सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी १ ते २५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

सार्थ ज्ञानेश् ॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥
॥ अथ पञ्चमोऽध्यायः– अध्याय पाचवा ॥ संन्यासयोगः
अध्याय पाचवा
अर्जुन उवाचः
संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यत् श्रेयं एतयोरेकें तत् मे ब्रूहि सुनिश्चितम्॥5.1॥

भावार्थ :- अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुनः कर्माचे अनुष्ठान करावे असेंहि तूच सांगतोस. या दोन्हीपैकी (तुझ्या मताने) जे खरोखर श्रेयस्कर असेल ते एक मला निश्चित सांग.
1-5
मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचे बोलणें । एक होय तरी अंतःकरणे । विचारूं ये ॥1॥
मग अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, “अहो ! हे असे कसे तुमचे बोलणे? तुम्ही एकच मार्ग सांगाल, तर त्यासंबंधी मनाने कांही विचार करता येईल.
2-5
मागां सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु । तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु । पोखीतसां पुढती ॥2॥
यापूर्वी तुम्ही कर्माचा त्याग करावा, हे विविध प्रकारे सांगितले होते; परंतु आता कर्मयोग आचरणासाठी अधिक उत्तेजन का देता?
3-5
ऐसें द्व्यर्थ हें बोलतां । आम्हां नेणतयांचिया चित्ता । आपुलिये चाडे अनंता । उमजू नोहे ॥3॥
हे श्रीअनंता ! आपले असे दोन्ही मार्गाचे बोलणे ऐकून आम्हा अज्ञानी लोंकांच्या मनाला काही उलगडा होत नाही.
4-5
एकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे । हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ॥4॥
ऐका. एका (सारभूत) तत्वाचा बोध करायचा असेल, तर ते एकच निश्चितपणे सांगितले पाहिजे. हे तुम्हाला दुसऱ्याने दुसऱ्यांनी सांगावयास पाहिजे काय??
5-5
तरी याचिलागीं तुमतें । म्यां राऊळासी विनविले होते । जे हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा ॥5॥
याकरताच आपल्यासारख्या श्रेष्ठयानां मी विनंती केली होती की, परमार्थ हा गूढ अर्थाने सांगू नका.


6-5
परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा । सांगे दोहींमाजि बरवा । मार्गु कवण ॥6॥
पण देवा ! मागील गोष्ट राहू दे. आता प्रस्तुत दोन्ही मार्गांपैकी कोणता मार्ग चांगला आहे, हे स्पष्ट करून सांगावे.
7-5
जो परिणामींचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा । आणि अनुष्ठिता प्रांजळा । सावियाचि ॥7॥
जो मार्ग परिणामी अमृतमधुर आहे, ज्याचे फळ अचूक प्राप्त होते आणि जो आचरण करण्यास सहजच सरळ आहे,
8-5
जैसें निद्रेचे सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे । तैसें सोकासनां सांगडे । सोहपें होय ॥8॥
निद्रेचे सुख मध्येच भंग न पावता रस्ता तर पार करता आला पाहिजे, अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा असेल, तो मार्ग मला सांगावा.
9-5
येणें अर्जुनाचेनि बोले । देवो मनीं रिझले । मग होईल ऐकें म्हणितले । संतोषोनियां ॥9॥
असे अर्जुनाचे बोलणे ऐकून देवाच्या मनात प्रसन्नता तरारली आणि परम संतोषाने ते अर्जुनास म्हणाले, तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल.
10-5
देखा कामधेनु ऐसी माये । सदैवा जया होये । तो चंद्रुहि परी लाहे खेळावया ॥10॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाहा, ज्या दैववानाला (सुदैवाने ज्याला) कामधेनुसारखी आई लाभली आहे, त्याला आकाशातील चंद्रदेखील खेळायला मिळतो.


11-5
पाहें पां शंभूची प्रसन्नता । तया उपमन्यूचिया आर्ता । काय क्षीराब्धि दूधभाता । देईजेचिना ॥11॥
असे पाहा की, शंकरांनी प्रसन्न होऊन उपमन्यूला त्याच्या इच्छेप्रमाणे दूधभात खाण्यासाठी दुधाचा सागर दिला.
12-5
तैसा औदार्याचा कुरुठा । कृष्ण आपु जाहलिया सुभटा । कां सर्व सुखांचा वसौटा । तोचि नोहावा ॥12॥
त्याप्रमाणे औदार्याचे घर असणारा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या अधीन झाल्यावर अर्जुन सर्वसुखाचे वसतिस्थान का बरे होणार नाही??
13-5
एथ चमत्कारु कायसा । गोसावी लक्ष्मीकांताऐसा । आतां आपुलिया सवेसा । मागावा कीं ॥13॥
यामध्ये आश्चर्य ते काय आहे? लक्ष्मीकांतसारखा मालक लाभल्यावर आता आपल्या इच्छेप्रमाणे मागितले पाहिजे.
14-5
म्हणोनि अर्जुने म्हणितले । तें हांसोनि येरें दिधले । तेंचि सांगेन बोलिले । काय कृष्णें ॥14॥
म्हणून अर्जुनाने जे मागितले, ते श्रीकृष्णांनी त्याला प्रसन्न चित्ताने दिले. श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात, श्रोतेहो, श्रीकृष्ण अर्जुनाला काय बोलले, तेच मी तुम्हाला आता सांगत आहे.
श्रीभगवानुवाचः
संन्यासं कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात् कर्मयोगो विशिष्यते॥5.2॥

भावार्थ :- भगवान म्हणाले, कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याणकारी आहेत; परंतु त्या दोन्हीपैकी (कर्माचा त्याग व कर्माचे अनुष्ठान हे दोन्ही मोक्षाला कारणीभूत आहेत) कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा सर्वाना सुगम असल्याने श्रेष्ठ आहे.
15-5
तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोगु विचारितां । मोक्षकर तत्वता । दोनीहि होती ॥15॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! तात्विक दृष्टीने विचार केला, तर कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहेत.


16-5
तरी जाणां नेणां सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळा । जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणीं ॥16॥
ज्याप्रमाणे नाव पुरुषांप्रमाणेच, स्त्रियांना आणि बालकांनाही पाण्यातून तरुण जाण्यास सोपे साधन आहे, त्याप्रमाणे जाणत्यांना, नेणत्यांना (हा संसाररुपी) भवसागर तरुण जाण्यासाठी हा निष्काम कर्मयोग सुलभ आहे.
17-5
तैसें सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे । येणें संन्यासफळ लाहिजे । अनायासें ॥17॥
सारासार विचार करून पहिले असता, निष्काम कर्मयोग फार सोपा आहे, त्याच्या आचरणाने कर्मसंन्यासाचे फळ अनायासे प्राप्त होते.
18-5
आतां याचिलागीं सांगेन । तुज संन्यासियाचे चिन्ह । मग सहजें हे अभिन्न । जाणसी तूं ॥18॥
याकरिता तुला कर्मसंन्यासाचे लक्षण सांगतो, मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत, असे तू जाणशील.
ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङक्षति ।
निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात् प्रमुच्यते॥5.3॥

भावार्थ :- हे अर्जुना ! जो मनुष्य कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणत्याही विषयाची इच्छा करत नाही, तो निष्काम कर्मयोगी सदा संन्यासीच समजणे योग्य आहे. कारण रागद्वेषादीपासून सुटलेला मनुष्य सुखपूर्वक संसारबंधनातून मुक्त होतो.
19-5
तरी गेलियाचि से न करी । न पवतां चाड न धरी । जो सुनिश्चळु अंतरीं । मेरु जैसा ॥19॥
जो होऊन गेलेल्या गोष्टीची आठवण काढत नाही, एखादी वस्तू प्राप्त झाली, तरी त्याचा आनंद मानत नाही, जो मेरुपर्वताप्रमाणे अंतर्यामी स्थिर असतो,
20-5
आणि मी माझें ऐसी आठवण । विसरले जयाचे अंतःकरण । पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥20॥
आणि हे पार्था ! ज्याच्या अंतःकरणात मी आणि माझे याचे स्मरणदेखील राहिलेले नसते, तो सदोदित संन्यासी आहे, असे जाणावे.


21-5
जो मनें ऐसा जाहला । संगी तोचि सांडिला । म्हणोनि सुखें सुख पावला । अखंडित ॥21॥
ज्याच्या मनाची अशी अवस्था झाली, त्याला विषयांची इच्छा सोडून जाते; म्हणून त्याला सहजसुखाने अखंड मोक्ष प्राप्त होतो.
22-5
आतां गृहादिक आघवें । तें कांहीं नलगे त्यजावें । जें घेतें जाहलें स्वभावें । निःसंगु म्हणऊनि ॥22॥
अशी स्थिती असलेल्या माणसाला घर, प्रपंच वगैरे कांही त्यागावे लागत नाही; कारण मी पणाच्या अभिमानाने प्रपंचाचा स्वीकार करणारे त्याचे मन अंतः करणापासून स्वभावतःच निःसंग झालेले असते.
23-5
देखें अग्नि विझोनि जाये । मग जे रांखोंडी केवळु होये । तैं ते कापुसें गिंवसूं ये । जियापरी ॥23॥
प्रज्वलित अग्नी विजून गेला, की त्याची राखच शिल्लक राहते. ती राख कापसानेदेखील धरून ठेवता येते.
24-5
तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे जो कर्मबंधीं । जयाचीचे बुद्धी । संकल्पु नाहीं ॥24॥
त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प निर्माण होत नाही, तो प्रपंचाच्या उपाधित असूनसुद्धा कर्मबंधात सापडत नाही.
25-5
म्हणोनि कल्पना जैं सांडे । तैंचि गा संन्यासु घडे । या कारणे दोनी सांगडे । संन्यासयोगु ॥25॥
ज्यावेळी मनातील कल्पनेचा त्याग होतो, त्यावेळी संन्यास घडतो आणि म्हणूनच कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही फलतः सारखेच आहेत.
सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः ।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम्॥5.4॥


भावार्थ :- अज्ञानी लोक सांख्ययोग आणि कर्मयोग यांना वेगवेगळे फल देणारे म्हणतात. परंतु ज्ञानी लोक तसे म्हणत नाहीत; कारण या दोन्हीपैकी एका साधनेचे शास्त्रशुद्ध अनुष्ठान केले, तर दोन्हीचे फलरूप मोक्ष म्हणजे परमात्माप्राप्ती होते.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *