सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७५१ ते १७७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1751-18
ऐसें श्रीनिवृत्तिनाथाचें । गौरव आहे जी साचें । ग्रंथु नोहे हें कृपेचें । वैभव तिये ॥1751॥
असा श्रीगुरुनिवृत्तिनाथांचा महिमा आहे; हा माझा ग्रंथ नसून हे त्यांच्या कृपेचेच केवळ ऐश्वर्य होय. 51
1752-18
क्षीरसिंधु परिसरीं । शक्तीच्या कर्णकुहरीं । नेणों कैं श्रीत्रिपुरारीं । सांगितलें जें ॥1752॥
क्षीरसिंधूच्या सन्निध, देवी पार्वतीच्या कानांत त्रिपुरारि श्रीशंकरांनीं जे ज्ञान केव्हां सांगितलें तें नकळे. 52
1753-18
तें क्षीरकल्लोळाआंतु । मकरोदरीं गुप्तु । होता तयाचा हातु । पैठें जालें ॥1753॥
पण, तें ज्ञान, क्षीरसागराच्या लाटांमध्ये माशाच्या पोटांत गुप्त असलेलें (भगवान् विष्णु) (श्रीमत्स्येंद्रनाथ) यांना प्राप्त झाले. 53
1754-18
तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं । भग्नावयवा चौरंगी । भेटला कीं तो सर्वांगीं । संपूर्ण जाला ॥1754॥
ते मत्स्येंद्रनाथ सप्तशृंगीपर्वतावर संचार करीत गेले असता त्यांच्या दर्शनाने तेथे असलेला अवयव तुटलेल चौरंगीनाथ हा एकदम सर्वावयवपूर्ण झाला. 54
1755-18
मग समाधि अव्युत्थया । भोगावी वासना यया । ते मुद्रा श्रीगोरक्षराया । दिधली मीनीं ॥1755॥
मग स्वतःप्रमाणे अव्युत्थित (अखंड) समाधि भोगतां यावी म्हणून ती ज्ञानमुद्रा मत्स्येंद्रनाथांनीं गोरक्षनाथांस दिली. 55

1756-18
तेणें योगाब्जिनीसरोवरु । विषयविध्वंसैकवीरु । तिये पदीं कां सर्वेश्वरु । अभिषेकिला ॥1756॥
त्या मुद्रादानाने, मत्स्येंद्रनाथांनी, योगरूपी कमलिनींचे सरोवर व विषयविध्वंस करणारा महाशूर, अशा जणु सर्वेश्वरालाच त्या योगमुद्राऐश्वर्यपदावर स्थापून अभिषेक केला. 56
1757-18
मग तिहीं तें शांभव । अद्वयानंदवैभव । संपादिलें सप्रभव । श्रीगहिनीनाथा ॥1757॥
मग त्या गोरक्षनाथांनीं श्रीशंकरापासून परंपरेनें प्राप्त झालेल्या अद्वयानंदैश्वर्याचा सामर्थ्यासहवर्तमान श्रीगहिनीनाथांवर कृपा प्रसाद केला. 57
1758-18
तेणें कळिकळितु भूतां । आला देखोनि निरुता । ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा । दिधली ऐसी ॥1758॥
ते गहिनीनाथ कलिकाल पीडित जीवांकडे पाहून, श्रीनिवृत्तिनाथांपाशीं येऊन त्यांना अशी आज्ञा करिते झाले,58
1759-18
ना आदिगुरु शंकरा- । लागोनि शिष्यपरंपरा । बोधाचा हा संसरा । जाला जो आमुतें ॥1759॥
की आदिगुरु श्रीशंकरांपासून अशाप्रकारच्या गुरुशिष्यपरंपरेने बोधाचा जो उपदेश आमच्यापर्यंत आला आहे. 59
1760-18
तो हा तूं घेऊनि आघवा । कळीं गिळितयां जीवां । सर्व प्रकारीं धांवा । करीं पां वेगीं ॥1760॥
त्या सर्वांचे ग्रहण करून कलिपीडित जे जीव असतील त्यांच्या उद्धारार्थं सत्वर धावून जा. 60

1761-18
आधींच तंव तो कृपाळु । वरी गुरुआज्ञेचा बोलू । जाला जैसा वर्षाकाळू । खवळणें मेघां ॥1761॥
श्रीनिवृत्तिनाथ स्वभावानेच कृपाळू होते, त्यांत अशी गुर्वाज्ञा झाल्यावर, तो कृपाळू स्वभाव वर्षाकाळच्या मेघांप्रमाणे जागृत होऊन जीवांवर कृपावर्षाव करू लागला.1761
1762-18
मग आर्ताचेनि वोरसें । गीतार्थग्रंथनमिसें । वर्षला शांतरसें । तो हा ग्रंथु ॥1762॥
मग आर्तजनांचा कळवळा येऊन, श्रीनिवृत्तिनाथांच्या कृपेनें, गीतार्थग्रंथाच्या मिषानें जीवांवर जो कल्याणार्थ शांत रसाचा वर्षाव केला, तोच हा ज्ञानेश्वरी ग्रंथ होय. 1762
1763-18
तेथ पुढां मी बापिया । मांडला आर्ती आपुलिया । कीं यासाठीं येवढिया । आणिलों यशा ॥1763॥
श्रीगुरूच्या कृपा मेघापुढे मी आपल्या चातकासारखा अनन्य होतोंच, व त्या माझ्या अनन्यतेमुळेच गुरुप्रसादाने मला एवढे ग्रंथ यश प्राप्त झाले.
1764-18
एवं गुरुक्रमें लाधलें । समाधिधन जें आपुलें । तें ग्रंथें बोधौनि दिधलें । गोसावी मज ॥1764॥
असे गुरुपरंपरेनें प्राप्त झालेले आपलें जें समाधिधन (नीजधन) ते श्रीगुरूनी ग्रंथरूप रचना करून माझ्या स्वाधीन केले.64
1765-18
वांचूनि पढे ना वाची । ना सेवाही जाणें स्वामीची । ऐशिया मज ग्रंथाची । योग्यता कें असे? ॥1765॥
एऱ्हवी, न पढलेला, न बहुश्रुत, किंवा स्वामीसेवेचेही ज्ञान नसलेल्या माझ्यासारख्याला ह्या ग्रंथरचनेची योग्यता कोठून असणार?

1766-18
परी साचचि गुरुनाथें । निमित्त करूनि मातें । प्रबंधव्याजें जगातें । रक्षिलें जाणा ॥1766॥
परंतु, माझ्या श्रीगुरूनी मला निमित्त करून गीताप्रबंधाच्या योगाने सर्व जगाचे रक्षण केलें हेंच खरें 66
1767-18
तऱ्ही पुरोहितगुणें । मी बोलिलों पुरें उणें । तें तुम्हीं माउलीपणें । उपसाहिजो जी ॥1767॥
तरी पुरोहिताच्या नात्याने मी जें कांहीं न्यूनाधिक बोललों असेन, तें आपण मातेसमान संतसज्जनांनीं मानून घ्यावें अशी प्रार्थना आहे. 67
1768-18
शब्द कैसा घडिजे । प्रमेयीं कैसें पां चढिजें । अळंकारु म्हणिजे । काय तें नेणें ॥1768॥
शब्दरचना कशी करावी, प्रमेय कसें व्यक्त वा सिद्ध करावें, किंवा भाषालंकार कशाला म्हणतात हे मला स्वतःला कांहीं ज्ञान नाहीं !68
1769-18
सायिखडेयाचें बाहुलें । चालवित्या सूत्राचेनि चाले । तैसा मातें दावीत बोले । स्वामी तो माझा ॥1769॥
परंतु, कळसूत्री बाहुलें जसे सूत्रधार हलवील तसें हलते, त्याप्रमाणे माझ्या स्वामींनीं मला जशी स्फूर्ती दिली तसें मी बोललों.1769
1770-18
यालागीं मी गुणदोष- । विषीं क्षमाविना विशेष । जे मी संजात ग्रंथलों देख । आचार्यें कीं ॥1770॥
यास्तव, ग्रंथाच्या गुणदोषाविषयीं मी फारसे माफी, क्षमा मागणें करीत नाही; कारण मी ” आचार्यं संजात” म्हणजे श्रीगुरुनीं प्रकट केलेल्या अर्थाचे नुसतें ग्रथन (गुंफणें) केले आहे.1770

1771-18
आणि तुम्हां संतांचिये सभे । जें उणीवेंसी ठाके उभें । तें पूर्ण नोहे तरी तैं लोभें । तुम्हांसीचि कोपें ॥1771॥
शिवाय, आपणासारख्या संतसभेमध्ये जर आश्रय करणारा जो मी, त्याच्या ठिकाणीं कांहीं उणेपणा राहिला तर मी लडिवाळपणे तुमच्यावर व रुसेन. 71
1772-18
सिवतलियाही परीसें । लोहत्वाचिये अवदसे । न मुकिजे आयसें । तैं कवणा बोलु । ॥1772॥
परिसाचा स्पर्श झाल्यावरही जर लोखंडाचा लोहत्वाचा विटाळ फिटला नाही तर तो दोष कोणाचा? (अर्थात् परिसाचाच) 72
1773-18
वोहळें हेंचि करावें । जे गंगेचें आंग ठाकावें । मगही गंगा जरी नोहावें । तैं तो काय करी? ॥1773॥
ओहोळावर इतकीच जबाबदारी आहे की त्याने वाटेल त्या मार्गाने गंगा गांठावी; इतकें करूनही तो गंगात्व न पावेल तर त्याचा तो दोष नव्हेच. 73
1774-18
म्हणौनि भाग्ययोगें बहुवें । तुम्हां संतांचें मी पाये । पातलों आतां कें लाहे । उणें जगीं । ॥1774॥
म्हणून, परम पुण्याईने, तुम्हां संतांच्या चरणांपाशीं मी प्राप्त झालों आहे. आतां मला या जगात काय कमी असणार?74
1775-18
अहो जी माझेनि स्वामी । मज संत जोडुनि तुम्हीं । दिधलेति तेणें सर्वकामीं । परीपूर्ण जालों ॥1775॥
अहो, माझ्या गुरुमाउलीने मला आपणा संत चरणांची जोड करून दिली आहे, त्यायोगे माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या आहेत. 75

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *