सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी १५१ ते १७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

151-2
अर्जुना ऐसा जाणावा । हा सकळात्मकु देखावा । मग सहजे शोकु आघवा । हरेल तुझा ॥151॥
हे अर्जुना,(आत्मा) हा असा आहे हे लक्षात घे. हे जाणावें आणि (आत्मा) हा सर्वत्र समप्रमाणात आहे, हे पाहावे. म्हणजे तुझा हा सगळा शोक की आपोआप नाहीसा होईल.
अथ चैनं नित्यजात नित्यं वा मन्यसे मृतं ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि॥2.26॥
भावार्थ :- हे महाबाहो अर्जुना !! हा आत्मा नेहमी जन्म घेत असतो आणि मृत्यू पावत असतो, असे जरी तू मानलेस तरीदेखील शोक करणे उचित नाही.
152-2
अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि हें मानिसी । तर्‍ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा ॥152॥
अर्जुना हा आत्मा अविनाशी (अमर) आहे, हे तुला समजत नसेल तर; हा आत्मा नाशवंत आहे असे जरी तू मानत असशील, तरीदेखील अर्जुन तूला शोक करण्याचे कारण नाही.
153-2
जे आदि-स्थिती- अंतु । हा निरंतर असे नित्यु । जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥153॥
कारण गंगेच्या पाण्याचा ओघ ज्या प्रमाणे अविच्छिन्न (अखंड) आहे, त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा क्रम अखंडच (नित्य घडत आहे) आहे.
154-2
(या तिन्ही अवस्थेत आत्मा अखंड व नित्य आहे.)
तें आदि नाहीं खंडले । समुद्रीं तरी असे मिनलें । आणि जातचि मध्यें उरले । दिसे जैसें ॥154॥
ते गंगेचे पाणी उगमाचे ठिकाणी खंड पावलेले नसते.पुढे ते समुद्रात जाऊन एकसारखे मिळत असते. (उगम आणि संगम यामध्ये असलेले जल) सदैव वाहत असलेले दिसते.
155-2
इये तिन्हीं तयापरी । सरसींच सदा अवधारीं । भूतांसी कवणीं अवसरीं । ठाकती ना ॥155॥
त्या प्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही (प्राणिमात्राच्या ठिकाणी) नेहमी बरोबरच असतात. हे लक्षात ठेव आणि ह्या तिन्हींचा प्रवाह कोणालाही थांबविता येत नाही.

156-2
म्हणोनि हे आघवें । एथ तुज न लगे शोचावें । जे स्थितीची हे स्वभावें । अनादि ऐसी ॥156॥
म्हणून हे अर्जुना, तुला या सर्वाबद्दल (कोणा विषयीच) शोक करण्याची गरजच नाही, कारण स्वभावतःच (उत्पत्ती आणि लय) असा सृष्टीचा क्रम आनादि कालापासून चालत आलेला आहे.
157-2
ना तरी हे अर्जुना । न येचि तुझिया मना । जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥157॥
या विश्वातील सर्व प्राणीमात्र जन्ममरण च्या आधिन आहेत, असे पाहून (ऐकून सुद्धा) (वरील म्हणणे) जर हे म्हणने तुझ्या मनाला पटत नसेल तर;
158-2
तरी येथ कांही । तुज शोकासि कारण नाहीं । जे जन्ममृत्यु हे पाहीं । अपरिहर ॥158॥
तरीपण (यातील कोणा विषयीच) तुला शोक करण्याचे कारण नाही; कारण हे जन्ममृत्यु चे हे चक्र (अटळ) टाळता न येणारे आहे.
जातस्य हि धृवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि॥2.27॥
भावार्थ :- कारण जो जन्मला आहे, त्याला मृत्यू निःश्चित आहे आणि जो मृत्यू पावला आहे, त्याला निःसंशय जन्म आहे. म्हणून (हे पार्थ) या अटळ गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही.
159-2
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥159॥
जे उत्पन्न होते (जन्मास आले) ते नाश पावणारच आणि जे नाश पावले ते पून्हा नवीन रूपात (जन्माला येणारच) दिसू लागते.हे रहाडगाडग्याप्रमाणे सतत हा क्रम सुरु असतो.
160-2
ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसे । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥160॥
अथवा, (सूर्याचा, दिवसाचा) उदय आणि अस्त हे आपोआप निरंतर होत असते, त्याप्रमाणे या (देहाचे, पाणीमात्राचे) जन्म-मरण अखंड होत असते, या विश्वात जन्म -मरण (अपरिहार्य आहे) चुकविता येणारे नाही.

161-2
महाप्रळय अवसरे । हें त्रैलोक्यही संहरे । म्हणोनि हा परिहरे । आदि अंतु ॥161॥
महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही नाश होतो, म्हणून (हे अर्जुना लक्षात घे कोणत्याही वस्तूची) उत्पत्ती व नाश हा क्रम टळत नाही.
162-2
तूं जरी हे ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी । काय जाणतचि नेणसी । धनुर्धरा ॥162॥
हे जर तुला पटत असेल, (हे म्हणजे आत्म्याला अदि व अंत असेलच)तर मग व्यर्थ शोक का करतोस? अर्जुना तू शहाणा असून वेड्यासारखे असे का बरे करतोस??
163-2
एथ आणिकही एक पार्था । तुज बहुतीं परी पाहतां । दुःख करावया सर्वथा । विषो नाहीं ॥163॥
हे अर्जुना ! तूला आणखी एक गोष्ट सांगतो, कोणत्याही बाजूने विचार करून पहिले, तरी तुला दुःख करण्याचे काहीच कारण नाही.
अव्यक्तादिनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना॥2.28॥
अर्जुना, सर्व प्राणिमात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात. मध्येच फक्त व्यक्त (दृश्य) (पंचमहाभूतात्मक शरीर मूर्त होऊन दिसते) होतात व पुन्हां मृत्यू नंतर अव्यक्तच बनतात. तर मग शोक कसला?
164-2
जें समस्तें इयें भूते । जन्मा आदि अमूर्ते । मग पातलीं व्यक्तीतें । जन्मलेया ॥164॥
(भगवान श्रीकृष्ण अर्जुनास आता दुसऱ्या पद्धतीने समजावतात ते कसे, पाहा !)कारण, सर्व जीव हे जन्मापूर्वी निराकार होते, मग जन्मल्यानंतर त्यांना आकार प्राप्त झाला,
165-2
तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आने नव्हती । देखें पूर्व स्थितीच येती । आपुलिये ॥165॥
(मृत्यूनंतर) हे नाश होऊन जेथे कोठे जातात, तेथे ते निःसंशय वेगळे नसतात, तर ते आपल्या मूळ (निराकार, अव्यक्त) अवस्थेला प्राप्त होतात.

166-2
येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें । तैसा आकारु हा मायावशें । सत्स्वरूपीं ॥166॥
आता मध्यंतरी (म्हणजे जन्म-मृत्यू या दोन अवस्थांच्या मधे जो व्यक्त प्रत्यक्ष धारण केलेला आकार, मूर्त शरीर) दिसतो, तो झोपेतल्या स्वप्नसारखेच होय. त्याप्रमाणे सत्स्वरूपाच्या (निराकार रूपाच्या) ठिकाणी मायेमुळे हा देहाचा आकार दिसतो.
167-2
ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार । का परापेक्षा अळकांर- । व्यक्ति कनकीं ॥167॥
(वाऱ्यामुळे ज्याप्रमाने) वाऱ्याच्या स्पर्शाने पाण्यावर लाटा तयार होतात, किंवा सोनाऱ्याच्या स्पर्शाने सोन्याला दागिन्यांचा आकार येतो.
168-2
तैसें सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित । जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटल ॥168॥
ज्याप्रमाणे आकाशात ढगांचे आवरण तयार होते, त्याप्रमाणे विश्वातील सर्व मूर्त पदार्थ मायेमुळे आकाराला आलेले आहेत, असें समज.
169-2
तैसें आदीचि जें नाही । तयालागीं तूं रुदसि कायी । तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥169॥
जे मुळात उत्पन्नच होत नाही, त्याबद्दल तू का दुःखाने रडत बसला आहेस? त्यापेक्षा निर्विकार, नित्य असे जे ब्रम्ह चैतन्य आहे, त्याकडे तू पूर्ण लक्ष दे.
170-2
जयाचि आर्तीचि भोगित । विषयी त्यजिले संत । जयालागीं विरक्त । वनवासिये ॥170॥
ज्या विश्व चैत्यन्याच्या प्राप्तीची (प्रत्येक्ष अनुभव घेण्यासाठी)तळमळ संतांच्या ठिकाणी उत्पन्न होताच, त्या संतांना विषय सोडून जातात. जे विरक्त आहेत, ते त्या आत्म्याचा लाभाकरिता वनवास स्वीकारतात.

171-2
दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें । मुनीश्वर तयातें आचरताती ॥171
त्याच्यावर (ब्रम्हचैतण्याकडे) दृष्टी एकाग्र करून श्रेष्ठ मुनि-महात्मे ब्रम्हचर्यादि व्रतांचे आणि तापाचे आचरण करतात.
आश्चर्यवत् पश्चति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवत् चैनमन्यः शृणोति । शृत्वाऽप्येनं वेद न चैव कश्चित् ॥2.29॥
भावार्थ :- कोणी एखादा या आत्म्याला अदभुत समजतो, तर दुसरा कोणी आश्चर्यकारक आहे, असे वर्णन करतो.(म्हणजे देहाला विसरतो). तर कोणी त्याचे अलौकिक गुणगान ऐकतो.पण याप्रमाणे पाहून, वर्णन करून, ऐकुनहि (यापैकी) कोणी जाणत नाही.
172-2
एक अंतरी निश्चळ । जें निहाळितां केवळ । विसरले सकळ । संसारजात ॥172॥
कित्येक जण तर (आत्म्याचा) विचार करत करत अंतःकरण शांत करतात आणि संसार विसरून जातात.
173-2
एकां गुणानुवादु करितां । उपरती होऊनि चिता । निरवधि तल्लीनता । निरंतर ॥173॥
कित्येकांना तर त्याचे (परब्रम्हाचे) वर्णन करता करता चित्तात वैराग्य उत्पन्न होवून, अमर्याद व अखंड तन्मयता पावतात.(चित्तात दीर्घकाळ तल्लीनता प्राप्त होणे)
174-2
एक ऐकतांचि निवाले । ते देहभावीं सांडले । एक अनुभवें पातले । तद्रुपता ॥174॥
कित्येक साधक तर त्या ब्रम्हचैतन्याचे स्वरूपाचे वर्णन ऐकूनच शांत होतात. (देहाचे भान) देहभाव संपून जातो. ते अनुभवाने तद्रुपता प्राप्त करतात.(त्याच ठिकाणी एकरूप तेचा अनुभव)
175-2
जैसा सरिता ओघ समस्त । समुद्रामाजिं मिळत । परी माघौते न समात । परतले नाहीं ॥175॥
ज्या प्रमाणे सर्व नद्यांचे ओघ समुद्रास मिळतात; परंतु समुद्रात पाणी मावत नाही म्हणून, नदीचे पाणी परत (माघारी) फिरले नाही.
(म्हणजे, या ओवी मध्ये समुद्र हा परमात्मा आहे आणि नदी आत्मा) एकरूप झाल्यावर येणारा अनुभव.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *