सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी १७६ ते २०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

176-2
तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळणीसवें एकवटती । परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥176॥
त्या प्रमाणे थोर योगीश्वरांची बुद्धी आत्मसाक्षात्काराने तद्रूप होते.मग ते योगी पुनः विचार करूनदेखील देहबोधावर (संसारात किंवा देहादि मायाजालात) येत नाहीत.
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि॥2.30॥

भावार्थ :- हे अर्जुना, सर्वांच्या देहामध्ये असणारा हा आत्मा सर्वदा अमर आहे; म्हणून तू कोणत्याही प्राणिमात्राबद्दल शोक करू नकोस.
177-2
जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं । तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥177॥
अर्जुना, जे सर्वत्र,सर्वच देहा मध्ये आहे, कोणत्याही प्रयत्नाने त्याचा घात(नाश) होत नाही, ते चैत्यन्य विश्वामध्ये सम प्रमाणात भरलेले आहे, हे तू लक्षात घे.
178-2
याचेनिचि स्वभावें । हें होत जात आघवें । तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ॥178॥
हे सर्व जग विश्वचैतन्याच्या सत्येने (मर्जीने) उत्पन्न होते आणि नाहीसे होते, तर मग तू का म्हणून शोक करावास? ते सांग.
179-2
एर्‍हवीं तरी पार्था । तुज कां नेणों न मनें चित्ता । परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परीं ॥179॥
अर्जुना, विचार करून पाहिले तर तूझ्या मनाला (आत्म्याच्या अमर तत्वाचा) विचार का पटत नाही, ते मलाही कळत नाही. परंतू या गोष्टीचा शोक करणे हे विविध प्रकारानें वाईट आहे, हे सिद्ध होते.
स्वधर्मपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते॥2.31॥

भावार्थ :- आणि स्वधर्माचा विचार केला, तर या युद्धापासून परावृत्त होणे तुला योग्य नाही.(व्याकुळ होणे). कारण क्षेत्रीयांला कर्तव्यप्राप्त (धर्मयुद्धा) युद्धाशिवाय दुसरे कोणतेही कल्याणाचे साधन नाही.
180-2
तूं अझुनि कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी । स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ॥180॥
तू अजून (ह्याचा) का बरे विचार करत नाहीस?? काय हे मनात घेऊन बसला आहेस?? या भवसागरातून तारून नेणारा (आपला धर्म) स्वधर्म तू का विसरला आहेस?


181-2
या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांही पातलें । कीं युगचि हें बुडालें । जर्‍हीं एथ ॥181॥
या कौरवांचे वाटेल ते झाले,किंवा युद्ध करताना तुझ्यावरच काही संकट आले अथवा हे युग जरी बुडाले, (युगांत जरी झाला) (तरी हे अर्जुना)
182-2
तरी स्वधर्मु एक आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे । मग तरिजेल काय पाहे । कृपाळुपणें ॥182॥
स्वधर्म म्हणून जो एक आहे, तो कोणत्याही कारणाने त्यागणे योग्य नाही.(स्वधर्म मुळीच टाकता येत नाही).मग अस असताना येथे लक्षात घ्यावे :- अर्जुन हा क्षत्रिय आहे,आणि क्षत्रियाचा स्वधर्म युद्ध करणे,पण अर्जुनाच्या मनात गोंधळ उत्पन्न झाल्याने कौरवांच्या (आप्तजन) विरूद्ध युद्ध करण्यास नकार देत असल्याने】तूझ्या मनात जो दयाभाव निर्माण झाला आहे, यामूळे तू तरला जाशील काय? याचा विचार कर.
183-2
अर्जुना तुझें चित्त । जर्‍ही जाहलें द्रवीभूत । तर्‍ही हें अनुचित । संग्रामसमयीं ॥183॥
हे अर्जुना ! तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले; तरी तसे होणे या युद्ध प्रसंगी अयोग्य आहे.(स्वधर्म विसरणे योग्य नाही, किंवा आपले कर्तव्य विसरून जाणे)
184-2
अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाही म्हणितलें । ऐसेनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां ॥184॥
जसे गायीचे दूध हे पवित्रच, (मनात आप्तजनाबद्दल दयाभाव उत्पन्न होणे हे योग्य जरी असेल) पण वैद्याने पथ्य सांगितले असतानाही, (म्हणजे घेऊ नये असे सांगितले) ते दूध (आग्रहाने) नवज्वारांत दिले, तर ते विषासमान मारक होते.
185-2
तैसे आनीं आन करितां । नाशु होईल हिता । म्हणऊनि तूं आतां । सावध होई ॥185॥
त्या प्रमाणे भलत्या ठिकाणी भलते कर्माचरण (आचरण) केले, तर त्याच्या हिताचा नाश होतो. म्हणून तू आता सावध हो.


186-2
(त्याच्या :- आपले कर्त्यव्य पार न पडणारा)
वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं । जो आचरिता बाधु नाहीं । कवणे काळीं ॥186॥
तू विनाकारण (व्यर्थ)शोकाकुल का होतोस,(मोहाने का बरे व्याकुळ होतोस) ज्याचे आचरण केले असता केंव्हाही दोष लागत नाही; त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे.
187-2
(ज्याचे :- आपल् कर्त्यव्य पार पडणारा)
जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥187॥
ज्या प्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता; कधीही अपाय होत नाही किंवा (रात्रीच्या समयी) दिव्याच्या उजेडात चालले असता ठेच लागत नाही;
188-2
तयापरी पार्था । स्वधर्मे राहाटतां । सकळ कामपूर्णता । सहजे होय ॥188॥
त्याप्रमाणे हे पार्था स्वधर्माने वागले असता (त्याच्या) सर्व इच्छा सहजच पूर्ण होतात.
189-2
म्हणोनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांही । संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥189॥
म्हणून तू ऐक, तूम्हां क्षत्रियांना युद्धवाचून दूसरे काहीही (तारून जाण्यासाठी) योग्य नाही, हे लक्षात घे.
190-2
निष्कपटा होआवें । उसिणा घाई जुंझावें । हें असो काय सांगावे । प्रत्यक्षावरी ॥190॥
निष्कपट भावाने (मनात कपट न धरता),समोरासमोर उभे राहून शौर्याने युद्ध करावे, पण हे बोलणे राहूदे,(तूही हे सगळे जाणतोस), (आत्ता तर) प्रत्यक्ष युद्धाची वेळ आली आहे, तेंव्हा जास्त काय सांगावे !?
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृत्तम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभंते युद्धमीदृशम्॥2.32॥
भावार्थ:- हे अर्जुना ! सहजपणे प्राप्त झालेला हे युद्ध म्हणजे आपोआप उघडलेले स्वर्गाचे द्वार होय; असे हे युद्ध भाग्यशाली क्षित्रियांनाच हे प्राप्त होते.


191-2
अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो काय दैव तुमचे । कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटले असे ॥191॥
हे अर्जुना ! आताचे हे युद्ध म्हणजे तूमचे पूर्व जन्मीचं भाग्य होय. अथवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्यापुढे प्रकटलेला आहे.
192-2
हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें । मूर्त कां प्रतापे । उदो केला ॥192॥
याला काय साधे युद्ध म्हणावे?? अरे या युद्धाच्या (निमित्ताने) रूपाने हा मूर्तिमंत स्वर्गच अवतरला आहे. अथवा, तुझा मूर्तिमंत प्रताप प्रकटला आहे. (अवतरला आहे)
193-2
ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तिंचेनि पडिभरें । हें कीर्तीचि स्वयंवरे । आली तुज ॥193॥
किंवा तुझ्या शौर्यगुणांचा लौकिक ऐकून तूझ्यावर आसक्त होवून कीर्तिरूप स्त्री उत्कट इच्छेने तुला वरण्यास (लग्न करण्यास) आली आहे.
194-2
क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तें झुंज ऐसें हें लाहिजे । जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणीसी ॥194॥
(अर्जुना ! असे हे धर्मयुद्ध सहज प्राप्त होत नाही,कारण) क्षत्रिया ने पुष्कळ पुण्य करावे,तेंव्हा त्याचा जिवनात असे धर्मयुद्ध करावयास मिळते. जसे सहज रस्त्याने जाताना ठेच लागावी काय लागले म्हणून पाहताच मनातील इच्छा पूर्ण करणारा चिंतामणी सापडावा,
195-2
ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख । तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥195॥
किंवा जांभाई देण्यासाठी तोंड उघडावे; आणि अचानक अमृत येऊन तोंडात पडावे. त्याप्रमाणे हे धर्मयुद्ध प्रसंग अनायासे आला आहे, असे समज.
अथ चेत् त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्यसिं॥2.33॥

भावार्थ :- आता असे धर्माला अनुकूल युद्ध करणार नसशील, तर स्वधर्म आणि कीर्ती यांचा त्याग करून पाप मात्र मिळवशील.


196-2
आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिले शोचूं बैसिजे । तरी आपण आहाणा होईजे । आपणपेयां ॥196॥
आता, असा हा संग्राम टाकून भलत्याच गोष्टींचा शोक करत बसलास; तर आपणच आपला घात केल्यासारखे होईल.
197-2
पूर्वजांचे जोडलें । आपणचि होय धाडिलें । जरी आजि शस्त्र सांडिले । रणीं इये ॥197॥
आज जर तू या (धर्म) युद्धात शस्त्र टाकून दिलेस; तर तूझीच नाही, तर तूझ्या पूर्वजांनी मिळविलेली पुण्यकीर्ति आपणच घालविल्यासारखे होईल.
198-2
असती कीर्ति जाईल । जग अभिशापु देईल । आणि गिंवसित पावतील । महादोष ॥198॥
इतकेच नाही तर तुझी असलेली कीर्तिं संपून जाईल, सगळे जग तुझी निंदा करेल, तुला नावे ठेवील आणि महापातके तुझ्याजवळ राहण्यासाठी तुझा शोध घेत येतील.
199-2
जैसी भ्रतारेहीन वनिता । उपहृती पावे सर्वथा । तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥199॥
ज्याप्रमाणे पतिविरहीत स्त्रीचा सर्वांकडून अपमान होत असतो. त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण न केल्याने (स्वधर्माचा त्याग केल्याने) जिवाची तशी दशा होते.
(त्याकाळची प्रथे नुसार लिहिले आहे, बदला नुसार ओव्यांचे योग्य अर्थ आपण येथे समजून घेऊ, भाव समजून घ्यावे)
200-2
ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरीं गिधीं विदारिजे । तैसे स्वधर्महीन अभिभविजे । महादोषी ॥200॥
किंवा रणभूमीवर टाकून दिलेल्या प्रेताला (मृत शरीराला) ज्याप्रमाणे चोहोबाजुनी गिधाडे टोचे मारीत असतात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष त्रास देत असतात.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading