सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १०७६ ते ११०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

1076-18
ऐसा जिंतिलिया रिपुवर्गु । अपमानिलिया हें जगु । अपैसा योगतुरंगु । स्थिर जाला ॥1076॥
ह्याप्रमाणे शत्रुसमुदायाला (अहंकारादि) जिंकून, सर्वात्मभावाने जगताचा पारमार्थिक अभाव पटल्यावर त्याच्या राजयोगरूप अश्वाची धांव सहजच थांबते 76
1077-18
वैराग्याचें गाढलें । अंगी त्राण होतें भलें । तेंही नावेक ढिलें । तेव्हां करी ॥1077॥
(संसारशत्रूशीं झुंजण्यासाठी) अंगांत जे वैराग्याचे मजबूत चिलखत घातलेले होते तेंही (आत्म-बोधानंतर ) क्षणभर ढिलें केलें जातं. (अगर होते) 77
1078-18
आणि निवटी ध्यानाचें खांडें । तें दुजें नाहींचि पुढें । म्हणौनि हातु आसुडें । वृत्तीचाही ॥1078॥
आणि ज्या ध्यानखड्गानें द्वैत नाश करण्याचे योजिलें होतें, ते द्वैतच बोधोत्तर पुढे येत नसल्यामुळे त्या ध्यानाच्या वृत्तीलाही मांद्य येते. 78
1079-18
जैसें रसौषध खरें । आपुलें काज करोनि पुरें । आपणही नुरे । तैसें होतसे ॥1079॥
जसे खरें रसायन रोगबीज नष्ट करून आपणही शरीरत उरत नाही, तशी (साधनांची) स्थिति होते. 79
1080-18
देखोनि ठाकिता ठावो । धांवता थिरावे पावो । तैसा ब्रह्मसामीप्यें थावो । अभ्यासु सांडी ॥1080॥
मुक्कामाचे ठिकाण जवळ आलेले दिसतांच, जलद पडणारे जसें पाऊल मंदावतें, त्याप्रमाणे ब्रह्मसामीप्यस्थितीची जाणीव होतांच तत्प्राप्त्यर्थ चाललेले) सर्व अभ्यास ढिले पडतात1080

1081-18
घडतां महोदधीसी । गंगा वेगु सांडी जैसी । कां कामिनी कांतापासीं । स्थिर होय ॥1081॥
समुद्राची भेट झाल्यावर जसा गंगेचा प्रवाह थांबतो किंवा कांतसमागमांत कामिनी जशी अचल (शांत) होते. 81
1082-18
नाना फळतिये वेळे । केळीची वाढी मांटुळे । कां गांवापुढें वळे । मार्गु जैसा ॥1082॥
केळ व्याली (फलवती झाली) म्हणजे तिची वाढ जशी खुंटते किवा गांव आला म्हणजे मार्ग जसा संपतो. 82
1083-18
तैसा आत्मसाक्षात्कारु । होईल देखोनि गोचरु । ऐसा साधनहतियेरु । हळुचि ठेवी ॥1083॥
याप्रमाणे, आत्मसाक्षात्कार होण्याचा समय जाणतांच, साधनरूप हत्यारें हळूच बाजूस सारतो. 83
1084-18
म्हणौनि ब्रह्मेंसी तया । ऐक्याचा समो धनंजया । होतसे तैं उपाया । वोहटु पडे ॥1084॥
म्हणून, अर्जुना, त्याला ब्रह्मस्थिति बाणू लागण्याच्या वेळी, साधनांना ओहोटी लागते. (शिथिल, कमी होतात.) 84
1085-18
मग वैराग्याची गोंधळुक । जे ज्ञानाभ्यासाचें वार्धक्य । योगफळाचाही परिपाक । दशा जे कां ॥1085॥
मग, वैराग्याची सांजवेळ, (मावळती दशा) ज्ञानाभ्यासाची वृद्धावस्था, (दृढपणा) योगफलाची परिपूर्णावस्था, अशी स्थिति, 85
3


1086-18
ते शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा । तैं ब्रह्म होआवया जोगा । होय तो पुरुषु ॥1086॥
जी शान्ति, ती हे अर्जुना, त्याचे ठिकाणी संपूर्णतया बाणते, व मग तो साधक ब्रह्मरूप होण्याच्या योग्यतेचा होतो. 86
1087-18
पुनवेहुनी चतुर्दशी । जेतुलें उणेपण शशी । कां सोळे पाऊनि जैसी । पंधरावी वानी ॥1087॥
तेव्हां, पौणिमेचा पूर्ण चंद्र व चतुर्दशीचा चंद्र ह्यांच्या कलांत जितका फरक असतो, अथवा सोळाकशी सोन्यापेक्षां पंधराकशी सोने जितक्या अंशाने कमी भावचे असतें. 87
1088-18
सागरींही पाणी वेगें । संचरे तें रूप गंगे । येर निश्चळ जें उगें । तें समुद्रु जैसा ॥1088॥
गंगेने समुद्रात प्रवेश केल्यावर, तिचा वेग दृष्टीला अगर स्पर्शाला जेथवर जाणवतो तेथवर तिला गंगापण आहे; जेथे अस फरक जाणवत नाही तेथे ती समुद्र झाली असे समजावें. 88
1089-18
ब्रह्मा आणि ब्रह्महोतिये । योग्यते तैसा पाडु आहे । तेंचि शांतीचेनि लवलाहें । होय तो गा ॥1089॥
याप्रमाणे ब्रह्मरूप झालेला व ब्रह्मरूप होण्याच्या स्थितीत असलेला ह्यांत अंतर आहे; तें अंतर शांतीच्या योगें तो तोडतो. 89
1090-18
पैं तेंचि होणेंनवीण । प्रतीती आलें जें ब्रह्मपण । ते ब्रह्म होती जाण । योग्यता येथ ॥1090॥
कारण, ब्रह्म व्हावयाचे नसते, तर, ब्रह्मरूपच आपण केव्हाही आहों व मुळचे होतों अशी जी प्रतीति, तीच त्याची ब्रह्म होण्याची योग्यता असें तू समज. 1090
ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काण्‌क्षति ।
समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ॥18.54॥


1091-18
ते ब्रह्मभावयोग्यता । पुरुषु तो मग पंडुसुता । आत्मबोधप्रसन्नता- । पदीं बैसे ॥1091॥
अर्जुना, ती ब्रह्मभावाची योग्यता पावलेला पुरुष, आत्मबोधप्रसन्नतेच्या पदावर सहजच आरूढ होतो. 91
1092-18
जेणें निपजे रससोय । तो तापुही जैं जाय । तैं ते कां होय । प्रसन्न जैसी ॥1092॥
ज्या अग्निसहाय्याने पाकसिद्ध होते, ती उष्णता मुरली म्हणजे ते अन्न जसे रुचीस व प्रसन्नतेस कारण होते. 92
1093-18
नाना भरतिया लगबगा । शरत्काळीं सांडिजे गंगा । कां गीत रहातां उपांगा । वोहटु पडे ॥1093॥
किंवा शरद् ऋतूत, गंगेचा पावसाळयांतील चढ उतार जसा थांबतो अथवा गायनसमाप्तीनंतर, तत्प्रीत्यर्थ आणलेल उपकरणे जशीं आपोआप बाजूस रहातात 93
1094-18
तैसा आत्मबोधीं उद्यमु । करितां होय जो श्रमु । तोही जेथें समु । होऊनि जाय ॥1094॥
त्याचप्रमाणे आत्मज्ञानप्राप्तीकरितां केलेल्या साधनादि उद्योगाने जो श्रम होतो त्याचाही त्या प्रसन्नतेमुळे परिहार होतो. 94
1095-18
आत्मबोधप्रशस्ती । हे तिये दशेची ख्याती । ते भोगितसे महामती । योग्यु तो गा ॥1095॥
अशा स्थितीलाच आत्मबोधाची प्रसन्नता असे म्हणतात; व ती भोगण्याची असा जो योगी साधक, त्याचीच अर्जुना, योग्यता आहे. 95

1096-18
तेव्हां आत्मत्वें शोचावें । कांहीं पावावया कामावें । हें सरलें समभावें । भरितें तया ॥1096॥
ज्याची वृत्ति साम्यभावाने (विषमता-रहित) परिपूर्ण आहे, असा तो योगी, अमुक एक गोष्ट माझी होती म्हणून तिजबद्दल शोक करील अगर अमुक एक गोष्ट मला असावी असें इच्छील, ह्या दोन्ही गोष्टी संभवत नाहीत. (संपतात) 96
1097-18
उदया येतां गभस्ती । नाना नक्षत्रव्यक्ती । हारवीजती दीप्ती । आंगिका जेवीं ॥1097॥
सूर्योदय होतांच, नाना नक्षत्रे आपापलें तेज जसे टाकतात ( निस्तेज होतात). 97
1098-18
तेवीं उठतिया आत्मप्रथा । हे भूतभेदव्यवस्था । मोडीत मोडीत पार्था । वास पाहे तो ॥1098॥
त्याप्रमाणे अपरोक्ष आत्मानुभवाच्या उदयाबरोबर, त्याच्या दृष्टीने भूतांतील भेदभाव लयास जाऊन, त्याला सर्वत्र आत्मदर्शनच होत असतें. 98
1099-18
पाटियेवरील अक्षरें । जैसीं पुसतां येती करें । तैसीं हारपती भेदांतरें । तयाचिये दृष्टी ॥1099॥
पाटीवरील अक्षरे जशीं हातानें पुसली जातात, तसा, त्याच्या दृष्टीने वस्तूवस्तूंमधील भेदभाव नाहीसा होतो. 99
1100-18
तैसेनि अन्यथा ज्ञानें । जियें घेपती जागरस्वप्नें । तियें दोन्ही केलीं लीनें । अव्यक्तामाजीं ॥1100॥
त्याप्रमाणे, अज्ञानाच्या विक्षेपशक्तीने दाखविलेल्या ज्या जागर व स्वप्न ह्या अवस्था त्या त्यांचे कारण जे अव्यक्त (अज्ञान) त्यांत प्रथम लीन होतात. 1100

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading