सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

101-18
देहाचिया गांवा अलिया । जन्ममृत्यूचिया सोहळिया । ना म्हणों नये धनंजया । जियापरी ॥101॥
अर्जुना, देहरूप गांवास आल्यावर जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही, ॥101॥
102-18
का ललाटींचें लिहिलें । न मोडे गा कांहीं केलें । काळेगोरेपण धुतलें । फिटों नेणे ॥102॥

किंवा नशिबात लिहिलेली काही टळत नाही, अथवा काळेपण व गोरेपण कितीही धुतले तरी नाहीसे होत नाही. ॥102॥
103-18
केलें काम्य कर्म तैसें । फळ भोगावया धरणें बैसे । न फेडितां ऋण जैसें । वोसंडीना ॥103॥
तसे काम्यकर्मे केले असता, ऋण फेडल्या वाचून ज्याप्रमाणे सुटका होत नाही, त्याप्रमाणे ते फळ भोगाविण्याकरिता दारात धरणे घेऊन बसते! ॥103॥
104-18
कां कामनाही न करितां । अवसांत घडे पंडुसुता । तरी वायकांडें न झुंजतां । लागे जैसें ॥104॥
अथवा अर्जुना इच्छा न करिता काम्यकर्म अकस्मात घडले तरी, केवळ करमणुकीकरिता वाय बाणांनी युद्ध करीत असता तो मर्मस्थली लागला तर जसा जीव घेण्यास कमी करत नाही, ॥104॥
105-18
गूळ नेणतां तोंडीं । घातला देचि गोडी । आगी मानूनि राखोंडी । चेपिला पोळी ॥105॥
गुळ न समजून जरी तोंडात घातला तरी तो गोडच लागतो किंवा अग्नीस राखोंडी समजून जरी त्यावर पाय दिला तरी तो भाजतोच. ॥105॥

106-18
काम्यकर्मी हें एक । सामर्थ्य आथी स्वाभाविक । म्हणौनि नको कौतुक । मुमुक्षु एथ ॥106॥
त्याप्रमाणे, काम्यकर्माचे ठिकाणी फळ भोगविण्याचे स्वाभाविक सामर्थ्य आहे, म्हणून मुमुक्षूने कौतुकानेही त्याचे आचरण करू नये. ॥106॥
107-18
किंबहुना पार्था ऐसें । जें काम्य कर्म गा असे । तें त्यजिजे विष जैसें । वोकूनियां ॥107॥
किंबहुना बा पार्था, असे जे काम्यकर्म आहे ते, विष पोटात गेले म्हणजे ओकुन टाकतात, तसे टाकून द्यावे ॥107॥
108-18
मग तया त्यागातें जगीं । संन्यासु ऐसया भंगीं । बोलिजे अंतरंगीं । सर्वद्रष्टा ॥108॥
मग ज्याच त्याला जगात संन्यास असे म्हणतात, असे सर्वांतर साक्षी भगवान श्रीकृष्ण बोलिले ॥108॥
109-18
हें काम्य कर्म सांडणें । तें कामनेतेंचि उपडणें । द्रव्यत्यागें दवडणें । भय जैसें ॥109॥
मग म्हणतात:- ज्याप्रमाणे आपल्या जवळील द्रव्ये टाकून दिली म्हणजे त्यापासून उत्पन्न होणारे भय नाहीसे होते, त्याप्रमाणे ह्या काम्यकर्मांचा त्याग करणे म्हणजे मनातील वासना समूळ नाहीतशा करणे होय ॥109॥
110-18
आणि सोमसूर्यग्रहणें । येऊनि करविती पार्वणें । का मातापितरमरणें । अंकित जे दिवस ॥110॥
आणि चंद्रग्रहण ह्या पर्वणीच्या दिवशी किंवा माता पितरांच्या श्राद्ध तिथीस, ॥110॥

111-18
अथवा अतिथी हन पावे । हें ऐसैसें पडे जैं करावें । तैं तें कर्म जाणावें । नौमित्तिक गा ॥111॥
अथवा काकबळी टाकण्याचे समयास अतिथी प्राप्त झाला असता, जी जी कर्मे करावी लागतात ति नैमित्तिक कर्मे होतं ॥111॥
112-18
वार्षिया क्षोमे गगन । वसंतें दुणावे वन । देहा श्रृंगारी यौवन- । दशा जैसी ॥112॥
वर्षाकाळी जसे आकाश भरून येवून मेघांची गर्जना होते, वसंत ऋतूच्या योगाने वनास पालवी फुटून दुप्पट शोभा येते, अथवा शरीराला यौवनदशा शोभा आणते. ॥112॥
113-18
का सोमकांतु सोमें पघळें । सूर्यें फांकती कमळें । एथ असे तेंचि पाल्हाळे । आन नये ॥113॥
किंवा सोमकांत मणी चंद्राच्या किरणांनी द्रवतो व सूर्याचे किरणांनी सुर्यविकाशिनी कमळे प्रफुल्लीत होतात; या ठिकाणी, जे मुळचे असते तेच वाढते, निराळे काही उत्त्पन्न होत नाही. ॥113॥
114-18
तैसें नित्य जें का कर्म । तेंचि निमित्ताचे लाहे नियम । एथ उंचावे तेणें नाम । नैमित्तिक होय ॥114॥
त्याच प्रमाणे जे नित्य कर्म आहे, त्यालाच निमिताचे नियम लागले कि, नैमित्तिक हे मोठे नांव त्याला प्राप्त होते. ॥114॥
115-18
आणि सायंप्रातर्मध्यान्हीं । जें कां करणीय प्रतिदिनीं । परी दृष्टि जैसी लोचनीं । अधिक नोहे ॥115॥
आणि दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळी जे कर्म करावे लागतात; परंतु ज्या डोळ्यातील दृष्टी अधिक होत नाही. ॥115॥

116-18
कां नापादितां गती । चरणीं जैसी आथी । नातरी ते दीप्ती । दीपबिंबीं ॥116॥
अथवा गतीचा स्वीकार ती जशी पायांत आपोआपच आहे; किंवा दिव्याचे ठिकाणीच जसे त्याचे सहज तेज आहे, ॥116॥
117-18
वासु नेदितां जैसे । चंदनीं सौरभ्य असे । अधिकाराचे तैसें । रूपचि जें ॥117॥
चंदनास वरून वास लावल्या शिवाय जसा अंगाचा सुगंध असतो तसे अधिकाराचे लक्षण होय. ॥117॥
118-18
नित्य कर्म ऐसें जनीं । पार्था बोलिजे तें मानीं । एवं नित्य नैमित्तिक दोन्हीं । दाविलीं तुज ॥118॥
त्या कर्मास पार्था, जगात नित्य कर्म म्हणतात, असे समज. या प्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक हि दोन्ही कर्मे दाखविली. ॥118॥
119-18
हेंचि नित्य नैमित्तिक । अनुष्ठेय आवश्यक । म्हणौनि म्हणों पाहती एक । वांझ ययातें ॥119॥
हेच नित्यनैमित्तिक कर्म अवश्य केले पाहिजे. म्हणून काही लोक या कर्मास निष्फळ कर्म असे म्हणू पाहतात. ॥119॥
120-18
परी भोजनीं जैसें होये । तृप्ति लाहे भूक जाये । तैसे नित्यनैमित्तिकीं आहे । सर्वांगीं फळ ॥120॥
परंतु, भोजनापासून जशी तृप्ती प्राप्त होवून क्षुधा नष्ट होते, तशी या नित्यनैमित्तिक कर्मापासून सर्व प्रकारे फळ प्राप्ती होते. ॥120॥

121-18
कीड आगिठां पडे । तरी मळु तुटे वानी चढे । यया कर्मा तया सांगडें । फळ जाणावें ॥121॥
ज्या प्रमाणे हिणकस सोने अग्नीत घातल्यावर त्याचा हिणकसपणा जाऊन त्याचा कस वाढतो, त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मापासून फळ प्राप्ती होते. (चित्त शुद्धी होते) ॥121॥
122-18
जे प्रत्यवाय तंव गळे । स्वाधिकार बहुवें उजळे । तेथ हातोफळिया मिळे । सद्गतीसी ॥122॥
कारण, या कर्माच्या आचरणाने दोष नाहीतसे होवून आपला अधिकार जास्त वाढतो आणि असे झाल्यावर हातोहात सद्गती प्राप्त होते. ॥122॥
123-18
येवढेवरी ढिसाळ । नित्यनैमित्तिकीं आहे फळ । परी तें त्यजिजे मूळ । नक्षत्रीं जैसें ॥123॥
नित्यनैमित्तिक कर्मापासून जरी एव्हढी मोठी फळ प्राप्ती होते, तरी मूळ नक्षत्रावर उपजलेल्या मुलांप्रमाणे, त्याच्या फळाचा त्याग करावा. ॥123॥
124-18
लता पिके आघवी । तंव च्यूत बांधे पालवीं । मग हात न लावित माधवीं । सोडूनि घाली ॥124॥
वसंत ऋतूच्या योगाने जरी सर्व वेल वाढले व आम्रवृक्षास पालवी फुटली, तरी जसा तो त्यास हात न लाविता टाकून जातो. ॥124॥
125-18
तैसी नोलांडितां कर्मरेखा । चित्त दीजे नित्यनैमित्तिका । पाठीं फळा कीजे अशेखा । वांताचे वानी ॥125॥

तसे नित्यनैमित्तिक कर्मांचे चित्त देवून यथाविधी आचरण कारावे; पण त्यापासून निष्पन्न होण्याऱ्या सर्व फलांचा वाती प्रमाणे त्याग करवा. ॥125॥

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading