सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी १ ते २५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

सार्थ ज्ञानेश्वरी:॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥
। अथ तृतीयोऽध्यायःअध्याय तीसरा । । कर्मयोगः ।
गीता श्लोक :- 43 ज्ञानेश्वरी ओव्या :- 276
अध्याय तीसरा

1-3
अर्जुन उवाच:
ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव॥3.1॥

भावार्थ :- अर्जुन म्हणाला, “हे जनार्दना ! कर्मा पेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे असे तुमचे मत आहे, तर मग हे केशवा, मला हे घोर कर्म का करावयास सांगता.?”
मग आइका अर्जुने म्हणितलें । देवा तुम्हीं जें वाक्य बोलिले । तें निकें म्यां परिसलें । कमळापती ॥1
(ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुनाने कोणत्या प्रकारे शंका विचारली ते आता ऐकावे,) मग अर्जुन म्हणाला, “हे देवा ! तूम्ही जे काही बोललात, ते, हे कमलापति, मी लक्षपूर्वक (चांगले) ऐकले.
2-2
तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां । ऐसें मत तुझें अनंता । निश्चित जरी ॥2॥
श्रीअनंता, (भगवंतांनी या पूर्वीचे सांगितलेले आत्मज्ञानाचा विचार केला) तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करून पहिला असता त्या ठिकाणी कर्म आणि त्याचा कर्ता, हे उरतच नाहींत व हेच जर तुझे मत निश्चित असेल,
3-3
तरी मातें केवी हरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं । इये लाजसीना महाघोरीं । कर्मीं सुता ॥3॥
तर मग श्रीकृष्णा, ‘मला का म्हणता की, “पार्था तू युद्ध कर “.या भयंकर कर्मात मला घालताना तुला काहीच वाटत नाही काय?
4-3
हां गा कर्म तूंचि अशेष । निराकारासी निःशेष । तरी मजकरवीं हें हिंसक । कां करविसी तूं ॥4॥
अरे, तूच जर सर्व कर्माचा निषेध करतोस, तर मग माझ्याकडून हे हिंसात्मक कर्म का करवुन घेतोस? (घेत आहेस. देवा हे योग्य आहे का?)
5-3
तरीं हेंचि विचारीं हृषीकेशा । तूं मानु देसी कर्मलेशा । आणि येसणी हे हिंसा । करवित अहासी ॥5॥
हे ऋषीकेशा ! याचा तू विचार करून पाहा कीं, आत्मज्ञानापुढे तू अल्पशा कर्मालादेखील मान देतोस आणि माझ्याकडुन एवढी मोठी हिंसा करवून घेत आहेस;(या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा घालावा.)


6-3
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्॥3.2॥
भावार्थ :- आपल्या या घोटाळ्याच्या, दुपट्टी वचनामुळे माझ्या बुद्धीला भ्रम झाला आहे. तरी तू ज्याच्या योगाने (जे केल्याने) मला हित प्राप्त होईल असें एक निश्चित वचन सांग.
देवा तुवांचि ऐसें बोलावें । तरी आम्हीं नेणतीं काय करावें । आता संपले म्हणे पां आघवें । विवेकाचे ॥6॥
देवा ! तुम्हीच जर असे संदेह उत्पन्न होणारे विचार बोलू लागलात, तर आमच्या सारख्या अज्ञानी लोकांनी काय करावे? तर मग आता विवेकाची गोष्टच संपली, असच म्हणाव लागेल?
7-3
हां गा उपदेशु जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा । आतां पुरला आम्हां धिंवसा । आत्मबोधाचा ॥7॥
अहो ! यालाच जर (अज्ञान नाशाचा) उपदेश म्हणावे, तर मग याहून भ्रम (उत्पन्न करणारे) तो निराळा कोणता? आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पूर्ण झाली म्हणावयाची.
8-3
वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये । तरी रोगिया कैसेनि जिये । सांगे मज ॥8॥
वैद्य हा (प्रथम रोग्याला औषध देऊन त्याने) काय खावे, काय खाऊ नये, हे पथ्य सांगून, मग नंतर जर त्याच वैद्याने रोग्यास (खाण्यासाठी) विष दिले तर तो रोगी कसा वाचावा हे मला सांग बरें !
9-3
जैसे आंधळे सुईजे आव्हांटा । कां माजवण दीजे मर्कटा । तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हां ॥9॥
जसे एखाद्या आंधळ्याला आडमार्गाला लावावे किंवा माकडाला मादक पदार्थ पिण्यास द्यावा, तसा हा तूझा उपदेश आम्हा अज्ञानी लोकांना चांगलाच लाभला आहे.
10-3
मी आधींचि कांही नेणें । वरी कवळिलों मोहें येणें । कृष्णा विवेकु या कारणें । पुसिला तुज ॥10॥
अहो ! मला आधीच काही समजेनासे झाले आहे, त्यात मी या मोहाच्या चक्रात आडकलो आहे, म्हणून हे कृष्णा ! खरे काय आणि खोटे काय, ही गोष्ट तुला विचारली आहे. (हा सारासार विचारले आहे.)


11-3
तंव तुझी एकेकी नवाई । एथ उपदेशामाजीं गांवाई । तरी अनुसरलिया काई । ऐसें कीजे ॥11
तो तुझे एकेक पहावे, ते सर्वच आश्चर्य ! इकडे उपदेश करतोस आणि त्यात आम्हाला (अज्ञानी) घोटाळ्यात घालतोस ! आम्ही तुला शरण आलो, तुझे विचार ऐकतो; तर तु शरणांगताशी असे वागावे का?
12-3
आम्हीं तनुमनुजीवें । तुझिया बोला वोटंगावें । आणि तुवांचि ऐसें करावें । तरी सरलें म्हणे ॥12॥
आम्ही शरीराने, मनाने व जीवाभावाने तुझ्यावर विश्वास ठेवावा (त्या नुसार जगावे) आणि तूच जर असे वागू (भ्रम निर्माण करणारे बोलू लागलास असे अर्जुन म्हणतोय) लागलास तर सगळे कांही संपलेच, असे म्हणावे लागेल.
13-3
आतां ऐसियापरी बोधिसी । तरी निकें आम्हां करिसी । एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे ॥13॥
“आता आशाच प्रकारे उपदेश करणार असशील, तर मग आमचे चांगले कल्याण करतोस म्हणावयाचे ! अर्जुन येथे (उपहासाने म्हणाला) आता येथे ज्ञान मिळण्याची आशा कशाची?”
14-3
तरी ये जाणिवेचे कीर सरलें । परी आणिक एक असें जाहलें । जें थितें हें डहुळलें । मानस माझें ॥14
ज्ञान मिळविण्याची गोष्ट तर खरोखरीच संपली, पण यांत आणखी एक असे झाले की, माझे स्थिर असलेले मन घोटाळ्यात पडले ! (संशयाने गोंधळून गेले)
15-3
तेवींचि कृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे । जरी चित्त पाहसी माझें । येणे मिषें ॥15॥
पुन्हा अर्जुन (जास्तच बोलला अस वाटुन चपापला आणि स्वर बदलून बोलू लागला) त्याप्रमाणे हे श्रीकृष्णा
! तुझे अलौकिक चरित्र मला समजत नाही.(तुझी लिला मला काही कळत नाही,) कदाचित या उपदेशाच्या निमित्ताने तू माझी परीक्षा घेत आहेस काय?


16-3
ना तरी झकवितु आहासी मातें । की तत्वचि कथिलें ध्वनितें । हे अवगमतां निरुतें । जाणवेना ॥16॥
किंवा तू आम्हाला भ्रमित करत आहेस, का गूढ शब्दांनी तत्वज्ञान सांगत आहेस, याचा सूक्ष्म विचार केला, तरी मला निश्चित असे कांही कळत नाही.
17-3
म्हणोनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा । मज विवेकु सांगावा । मर्‍हाटा जी ॥17॥
म्हणूण हे देवा ! आपण माझे ऐकावे. हा उपदेश असा गुढार्थाने सांगू नकोस. महाराज, मला तो विचार माझ्या भाषेत, मला समजेल असा सोपा करून सांगावा. (आडाण्यालाही समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगा)
18-3
मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियसें । कृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥18॥
हे श्रीकृष्णा ! मी अतिशय मंदबुद्धी आहे, पण अशाहि मला उत्तम प्रकारे समजेल,असे निश्चयात्मक सांग.
19-3
देखें रोगातें जिणावें । औषध तरी द्यावें । परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसें ॥19॥
हे पाहा, रोग नाहिसा होण्यासाठी वैद्याने औषध तर द्यावे; परंतु ते मधुर व रुचकर असावे; (रोगी ते आनंदाने पिला पाहिजे)
20-3
तैसें सकळार्थभरित । तत्व सांगावे उचित । परी बोधे माझें चित्त । जयापरी ॥20॥
त्याप्रमाणे अर्थाने परिपूर्ण व आचरणास उचित योग्य असे तत्व तर सांगावे, पण ते असे सांगावे की, जेणेकरून माझ्या मनाला निःसंशय कळेल. (त्याचा निःसंदिग्धपणे पूर्ण बोध होईल.)


21-3
देवा तुज ऐसा निजगुरु । आणि आर्तीधणी कां न करूं । एथ भीड कवणाची धरूं । तूं माय आमुची ॥21॥
हे देवा, तुमच्यासारखा सद्गुरू आज लाभला आहे, तर मी माझ्या मनाची इच्छा तृप्त का बरें करून घेऊ नये? तू आमची आई आहेस (तर मग) येथे भीड का बरे धरावी?
22-3
हां गा कामधेनूचें दुभतें । देवें जाहलें जरी आपैतें । तरी कामनेची कां तेथें । वानी कीजे ॥22॥
अहो, दैवयोगाने कामधेनुचे दुभते जर प्राप्त झाले, तर तशा प्रसंगी हवे ते मागण्यास संकोच का करावे?
23-3
जरी चिंतामणि हातां चढे । तरी वांछेचे कवण सांकडे । कां आपुलेनि सुरवाडें । इच्छावें ना ॥23॥
किंवा चिंतामणी जर हाती लागला, तर आपणास इच्छित वस्तू मागण्याची अडचण का वाटावी? आपणास हवी तशी इच्छा का करू नये?
24-3
देखें अमृतसिंधूतें ठाकावें । मग तहाना जरी फुटावें । मग सायासु कां करावे । मागील ते ॥24॥
असे पाहा की, अमृताच्या सागराजवळ यावे, आणि अमृताचे प्राशन न करता तहानेने व्याकुळ व्हावे, तर मग (अमृत सागराजवळ) येथे येण्याचे कष्ट तरी का बरे घ्यावेत?
25-3
तैसा जन्मांतरी बहुतीं । उपासिता लक्ष्मीपती । तूं दैवें आजि हातीं । जाहलासी जरी ॥25॥
त्याचप्रमाणे हे कमळापती ! तुझी जन्मोजन्मी मनोभावे उपासना केली, (अर्थात निष्काम सेवा केल्यामुळे) त्यामुळे आज दैवयोगाने तू आम्हाला लाभला आहेस.

, ,

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *