सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , ,

301-6
ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये । मारुत ऐसें नाम होये । परि शक्तीपण तें आहे । जंव न मिळे शिवीं ॥301॥
त्या वेळी कुंडलिनी हे नाव राहत नाही, तिला मरुत म्हणजे वायूमय हे नाव प्राप्त होते. जोपर्यँत ती शिवाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत तिचे शक्तीपण असतेच.
302-6
मग जालंधर सांडी । ककारांत फोडी । गगनाचिये पाहाडीं । पैठी होय ॥302॥
मग ती शक्ती जालंधर बंधाचे उल्लंन्घन ककार जाच्या अंती आहे, अशा कृकाटिकेचे तालुस्थानाचा भेद करून मुर्धन्याकाशाच्या पहाडावर प्रवेश करते.
303-6
ते ॐकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी । पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ॥303॥
ती ओंकाराच्या पाठीवर त्वरित पाय देऊन पश्यन्ती वाणीची पायरी मागे टाकते.
304-6
पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाचां अंतरी । भरती गमे सागरीं । सरिता जेवीं ॥304॥
पुढे ज्याप्रमाणे सागरात नद्या मिसळलेल्या दिसतात, त्याप्रमाणे अर्धमात्रपर्यंतच्या ओंकाराच्या मात्रा मुर्धन्य – आकाशात मिळतात.
305-6
मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी । सोहंभावाच्या बाह्या पसरुनी । परमात्मलिंगा धांवोनि । आंगा घडे ॥305॥
मग ती शक्ती ब्रम्हरंधराचे ठिकाणी स्थिर होऊन ते ब्रम्ह मी आहे, या ज्ञानाच्या जणू बाह्या पसरून परब्रम्हरूपी लिंगाला अलिंगन देते, म्हणजे त्याच्याशी एकरूप होते.

306-6
तंव महाभूतांची जवनिका फिटे । मग दोहींसि होय झटें । तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ॥306॥
त्या वेळी पंचमहाभूतामचा पडदा नाहीसा होतो आणि शिवशक्तीचे ऐक्य होते. त्या ऐक्यामध्ये मुर्धन्याकाशात शक्तीचे रूप लोप पावते.
307-6
पैं मेघाचेनि मुखीं निवडिला । समुद्र कां वोघीं पडिला । तो मागुता जैसा आला । आपणपेयां॥307॥
ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघाच्या द्वारे समुद्रापासून वेगळे होऊन नदीच्या पात्रात पडून पुनः नदीच्या रूपाने समुद्रास मिळते,
308-6
तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे । तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ॥308॥
त्याप्रमाणे हे अर्जुना ! शरीराच्या द्वारे जेंव्हा शक्तीरूप त्यागून शिवच शिवात मिळते, ते अकत्वही समुद्राच्या पाण्याप्रमाणे होय.
309-6
आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें । ऐशिये विवंचनपुरतें । उरेचिना ॥309॥
या अवस्थेमध्ये पूर्वी द्वैत होते का मुळातच अद्वैत होते, असा विचार करण्यापूर्वी काही राहत नाही.
310-6
गगनीं गगन लया जाये । ऐसें जे कांहीं आहे । तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ॥310॥
आकाशदेखील ज्या महशून्यामध्ये लय पावते, असे जे काही परमात्मतत्व आहे, तो अनुभवाने जो कोणी होतो, म्हणजे त्या तत्वाशी एकरूप होतो, त्यालाच ही अवस्था प्राप्त होते.

311-6
म्हणोनि तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु । जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे॥311॥
म्हणून ज्या शब्दांनी कोणतीही गोष्ट स्पष्ट करून सांगता येते, त्या शब्दांचे हात तेथील अवस्थेचे वर्णन करण्यापर्यंत पोचत नाहीत. (म्हणजे त्या स्थितीचे वर्णन शब्दात सांगताच येत नाही)
312-6
अर्जुना एऱ्हवीं तरी । इया अभिप्रायाचा गर्वु धरी । ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ॥312॥
अर्जुना ! एरवी तरी “या अलौकिक अवस्थेचे मर्म मी सांगू शकेन” असा अभिमान धरणारी वैखरी वाणी त्या अवस्थेपासून दूरच राहते.
313-6
भ्रूलता मागिलीकडे । तेथ मकाराचेंचि आंग न मांडे । सडेया प्राणा सांकडें । गगना येतां ॥313॥
भिवयांच्या आतल्या बाजूस म्हणजे आज्ञानचक्रात ओंकरातील मकार मात्राचादेखील प्रवेश होत नाही. इतकेच नाही,तर एकट्या प्राणवायूला गगणास येण्याला संकट पडते,
314-6
पाठीं तेथेंचि तो भासळला । तंव शब्दाचा दिवो मावळला । मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ॥314॥
नंतर तो प्राणवायू मुर्धन्य-आकाशात विरून जातो, तेंव्हा शब्दाचा दिवस मावळतो म्हणजे शब्दाचे बोलणे खुंटले जाते. मग त्यांनतर आकाशाचाही लय होतो.
315-6
आतां महाशून्याचिया डोहीं । जेथ गगनसीचि ठावो नाहीं । तेथ तागा लागेल काई । बोलाचा इया ॥315॥
परब्रम्हरूपी डोहात जेथे आकाशाचा थांग लागत नाही, तेथे वर्णन करण्याची नौका पलीकडे नेण्यासाठी या वैखरी वेळूचा लाग लागेल काय??

316-6
म्हणोनि आखरामाजीं सांपडे । कीं कानावरी जोडे । हे तैसें नव्हे फुडें । त्रिशुध्दी गा ॥316॥
म्हणून ही ब्रम्हस्थिती शब्दाने वर्णन करता येईल अथवा कानांनी ऐकता येईल, अशी नाही, हे त्रिवार सत्य आहे.
317-6
जैं कही दैवें । अनुभविलें फावे । तैं आपणचि हें ठाकावें । होऊनिया ॥317॥
जे दैवयोगाने अनुभवास येते, त्या वेळी तो तद्रूप होऊन जात असतो.
318-6
पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणोनि असो किती हेंचि । बोलावें आतां वायांचि । धनुर्धरा ॥318॥
ही अवस्था प्राप्त झाली म्हणजे जाणायचे असे कांही शिल्लक राहत नाही. म्हणून हे अर्जुना ! आता उगीच किती बरे बोलावे??
319-6
ऐसें शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे । वाराही जेथ न शिरे । विचाराचा ॥319॥
याप्रमाणे सर्व शब्द जेथून माघारी फिरतात, त्या ठिकाणी संकल्पही मावळतो आणि विचारांचा वारा देखील तेथे प्रवेश करू शकत नाही.
320-6
जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य । अनादि जें अगण्य । परमतत्व ॥320॥
ते प्ररमतत्व मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे, जे चौथ्या ज्ञानरूप तुर्या अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्यसिद्ध अमर्याद आहे.

321-6
आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु । जेथ आदि आणि अंतु । विरोनि गेले॥321॥
तेथे आकाशाचा शेवट होतो; तें म्हणजे मोक्षाची केवळ स्थिती असुन समाधि अवस्थेचें तारुण्य होय; आणि ज्याला आदि नाही व जे मापतां येत नाही,
322-6
जें विश्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ । जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा ॥322॥
तें म्हणजे मोक्षाची केवळ स्थिती असुन ते विश्वाचा आधार व योगरूप वृक्षाचे फळ आणि आनंदाचे केवळ जीवन होय.
323-6
जें महाभूतांचें बीज । जें महातेजाचें तेज । एवं पार्था जें निज । स्वरुप माझें ॥323॥
ते ब्रह्म पंचमहाभुतांचे मूळ कारण व महातेजाचे तेज होय.सारांश, पार्था, ते ब्रह्म माझे मुळस्वरूप होय.
324-6
ते हे चर्तुभुज कोंभेली । जयाची शोभा रुपा आली । देखोनि नास्तिकीं नोकिली । भक्तवृंदें ॥324॥
साधुवृंदांचा नास्तिकांनी जेव्हां छळ केला, तेव्हां हीच चतुर्भुज मुर्ति या स्वरुपापासुन आकाराला आली.
325-6
तें अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले जे पुरुष । जयांचे कां निष्कर्ष । प्राप्तीवेरीं ॥325॥
अर्जुना, असे हे महासुख अवर्णनीयच, परंतु याची प्राप्ति होईपर्यंत ज्या पुरुषाचे प्रयत्न अव्याहत चालले, ते पुरुष स्वयमेव सुखरूप झाले.

, , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *