सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी २५१ ते २७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

251-2
जैसा कर्पुराचा राशि कीजे ।मग अग्नि लाऊनि दीजे ।कां मिष्टानीं संचरविजे । काळकूट ॥ 251 ॥
ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि मग तिला अग्नी लाऊन द्यावा किंवा मिष्टान्नात जालीम विष घालावे.
252-2
दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला ।तैसा नासिती धर्म निपजला । हेतुकपणें॥ 252 ॥
किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा त्याप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते आयता घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवतात.
253-2
सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु का अपेक्षिजे ।परी नेणती ते काय कीजे । अप्राप्त देखें ॥ 253 ॥
मोठ्या सायासाने पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी? पण पहा, ज्यांना सद्बुद्धी प्राप्त झालेली नाही अशा त्या अज्ञानी लोकांना हे समजत नाही त्याला काय करावे?
254-2
जैसे रांधवणी रससोय निकी । करुनियां मोले विकी ।तैसा भोगासाठी अविवेकी । धाडिती धर्मु ॥ 254 ॥
ज्याप्रमाणे एखाद्या सुग्रण स्त्रीने उत्तम पक्वान्ने करून ती केवळ द्रव्याच्या आशेने विकून टाकावी, त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुखोपभोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात.
255-2
म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा ।तयां वेदवादरतां । मनीं वसे ॥255॥
म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामधे मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते हे लक्षात ठेव.
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन।
निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्॥2-45॥

अर्थहे अर्जुना, वेद त्रिगुणात्मक (संसाराचे) प्रतिपादन करणारे आहेत. तू त्रिगुणातीत हो, द्वंद्वरहित हो, नित्य सत्वगुणी हो, योगक्षेमरहित हो आणि आत्मनिष्ठ हो. आत्मसुखाला विसरू नकोस.


256-2
तिन्हीं गुणीं आवृत्त । हे वेद जाणे निभ्रांत ।म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्विक ते ॥256॥
तू असे नि:संशय समज की वेद हे सत्व, रज व तम या त्रिगुणांनी व्याप्त आहेत. म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते केवळ सात्विक आहेत.
257-2
येर रजतमात्मक।जेथ निरुपिजे कर्मादिक ।जे केवळ स्वर्गसूचक ।धनुर्धरा ॥257॥
आणि अर्जुना केवळ स्वर्गसूचक अशा कर्मादिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत.
258-2
म्हणोनि तूं जाण । हे सुखदुःखासीच कारण ।एथ झणे अंतःकरण । रिगों देसी ॥ 258 ॥
म्हणून हे केवळ सुखदु:खाला कारण होणारे आहेत असे तू समज व त्यांचे ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर ते जाऊ देऊ नकोस.
259-2
तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं ।एक आत्मसुख अंतरी । विसंब झणीं ॥ 259 ॥
तू तिन्ही गुण टाकून दे, मी माझेपण धरू नकोस. पण अंत:करणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस.
260-2
यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः॥ 2.46 ॥

जरी वेदें बहुत बोललें । विविध भेद सूचिले* । *तर्‍ही आपण हित आपुलें । तेंचि घेपे ॥ 260 ॥
जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत.अनेक प्रकारचे साधन मार्ग सूचविले आहेत, तरी *आपण त्यातिल आपले हित ज्यात आहे तेच घ्यावे.


261-2
जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती । तरी तेतुलेही काय चालिजती । सांगे मज ॥261॥
जसे सूर्योदय झाला की, सर्वच रस्ते दिसू लागतात; म्हणून त्या सर्वच मार्गांनी आपण जाऊ शकतो काय? सांग बरे मला.
262-2
का उदकमय सकळ । जर्‍ही जाहलें असे महीतळ । तरी आपण घेपे केवळ । आर्तीचजोगें ॥262॥
अथवा, पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तेवढे जरी पाणी असले, तरी आपण आपल्याला हवे तेवढे पाणी घेतो.
263-2
तैसे ज्ञानिये जे होती । ते वेदार्थाते विवरिती । मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्वत जें ॥263॥
त्याप्रमाणेच जे ज्ञानी आहेत, (ते विचारवान मुमुक्षू आहेत).ते वेदार्थाचा विचार करतात आणि आपल्याला अपेक्षित अशा शाश्वत परब्रम्हतत्वाचाच फक्त स्विकार करतात.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥2.47॥
भावार्थ :- अर्जुना ! तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्मफळांचा अधिकारी तू कधी होऊ नकोस. कर्माच्या फळाची इच्छादेखील धारण करू नकोस आणि कर्म न करण्याविषयीही आग्रह धरू नकोस.
264-2
म्हणौनि आइकें पार्था । याचिवरी पाहतां । तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥264॥
म्हणून अर्जूना, ऐक. या सर्व गोष्टींचा विचार करून पाहिले, असता तूला आता स्वकर्मच करणे उचित (निश्चित फलप्रद)आहे.
265-2
आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेंचि हें मना आलें । जे न संडिजे तुवा आपुलें । विहित कर्म ॥265॥
आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पहिला, त्यावेळी असे दृष्टिस आले की आपले विहीत कर्म आपण कधीही सोडू नये.


266-2
आम्हीं समस्तही विचारिलें । आणि कुकर्मी संगति न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥266॥
मात्र हे (विहीत कर्म करताना) या कर्माचे फल मिळेल ही इच्छा ठेवू नये. आणि निषिद्ध कर्माचे आचरण होऊ नये. म्हणून या सत्कर्माचेच निष्काम वृत्तीने आचरण करावेस.
योगस्थ कुरू कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते॥2.48॥
भावार्थ :- हे धनंजया ! तू आसक्तीचा त्याग करून पूर्ण व अपूर्ण यामध्ये समान बुद्धी ठेऊन योगस्थ स्थितीने कर्मे कर. असा जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग् म्हणतात.
267-2
तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संग सांडुनी । मग अर्जुना चित्त देऊनी । करीं कर्में ॥267॥
अर्जूना तू समतारुपी योगाने युक्त हो, फलाची इच्छा टाकून मन एकाग्र करून कर्मे कर.
268-2
परी आदरिले कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे । तरी विशेषें तेथ तोषावें । हेही नको ॥268॥
आणि आरंभिलेले कर्म दैवयोगानेच यथासांग पूर्ण झाले.तरी त्याचा विशेष संतोष मानू नकोस.
269-2
कां निमित्तें कोणे एकें । तें सिद्धी न वचतां ठाकें । तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥269॥
किंवा कोणत्याही कारणाने ते कर्म सिद्धीस गेले नाही, अर्थवट राहिले, तरी त्याबद्दल मनात असंतोष मानू नकोस व मनाला त्रासहि करून घेऊ नकोस.
270-2
आचरता सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें । परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥270॥
कर्म करताना जर ते शेवटास गेले (सफल झाले) तर ते खरोखर आपल्या उपयोगाला आले; परंतू कदाचित काही विघ्ने येऊन जर कर्म अपुरे राहिले, तरीही ते सफलच झाले, असे समजावे.


271-2
देखें जेतुलालें कर्म निपजे । तेतुलें आदिपुरुषीं जरी अर्पिजे । तरी परीपूर्ण सहजें । जहालें जाणे ॥271॥
कारण असे पाहा की, जेवढे म्हणुन आपल्या हातून कर्म होईल, ते सर्वच ईश्वरचरणी अर्पण केले, म्हणजे सहजच परिपूर्ण झाले, असे समज.
272-2
देखें संतासंती कर्मीं । हें जे सरिसेपण मनोधर्मीं । तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे ॥272॥
अर्जूना हे पाहा ! पूर्ण आणि अपूर्ण (किंवा चांगले – वाईट) कर्माविषयी (बाबतीत आपले मन) मनाचा समतोलपणा राखणे, हीच योगस्थिति होय. याच योग्यस्तिथीची प्रशंसा करतात.
दूरेण ह्यत्वरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय ।
बुद्धौ शरणमन्विछ कृपणाः फलहेतवः॥2.49॥
भावार्थ :- हे अर्जुना, निष्काम बुद्धियुक्त होऊन केलेल्या कर्मपेक्षा (फळाच्या इच्छेने) सकाम कर्म अत्यन्त निकृष्ट होय. तू समत्वबुद्धीचा आश्रय घे. फलाचा हेतू मनात ठेवून कर्म करणारे दीन होत.
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत्दुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलं॥2.50॥

भावार्थ :- समत्वबुद्धियुक्त मनुष्य या लोकीच पुण्य व पाप या दोन्हीचा त्याग करतो. म्हणून समत्वबुद्धीयोग साध्य करून घेण्याचा प्रयत्न कर. कारण योग म्हणजे कर्माचे कौशल्य होय. (म्हणजेच प्रम्यात्म्याच्या चरणी कर्म अर्पण करणे)
273-2
अर्जुना समत्व चित्ताचें । तेचिं सार जाण योगाचें । जेथ मना आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥273॥
अर्जूना ! यशपयशी चित्ताची समता हे योगाचे सार आहे.या योगात मन (क्रिया)व बुद्धी (ज्ञान) यांचे ऐक्य असते. (म्हणजे मनाचा संकल्प, व बुद्धीचा निश्चय यांत विरोध नसतो हे वैशिष्ट्य)
274-2
तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडे पार्था । दिसे हा अरुता । कर्मभागु ॥274॥
पार्था ! या बुद्धीयोगाची आणि कर्मयोगाची तुलना केली, तर अनेक प्रमानांनी सकाम कर्मयोग कमी प्रतीचा वाटतो.
275-2
परि तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे । जें कर्मशेष सहजे । योगस्थिति ॥275॥
परंतु सुरुवातीला तेच सकाम कर्म जेंव्हा करावे तेंव्हाच (पुढे) निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. त्या कर्माचे (निरहंकार व निष्काम बुद्धीने आचरण केले तरच हा बुद्धीयोग साध्य होतो) या कर्माची (शेवटची अवस्था) उत्तरावस्था तीच योगस्थिती होय.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading