सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी २२६ ते २५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , ,

226-1
त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल प्राप्त । तरी हें अनुचित । नाचरें मी ॥226॥
त्रैलोक्याचे / त्रिभूवनाचे राज्य जरी मिळणार असेल, तरी हे अनुचित कृत्य मी करणार नाही. ॥226॥
227-1
जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाच्या मनीं उरिजे? । सांगे मुख केवीं पाहिजे । तुझें कृष्णा? ॥227॥
जर असे अनुचित कृत्य आम्ही केले, तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनांत आदर राहील? अशा पापकर्मामुळे तुझे मुख तरी कसे पाहणार? ॥227॥
228-1
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापमेवाऽऽश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः॥1.36॥
भावार्थ :- हे जनार्दना ! धृतराष्टराच्या पुत्रांचा वध करून आम्हाला कोणते बरे सुख लाभणार? ह्या आततायींना मारले असता (कुलनाशाचे) पाप मात्र लागेल. ॥36॥
जरी वधु करोनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा । मज जोडिलासि तुं हातींचा । दूरी होसी ॥228॥
जर मी गोत्रजांना ठार केले, तर मी सर्व दोषांचा आश्रयस्थान बनेन. असे झाल्यामुळे तुझ्याशी जोडलेला संबंध मी माझ्या हातानेच दूर केल्यासारखे होईल. ॥228॥
229-1
कुळहरणीं पातकें । तिये आंगीं जडती अशेखें । तये वेळीं तुं कवणें कें । देखावासी? ॥229॥
कुळाचा नाश केल्यामूळे सर्व पातके लागतात. अशा प्रसंगी तुला कोणी कोठे शोधावे? ॥229॥
230-1
जैसा उद्यानामाजीं अनळु । संचारला देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे ॥230॥
ज्याप्रमाणे बगीचाला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळा तेथें क्षणभारहि थांबत नाही; ॥230॥

231-1
का सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु । न सेवितु अव्हेरु । करूनि निघे ॥231॥
चिखलाने भरलेले सरोवर पाहून चकोर पक्षी तेथील पाण्याचे सेवन न करता त्या सरोवराचा त्याग करून तेथून निघून जातो; ॥231॥
232-1
तयापरी तुं देवा । मज झकवूं न येसीं मावा । जरी पुण्याचा वोलावा । नाशिजैल ॥232॥
त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या हृदयातील पुण्याचा (प्रेमाचा) ओलावा नाहीसा झाला, तर तू आपल्या मायेने मला चकवून माझ्याकडे येणार नाहीस. ॥232॥
233-1
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥1.37॥
भावार्थ :- म्हणून हे माधव ! कौरव आमचे बांधव आहेत. त्यांना मारणे आम्हाला योग्य नाही. कारण स्वजनांनाच ठार मारून आम्ही कसे बरे सुखी होऊ? ॥37॥
म्हणोनि मी हें न करीं । इये संग्रामीं शस्त्र न धरीं । हें किडाळ बहुतीं परी । दिसतसे ॥233॥
म्हणून मी हे कृत्य करणार नाही; या लढाईमध्ये शस्त्र धरणार नाही. कारण हे युद्ध अनेक प्रकारांनी निंद्य आहे, असे मला दिसत आहे. ॥233॥
234-1
तुजसीं अंतराय होईल । मग सांगे आमुचें काय उरेल? । तेणें दुःखें हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ॥234॥
हे श्रीकृष्णा ! युद्धाच्या पापामुळे तुझ्याशी ताटातूट होईल, तर मग तुझ्यावाचून आमचे या जगात काय राहील? त्या वियोग-दुःखानेच आमचे हृदय विदीर्ण होईल. ॥234॥
235-1
म्हणौनि कौरव हे वधिजती । मग आम्ही भोग भोगिजती । हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ॥235॥
ऐवढ्याकरिता या कौरवांचा वध करून आम्ही राज्याचे भोग भोगावेत, हे राहू दे; ही गोष्ट घडणे अशक्य आहे, असे अर्जुन म्हणाला. ॥235॥

236-1
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥1.38॥
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥1.39॥
भावार्थ
:- अतिलोभामुळे अंतःकरण भ्रष्ट झालेल्या यांना (कौरावांना) कुलक्षयाने होणारा दोष आणि मित्रद्रोहाचे पातक जरी दिसत नाही, ॥38॥
तरी कुलक्षय केल्याने होणारा दोष ढळढळीत दिसत असताना आम्हालादेखील, “हे जनार्दना”, या पापापासून परावृत्त होण्याची जाणीव का असू नये ! ॥39॥
हे अभिमानमदें भुललें । जरी पां संग्रामा आले । तर्‍ही आम्हीं हित आपुलें । जाणावें लागे ॥236॥
कौरव हे अभिमानांच्या मदाने बहकून गेले आहेत, त्यामुळे ते संग्राम करण्यासाठी आले आहेत; तरी पण आम्ही आपले हित (कशांत) आहे हे पहिले पाहिजे. ॥236॥
237-1
हें ऐसें कैसें करावें? । जे आपुले आपण मारावे? । जाणत जाणतांचि सेवावें । काळकूट? ॥237॥
आपलेच आप्तसंबंधी मारावे? हे असें भलतेच कसें करावे? काळकूट विष आहे, हे कळाले, तर ते कसे घ्यावे? ॥237॥
238-1
हां जी मार्गीं चालतां । पुढां सिंहु जाहला आवचिता । तो तंव चुकवितां । लाभु आथी ॥238॥
महाराज रस्त्याने चालत असतां अकस्मात सिंह आडवा आला, तर त्याला चुकवून जाण्यातच हित आहे. ॥238॥
239-1
असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा । तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगे? ॥239॥
प्रकाशाचा मार्ग सोडून अंधकारमय विहिरीत जाऊन बसणे, यामध्ये कोणता लाभ आहे? हे देवा ! तूच सांग बरे. ॥239॥
240-1
कां समोर अग्नि देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी । तरी क्षणा एका कवळूनी । जाळूं सके ॥240॥
किंवा समोर अग्निज्वाला प्रज्वलीत आहेत हे पाहून आपण बाजूने गेलो नाही, तर त्या अग्निज्वाला एका क्षणात आपणास घेरून जाळून टाकतील. ॥240॥

241-1
तैसे दोष हे मूर्त ॥ अंगी वाजों असती पाहात । हें जाणतांही केवीं एथ । प्रवर्तावें? ॥241॥
तसेच कुलक्षयामुळे होणारे मूर्तिमंत दोष आम्हाला लागतील, हे कळल्यावरही, आम्ही हे संहाराचे काम कसे बरे करावे? ॥241॥
242-1
ऐसें पार्थु तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं । या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ॥242॥
त्यावेळी असें बोलून पार्थ म्हणाला, देवा ऐका. मी तुम्हाला या पापाचे भयंकर परिणाम सांगतो. ॥242॥
243-1
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत॥1.40॥
भावार्थ :- कुलक्षय झाला, की वंशपरंपरेने चालत आलेले म्हणजे सनातन कुलाचार (कुलधर्म) नाहीसे होऊन जातात. त्यामुळे अधर्म सर्व कुल व्यापून टाकतो. ॥40॥
जैसें कष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे । तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥243॥
ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असता तेथे अग्नी निर्माण होतो. तो अग्नी भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो. ॥243॥
244-1
तैसा गोत्रींचीं परस्परें । जरी वधु घडे मत्सरें । तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे ॥244॥
त्याप्रमाणे कुळातील लोकांनी मत्सराने(द्वेषाने) परस्परांचा नाश केला, तर त्या भयंकर महादोषाने कुळच नाशाला पावतें. ॥244॥
245-1
म्हणौनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे । मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजीं ॥245॥
म्हणून या पापाने वंशपरंपरागत आलेल्या कुलधर्मचा लोप होतो आणि मग कूळामध्ये अधर्मच वाढत जातो. ॥245॥

246-1
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः॥1.41॥
भावार्थ :- हे कृष्णा ! अधर्म वाढला, म्हणजे कुलस्त्रियां दुराचारी बनतात. हे वृष्णिकुलोत्पन्न कृष्णा ! कुलस्त्रियां बिघडल्या, की वर्णसंकर उत्पन्न होतो. ॥41॥
एथ सारासार विचारावें । कवणें काय आचारावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ॥246॥
तेथे सारासार विचार नाहीसा होतो, कोणी कोणते आचरण करावे व कर्तव्य काय, अकर्तव्य काय, या सगळ्या गोष्टी लोप पावतात. ॥246॥
247-1
असता दीपु दवडिजे । मग अंधकारीं राहाटिजे । तरी उजूचि कां अडळिजे । जयापरी ॥247॥
आपल्या जवळ असलेला दिवा विझवून अंधारात चालू लागलो, तर चांगल्या जागीही माणूस अडखळतो. ॥247॥
248-1
तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळीं तो आद्यधर्मु जाय । मग आन कांहीं आहे । पापावांचुनी? ॥248॥
त्याप्रमाणे ज्या वेळी कुलक्षय होतो त्या वेळी कुळांत परंपरागत चालत असलेल्या धर्माचा लोप होतो. मग तेथें पापवाचून दुसरे काय असणार.? ॥248॥
249-1
जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रिये सैरा राहाटती । म्हणौनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥249॥
ज्या वेळी इंद्रियें व मन यांचा निग्रह थांबतो,त्यावेळी इंद्रिये स्वैर (व्यवहार करतात) सुटतात म्हणून कुळस्त्रियांकडून व्यभिचार घडतो. ॥249॥
250-1
उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥250॥
उच्च वर्णाच्या स्त्रियांचा नीच वर्णाच्या लोकांत संचार होतो. अशा रीतीनें वर्णसंकर निर्माण होतो. त्यामुळे जातीधर्म मुळापासून उखडले जातात. ॥250॥

, , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *