखाचा वेदघोष विप्रांचा । वैष्णवी नामाचा घोष केला ॥१०॥
तेथे पूजा नमस्कार परिसियानें केली । हृदयी धरीली चरण कमळें ॥११॥


वियोग नामयाचा न साहे गोपाळा ।
न जाय राउळा पांडुरंग ॥१॥
पद्माळ्यांत तेव्हां राहे विश्वंभर ।
कळे समाचार रुक्मिणीसी ॥२॥
चला वो मंदिरीं देवा पुरुषोत्तमा ।
येईल गे नामा माझा जेव्हां ॥३॥
तयाविण मज दाही दिशा ओस ।
न लगे चित्तास गोड कांहीं ॥४॥
परिसा म्हणे ऐसी आवडी नाम्याची ।
म्हणोनियां त्याची सेवा करू ॥५॥


पूर्वसंबंधें मज दिघलें बापानें । शेखी काय जाणें कैसें झालें ।।१।।
प्रसुतालागीं मज आणिलें कल्याणा । अंतरला राणा पंढरीचा ।।२।।
मुकुंदे मजसी थोर केला गोवा । लोटियेलें भवा नदीमाजीं ।।३।।
ऐकिला वृत्तांत सर्व झाले गुप्त । माझेंचि संचित खोटें कैसें ।।४।।
द्वादश बहात्तरी कृष्ण त्रयोदशी । आषाढ़ हें मासी देवद्वारीं ।।५।।
सर्वांनी हा देह अर्पिला विट्ठली । मज कां ठेविलें पापिणीसी वेगळी ।।६।।
लडाई म्हणे देह अर्पिन विट्ठला । म्हणोनि आदरिला प्राणायाम ।।७।।

संत नामदेव महाराज संपूर्ण चरित्र पहा

वारकरी संत समाधी अभंग

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *