326-2
जैसें जात्यंधा पळणी पावे । मग ते काकुळती सैरा धांवे । तैसे बुद्धीसि होती भवें । धनुर्धरा ॥326॥
जसे जन्मांधाला कांही कारणामुळे पळण्याची वेळ आली की तो अगतिकपणे (गोंधळुन जातो) दीन होऊन सैरावैरा (दिशाहीन)धावू लागतो.त्याप्रमाणे अर्जुना बुद्धिला भ्रांती होते.
327-2
ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे । तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात ॥327॥
अशा प्रकारे स्मृतिभ्रंश झाल्यामुळे बुद्धी सर्व बाजुंनी (घोटाळ्यात पडते, कुचंबणा होते) चक्रात सापडते. त्यामुळे सर्व ज्ञान मुळासह नाहीसे होते.
328-2
चैतन्याचां भ्रंशी । शरीरा दशा जैशी । पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखें ॥328॥
शरीरातील प्राण निघून गेला म्हणजे देहाची शरीराची जशी दशा होते. तशीच स्थिती बुद्धी नष्ट झाल्यावर त्या जिवाची होते.
329-2
म्हणोनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना । मग प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके ॥329॥
म्हणून अर्जुना ! ऐक. जळणाला (ज्वलनशील पदार्थाला) एखादी लहान ठिनगी (मनात एखादा दुष्ट विचार, अविचार,) जर लाकडाला लागली व ती एकदा का भडकली (मोठा अग्नी प्रज्वलित होतो) मग तीच लहान ठिनगी त्रिभुवनाला देखील जाळण्यास समर्थ होते.
330-2
तैसें विषयांचे ध्यान । जरी विपायें वाहे मन । तरी येसणे हें पतन । गिंवसीत पावे ॥330॥
त्याच प्रमाणे मनाकडून नकळत देखील विषयांचे स्मरण, चिंतन अंतःकरणात (चुकून यत्किंचितही जरी झाले,) तरी एवढा (अनर्थ,) पतन त्यास शोधित येतें.
331-2
रागद्वेषवियुकतैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति॥2.64॥
भावार्थ :- ज्या पुरुषाने आपले अंतःकरण ताब्यात ठेवले आहे, जो प्रीति व द्वेष रहित आहे, त्याने (त्याने म्हणजे कोण? आपल्या वश असलेल्या इंद्रियांनी असा तो) विषयाचा उपभोग घेतला असता अशा पुरुषास अंतःकरणाची (मनाची) प्रसन्नता अखंड राहते.
म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे । मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥331॥
म्हणून (साधकाने) हे सर्व विषय मनातून काढून टाकावे. (अर्थातच विषयातील अनित्यत्व, जडत्व, मिथ्यात्वादि दोषदर्शनाने त्यापासून परावृत्त व्हावे.) म्हणजे राग, प्रिती, आणि द्वेष हे आपोआपच नाहीसे होतील.
332-2
पार्था आणिकही एक । जरी नाशिले रागद्वेष । तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाही ॥332॥
पार्था ! आणखी एक गोष्ट ऐक. राग आणि द्वेष नाहिसे झाल्यावर, जरी इंद्रिये विषयाचे ठिकाणी कदाचित रममाण झाली तरी ते विषय साधकाला बाधक होत नाही.
333-2
जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरीं जगातें स्पर्शतु । तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिंचेनि ॥333॥
ज्याप्रमाणे सूर्य हा आपल्या किरणरूपी हातांनी सार्या जगाला स्पर्श करतो, परंतु त्यांच्या संगदोषाने सूर्य लिप्त होतो काय? (तर नाही)
334-2
तैसा इंद्रियार्थी उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न । जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥334॥
त्याप्रमाणे जो (ज्ञानी) विविध विषयांचे ठिकाणी उदासीन, अनासक्त असतो, आत्मनंदात रंगून गेलेला असतो, कामक्रोधा पासून अलिप्त असतो,
335-2
तरी विषयांतुही कांही । आपणपेवाचुनि नाहीं । मग विषय कवण कायी । बाधीतील कवणा ॥335॥
आणि ज्याला सर्व विषयामध्ये आपल्या आत्मस्वरूपाहून भिन्न असे दुसरे काही दिसत नाही, मग त्याला विषय कोणते, कोणाला आणि कशी बाधा करतील??
336-2
जरी उदकें उदकीं बुडीजे । कां अग्नि आगी पोळिजे । तरीं विषयसंगे आप्लविजे । परिपूर्ण तो ॥336॥
जसे पाण्यात पाणी बुडाले (बुडत नाही) किंवा अग्नीच्या ज्वालेने अग्नी पोळला गेला, (अग्नित अग्नि जळत नाही). तसेच परिपूर्ण (आत्मज्ञानाने परिपूर्ण) अवस्थेला पावलेला पुरूष विषयांचे संगतीने लिप्त होत नाही.
337-2
ऐसा आपणचि केवळ । होऊनि असे निखळ । तयाचि प्रज्ञा अचळ । निभ्रांत मानीं ॥337॥
असा जो विश्वचैतन्याशी एकरूप होऊन राहतो (शुद्ध आत्मस्वरूप) होऊन राहतो, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे, (स्थिरबुद्धि) असे तू निःसंशय समज.
338-2
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते॥2.65॥
भावार्थ :- चित्त प्रसन्न झाले, म्हणजे सर्व दुःखांचा नाश होतो. चित्त प्रसन्न असणाऱ्या साधकाची बुद्धी प्ररमात्मास्वरूपी लवकर स्थिर होते.
देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथे रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥338॥
असे पहा की, ज्याच्या चित्तात अखंड प्रसन्नता (मनाची निरंतर पूर्ण शांती) भरलेली आहे, तेथे कोणत्याही प्रकारचे संसार सुखदुःखांचा प्रवेश होत नाही.
339-2
जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु । तया क्षुधेतृष्णेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥339॥
अरे ! ज्याच्या उदरात अमृताचा झरा उत्पन्न झाला आहे, त्याला कधीही तहान-भुकेची (कधी पीडा अथवा) भीती नसते.
340-2
तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे । तेथ बुद्धि आपैसी राहे । परमात्मरूपीं ॥340॥
त्याप्रमाणे ज्याचे अंतःकरण परिपूर्ण प्रसन्न झाले आहे, त्याला दुःख कसले, आणि कोणाला होणार? कारण तेथे त्याची बुद्धी आपोआपच परमात्मस्वरूपी स्थिर झालेली असते.
341-2
जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणे कंपु । तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥341॥
ज्याप्रमाणे निवार्यातील दिव्यांची ज्योत मुळीच हालत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त म्हणजे जो स्थिरबुद्धि पुरुष (आत्मस्वरूप समाधीमध्ये) सत्स्वरूपाशी एकरूप होऊन राहिलेला असतो.
342-2
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शांतिरशांतस्य कुतः सुखम्॥2.66॥
भावार्थ :- जो साधना करीत नाही, त्या पुरुषाच्या अंतःकरणात सद्बुद्धी नसते, आस्तिकभाव नसतो. अशा पुरुषाला शांती नसते; त्यामुळे त्याला सुख तरी कोठून मिळणार. (म्हणजेच ज्याला स्थिरतेची इच्छा नाही त्याला शांती लाभणार नाही मग समाधान कसे प्राप्त होईल.)
ये युक्तीचि कडसणी । नाहीं जयाचां अंतःकरणीं । तो आकळिलां जाण गुणीं । विषयादिकीं ॥342॥
योगयुक्त होऊन राहण्याचा (म्हणजे योगबुद्धीचा) विचार ज्याच्या अंतःकरणात नाही, त्याला शब्दादिक विषय आपले पाशाने जखडून टाकतात.
343-2
तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा । आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥343॥
हे अर्जुना ! स्थिरतेची इच्छा ज्याचा अंतःकरणात कधी उत्पन्न होत नाही, त्याची बुद्धी कधी स्थिर नसते. (स्थिरता लाभावी असे त्याची बुद्धी इच्छा सुद्धा करत नाही)
344-2
निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखें मना । तरी शांति केवी अर्जुना । आपु होय ॥344॥
ज्या स्थिरपणाची नुसती भावनाही ज्याच्या मनाला शिवत नाही, तर अर्जुना त्याला शांतीचा लाभ कसा होणार?? (शांतीच लाभणार नाही)
345-2
आणि जेथ शांतिचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं । जैसा पापियाचां ठायीं । मोक्षु न वसे ॥345॥
जसे पापी मनुष्याकडे मोक्ष चुकूनदेखील पाहत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या हृदयामध्ये शांती नाही, तेथे सुख नजर चुकीने सुद्धा (नकळत सुद्धा) प्रवेश करत नाही.
346-2
देखें अग्निमाजी धापती । तियें बीजें जरी विरुढती । तरी अशांत सुखप्राप्ती । घडों शके ॥346॥
असे पहा की ! विस्तवावर घातलेली (भाजलेली, करपलेली) धान्याची बी जर उगवली (नाही उगवणार) तसच हृदयात शांती नसलेल्या मनुष्यास सुखप्राप्ती होऊ शकेल. (तर नाहीच घडणार)
348-2
म्हणोनि अयुक्तपण मनाचे । तेंचि सर्वस्व दुःखाचें । या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥347॥
म्हणूनच मनाचे चंचलत्व (त्यांचे नियमन न करणे) हेच सर्वतोपरी दुःखाचें कारण आहे. ह्या करीता (साधकाने) इंद्रियांचा दृढ निग्रह करणे हे आवश्यक आहे. (करणे हे चांगले आहे)
348-2
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि॥2.67॥
भावार्थ :- कारण जे मन विषयाकडे धाव घेणाऱ्या इंद्रियांच्या मागे धावत राहते, ते मन पाण्यातील नावेला वारा ज्याप्रमाणे भलतीकडे घेऊन जात असतो, त्याप्रमाणे मानवाच्या बुद्धीला वेगळ्याच मार्गाकडे घेऊन जातो.
ये इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती । ते तरलेचि न तरिती । विषयसिंधु ॥348॥
(जे पुरूष) इंद्रियें जे जे म्हणतात तेच ते पुरुष करत असतात. (इंद्रियांच्या इच्छेनुसार वागतात), ते या विषयरूपी सागरातून आपण तरलो आहोत, असें त्यांना वाटते (असे म्हणत असतील) तरी, ते तरले नाहीत, असे समजावे.
349-2
जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता । तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ॥349॥
जर एखादी नाव तीराजवळ आली आणि (त्याच वेळी प्रचंड वादळात सापडली गेली), त्याच वेळी प्रचंड वादळ उत्पन्न झाले, ती ज्या संकटांना चुकवून तीरापर्यंत आली त्याच आपत्तीत (संकटात) पुन्हा सापडते. (तोच अपाय तिला पोचतो)
350-2
तैसी प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें । तरी आक्रमिला देख दुःखे । सांसारिकें ॥350॥
पाहा, आत्मप्राप्ती झालेल्या (पारमार्थिक पुरुषाने)(ज्ञानसंपन्न) पुरूषाने सहजपणे इंद्रियांचे कौतुकाने लाड केले, लाड पुरविले तरी तो पुन्हा संसार दुःखाच्या चक्रात पुन्हा सापडला जातो, असे समज.
तस्माद् यस्य महाबाहो निगृहितानि सर्वशः । इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥2.68॥
भावार्थ :- म्हणून हे महाबाहो, ज्या मानवाची इंद्रिये, इंद्रियांच्या विषयापासून संपूर्णपणे आवरलेली (अलिप्त) असतात, त्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झाली, असे समज.
