126-4
आतां अवधारीं सांगेन आणिक । जे ब्रह्माग्नी साग्निक । तयांते यज्ञेंचि यज्ञु देख । उपासिजे॥126॥
दुसरा प्रकार आता तुला सांगतो, ऐक. जे ब्राम्हरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत, ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात.(स्वकर्माने ईश्वराची आराधना करतात)
श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन् विषयानन्य । इंद्रियाग्निषु जुह्वति॥4.26॥
भावार्थ :- काही योगी श्रोत्र आदि करून ज्ञानेंद्रियांचा संयमरूप अग्निमध्ये होम करतात, म्हणजे ज्ञानेंद्रियांचा निरोध करतात. काही योगी शब्दादी पंचविषयांचे हवन इंद्रियरूपी अग्नीत करतात.
127-4
एथ संयमाग्निहोत्री । जे युक्तित्रयांच्यां मंत्रीं । यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्यीं ॥127॥
धारणा, ध्यान, समाधीरूप संयम हे अग्निहोत्र, त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक तीन बंधरुपी मंत्राच्या द्वारे इंद्रिरूपी पवित्र अशा द्रव्यांनी यज्ञ करतात.
128-4
एकां वैराग्यरवि विवळे । तंव संयती विहार केले । तेथ अपावृत्त जाहले । इंद्रियानळ ॥128॥
दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्य उगवल्यावर संयमरुपी कुंडाची रचना करतात. मग त्या कुंडामध्ये इंद्रिरूपी अग्नी प्रकट होतो.
129-4
तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली । तंव विकारांची इंधने पळिपलीं । तेथ आशाधूमें सांडिलीं । पांचही कुंडें ॥129॥
त्या इंद्रिय- अग्नीने विरक्तीच्या ज्वाला जेंव्हा वाढतात, त्यावेळी कामक्रोधाधी लाकडे पेटू लागतात. त्या वेळी कामक्रोधाधी लाकडे पेटू लागतात. त्या इंद्रिय – अग्नीच्या पाच कुंडातून आशारूपी धूर निघून गेलेला असतो.
130-4
मग वाक्यविधीचिया निरवडी । विषयआहुति उदंडी । हवन केलें कुंडी । इंद्रियाग्नीचां ॥130॥
मग वेदांत सांगितलेल्या विधीच्या पद्धतीने इंद्रियरुप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप आहुती देऊन ते यज्ञ करतात.
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते॥4.27॥
भावार्थ :- दुसरे कोणी ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या मनोनिग्रहरूपी अग्निमध्ये सर्व इंद्रियांची आणि प्राणांची कर्मे हवन करतात म्हणजे इश्वराशिवाय कशाचेही चिंतन करत नाहीत.
131-4
एकीं ययापरी पार्था । दोषु क्षाळिले सर्वथा । आणिकीं हृदयारणीं मंथा । विवेकु केला ॥131॥
हे अर्जुना ! अनेक साधकांनी विविध प्रकारचे यज्ञ करून आपल्या चित्तातील दोष नाहीसे केले आहेत. दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात.
132-4
तो उपशमें निहटिला । धैर्यें वरी दाटिला । गुरुवाक्यें काढिला । बळकटपणें ॥132॥
तो धैर्यरूपी भाराने दाबून शांतिरुप रज्जूने घसळून गुरुवाक्यरूपी मंत्राने त्याचे मंथन करतात.
133-4
ऐसे समरसें मंथन केलें । तेथ झडकरी काजा आलें । जे उज्जीवन जहालें । ज्ञानाग्नीचें ॥133॥
समरसतेने मंथन केले असता त्याचा त्वरित उपयोग होतो आणि ज्ञानाग्नि प्रकट होतो.
134-4
पहिला ऋद्धिसिद्धीचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धूमु । मग प्रगटला सूक्ष्मु । विस्फुलिंगु ॥134॥
त्यावेळी रिद्धी- सिद्धीचा मोह हाच उत्पन्न झालेला धूर नाहीसा होऊन जातो. मग सूक्ष्म अशी अग्नीची ठिणगी उत्पन्न होते.
135-4
मन तयाचे मोकळें । तेचि पेटवण घातलें । जें यमदमीं हळुवारलें । आइतें होतें ॥135॥
यम नियमांच्या अभ्यासाने वाळून हलके असे झालेले मन, हे त्या ज्ञानरूपी अग्नीला पेटवन घालतात.
136-4
तेणें सादुकपणें ज्वाळा समृद्धा । मग वासनांतराचिया समिधा । स्नेहेंसी नानाविधा । जाळिलिया ॥136॥
त्याच्या आधारे ज्वाला प्रज्वलित होतात. मग त्यामध्ये विविध प्रकारच्या वासनारूप समिधा मोहरूपी तुपासह जळतात.
137-4
तेथ सोहंमंत्रें दीक्षितीं । इंद्रियकर्मांचिया आहुती । तिये ज्ञानानळीं प्रदीप्तीं । दिधलिया ॥137॥
यज्ञ करणारा पुरुष मी ब्रम्हरूप आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रियकर्माच्या आहुती देतो.
138-4
पाठीं प्राणक्रिचेनि स्रुवेनिशीं । पूर्णाहुती पडली हुताशीं । तेथ अवभृत समरसीं । सहजें जाहलें ॥138॥
प्राणाच्या श्वासादी क्रियारूपी स्रुवापात्रासह ज्ञानाग्नित पूर्णाहुती पडली असता सहजपणे निर्बीज अशा समाधीच्या ऐक्यामध्ये त्या यज्ञकर्त्या पुरुषाचे अवभूत स्नान झालेले असते.
139-4
मग आत्मबोधींचे सुख । जे संयमाग्नीचें हुतशेष । तोचि पुरोडाशु देख । घेतला तिहीं ॥139॥
संयम अग्निमध्ये होमद्रव्याचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख, तोच पुरोडाश मग ते सेवन करतात.
140-4
एक ऐशिया इहीं यजनीं । मुक्त ते जाहले त्रिभुवनीं । या यज्ञक्रिया तरी आनानी । परि प्राप्य तें एक ॥140॥
अशा प्रकारचा यज्ञ करून अनेक लोक या त्रिभुवनात मुक्त झाले आहेत. या पुरुषांच्या यज्ञक्रिया जरी भिन्न-भिन्न असल्या; तरीपण त्या सर्वांचे प्राप्तव्य एकच आहे.
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः॥4.28॥
भावार्थ :- त्याचप्रमाणे द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योग्यज्ञ, वाग्ययज्ञ, व ज्ञानयज्ञ असे पाच प्रकारचे यज्ञ आहेत. तीक्ष्ण व्रते आचरण करणारे यतीच हे यज्ञ करतात.
141-4
एक द्रव्ययज्ञु म्हणिपती । एक तपसामग्रिया निपजती । एक योगयागुही आहाती । जे सांगितले ॥141॥
त्यापैकी एकाला द्रव्ययज्ञ, एकाला तापोयज्ञ तर अष्टांग साधनेने साधलेल्या यज्ञाला योगयज्ञ असे म्हणतात.
142-4
एकीं शब्दीं शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे । ज्ञाने ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ॥142॥
ज्यामध्ये शब्दाने शब्दांचा होम केला जातो, अर्थात विधीप्रमाणे वेदांचे अध्ययन केले जाते, त्याला वाग्यज्ञ म्हणतात आणि ज्या यज्ञात ज्ञानाने ब्रम्हाशी एकरूपता प्राप्त होते, त्याला ज्ञानयज्ञ असे म्हणतात.
143-4
हें अर्जुना सकळ कुवाडें । जे अनुष्ठितां अतिसांकडे । परी जितेंद्रियासीचि घडे । योग्यतावशें ॥143॥
हे अर्जुना ! हे सर्व यज्ञ करणे अतिशय कठीण आहे; कारण यांचे अनुष्ठान करणे अतिशय अवघड आहे. परंतु ज्यांनी आपली इंद्रिय जिंकली आहेत, त्यांना मात्र ते करण्याची योग्यता प्राप्त होते आणि त्याचे आचरण घडते.
144-4
ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धी आथिले । म्हणोनि आपणपां तिहीं केले । आत्महवन ॥144॥
ते यज्ञंकर्मामध्ये प्रवीण असतात आणि साधनसमृद्धीने संपन्न असतात; म्हणून त्यांनी आपल्या जीवाचे आत्म्याच्या ठिकाणी हवन केलेले असते.
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपाऽनं तथापरे ।
प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायामपरायणाः॥4.29॥
भावार्थ :- कोणी अपानवायूच्या ठिकाणी प्राणवायूचे हवन करतात, यास पूरक म्हणतात.कोणी प्राणवायूच्या ठिकाणी अपानवायूचे हवन करतात, यांस रेचक म्हणतात.कांही प्राणायामामध्ये तत्पर असणारे प्राणवायू आणि अपानवायू या दोन्हीचा विरोध करतात, म्हणजे कुंभक करतात.
145-4
मग अपाग्नीचां मुखी । प्राणद्रव्यें देखी । हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ॥145॥
कित्येक योगी अभ्यासाने अपानवायुरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात, म्हणजे पूरक नावाचा प्राणायाम करतात.
146-4
एकु अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहींतेंही निरुंधिती । ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ॥146॥
हे अर्जुना ! काही साधक प्राणवायूच्या ठिकाणी शरीरात असलेल्या अपानवायूला बाहेर सोडून हवन करतात. याला रेचक म्हणतात. कित्येक योगी प्राण आणि अपान या दोघाच्याही गतीचा निरोध करतात. त्यांना प्राणायामी म्हणतात.
अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति ।
सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः॥4.30॥
भावार्थ :- दुसरे काही योगी आहाराचे नियमन करतात आणि प्राणाचा प्राणवायूत होम करतात. हे सर्वही यज्ञ जाणणारे योगी यज्ञाने पापाचा नाश करून टाकतात.
147-4
एक वज्रयोगक्रमें । सर्वाहारसंयमें । प्राणीं प्राणु संभ्रमें । हवन करिती ॥147॥
कित्येक योगी वज्रसनाच्या मुळंबंधाच्या पद्धतीचे सर्व आहाराचे संयमन करून, प्रयत्नाने प्राणांचे प्राणाच्या ठिकाणी हवन करतात.
148-4
ऐसे मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ । हीं यज्ञद्वारा मनोमळ । क्षाळण केले ॥148॥
याप्रमाणे हे सर्व यज्ञ करणारे मोक्षाची इच्छा करतात. यज्ञ करणे, हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी यज्ञाच्या आधारे मनातील सर्व प्रकारचे दोष घालविले असतात.
149-4
जया अविद्याजात जाळितां । जे उरलें निजस्वभावता । जेथ अग्नि आणि होता । उरेचिना ॥149॥
त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे स्वाभाविकपणेच मूळचे शुद्ध स्वरूप शिल्लक राहते तेथे अग्नी व यज्ञकर्ता हा कोणत्याही प्रकारचा द्वैतभाव शिल्लक राहत नाही.
150-4
जेथ यजितयाचा कामु पुरे । यज्ञींचें विधान सरे । मागुते जेथूनि वोसरे । क्रियाजात ॥150॥
ज्या ठिकाणी यज्ञ करांनाऱ्याची इच्छा पूर्ण होते आणि यज्ञाक्रिया संपून जातात आणि जेथून क्रिया या मागे परतून ओसरून (नाहीशा होतात) जातात,