101-2
परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतीसी । आणि तूंचि नीति सांगसी । आम्हांप्रति ॥101॥
या अज्ञानामुळे (मोहाने, मूर्खपणामुळे) तुला या गोष्टी समजत नाहीत. ज्याची चिंता करू नये, त्या गोष्टींची चिंता करत आहेस, मनात आणू नये ते तू आणतो आहेस; आणि उलट तूच आम्हाला नीतीच्या गोष्टी सांगत आहेस !!
102-2
(आश्चर्यकारक)
देखैं विवेकी जे होती । ते दोहीतेंहीं न शोचिती । जे होय जाय हे भ्रांती । म्हणौनियां ॥102॥
(हे पार्थ !) हे पहा, जन्म आणि मृत्यू हा केवळ भ्रम आहे, जे (ज्ञानी विद्वान,विवेकी) विचारवंत आहेत ते या दोनोंचाहि शोक करत नाहीत.
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥2.12॥
भावार्थ ::- एक लक्षात घे, मी, तू आणि हे सर्व राजे पूर्वी (भूतकाळात) नव्हतो असे नाही. भविष्यकाळात (आपल्या या देहाच्या मृत्यू नंतर) आपण सर्वजण असणार नाही, असेंहि नाही.
103-2
अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख । आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी ॥103॥
अर्जुना !! आणखी ऐक सांगतो, ते तू ऐक, पाहा येथे जमलेले आम्ही, तुम्ही आणि हे सर्व राजे सगळेच, (आपण जे आहोत)
104-2
नित्यता ऐसेचि असोनी । ना तरी निश्चित क्षया जाउनी । हे भ्रांति वेगळी करुनी । दोन्ही नाहीं ॥104॥
(आता आपण जसे आहोत तसेच) ते सर्वकाळ (निरंतर) असेच राहूं किंवा लय (नाश होईल) पावू, याची (चिंता)भ्रांती सोड, कारण (मुळामध्ये,वास्तविक पाहता)या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत.
105-2
हे उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे । एर्हवीं तत्त्वता वस्तु जें असे । तें अविनाशचि ॥105॥
(मायेमुळे, भ्रांतीला वश झाल्यामुळे) जन्म आणि मृत्यू हे अनुभवास येतात, एरव्ही खरोखर (म्हणजेच वास्तवात) आत्मवस्तु (आत्मा) जी आहे, ती अविनाशी आहे.
106-2
जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें । तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ? ॥106॥
जसें वाऱ्यामुळे पाणी हलविले (जर वाऱ्यामुळे निर्माण झालेले तरंग) त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले; तर मग या ठिकाणी कोणाला व कुठें जन्म आला, असें म्हणता येईल.??
107-2
तेंचि वायूचें स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाट जाहलें । तरी आतां काय निमालें । विचारीं पां ॥107॥
पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप (शांत) सपाट झाले, तर आता कशाचा नाश झाला?? याचा तूच विचार कर.
देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥2.13॥
भावार्थ ::- ज्याप्रमाणे जीवाला बाल्य, तरुण, आणि वार्धक्य या अवस्था प्राप्त होतात, त्याचप्रमाणे एक देह जाऊन त्याला दुसऱ्या शरीराची प्राप्ती होते, (असें असल्यामुळे जो आत्मा हा अविनाशी आहे हे जाणतो) त्यामुळे धैर्यवान (विद्वान)पुरुषाला(मोहित होत नाही) जन्ममरणाची भ्रांती उत्पन्न होत नाही.
108-2
आइकें शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक । हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥108॥
आणखी असे पाहा कीं, शरीर तर एकच आहे, परन्तु वयोमानाप्रमाणे त्यास अनेक अवस्था प्राप्त होतात, हा प्रत्यक्ष पुरावा तूच पाहा.
109-2
एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि हा न नाशे । एकेकासवें ॥109॥
या शरीरावर बालपण उमटलेले दिसते, मग तारुण्यात तेच बालपण नाहीसे होते. अशा अवस्था बदलत असतात, पण(शरीर) तोच असतो, त्याचा नाश होत नाही.
110-2
तैसीं चैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं । ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥110॥
त्याचप्रमाणे हे पाहा, एका अविनाशी अशा आत्मचैतन्याच्या ठिकाणी निरनिराळे शरीर येतात व जातात, असें जो जाणतो (ज्याला समजते,), त्याला भ्रांतिजन्य (अपूर्ण ज्ञानामुळे झालेले त्रास,दुःख) दुःख कधीहि होत नाही.
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदा ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत॥2.14॥
भावार्थ :-हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचा विषयांशी संबंध आला की, शीत-उष्ण, सुख-दुःख, इत्यादी द्वंद्व (अंतःकरणात) निर्माण होते (किंवा देणारे आहेत); उत्पत्ती आणि विनाश यांनी युक्त असल्यामुळे अनित्य आहेत; म्हणून हे भारता ! त्यांना तू सहन केले पाहिजे.
111-2
एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियां आधीनपण । तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥111॥
इंद्रियांच्या आधीन झाल्यामुळे मानवाला ते समजत नाही(किंवा इंद्रियावर संयम राहिले नाही की), हेच एक कारण आहे आणि ती इंद्रियें अंतःकरणावर आपला पगडा बसवितात; (किंवा आपल्यावर अधिकार गाजवतात)म्हणून (मानवाला) त्याला भ्रम निर्माण होते.
112-2
इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती । ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥112॥
सुरुवातीस (प्रारंभी) इंद्रिये विषयांचे सेवन करतात. त्यामुळे सुख- दुःखे उत्पन्न होतात. मग ती (मिळालेली) सुख- दुःखे आपल्या संसर्गाने मानवाच्या अंतःकरणांत (ग्रासून टाकतात) भ्रम निर्माण करतात.
113-2
जयां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं । तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥113॥
ज्या विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयापासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते.
114-2
देखें शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति । तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥114॥
असे पाहा कीं, स्तुती आणि निंदा ही शब्दांची व्याप्ती आहे. कानांनी जर स्तुती ऐकली तर आनंद मिळतो पण, निंदा ऐकताच (अंतःकरणात) द्वेष निर्माण होतो.
115-2
मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥115॥
मृदूता आणि कठीणता, हे स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत; परंतु त्वचेच्या (ठिकाणी भासल्यास) संयोगाने संतोषाला आणि खेदाला कारण होतात.
116-2
भ्यासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख । जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥116॥
तसेच, भेसूर आणि सुरेख ही दोन लक्षणे रूप या विषयीची आहेत. पण नेत्राद्वारे सुखदुःख उत्पन्न करतात.
117-2
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु । जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ॥117॥
सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुखदुःख उत्पन्न करतात.
118-2
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु । म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥118॥
त्याचप्रमाणे (कडू व गोड) दोन प्रकारचा रस असतो. एकातुन त्रास (नावड) आणि एकातून प्रीती (आवड) निर्माण होते. म्हणून विषयांची संगती मानवाला अधोगतीला (घेऊन जाते) नेणारी आहे.
119-2
देखें इंद्रियां आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे । आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥119॥
असे पाहा की, माणूस ज्यावेळी इंद्रियांच्या ताब्यात जातो, तेंव्हा त्याला शितोष्णाचा (द्वंद्वे निर्माण होणे) अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो सुखदुःखाच्या चक्रात सापडतो.
120-2
या विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं । ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥120॥
पाहा, या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की, त्यांना या विषयावाचून दुसरे काहींच (म्हणून आपण गुंतत जातो) गोड वाटत नाही.
121-2
हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें । कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥121॥
मग हे (इंद्रियांचे स्वभाव)विषय आहेत तरी कसे? मृगजळ जसे आभासात्मक (म्हणजे खरे नसते, कल्पना) किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती, वगैरे जसा केवळ भासमय असतो.
122-2
देखैं अनित्य तियापरी । म्हणौनि तूं अव्हेरीं । हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥122॥
अशाप्रकारे हे विषय क्षणभंगुर आहेत; याकरिता हे धनुर्धरा, तू त्यांचा (विषयांचा) त्याग कर. त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस. (संगती करू नकोस)
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥2.15॥
हे पुरुषश्रेष्ठा अर्जुना !! ज्याला इंद्रिय आणि विषयसंबंध व्याकुळ करीत नाहीत, त्याला सुख-दुःख समान (होतात) आहेत.असा तो विवेकवंत (धीर) पुरुष मोक्षप्राप्तीला योग्य होतो.
123-2
हे विषय जयातें नाकळिती । तया सुखदुःखें दोनी न पवती । आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥123॥
जो पुरुष या विषयांच्या आधीन (तावडीत) होत नाही, त्याला सुखदुःख ही दोन्ही होत नाहीत.(सुखदुःख या दोन्ही वेळी सारखाच (संयमी) असणारा), त्याला पुनः गर्भवास सोसावे लागत नाही. (म्हणजेच मोक्षप्राप्ती).
124-2
तो नित्यरूप पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥124॥
जो या इंद्रियांचे जे विषय (त्यांच्या आधीन न होणारा) त्या दुष्टचक्रात सापडत नाही, (अशा मानवास) हे पार्था, तो पूर्णपणे ब्रम्हरूप आहे असें जाणावे.
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः॥2.16॥
अविद्यमान (अस्तित्वात नसलेल्या) वस्तूला अस्तित्व कधी नसते,आणि विद्यमान गोष्टीला कधी आभाव नसतो. विद्यमान व अविद्यमान या दोन्हीचाहि निर्णय तत्वज्ञानी लोकांनी जाणला आहे.
125-2
आतां अर्जुना कांहीं एक । सांगेन मी आईक । जे विचारपर लोक । वोळखिती ॥125॥
आता अर्जुना, तुला मी आणखी एक गोष्ट सांगणार आहे, ऐक. जी ज्ञानी पुरुष विचारांनी जाणतात.