सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५७६ ते १६०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1576-18
यया अर्जुनाचिया बोला । देवो नाचे सुखें भुलला । म्हणे विश्वफळा जाला । फळ हा मज ॥1576॥
ह्या अर्जुनाच्या भाषणानें, देवांना सुखाचें भरतें येऊन ते आनंदानें नाचू लागले, व म्हणाले विश्वांत अत्यंत मोठी फलप्राप्ति जर असेल तर असा शिष्य मिळणे हि होय. 76
1577-18
उणेनि उमचला सुधाकरु । देखुनी आपला कुमरु । मर्यादा क्षीरसागरु । विसरेचिना? ॥1577॥
आपला पुत्र जो चंद्र त्याचे कलाहीनत्व नष्ट होऊन, त्याला पूर्णता आलेली पाहून, सागरालाही नित्य मर्यादेचा विसर पडावा असें भरते येत नाही काय? (मग देव नाचू लागले तर नवल काय?) 77
1578-18
ऐसे संवादाचिया बहुलां । लग्न दोघांचियां आंतुला । लागलें देखोनि जाला । निर्भरु संजयो ॥1578॥
ह्याप्रमाणे संवादरूपी बहुल्यांवर श्रीकृष्णार्जुनांच्या चित्तवृत्तीचे लग्न लागत असलेलें (ऐक्य होत असलेले) पाहून संजयालाही प्रेमपूर येऊन तो तल्लीन झाला. 78
1579-18
तेणें म्हणतसे संजयो । बाप कृपानिधी रावो । तो आपुला मनोभावो । अर्जुनेंसी केला ॥1579॥
त्या वृत्तीच्या भरांत संजय, राजा धृतराष्ट्रास म्हणला, महाराज, केवढे आपलें दोघांचे थोर भाग्य! श्रीमद्व्यासांनीच आपलें आज रक्षण केलें 1579
1580-18
तेणें उचंबळलेपणें । संजय धृतराष्ट्रातें म्हणे । जी कैसे बादरायणें । रक्षिलों दोघे? ॥1580॥
त्या वृत्तीच्या भरांत संजय, राजा धृतराष्ट्रास म्हणला, महाराज, केवढे आपलें दोघांचे थोर भाग्य! श्रीमद्व्यासांनीच आपलें आज रक्षण केलें. 1580

1581-18
आजि तुमतें अवधारा । नाहीं चर्मचक्षूही संसारा । कीं ज्ञानदृष्टिव्यवहारा आणिलेती ॥1581॥
आज तुम्हाला चर्मचक्षु तर नाहीतच, की ज्याने तुम्ही कांहीं व्यवहार करू शकला असता; पण, तुमच्याकडून ज्ञान दृष्टीचा व्यवहार व्हावा अशी संधि प्राप्त झाली 81
1582-18
आणि रथींचिये राहाटी । घेई जो घोडेयासाठीं । तया आम्हां या गोष्टी । गोचरा होती ॥1582॥
आणि माझी स्वतःची गोष्ट सांगणे झाल्यास,ज्या मला रथांच्या घोड्यांच्या परीक्षेसाठी म्हणून ठेवले,त्या मला श्रीकृष्णार्जुन संवादाचा व्यासकृपेनें प्रत्यक्ष लाभ झाला. 82
1583-18
वरी जुंझाचें निर्वाण । मांडलें असे दारुण । दोहीं हारीं आपण । हारपिजे जैसें ॥1583॥
त्यांतही, असा घोर व निर्वाणीचा युद्धप्रसंग सुरू आहे की दोहोंपैकी कोणताही पक्ष हरला तरी आपलाच पराजय झाला असे दोघांनाही म्हणण्याची वेळ आहे. (एककुलत्वात् )83
1584-18
येवढा जिये सांकडां । कैसा अनुग्रहो पैं गाढा । जे ब्रह्मानंदु उघडा । भोगवीतसे ॥1584॥
महाराजांच्या कृपेला पारावार नाही; अशा संकटकालामध्येही मूर्त ब्रह्मानंद आपण भोगावा असा त्यांचा आपल्यावर अनुग्रह आहे.84
1585-18
ऐसें संजय बोलिला । परी न द्रवे येरु उगला । चंद्रकिरणीं शिवतला । पाषाणु जैसा ॥1585॥
संजय असे आनंदभरात बोलत होता खरा; पण, तो वृद्ध धृतराष्ट्र, चंद्रकिरणांचा पाषाणावर जसा काहीही परिणाम होत नाही. तसा त्या संवादकाली स्तब्ध होता.85

1586-18
हे देखोनि तयाची दशा । मग करीचिना सरिसा । परी सुखें जाला पिसा । बोलतसे ॥1586॥
राजाची अशी स्थिति पाहून संजयाने आपले भाषण संपविले, पण त्या संवादसुखानें तो असा वेडावला होता की त्याला बोलल्यावांचून रहावेच ना 86
1587-18
भुलविला हर्षवेगें । म्हणौनि धृतराष्ट्रा सांगे । येऱ्हवीं नव्हे तयाजोगें । हें कीर जाणें ॥1587॥
हर्षातीरेकाने- तो भानावर नव्हता म्हणूनच राजाशीं बोलला एवढेच, नाहीतर हा संवाद धृतराष्ट्राच्या योग्यतेचा नाही हे तो जाणत होता. 87
सञ्जय उवाच ।
इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः ।
संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥18.74॥

1588-18
मग म्हणे पैं कुरुराजा । ऐसा बंधुपुत्र तो तुझा । बोलिला तें अधोक्षजा । गोड जालें ॥1588॥
संजय मग म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, तुझा पुतण्या अर्जुन, त्याचे ते भाषण ऐकून भगवान श्रीकृष्णांना अत्यंत आनंद झाला.88
1589-18
अगा पूर्वापर सागर । ययां नामसीचि सिनार । येर आघवें तें नीर । एक जैसें ॥1589॥
अहो, पूर्वसमुद्र व पश्चिमसमुद्र हा जसा नाममात्र भेद आहे, सागरत्व पहातां समानच; 89
1590-18
तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसें । हें आंगाचिपासीं दिसे । मग संवादीं जी नसे । कांहींचि भेदु ॥1590॥
तसे पार्थिव देहदृष्टि ठेविली म्हणजे त्या दोन व्यक्ति म्हणाव्या इतकेच; विचारदृष्टया त्या दोघांत कांहीही भेद नाहीं. 1590

1591-18
पैं दर्पणाहूनि चोखें । दोन्ही होती सन्मुखें । तेथ येरी येर देखे । आपणपें जैसें ॥1591॥
किंवा, दर्पणापेक्षांही स्वच्छ असे दोन पदार्थ एकासमोर एक आले तर, ह्याचे त्यात किंवा त्याचे ह्यात होणारे दर्शन हें भिन्न नसून स्वतःचेच दर्शन होते असे म्हणावें लागते. 91
1592-18
तैसा देवेसीं पंडुसुतु । आपणपें देवीं देखतु । पांडवेंसीं देखे अनंतु । आपणपें पार्थीं ॥1592॥
त्याप्रमाणे दर्पणाहूनही स्वच्छ वृत्तीच्या पांडवानी तितक्याच स्वच्छवृत्तीच्या देवाकडे पाहिले, तेव्हां त्याला तेथे आपलेंच दर्शन झाले व तसेच देवांनींही पांडवांकडे पाहतां त्यांसही तेथे आपलेच दर्शन. 92
1593-18
देव देवो भक्तालागीं । जिये विवरूनि देखे आंगीं । येरु तियेचेही भागीं । दोन्ही देखे ॥1593॥
देवाधिदेव भक्तस्वरूपाचा आपल्या ठिकाणीं विचार करीत होता. तर तिकडे अर्जुनही आपल्या स्वरूपामध्यें दोघांच्या स्वरूपाचा विचार करीत होता. 93
1594-18
आणिक कांहींच नाहीं । म्हणौनि करिती काई । दोघे येकपणें पाहीं । नांदताती ॥1594॥
पण काय करणार, त्यांना स्वस्वरूपाहून अन्य कांहींच आढळेना; तेव्हां दोघेही अद्वैतभावाने नांदू लागले. 94
1595-18
आतां भेदु जरी मोडे । तरी प्रश्नोत्तर कां घडे? । ना भेदुचि तरी जोडे । संवादसुख कां? ॥1595॥
आतां भेद नाहीसा झाला, तर प्रश्नोत्तरे कशी होतील व भेद जर सत्य असेल तर ऐक्याचे संवाद सुख कसे प्राप्त होणार? 95

1596-18
ऐसें बोलतां दुजेपणें । संवादीं द्वैत गिळणें । तें ऐकिलें बोलणें । दोघांचें मियां ॥1596॥
अशाप्रकारे कृष्णार्जुनांचे आभासिक द्वैतभावांत भाषण चाललें असतां, संवादा तही द्वैतांचा ग्रास कसा होऊ शकतो तें बोलणें मीं ऐकिलें असें संजय म्हणाला 96
1597-18
उटूनि दोन्ही आरिसे । वोडविलीया सरिसे । कोण कोणा पाहातसे । कल्पावें पां? ॥1597॥
दोन आरसे स्वच्छ करून समोरासमोर आणिले असतां, कोणकोणाला पहातो हें काय सांगणार? 97
1598-18
कां दीपासन्मुखु । ठेविलया दीपकु । कोण कोणा अर्थिकु । कोण जाणें ॥1598॥
किंवा दिव्यासमोर दुसरा दिवा आणून ठेविला तर, कोणकोणाला प्रकाशित आहे हे कोणी सांगावें? 98
1599-18
नाना अर्कापुढें अर्कु । उदयलिया आणिकु । कोण म्हणे प्रकाशकु । प्रकाश्य कवण? ॥1599॥
अथवा असे समजा, एका सूर्यापुढे दुसरा सूर्य उगवला तर, त्यांतील प्रकाश्य कोण व प्रकाशक कोण हें कोण सांगणार? 99
1600-18
हें निर्धारूं जातां फुडें । निर्धारासि ठक पडे । ते दोघे जाले एवढे । संवादें सरिसे ॥1600॥
वरील गोष्टींच निर्णय करू गेल्यास निर्णय करणाराला जसे हातच टेकले पाहिजेत, तसे त्या दोघांचे त्या संवादांत ऐक्य झाले.. 1600

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *