सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७०१ ते ७२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

701-18
येतुलेनि तें कर्म । सांडी जन्मभय विषम । करूनि दे उगम । मोक्षसिद्धि ॥701॥
अशा युक्तीने नित्य कर्म केले असता ते दुस्तर अशा जन्म भयापासून सोडविते आणि मोक्षप्राप्ती सुलभ करून देते. 701
702-18
ऐसें करी तो भला । संसारभयें सांडिला । करणीयत्वें आला । मुमुक्षुभागा ॥702॥
अशा रीतीने जो सुज्ञ पुरुष कर्म करतो, तो संसार भयापासून मुक्त होतो वया आचरणाने मुमुक्षत्वाच्या पायरीला येऊन पोहोचतो.(मोक्षमार्गास लागतो) 702
703-18
तेथ जे बुद्धि ऐसा । बळिया बांधे भरंवसा । मोक्षु ठेविला ऐसा । जोडेल येथ ॥703॥
या नित्यकर्म वर भरवसा ठेवून ती बुद्धी त्याच्या आचरणात विषयी निश्चय करते, तेथे मोक्षप्राप्ती ठेवलेली आहे, 703
704-18
म्हणौनि निवृत्तीची मांडिली । सूनि प्रवृत्तितळीं । इये कर्मीं बुडकुळी । द्यावीं कीं ना? ॥704॥
म्हणून ज्याची निवृत्तीचे पायावर प्रवृत्तीची उभारणी आहे अशा या कर्मांत बुडी कां न मारावी? 704
705-18
तृषार्ता उदकें जिणें । कां पुरीं पडलिया पोहणें । अंधकूपीं गति किरणें । सूर्याचेनि ॥705॥
तहानलेल्या मनुष्यास पाणी असल्यावर, पुरात पडलेल्यास पोहता येत असतांना, अंधकारात सूर्याच्या प्रकाशाचे साह्य असल्यावर, 705

706-18
नाना पथ्येंसीं औषध लाहे । तरी रोगें दाटलाही जिये । का मीना जिव्हाळा होये । जळाचा जरी ॥706॥
अथवा पथ्यासह औषध घेतली असता जसा रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य वाचतो, किंवा माशाला जर पाण्याचा आश्रय असला, 706
707-18
तरी तयाच्या जीविता । नाहीं जेवीं अन्यथा । तैसें कर्मीं इये वर्ततां । जोडेचि मोक्षु ॥707॥
तर त्याच्या जिवासी असे भय नाही, तसे ह्या नित्य कर्माचे आज केले असता मोक्षप्राप्ती होतेच होते, 707
718-18
हें करणीयाचिया कडे । जें ज्ञान आथी चोखडें । आणि अकरणीय हें फुडें । ऐसें जाण ॥708॥
हे नित्यकर्म करण्याकडे ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते, आणि हे बघ, खरोखरच योग्य नव्हतं, 708
709-18
जीं तिथें काम्यादिकें । संसारभयदायकें । अकृत्यपणाचें आंबुखें । पडिलें जयां ॥709॥
अशी जी काम्यादिक कर्मे, जी संसारभय उत्पन्न करतात व ज्यांच्यावर निषिद्ध पणाचा शिक्का आहे, 709
710-18
तिये कर्मीं अकार्यीं । जन्ममरणसमयीं । प्रवृत्ति पळवी पायीं । मागिलींचि ॥710॥
त्या अनाचारणीय व जन्ममरणदायक अशा वाईट कर्मांपासून जो आपली प्रवृत्ती मागल्या पायीच पळवितो; 710

711-18
पैं आगीमाजीं न रिघवे । अथावीं न घालवे । धगधगीत नागवे । शूळ जेवीं ॥711॥
अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, खोल पाण्यात जशी उडी घालवत नाही, व तापून लाल झालेला सूळ जसा हातात धरवत नाही, 711
712-18
कां काळियानाग धुंधुवातु । देखोनि न घालवे हातु । न वचवे खोपेआंतु । वाघाचिये ॥712॥
अथवा फुसकारे टाकीत असलेला काळा नाग दिसत असला म्हणजे त्यास हात घालवत नाही व ज्याप्रमाणे वाघाच्या जाळीत कोणी जाऊ शकत नाही, 712
713-18
तैसें कर्म अकरणीय । देखोनि महाभय । उपजे निःसंदेह । बुद्धी जिये ॥713॥
त्याप्रमाणे निषिद्ध कर्म पाहूनच ज्या बुद्धीत निश्चयकरून भय उत्पन्न होते, 713
714-18
वाढिलें रांधूनि विखें । तेथें जाणिजे मृत्यु न चुके । तेवीं निषेधीं कां देखे । बंधातें जे ॥714॥
विष घालून तयार केलेले अन्न खाल्ले असता मरण चूकता नाही, असे निषिद्ध कर्मांचे आचरण केले असता जन्ममृत्यू चुकत नाही. 714
715-18
मग बंधभयभरितीं । तियें निषिद्धीं प्राप्ती । विनियोगु जाणे निवृत्ती । कर्माचिये ॥715॥
मग निषिद्ध कर्मांचे आचरण केले असता जन्म मृत्यूचे भय प्राप्त होते असे समजून जी बुद्धी त्याचा त्याग करते; 715

716-18
ऐसेनि कार्याकार्यविवेकी । जे प्रवृत्ति निवृत्ति मापकी । खरा कुडा पारखी । जियापरी ॥716॥
रत्नपारखी खऱ्याखोट्याचा निर्णय करितो, तसा कार्य व अकार्य यांच्याविषयी प्रवृत्तीनिवृत्ती रुप मापाने जी निर्णय करिते; 716
717-18
तैसी कृत्याकृत्यशुद्धी । बुझे जे निरवधी । सात्विक म्हणिपे बुद्धी । तेचि तूं जाण ॥717॥
तसेच, ज्या बुद्धीला चांगले व वाईट हे स्पष्ट समजते, ती सात्त्विक बुद्धी होय असे समज. 717
यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च ।
अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ॥18.31॥

718-18
आणि बकाच्या गांवीं । घेपे क्षीरनीर सकलवी । कां अहोरात्रींची गोंवी । आंधळें नेणे ॥718॥
आणि बगळ्यांच्या गावात जसे दूध व पाणी एकत्र घेतले जाते; किंवा आंधळा ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांच्यामधील भेद जाणत नाही; 718
719-18
जया फुलाचा मकरंदु फावे । तो काष्ठें कोरूं धांवे । परी भ्रमरपणा नव्हे । अव्हांटा जेवीं ॥719॥
ज्या भ्रमराला अतिशय कोमल अशा फुलांचा मकरंद सेवन करता येतो; तोच लाकूडही करण्यास प्रवृत्त होतो; परंतु याचा भ्रमर पणा काही नष्ट होत नाही, 719
720-18
तैसीं इयें कार्याकार्यें । धर्माधर्मरूपें जियें । तियें न चोजवितां जाये । जाणती जे कां ॥720॥
त्याप्रमाणे धर्म-अधर्म रूपाने असणारी जी कार्याकार्ये, त्यांची निवड न करिता जी बुद्धि त्यांचे आचरण करीते, 720

721-18
अगा डोळांवीण मोतियें । घेतां पाडु मिळे विपायें । न मिळणें तें आहे । ठेविलें तेथें ॥721॥
अरे, परीक्षेशिवाय मोती घेतला असता किंचित चांगली मिळतीलच असा नेम नाही; पण चांगली मिळणार नाहीत ही गोष्ट मात्र निश्चित आहे; 721
722-18
तैसें अकरणीय अवचटें । नोडवे तरीच लोटे । येऱ्हवीं जाणें एकवटें । दोन्ही जे कां ॥722॥
तसे निषिद्ध कर्म सहाजिकपणे प्राप्त न झाले तरच रहाते, एरवी जेथे चांगले व वाईट ही दोन्ही कर्मे सरसकटच मानले जातात; 722
723-18
ते गा बुद्धि चोखविषीं । जाण येथ राजसी । अक्षत टाकिली जैसी । मांदियेवरी ॥723॥
जसे सर्व समाजात योग्य व अयोग्य यांचा विचार न करता आमंत्रण द्यावे, तसे चांगल्या व वाईट कर्माविषयी जी अंध बुद्धी ती राजस बुद्धी होय. 723
अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता ।
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥18.32॥
724-18
आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडव होये । कां राक्षसां दिवो पाहे । राती होऊनि ॥724॥
आणि राजा ज्या मार्गांनी जातो, ते चोरास जसे आडमार्ग होत, (राजमार्ग जसे चोरांच्या उपयोगी नाहीत,) तेव्हा राक्षसाला रात्री जसे उजाडते; 724
725-18
नाना निधानचि निदैवा । होये कोळसयाचा उडवा । पैं असतें आपणपें जीवा । नाहीं जालें ॥725॥
अथवा धनाचा ठेवा असून भाग्यहीनाला जशी ती कोळशांची रास दिसते; म्हणून धन जवळ असतांना त्याला नाही सारखे होते, 725

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading