26-7
जें आंखूनि नाणें विस्तारी । पाठीं तयांची आटणी करी । माजीं कर्माकर्माचिया व्यवहारीं । प्रवर्तु दावी ॥26॥
ती नाण्यांवर खुणा करून त्यांचा विस्तार करिते, व मागाहून त्यांची आटणी करिते; अशा प्रकारे कर्माकर्माप्रमाणे घडामोड करण्याची मायेची प्रवृत्ती आहे.
27-7
हें रूपक परी असो । सांगों उघड जैसें परियेसों । तरी नामरूपाचा अतिसो । प्रकृतीच कीजे ॥27॥
हे रुपक असो; तुला समजेल अशा उघड रीतीने सांगावयाचे म्हटले, तर ही प्रकृतीच प्राण्यांच्या नामरुपांचा विस्तार करते.
28-7
आणि प्रकृति तंव माझां ठायीं । बिंबे येथ आन नाहीं । म्हणोनि आदि मध्य अवसान पाहीं । जगासि मी ॥28॥
आणि प्रकृती तर निःसंशय माझ्याच ठायी बिंबते; अर्थात् जगाची उत्पत्ति, स्थिती व लय यांस मीच कारण आहे.
मत्त: परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनंजय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥7.7॥
29-7
हें रोहिणीचें जळ । तयाचें पाहातां येइजे मूळ । तैं रश्मि नव्हती केवळ । होय तो भानु ॥29॥
हे दृश्य विश्व मृगजळासारखे आहे! मृगजळाचे मूळ पांहू गेले असतां ते केवळ सूर्यकिरण नसून सूर्यच होय.
30-7
तयाचिपरी किरीटी । इया प्रकृती जालिये सृष्टी । जैं उपसंहरूनि कीजेल ठी । तैं मीचि आहें ॥30॥
त्याचप्रमाणे, अर्जुना जिच्यापासून ही सृष्टी झाली आहे, ती प्रकृति आणि सृष्टी यांचा उपसंहार करुन (यांना वजा करून) पाहिले तर अवशिष्ट तत्त्व मीच आहे.
31-7
ऐसें होय दिसे न दिसे । हें मजचि माजीवडे असे । मियां विश्व धरिजे जैसें । सूत्रें मणि ॥31॥
अशा प्रकारे, जे उत्पन्न होते, दिसते व नाहींसे होते, ते माझ्याच ठिकाणी होते. ज्याप्रमाणे दोऱ्याने मणि धरलेले असतात, त्याप्रमाणे मी हे विश्व धरले आहे.
32-7
सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाचां सुतीं वोविले । तैसें म्यां जग धरिलें । सबाह्याभ्यंतरीं ॥32॥
त्याप्रमाणे मी हे विश्व धरले आहे. सोन्याचे मणि करून ते सोन्याच्याच तारेत ओवावे, त्याप्रमाणे हे सर्व जग अंतर्बाह्य मीच व्यापले आहे.
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो: ।
प्रणव: सर्ववेदेषु शब्द: खे पौरुषं नृषु ॥7.8॥
पुण्यो गन्ध: पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥7.9॥
33-7
म्हणोनि उदकीं रसु । कां पवनीं जो स्पर्शु । शशिसूर्यीं जो प्रकाशु । तो मीचि जाण ॥33॥
म्हणून, पाण्यांत जो रस आहे, किंवा वाऱ्यांत जो स्पर्श आहे, आणि चंद्र व सुर्य यांच्यात जो प्रकाश आहे, तो मीच आहे असे समज
34-7
तैसाचि नैसर्गिकु शुद्धु । मी पृथ्वीचां ठायीं गंधु । गगनीं मी शब्दु । वेदीं प्रणवु ॥34॥
त्याचप्रमाणे, पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतः असणारा जो सुवास, तो मी; आकाशांत शब्द म्हणून जो आहे, तो मी; तसेच वेदांत ॐकार म्हणून जो आहे, तो मी.
35-7
नराचां ठायीं नरत्व । जें अहंभाविये सत्त्व । तें पौरुष मीं हें तत्त्व । बोलिजत असे ॥35॥
मनुष्याच्या ठिकाणी असणारा मनुष्यपणा – जो अहंभावाचे सत्त्व आहे – ते पौरुष मी, हे तत्त्व तुला सांगून ठेवतो
36-7
अग्नी ऐसें आहाच । तेजा नामाचें आहे कवच । तें परौतें केलिया साच । निजतेज तें मी ॥36॥
तेजाला अग्नि या नांवाचे जे उगीच पांघरूण आहे, ते दूर केले असता त्यांचे खरे स्वरुप ते मी;
37-7
आणि नानाविध योनि । जन्मोनि भूतें त्रिभुवनीं । वर्ततें आहाति जीवनीं । आपुलालां ॥37॥
आणि या त्रिभुवनांत प्राणी पुष्कळ प्रकारच्या जातींत जन्म घेऊन आपआपल्या जातीच्या अनुरोधाने अन्नादि जीवनाने जीवन पावतात.
38-7
एकें पवनेंचि पीती । एकें तृणास्तव जीती । एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ॥38॥
कोणी वारा पिऊन असतात, कोणी गवतावर उपजीवीका करतात; कोणी अन्नावर राहतात, आणि कोणी पाण्यावर आपले उपजीवन करता
39-7
ऐसें भूताप्रति आनान । जें प्रकृतिवशें दिसे जीवन । तें आघवा ठायीं अभिन्न । मीचि एक ॥39॥
असे प्रत्येक प्राण्याचे त्याच्या प्रकृतीच्या मानानें जे निरनिराळे जीवन दिसते, ते सर्व मीच आहे.
बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥7.10॥
बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥7.11॥
40-7
पैं आदिचेनि अवसरें । विरूढे गगनाचेनि अंकुरें । जें अंतीं गिळी अक्षरें । प्रणवपटींची ॥40॥
खरोखर, उत्पत्तीचे वेळी जे आकाशाच्या अंकुराने विस्तार पावते आणि जें अंतकाली ॐकाराची अक्षरे गिळून टाकते;
41-7
जंव हा विश्वाकार असे । तंव जें विश्वाचिसारखें दिसे । मगमहाप्रळयदशें । कैसेही नव्हे ॥41॥
जोपर्यत या जगाला आकार आहे, तोपर्यंत जे त्याच्यासारखेच दिसते. परंतु महाप्रलयाचे वेळेस ते कोणत्याही आकाराचे नसते;
42-7
ऐसें अनादि जें सहज । तें मी गा विश्वबीज । हें हातातळीं तुज । देइजत असे ॥42॥
असे जे ह्या जगाचे अनादि व स्वतःसिद्ध बीज, ते मी आहे; ते आज अगदीं तुझ्या हातांत देत आहे.
43-7
मग उघड करूनि पांडवा । जैं हें आणिसील सांख्याचिया गांवा । तैं ययाचा उपेगु बरवा । देखसील ॥43॥
मग अर्जुना, ते समजून घेऊन जर तूं त्याचा विचार करशील, तर त्याचा उपयोग कसा चांगला होईल तो पहाशील.
44-7
परी हे अप्रासंगिक आलाप । आतां असतु न बोलों संक्षेप । जाण तपियांचां ठायीं तप । तें स्वरूप माझें ॥44॥
परंतु आता हे अप्रासंगिक बोलणे बाजुला राहूं दे; तुला मी आपला संक्षेपाने सांगतो :- हे पहा की, तपस्व्यांचे ठायी तप म्हणून जे आहे, ते माझे रुप होय.
45-7
बळियांमाजीं बळ । तें मी जाणे अढळ । बुद्धिमंतीं केवळ । बुद्धि ते मी ॥45॥
बलवानांत बल म्हणून जे आहे ते मी असे निःसंशय समज, आणि बुद्धिमंताना बुद्धि म्हणून जी आहे ती मी.
46-7
भूतांचां ठायीं कामु । तो मी म्हणे आत्मारामु । जेणें अर्थास्तव धर्मु । थोरू होय॥46॥
श्रीकृष्ण म्हणतात :- ज्याच्या आचरणापासून धर्म व अर्थ हे पुरुषार्थ साध्य होतात, तो प्राणिमात्राचे ठिकाणी असणारा काम मी.
47-7
ये-हवीं विकाराचेनि पैसें । करी कीर इंद्रियांचेयाचि ऐसें । परी धर्मासि वेखासें । जावों नेदी ॥47॥
येरवी, विकार उत्पन्न होऊन इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे जरी आचरण केले, तरी तो काम धर्माविरूद्ध जाऊं देत नाही.
48-7
जे अप्रवृत्तीचा अव्हांटा । सांडूनि विधीचिया निघे वाटा । तेवींचि नियमाचा दिवटा । सवें चाले ॥48॥
तो काम निषेधाची आडवाट सोडुन विधीच्या वाटेने नीट जातो; आणि त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर नियमरूप मशाल पेटलेली असते.
49-7
कामु ऐशिया वोजा प्रवर्ते । म्हणोनि धर्मासि होय पुरतें । मोक्षतीर्थींचे मुक्तें । संसारु भोगी ॥49॥
अशा रीतीने हा काम चालतो, म्हणून धर्माचे आचरण पूर्ण होते; व त्यामुळे संसारात राहणाराला मोक्षरूपी तीर्थात मुक्ति प्राप्त होते.
50-7
जो श्रुतिगौरवाचां मांडवीं । कामसृष्टीचा वेलु वाढवी । जंव कर्मफळेंसी पालवी । अपवर्गीं टेके ॥50॥
तो काम वेदाच्या महत्वरूपी मांडवावर कर्मफलांची पाने मोक्षाला लागत तोंपर्यंत सृष्टीचा वेल वाढवितो.