सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ६२६ ते ६५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

626-18
तैसें कृत्याकृत्य सरकटित । आपपर नुरवित । कर्म होय तें निश्चित । तामस जाण ॥626॥
तसे योग्य-अयोग्य एके ठिकाणी रगडून आपले व दुसऱ्याचे हा भेद असे उरू देत नाही, ते तामस कर्म असे समज. 626
627-18
ऐसी गुणत्रयभिन्ना । कर्माची गा अर्जुना । हे केली विवंचना । उपपत्तींसीं ॥627॥
याप्रमाणे अर्जुना, गुणांच्या भिन्नपणाने कर्म तीन प्रकारचे कसे झाले हे तुला दाखवल्यास स्पष्ट करून सांगितले. 627
628-18
आतां ययाचि कर्मा भजतां । कर्माभिमानिया कर्ता । तो जीवुही त्रिविधता । पातला असे ॥628॥
आता या कर्माचा अभिमान बाळगून त्याचे आचरण करणारा जो जीव, तो याचे योगाने तीन प्रकारचा झाला आहे. 628
629-18
चतुराश्रमवशें । एकु पुरुषु चतुर्धा दिसे । कर्तया त्रैविध्य तैसें । कर्मभेदें ॥629॥
ज्याप्रमाणे, एकाच पुरुषावर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, व संन्यास या चार आश्रमांच्या योगे चार अवस्था दिसतात, त्याचप्रमाणे कर्माचा भेदाने कर्त्याला तीन अवस्था येतात. 629
630-18
तरी तयां तिहीं आंतु । सात्विक तंव प्रस्तुतु । सांगेन दत्तचित्तु । आकर्णीं तूं ॥630॥
तर त्या तिहींपैकी सात्विक अवस्थेचे प्रथम वर्णन करतो, ते पूर्ण लक्ष देऊन ऐक. 630
मुक्तसण्‌गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः ।
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ॥18.26॥

631-18
तरी फळोद्देशें सांडिलिया । वाढती जेवीं सरळिया । शाखा कां चंदनाचिया । बावन्नया ॥631॥
ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील चंदनाच्या फांद्या फळाची इच्छा न धरिता सरळ वाढतात, तथापि त्या झाडाच्या सर्व भागांस उत्तम सुवासच असतो; 631
632-18
कां न फळतांही सार्थका । जैसिया नागलतिका । तैसिया करी नित्यादिकां । क्रिया जो कां ॥632॥
किंवा नागवेल न फळताही सार्थकी लागतो, नागवेल लाजरी फळ येत नाही तरी तिची पानेच उपयोगी पडतात, त्याप्रमाणे जी सर्वतोपरी उत्तम आहेत, त्या नित्यनैमित्तिक कर्मांच्या फळांची इच्छा न धरता जो त्यांचे आचरण करतो, 632
633-18
परी फळशून्यता । नाहीं तया विफळता । पैं फळासीचि पंडुसुता । फळें कायिसी । ॥633॥
पण त्याला फळशून्य असे म्हणू नये; कारण त्या कर्माला विफलता नाहीच म्हणून अर्जुना, फळाला फळे कुठून येणार? 633
634-18
आणि आदरें करी बहुवसें । परी कर्ता मी हें नुमसे । वर्षाकाळींचें जैसें । मेघवृंद ॥634॥
आणि ती कर्मे आदराने करितो पण कर्तृत्वाचा अभिमान बाळगत नाहीत; ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ समुदाय काही गर्जना न करिता वृष्टी करितात, 634
635-18
तेवींचि परमात्मलिंगा । समर्पावयाजोगा । कर्मकलापु पैं गा । निपजावया ॥635॥
त्याप्रमाणे परमात्म्याला अर्पण करण्यास योग्य होतील अशी कर्मे करण्याकरिता, 635

636-18
तया काळातें नुलंघणें । देशशुद्धिही साधणें । कां शास्त्रांच्या वातीं पाहणें । क्रियानिर्णयो ॥636॥
काळाची मर्यादा न सोडता, देहशुद्धी साधून कर्माच्या योग्यायोग्यतेचा निर्णय शास्त्ररूप दिव्याने पाहतो- कर्माच्या योग्यायोग्यतेचा निर्णय शास्त्रानुरोधे करितो.636
637-18
वृत्ति करणें येकवळा । चित्त जावों न देणें फळा । नियमांचिया सांखळा । वाहणें सदा ॥637॥
इंद्रिये व वृत्ती यांचे ऐक्य करून फळाकडे चित्तास न जाऊ देता, जो नियमांची बेडी पायांत बाळगतो, 637
638-18
हा निरोधु साहावयालागीं । धैर्याचिया चांगचांगीं । चिंतवणी जिती आंगीं । वाहे जो कां ॥638॥
ही अट सहन करण्याकरिता उत्तम प्रकारचे धैर्य आपल्या अंगी असावे, अशा विषयी जो आपल्या मनात जिवंत चिंता वाहतो,( अहोरात्र त्याजविषयी विचार करीत असतो,) 638
639-18
आणि आत्मयाचिये आवडी । कर्में करितां वरपडीं । देहसुखाचिये परवडीं । येवों न लाहे ॥639॥
आणि आत्म्याचे प्राप्तीविषयी कर्म करीत असता देह सुखाच्या नाश याची पर्वा करीत नाही, 639
640-18
आळसा निद्रा दुऱ्हावे । क्षुधा न बाणवे । सुरवाडु न पावे । आंगाचा ठावो ॥640॥
तो आळस व झोप टाकून देतो त्याला भुकेचीही आठवण होत नाही आणि त्यायोगे जो जो सुख आवस्था दूर दूर पळते, 640

641-18
तंव अधिकाधिक । उत्साहो धरी आगळीक । सोनें जैसें पुटीं तुक । तुटलिया कसीं ॥641॥
तो तो, सोने ज्याप्रमाणे आंचीत घातल्यावर वजनास कमी भरले तरी कसाच जास्त लागते, त्याप्रमाणे कर्म करण्याविषयी नाना प्रकारे अधिकाधिक उत्साह धरतो.641
642-18
जरी आवडी आथी साच । तरी जीवितही सलंच । आगीं घालितां रोमांच । देखिजती सतिये । ॥642॥
जेथे खरोखर प्रीती आहे तेथे जीवितही तुच्छ असते. सहगमन करताना अग्नीत उडी टाकिते समयीही पती प्रेमामुळे पतिव्रता स्त्री च्या अंगावर रोमांच उभे राहतात ! 642
643-18
मा आत्मया येवढीया प्रिया । वालभेला जो धनंजया । देहही सिदतां तया । काय खेदु होईल? ॥643॥
मग अर्जुना आत्मप्राप्ती सारखी प्रिय वस्तू प्राप्त होण्याविषयी ज्याला इच्छा झाली आहे, त्याचे शरीरास जरी कष्ट झाले तरी याच खेद होईल काय? 643
644-18
म्हणौनि विषयसुरवाडु तुटे । जंव जंव देहबुद्धि आटे । तंव तंव आनंदु दुणवटे । कर्मीं जया ॥644॥
म्हणून विषय सुखेच्छा नाहीशी होऊन जो जो देहाविषयी अभिमान कमी होतो, तो तो कर्म करण्याविषयी त्याला दुप्पट आनंद होतो. 644
645-18
ऐसेनि जो कर्म करी । आणि कोणे एके अवसरीं । तें ठाके ऐसी परी । वाहे जरी ॥645॥
याप्रमाणे कर्म करीत असता एखादेवेळी ते कर्म जरी बंद पडले, तरी 645


646-18
तरी कडाडीं लोटला गाडा । तो आपणपें न मनी अवघडा । तैसा ठाकलेनिही थोडा । नोहे जो कां ॥646॥
गाडा डोंगरावरून आपोआप खाली पडून त्याचे तुकडे झाले तरी जसे त्याला त्याबद्दल अवघड वाटत नाही, तसे कर्म राहिले असता तो यत्किंचितही खेद मानीत नाही, 646
647-18
नातरी आदरिलें । अव्यंग सिद्धी गेलें । तरी तेंही जिंतिलें । मिरवूं नेणें ॥647॥
अथवा आरंभिलेले कर्म सिद्धीस गेले असतानाही त्याबद्दल प्रतिष्ठा मिरवू जाणत नाही, 647
648-18
इया खुणा कर्म करितां । देखिजे जो पंडुसुता । तयातें म्हणिपे तत्त्वतां । सात्विकु कर्ता ॥648॥
अर्जुना, कर्माचे आचरण करीत असता, ही लक्षणे ज्याचे ठिकाणी आढळतील, त्याला निश्चयाने सात्त्विक कर्ता म्हणावे.648
649-18
आतां राजसा कर्तेया । वोळखणें हें धनंजया । जे अभिलाषा जगाचिया । वसौटा तो ॥649॥
हे धनंजया, आता राजस कर्त्याची चिन्हे तुला सांगतो. कारण, जगातील सर्व अभिमानांचे ही माहेरघरच होय.649
रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः ।
हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः ॥18.27॥

450-18
जैसा गावींचिया कश्मळा । उकरडा होय येकवळा । कां स्मशानीं अमंगळा । आघवयांची ॥650॥
ज्याप्रमाणे गावातील सर्व घाणेरडे पदार्थ टाकण्याची उकिरडा हे ठिकाण असते, अथवा सर्व अमंगल पदार्थ जसे स्मशानात टाकतात, 650

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *