सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी ५१ ते ७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

51-1
ना तरी शब्दब्रह्माब्धि । मथियेला व्यासबुद्धि । निवडिलें निरवधि । नवनीत हें ॥1.51॥
महर्षी व्यासांनी आपल्या प्रखर बुध्दीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून महाभारतरूपी अनुपमेय नवनीत काढले॥1-51॥
52-1
मग ज्ञानाग्निसंपर्कें । कडसिलेंनि विवेकें । पद आलें परिपाकें । आमोदासी ॥1.52॥
मग ते नवनीत ज्ञानरुप अग्नीच्या संबंधाने विवेकपूर्वक घडविले; आणि त्याचा उत्तम परिपाक होऊन त्या लोण्याचे सुगंधी साजूक तूप झाले, ते म्हणजे गीता होय. ॥1-52
53-1
जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं । सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥1.53॥
वैराग्यवान देखील या गीतेची इच्छा करतात. संतदेखील नेहमी या गीतेचा अनुभव घेतात. ‘तो परमात्मा मी आहे’ अशा अभेद भावात असणारे ब्रम्हनिष्टदेखील या गीतेत रममाण होतात. ॥1-53
54-1
जें आकर्णिजें भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं । तें भीष्मपर्वीं संगती । म्हणितली कथा ॥1.54॥
भक्त जिचे परम श्रद्धेने श्रवण करतात, जी त्रैलोक्यात प्रथम वंदनीय आहे, जी भीष्मपर्वात प्रसंगाच्या अनुरोधाने सांगितली आहे. ॥1-54
55-1
जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे । जें सनकादिकीं सेविजे । आदरेंसीं ॥1.55॥
ती ” भगवतगीता ” होय. ब्रम्हदेव आणि महादेव तिची स्तुती करतात, सनकादिक परम श्रद्धेने तिचे श्रवण, मनन, पठण करतात. ॥1-55

56-1
जैसें शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोंवळे । ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥1.56॥
शरद ऋतूतील चंद्रकलेत असलेले कोवळे अमृतकण चकोर पक्षांची पिल्ले जसे अतिशय मृदू मनाने वेचतात. ॥1-56

57-1
तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अतिहळुवारपण चित्ता । आणूनियां ॥1.57॥
त्या प्रमाणे श्रोत्यांने चित्त शुद्ध करून एकाग्रतेने, अत्यन्त हळुवार पणे भगवदगीतेचा अनुभव घ्यावा. ॥1-57
58-1
हें शब्देंवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे । बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥1.58॥
शब्दांशिवाय या गीतेच्या अर्थाची मनातल्या मनात चर्चा करावी. इंद्रियांना नकळत याच्या अर्थाचा अनुभव घ्यावा. वक्ताच्या मुखातून शब्द प्रकट होण्यापूर्वीच त्यातील सिद्धांताशी एकरूप होऊन राहावे. ॥1-58
59-1
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये॥1.59॥
ज्या प्रमाणे भ्रमर कमलदलाला समजू न देता त्यातील पराग सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ जाणून घेण्याची पद्धत आहे. ॥1-59
60-1
कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटतां । हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥1.60॥
नभामध्ये चंद्रमा उदय पावला, की चंद्रविकासी कुमुदनी प्रफुल्ल होतात आणि आपले पाण्यातील स्थान न सोडता त्याला अलिंगन देण्याचे परमसुख जाणतात. ॥1-60

61-1
ऐसेनि गंभीरपणें । स्थिरावलोनि अंतःकरणें । आथिला तोचि जाणें । मानूं इये ॥1-61
त्या प्रमाणे शुद्ध, सात्विक आणि स्थिर चित्ताने जो संपन्न आहे, तोच गीतेतील अर्थ जाणू शकतो. असे आम्ही समजतो. ॥1-61
62-1
अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती । तिहीं कृपा करूनि संतीं । अवधान द्यावें ॥1.62॥
श्रोतेहो ! अर्जुनाच्या पंक्तीला बसून गीतेचा अर्थ श्रवण करण्यास जे योग्य आहेत, त्या संतांनी कृपा करून इकडे पूर्ण लक्ष द्यावे. ॥1-62

63-1
हें सलगी म्यां म्हणितलें । चरणां लागोनि विनविलें । प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणौनियां ॥1.63॥
महाराज ! आपले हृदय सखोल आहे; म्हणून मी लडिवाळपणे आपणास लक्ष द्या, अस म्हंटल. खरोखर ही माझी आज्ञा नाही; आपल्या चरणांना स्पर्श करून विनंती केली आहे. ॥1-63॥
64-1
जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥1.64॥
ज्याप्रमाणे आपले मुल बोबडे बोलले, तरी त्याचा स्वभावतः अधिक संतोष आईवडिलांना होत असतो. ॥1-64॥
65-1
तैसा तुम्हीं मी अंगिकारिला । सज्जनीं आपुला म्हणितला । तरी उणें सहजें उपसाहला । प्रार्थूं कायी ॥1.65॥
त्याप्रमाणे तुम्ही सज्जनांनी माझा अंगीकार करून मला आपले म्हंटले आहे. त्यामुळे माझ्यातील उणीवा सहन कराल. त्यासाठी मी स्वतंत्र प्रार्थना करावयास पाहिजे, असे नाही. ॥1-65॥

66-1
परी अपराधु तो आणिक आहे । जे मी गीतार्थु कवळुं पाहें । तें अवधारा विनवूं लाहें । म्हणौनियां ॥1.66॥
परंतु माझ्याकडून एक अपराध घडत आहे. मी गीतेचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे; म्हणून सांगितलेला अर्थ बरोबर आहे की नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती केली. ॥1-66॥
67-1
हें अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता । येर्‍हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी ॥1.67॥
गीतेचा अर्थ सांगणे फार कठीण कार्य आहे. याचा विचार न करता तो अर्थ स्पष्ट करण्यासाठी माझ्या चित्तात व्यर्थ धैर्य उत्पन्न झाले; परंतु सूर्याच्या प्रकाशात काजव्याची शोभा असते काय? ॥1-67॥
68-1
कीं टिटिभू चांचुवरी । माप सूये सागरीं । मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ ॥1-68॥
एखाद्या टिटवीने समुद्राची अथांग खोली मोजण्याकरता चोच बुडेपर्यंत त्यात माप घालावे, त्याप्रमाणे मी जाणकार नसताना गीतेचा अर्थ प्रकट करण्यास प्रवृत्त झालो आहे. ॥1-68॥
69-1
आइका आकाश गिंवसावें । तरी आणीक त्याहूनि थोर होआवें । म्हणौनि अपाडू हें आघवें । निर्धारितां ॥1-69॥
आकाशाला कवटाळायचे असेल, तर त्यापेक्षा विशाल व्हावे लागते. गीतेवर भाष्य करण्यासाठी प्रकांड पांडित्य हवे; म्हणून मी तर गीतेवर भाष्य करण्यास योग्य नाही, असे दिसते. ॥1-69॥
70-1
या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी । जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारौनि ॥1-70॥
(गीतेची थोरवी) एकदा भगवान शंकरांनी गीतेची थोरवी सांगितली. ते शब्द ऐकून पार्वतीला आश्चर्य वाटले व ती म्हणाली, आपण गीतेची विस्तारपूर्वक सांगा. ॥1-70॥

71-1
तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझें । तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्व ॥1.71॥
भगवान शंकर म्हणाले, गीतेचे महत्व मी पूर्णपणे जाणू शकत नाही. पार्वती ! तुझे स्वरूप जसे नित्यनूतन आहे, तसे गीतार्थ हा नित्यनूतन आहे. ॥1-71॥
72-1
हा वेदार्थ सागरु । जया निद्रिताचा घोरु । तो स्वयें सर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ॥1-72॥
ज्या सर्वेश्वराच्या योगनिद्रेतील घोरण्यापासून समुद्राप्रमाणे अगाध वेद निर्माण झाले, त्या जगदीश्वर श्रीकृष्णाने स्वतः जागृतीत गीतेच्या रुपाने वेदार्थाचे सार सांगितले. ॥1-72॥
73-1
ऐसे जें अगाध । जेथ वेडावती वेद । तेथ अल्प मी मतिमंद । काई होये ॥1.73॥
असे हे गीताशास्त्र अगाध, गहन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होऊन जाते. मी तर लहान आहे, माझी बुद्धी अल्प आहे मी तरी कसे सांगणार?? ॥1-73॥
74-1
हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें । गगन मुठीं सुवावें । मशकें केवीं? ॥1.74॥
हे अमर्याद गीताशास्त्र मला कसे बरे आकलन होणार? महातेजाला कशाने बरे उजळावे? छोट्याश्या चिलटाने आकाश आपल्या मुठीत कसे बरे ठेवावे? ॥1-74॥
75-1
परी एथ असे एकु आधारु । तेणेंचि बोले मी सधरु । जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥1.75॥
परंतु मला सद्गुरु निवृत्तीनाथांचा मोठा आधार आहे. ते मला अनुकूल आहेत; म्हणून मी हे धैर्य करत आहे, असे ज्ञानदेव म्हणतात. ॥1-75॥

, , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *