1351-18
तैसा तूं माझ्या ठाईं । राखों नेणसीचि कांहीं । तरी आतां तुज काई । गोप्य मी करूं? ॥1351॥
त्याप्रमाणे तू ही मद्रूप होतांना आपण म्हणून निराळा कांहीं रहातच नाहींस; मग तुझ्यापन कांहीं गौप्य लपवावें हे, मी तरी कसें करणार? 51
1352-18
म्हणौनि आघवींचि गूढें । जें पाऊनि अति उघडें । तें गोप्य माझें चोखडें । वाक्य आइक ॥1352॥
म्हणून, ज्या माझ्या गुप्त ठेव्या पुढे जगांतील इतर गौप्यं ही उघडया बाजारासारखी ठरतात तें मझ शुद्ध रहस्यवाक्य श्रवण कर. 52
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥18.65॥
1353-18
तरी बाह्य आणि अंतरा । आपुलिया सर्व व्यापारा । मज व्यापकातें वीरा । विषयो करीं ॥1353॥
अर्जुना, तुझ्या अंतर्बाह्य (मानसिक व कायिक ) सर्व क्रिया मी जो सर्वव्यापक त्याला विषय करून म्हणजे त्याच्या उद्देशाने कराव्या. 53
1354-18
आघवा आंगीं जैसा । वायु मिळोनि आहे आकाशा । तूं सर्व कर्मीं तैसा । मजसींचि आस ॥1354॥
वायु सर्वांगाने जसा आकाशामध्ये लीन असतो, तसा सर्व कर्मे करितांना तुं मद्रूप बुद्धि ठेव. 54
1355-18
किंबहुना आपुलें मन । करीं माझें एकायतन । माझेनि श्रवणें कान । भरूनि घालीं ॥1355॥
किंबहुना स्वत:चे मन हे माझे रहाण्याचेच एक स्थान कर, आणि श्रवणांनाही मद्गुणश्रवणानेच भरून काढ. 55
1356-18
आत्मज्ञानें चोखडीं । संत जे माझीं रूपडीं । तेथ दृष्टि पडो आवडी । कामिनी जैसी ॥1356॥
शुद्ध आत्म-ज्ञानयुक्त ज्या संतमूर्ती तीं माझींच रूपे आहेत अशा भावनेने, कामुकाची कामिनीविषयीं जशी दृष्टि असते, त्याप्रमाणेच, तुझी त्यांच्या चरणाविषयीं आवड असावी. 56
1357-18
मीं सर्व वस्तीचें वसौटें । माझीं नामें जियें चोखटें । तियें जियावया वाटे । वाचेचिये लावीं ॥1357॥
सर्वाधिष्ठान जो मी, त्या माझी शुद्ध व गोड नामें, त्यांचा जिव्हेला सराव व्हावा म्हणून ती वाणीत धारण कर. 57
1358-18
हातांचें करणें । कां पायांचें चालणें । तें होय मजकारणें । तैसें करीं ॥1358॥
हातांची क्रिया की पायांचा संचार हा सर्व माझ्या उद्देशाने होत असावा 58
1359-18
आपुला अथवा परावा । ठायीं उपकरसी पांडवा । तेणें यज्ञें होईं बरवा । याज्ञिकु माझा ॥1359॥
स्वकीय अथवा परकीय यांवर जो उपकार तू करशील तो मदर्पण करून माझा याज्ञिक हो. 59
1360-18
हें एकैक शिकऊं काई । पैं सेवकें आपुल्या ठाईं । उरूनि येर सर्वही । मी सेव्यचि करीं ॥1360॥
अशी एकेक गोष्ट काय शिकवावी? सर्व जग मद्रूप आहे अशी भावना करून व स्वतः सेवकभाव पत्करून तुं सेवा कर. 1360
1361-18
तेथ जाऊनिया भूतद्वेषु । सर्वत्र नमवैन मीचि एकु । ऐसेनि आश्रयो आत्यंतिकु । लाहसी तूं माझा ॥1361॥
ह्याने सर्व भूतांविषय द्वेष नाहीसा होऊन सर्वत्र नमन करण्याला मीच एक भरलों आहे असे वाटून तुला माझे अत्यंत सान्निध्य प्राप्त होईल.61
1362-18
मग भरलेया जगाआंतु । जाऊनि तिजयाची मातु । होऊनि ठायील एकांतु । आम्हां तुम्हां ॥1362॥
मग ह्या सर्व जगांत तिसरेपणा नाहीसा होऊन तुझा वा माझा असा एकांतच आढळून येईल. 62
1363-18
तेव्हां भलतिये आवस्थे । मी तूतें तूं मातें । भोगिसी ऐसें आइतें । वाढेल सुख ॥1363॥
मग वाटेल त्या स्थितींत तुला माझा व मला तुझा एकांतिक भोग घडत राहून सहजच सुखाची वृद्धि होईल 63
1364-18
आणि तिजें आडळ करितें । निमालें अर्जुना जेथें । तें मीचि म्हणौनि तूं मातें । पावसी शेखीं ॥1364॥
आणि अर्जुना, सुखप्राप्तीच्या आड असणारी जी तिसऱ्याची म्हणजे जगदाभासाची निवृत्ति झाल्यावर तुलाही अखेर मद्रूप आहेस असे वाटून माझी प्राप्ति होईल. 64
1365-18
जैसी जळींची प्रतिभा । जळनाशीं बिंबा । येतां गाभागोभा । कांहीं आहे? ॥1365॥
याला उदाहरण- जलांतील प्रतिबिंबाला जल ह्या उपाधीच्या नाशानंतर मुख्य बिंबास ऐक्य पावण्यास कांहीं श्रम कां पडतात? (तें नेहमींच बिंबरूप असतें.) 65
1366-18
पैं पवनु अंबरा । कां कल्लोळु सागरा । मिळतां आडवारा । कोणाचा गा? ॥1366॥
तसेच वारा आकाशास मिळण्यास किंवा लाटेला समुद्राला भेटण्यास कांहीं कोणाचा प्रतिबंध असतो काय? 66
1367-18
म्हणौनि तूं आणि आम्हीं । हें दिसताहे देहधर्मीं । मग ययाच्या विरामीं । मीचि होसी ॥1367॥
म्हणून तू व आम्ही असा हा भेद देहोपाधीमुळे दिसत आहे, त्यांच्या निरासाने तूं मद्रूपच होशील. (विचारानें आतांही आहेस.) 67
1368-18
यया बोलामाझारीं । होय नव्हे झणें करीं । येथ आन आथी तरी । तुझीचि आण ॥1368॥
ह्या माझ्या बोलण्याविषयीं’ असेल नसेल’ अशी शंका धरू नको; ह्यांत अक्षरही अन्यथा नाहीं हें तुझीच शपथ घेऊन सांगतों. 68
1369-18
पैं तुझी आण वाहणें । हें आत्मलिंगातें शिवणें । प्रीतीची जाति लाजणें । आठवों नेदी ॥1369॥
तुझी शपथ वाहणे म्हणजे आत्म्याचीच शपथ घेण्यासारखे आहे; (वास्तविक हे अयोग्य होय ) पण प्रेमाची जातीच अशी असते की, योग्यायोग्य, लाज,शंका ही बंधने तिला आठवत नाहीत. 69.
1370-18
येऱ्हवीं वेद्यु निष्प्रपंचु । जेणें विश्वाभासु हा साचु । आज्ञेचा नटनाचु । काळातें जिणें ॥1370॥
वस्तुतः विचार केला तर जो ज्ञानस्वरूप, निष्प्रपंच (भेदभावरहित) असून, ज्याच्या सत्तेमुळे विश्वाला सत्यस्व आले आहे व ज्याच्या आज्ञेचे सामर्थ्य काळाला जिंकते असे आहे. 1370
1371-18
तो देवो मी सत्यसंकल्पु । आणि जगाच्या हितीं बापु । मा आणेचा आक्षेपु । कां करावा? ॥1371॥
असा जो मी सत्यसंकल्प ईश्वर, व जगाच्या कल्याणाविषयीं तत्पर असणारा, त्या मी शपथ, वाहणेचे कारणच काय? 71
1372-18
परी अर्जुना तुझेनि वेधें । मियां देवपणाचीं बिरुदें । सांडिलीं गा मी हे आधें । सगळेनि तुवां ॥1372॥
अर्जुना परंतु, तू मला इतकें वेड लाविलें आहेस कीं, मी देव म्हणून कोणी आहे ह्याचे मला भानही नाही (खरेंसांगू का?) माझे अर्धसत्व नष्ट होऊन माझ्या ठिकाणीं तुझीच सर्वस्वी स्थापना होऊन अदलाबदल झाल्यासारखी आहे. 72
1373-18
पैं काजा आपुलिया । रावो आपुली आपणया । आण वाहे धनंजया । तैसें हें कीं ॥1373॥
किंवा आपल्या कार्यासाठी राजा जशी आपली स्वतःचीच शपथ घेतो तसाच कांहीसा हा प्रकार होय. 73
1374-18
तेथ अर्जुनु म्हणे देवें । अचाट हें न बोलावें । जे आमचें काज नांवें । तुझेनि एके ॥1374॥
त्यावर अर्जुन म्हणाला, देवा, असें भलतेंच नका हो बोलू; अहो, आमची सर्व कार्यं नुसत्या तुमच्या नाममात्राने सिद्धीस जातात.74
1375-18
यावरी सांगों बैससी । कां सांगतां भाषही देसी । या तुझिया विनोदासी । पारु आहे जी? ॥1375॥
असे असूनही, तूंच आम्हाला आमच्या मोठेपणाच्या गोष्टी सांगतोस आणि त्याही शपथ वाहून ! देवा ! तुमच्या ह्या विनोदाला कांहीं सीमा आहे कां? 75
Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण
