सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी १ ते २५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ ॥ अथ सप्तमोऽध्यायः – अध्याय सातवा ॥ ॥ ज्ञानविज्ञानयोगः ॥
अध्याय सातवा

श्रीभगवानुवाच :
मय्यासक्तमना: पार्थ योगं युञ्जन्मदाश्रय: ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥7.1॥
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषत: ।
यज्ज्ञात्वा नेहभूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥7.2॥

1-7
आइका मग तो अनंतु । पार्थातें असे म्हणतु । पै गा तूं योगयुक्त । जालासि आतां ॥1॥
श्रोतेहो, ऐका. मग श्रीअनंत पार्थाला म्हणाले :- अरे, तूं निश्चयेंकरून योगयुक्त झालास.
2-7
मज समग्रातें जाणसी ऐसें । आपुलिया तळहातींचें रत्न जैसें । तुज ज्ञान सांगेन तैसें । विज्ञानेंसीं ॥2॥
आतां मी तुला व्यावहारिक (प्रापंचिक) ज्ञानासह ब्रह्मज्ञान अशा रितीने सांगेन की, त्या योगाने, तळहातावरील रत्न आपण पहातो, त्याप्रमाणे तूं मला सगळा ओळखशील.
3-7
एथ विज्ञानें काय करावें । ऐसें घेसी जरी मनोभावें । तरी पैं आधीं जाणावें । तेंचि लागे ॥3॥
या ठिकाणी प्रापंचिक ज्ञानाशीं काय करावयाचे आहे, असा जर तुझ्या मनाचा ग्रह होईल तर आधी खरोखर तेंच समजून घेतले पाहिजे.
4-7
मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे । जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ॥4॥
मग ज्ञानाच्या साक्षात्काराच्या वेळी बुद्धीचीं नजर थांबते. ज्याप्रमाणे तीराला टेकलेली नाव हालत नाही
5-7
तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे । तर्कु आयणी नेघे । आंगीं जयाचां ॥5॥
त्याप्रमाणे, ज्या ठिकाणी बुद्धिचा शिरकाव होत नाही, विचारही मागे राहतो आणि तर्काचा हुरूप मोडतो, त्यालाच ज्ञान असे म्हणतात.


6-7
अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान । तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥6॥
अर्जुना, बाकीची सर्व प्रापंचिक ज्ञाने त्याला विज्ञान असे म्हणतात; आणि प्रपंच खरा मानणे हे खरे अज्ञान होय असे समज.
7-7
आतां अज्ञान अवघें हरपें । विज्ञान नि:शेष करपें । आणि ज्ञान तें स्वरूपें । होऊनि जाईजे ॥7॥
आतां, सर्व अज्ञान नाहींसे होईल, विज्ञान समुळ जळुन जाईल आणि मुर्तिमंत ज्ञान प्रकट होईल.
8-7
ऐसें वर्म जें गूढ । तें किजेल वाक्यारूढ । जेणें थोडेन पुरें कोड । बहुत मनींचें ॥8॥
ज्याच्या योगानें सांगणाराचे बोलने खुंटतें, ऐकणाराची इच्छा कमी होते, आणि अमुक मोठे व अमुक लहान असा भेद रहात नाही;
9-7
जेणें सांगतयाचें बोलणें खुंटें । ऐकतयाचें व्यसन तुटें । हें जाणणें सानें मोठें । उरों नेदी ॥9॥
व जे थोडे ऐकले असतां सुद्धा मनांतील पुष्कळ हेतु पुर्ण होतील, ते गुप्त तत्त्व तुला सांगतो.
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत: ॥7.3॥

10-7
पैं गा मनुष्यांचिया सहस्रशां- । माजि विपाइलेयाची येथ धिंवसा । तैसेया धिंवसेकरां बहुवसां- । माजि विरळा जाणे ॥10॥
अरे, खरोखर हजारो मनुष्यांत एखाद्यालाच या ज्ञानाची इच्छा होते, आणि तसेच, ज्ञानाची इच्छा उत्पन्न झालेल्या पुष्कळांत मला तत्त्वतः जाणणारा क्वचितच सांपडतो.


11-7
जैसा भरलेया त्रिभुवना- । आंतु एक एकु चांगु अर्जुना । निवडूनि कीजे सेना । लक्षवरी ॥11॥
ज्याप्रमाणे मनुष्यांनी भरलेल्या त्रिभुवनांत फौजेमध्ये ठेवण्याकरिता एकेक चांगला शूर निवडून लक्षावधि फौज तयार करितात,
12-7
कीं तयाहीपाठी । जे वेळीं लोह मांसातें घांटी । ते वेळीं विजयश्रीयेचां पाटीं । एकुचि बैसें ॥12॥
आणि त्यांतूनही, ज्या वेळेस तलवारींचे घाव, शरीरावर बसतात त्या वेळेस एखादाच विजयश्रीचा अधिकारी होतो,
13-7
तैसे आस्थेचां महापुरीं । रिघताति कोटिवरी । परी प्राप्तीचां पैलतीरीं । विपाइला निगे ॥13॥
त्याप्रमाणे माझ्या ज्ञानाच्या प्राप्तीच्या आस्थेच्या पुरांत कोट्यवधि लोक उड्या टाकतात, परंतु एखादाच तिच्या पैलथडीस जातो. (एखाद्यालाच माझी प्राप्ति होते).
14-7
म्हणऊनि सामान्य गा नोहे । हें सांगतां वडील गोठी गा आहे । परी तें बोलों येईल पाहें । आता प्रस्तुत ऐकें ॥14॥
म्हणुन, ही सामान्य गोष्ट नसुन मोठी श्रेष्ठ आहे; परंतु ती पुढे सांगता येईल. प्रस्तृत (तुला विज्ञानाचे रुप) सांगतो तें ऐक.
भूमिरापोऽनलो वायु: खं मनो बुद्धिरेव च ।
अहंकार इतीयं मे भिन्नाप्रकृतिरष्टधा ॥7.4॥

15-7
तरी अवधारीं गा धनंजया । हे महदादिक माझी माया । जैसी प्रतिबिंबे छाया । निजांगाची ॥15॥
हे धनंजया, ऐक; आपल्या अंगाची पडछाया असते, त्याप्रमाणे ही महदादि तत्त्वे म्हणजे माझी माया होय.


16-7
आणि इयेतें प्रकृति म्हणिजे । जे अष्टधा भिन्न जाणिजे । लोकत्रय निपजे । इयेस्तव ॥16॥
हिलाच प्रकृति असे म्हणावे; व हिचे आठ निरनिराळे प्रकार आहेत असे समजावे; आणि हिच्यापासून हे त्रैलोक्य उत्पन्न होते.
17-7
हे अष्टधा भिन्न कैसी । ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसीं । तरी तेचि गा आतां परियेसीं । विवंचना ॥17॥
ही आठ प्रकारांनी कशी निराळी आहे अशी शंका जर तूं मनांत आणशील, तर तोच विचार सांगतो, ऐक.
18-7
आप तेज गगन । मही मारुत मन । बुद्धि अहंकार हे भिन्न । आठै भाग ॥18॥
उदक, तेज, आकाश, पृथ्वी, वायु, मन, बुद्धि आणि अहंकार हे तिचे निरनिराळे आठ प्रकार आहेत.
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥7.5॥

19-7
आणि या आठांची जे साम्यावस्था । ते माझी परम प्रकृति पार्था । तिये नाम व्यवस्था । जीवु ऐसी ॥19॥
पार्था, ह्या आठ भागांची साम्यस्थिति (एकीकरण) ती माझी परमप्रकृति, आणि तिलाच जीवभुता ही संज्ञा आहे.
20-7
जे जडातें जीववी । चेतनेतें चेतवी । मनाकरवीं मानवी । शोक मोहो ॥20॥
ही अचेतनाचे (शरीराचे) जीवना करते, ज्ञानाला चेतना देते, आणि मनाला शोक व मोह मानण्यास लाविते.


21-7
पैं बुद्धिचां अंगीं जाणणें । तें जियेचिये जवळिकेचें करणें । जिया अहंकाराचेनि विंदाणें । जगचि धरिजे ॥21॥
हे पहा की, हिच्या सान्निध्याने बुद्धीच्या अंगी ज्ञान उत्पन्न होते, व ही अहंकाराच्या कुशलतेने जगाला धारण करिते.
एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगत: प्रभव: प्रलयस्तथा ॥7.6॥

22-7
ते सूक्ष्म प्रकृति कोडें । जैं स्थूळाचिया आंगा घडे । तैं भूतसृष्टीची पडे । टांकसाळ ॥22॥
ही सूक्ष्म (परा) प्रकृती जेव्हां स्वच्छेनें स्थूल प्रकृतीशी संयुक्त होते, तेव्हां सृष्टीतील प्राण्यांची टांकसाळ सुरू होते.
23-7
चतुर्विधु ठसा । उमटों लागे आपैसा । मोला तरी सरिसा । परी थरचि आनान ॥23॥
त्या टांकसाळींत आपोआप चार प्रकारचे ठसे उमटूं लागतात. त्यांतील पंचमहाभुतांची योग्यता सारखीच असते, परंतु जाति भिन्न असतात.
24-7
होती चौऱ्यांसी लक्ष थरा । येरा मिती नेणिजे भांडारा । भरे आदिशून्याचा गाभारा । नाणेयांसी ॥24॥
त्यांच्या चौऱ्यांशी लक्ष जाति असून, त्या जातीत आणखी किती जाति आहेत त्यांची गणती नाही. अशा पुष्कळ नाण्यांनी (जातींनीं) निराकार शून्य म्हणजे अव्यक्ताचा गाभारा भरून जातो.
25-7
ऐसें एकतुकें पांचभौतिक । पडती बहुवस टांक । मग तिये समृद्धीचे लेख । प्रकृतीचि धरी ॥25॥
याप्रमाणे पंचमहाभूतांचे एकसारखे पुष्कळ ठसे बनतात व त्यांच्या वृद्धिची गणना प्रकृति (माया) हीच ठेवते.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *