सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १३२६ ते १३५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

1326-18
तें हें गा आत्मज्ञान । मज गोप्याचेंही गुप्त धन । परी तूं म्हणौनि आन । केवीं करूं? ॥1326॥
अरे, तें हें आत्मज्ञान, सर्वांना गूढ असणारा जो मी त्या माझेही गुप्तधन होय; परंतु, तूंच म्हणून ते कसें चोरून ठेवावें? 26
1327-18
याकारणें गा पांडवा । आम्हीं आपुला हा गुह्य ठेवा । तुज दिधला कणवा । जाकळिलेपणें ॥1327॥
ह्याचकरितां अर्जुना, तुजवर संतुष्ट होऊन तुझ्याविषयींच्या कळकळीने आम्ही आपला हा गुप्त ठेवा तुला दिला 27
1328-18
जैसी भुलली वोरसें । माय बोले बाळा दोषें । प्रीति ही परी तैसें । न करूंचि हो ॥1328॥
मातेच्या अंतःकरणांतील स्नेह जसा तिला बालकापाशीं बोलवितो, तीच स्थिति, तुजविषयींचे आमच्या अंतःकरणांतील प्रेम, आमची कां करणार नाहीं? 28
1329-18
येथ आकाश आणि गाळिजे । अमृताही साली फेडिजे । कां दिव्याकरवीं करविजे । दिव्य जैसे ॥1329॥
येथे आकाश जसे गाळून घ्यावें, अमृताचीही साल काढावी, किंवा प्रतिज्ञेनेच जशी प्रतिज्ञा करावी. 29
1330-18
जयाचेनि अंगप्रकाशें । पाताळींचा परमाणु दिसे । तया सूर्याहि का जैसे । अंजन सूदलें ॥1330॥
ज्याच्या तेजाने पाताळींचे परमाणुही दिसतात, त्या सूर्याच्या डोळ्यातच जसे अंजन घालवें, 1330<

1331-18
तैसें सर्वज्ञेंही मियां । सर्वही निर्धारूनियां । निकें होय तें धनंजया । सांगितलें तुज ॥1331॥
त्याप्रमाणे, सर्वज्ञही जो मी, त्या मी सर्व गोष्टींचा निर्णय करून, जे सत्यांतलें सत्य ठरलें तें अर्जुना, तुला सांगितले. 31
1332-18
आतां तूं ययावरी । निकें हें निर्धारीं । निर्धारूनि करीं । आवडे तैसें ॥1332॥
आतां, यापुढे, तू आपला तूंच काय तो निश्चय कर; आणि निश्चय ठरला म्हणजे जे तुझ्या इच्छेस येईल तें कर (मुक्तीचे शुद्ध स्वरूप). 32
1333-18
यया देवाचिया बोला । अर्जुनु उगाचि ठेला । तेथ देवो म्हणती भला । अवंचकु होसी ॥1333॥
असे देवांचे भाषण चालू असता अर्जुन स्तब्ध बसला; हे पाहून देव म्हणाले, ” खरा मतलबी आहेस रे. ” 33
1334-18
वाढतयापुढें भुकेला । उपरोधें म्हणे मी धाला । तैं तोचि पीडे आपुला । आणि दोषुही तया ॥1334॥
वाढणारा पुढे, भुकेला मनुष्य भिडेनं पुरेपुरे” म्हणाला तर भुकेची पीडा त्यालाच होणार व त्या पीडेचा दोषही त्यालाच आहे. 34
1335-18
तैसा सर्वज्ञु श्रीगुरु । भेटलिया आत्मनिर्धारु । न पुसिजे जैं आभारु । धरूनियां ॥1335॥
त्याप्रमाणे, सर्वज्ञ श्रीगुरूची गांठ पडूनही, आत्मनिश्चयाविषयींचा प्रश्न मनांतील संकोच वृत्तीमुळे केला नाहीं. 35

1336-18
तैं आपणपेंचि वंचे । आणि पापही वंचनाचें । आपणयाचि साचें । चुकविलें तेणें ॥1336॥
तर, आपणच आपल्याला ठकविल्यासारखे होऊन त्या वंचनेचा दोषही त्याच्याकडेच येतो; व आपले सत्स्वरूप त्याचे त्यानेच दुराविलें असें होतें. 36
1337-18
पैं उगेपणा तुझिया । हा अभिप्रावो कीं धनंजया । जें एकवेळ आवांकुनियां । सांगावें ज्ञान ॥1337॥
अर्जुना, तुझ्या उगेपणावरून तुझा असा भाव दिसतो की, आम्ही पुन्हां एकदां पूर्णपणे आत्मज्ञानाची उजळणी करावी. 37
1338-18
तेथ पार्थु म्हणे दातारा । भलें जाणसी माझिया अंतरा । हें म्हणों तरी दुसरा । जाणता असे काई? ॥1338॥
तेव्हां पार्थ म्हणाला, प्रभो बरोबर माझे मन ओळखिलें; पण इतकेंही म्हणण्याचे कारण नाहीं; देवा, आपल्यावांचून अंतर्यामी जाणणारा दुसरा कोण आहे? 38
1339-18
येर ज्ञेय हें जी आघवें । तूं ज्ञाता एकचि स्वभावें । मा सूर्यु म्हणौनि वानावें । सूर्यातें काई? ॥1339॥
कारण, सर्व विश्व तूझे ज्ञेय असून त्याचा स्वभावसिद्ध ज्ञाता तूच एक आहेस; सूर्याची तुम्ही सूर्य म्हणून कोणी स्तुति करितो काय? 39
1340-18
या बोला श्रीकृष्णें । म्हणितलें काय येणें । हेंचि थोडें गा वानणें । जें बुझतासि तूं ॥1340॥
या अर्जुनाच्या भाषणावर देव म्हणाले, अरे, आम्हीं सांगितलेले तू समजतोस, हें काय आमचे थोडे वर्णन आहे? 1340

सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः ।
इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ॥18.64॥

1341-18
तरी अवधान पघळ । करूनियाम् आणिक येक वेळ । वाक्य माझें निर्मळ । अवधारीं पां ॥1341॥
तूझ्या मनांतच आहे तर, पुन्हां एकवेळ मोकळ्या मनाने माझे निर्मळ भाषण श्रवण कर. 41
1342-18
हें वाच्य म्हणौनि बोलिजे । कां श्राव्य मग आयिकिजे । तैसें नव्हें परी तुझें । भाग्य बरवें ॥1342॥
वाणीचा विषय म्हणून बोलावें किंवा श्रवणाचा विषय म्हणून हे ऐकावें असा हा विषय नाही; पण तुझे भाग्यच थोर म्हणावें लागते 42
1343-18
कूर्मीचिया पिलियां । दिठी पान्हा ये धनंजया । कां आकाश वाहे बापिया । घरींचें पाणी ॥1343॥
अर्जुना, कांसवीच्या पिलांचे तिच्या दृष्टीच्या पान्ह्याने रक्षण होते; किंवा (जे आपल्यामध्ये केव्हांही कांहीं सांठवीत नाहीं) ते आकाशही आपल्या अवकाशांत चातकासाठीं जल धारण करतें. 43
1344-18
जो व्यवहारु जेथ न घडे । तयाचें फळचि तेथ जोडे । काय दैवें न सांपडे । सानुकूळें? ॥1344॥
जी वस्तु, कोणत्याही व्यवहाराचा विषय नसते (अव्यवहार्य ती वस्तु, जेव्हां जोडली जाते तेव्हां एकदम ‘फल’ ) म्हणूनच जोडली जाते (साध्यसाधनरूपाने नव्हे); दैव सानुकूल असल्यावर काय प्राप्त होणार नाहीं?44
1345-18
येऱ्हवीं द्वैताची वारी । सारूनि ऐक्याच्या परीवरीं । भोगिजे तें अवधारीं । रहस्य हें ॥1345॥
एऱ्हवी पाहतां, सवं द्वैतप्रपंचाचा निरास करून, केवल ऐक्याच्या दालनांत, अनुभव, अनुभविता, अनुभाव्य अशा त्रिपुटीद्वारा नव्हे तर केवल अनुभूतित्वाने ज्याचा भोग असतो असे हे रहस्य (गौप्य) आहे हे लक्ष्यांत असूदे. 45

1346-18
आणि निरुपचारा प्रेमा । विषय होय जें प्रियोत्तमा । तें दुजें नव्हे कीं आत्मा । ऐसेंचि जाणावें ॥1346॥
अर्जुना, निरुपचार म्हणजे निर्निमित्त प्रेमाचा जो विषय, किंवा जे स्थान, ते दुसरें तिसरें कांहीही नसून आत्मा होय असेंच समज. 46
1347-18
आरिसाचिया देखिलया । गोमटें कीजे धनंजया । तें तया नोहे आपणयां । लागीं जैसें ॥1347॥
अर्जुना, आरशांत चांगलें प्रतिबिंब दिसावें म्हणून तो स्वच्छ करितात आरशाकरितां नव्हे तर ते आपल्यासाठीच जसे असतें, 47
1348-18
तैसें पार्था तुझेनि मिषें । मी बोलें आपणयाचि उद्देशें । माझ्या तुझ्या ठाईं असे । मीतूंपण गा ॥1348॥
तसें तुझ्या निमित्ताने, पण स्वतःसाठींच, मी हे बोलत आहें; अरे, तुझ्यामाझ्यामध्ये तू आणि मी असा भेद आहे काय? 48
1349-18
म्हणौनि जिव्हारींचें गुज । सांगतसे जीवासी तुज । हें अनन्यगतीचें मज । आथी व्यसन ॥1349॥
म्हणून, अगदीं जिव्हाळयाची गुप्त गोष्ट तू माझा जो प्राण त्या तुला सांगितली; अरे, अनन्य भक्तांचे मला असे व्यसनच (छंद) आहे 49
1350-18
पैं जळा आपणपें देतां । लवण भुललें पंडुसुता । कीं आघवें तयाचें होतां । न लजेचि तें ॥1350॥
जलाला स्वत्व अर्पण करितांना मिठाला स्वत:चे जसे स्मरण रहात नाही किंवा आपण सर्व जलरूप होतांना तें लाजत नहीं.1350

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading