सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १२५१ ते १२७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1251-18
तैसा बुद्धी वाचा कायें । जो मातें आश्रऊनि ठाये । तो निषिद्धेंही विपायें । कर्में करूं ॥1251॥
त्याप्रमाणे, काया, वाचा, मनेंकरून जो माझा आश्रय करून राहिला आहे, तो क्वचित् निषिद्धही कर्म करो. 51
1252-18
परी गंगेच्या संबंधीं । बिदी आणि महानदी । येक तेवीं माझ्या बोधीं । शुभाशुभांसी ॥1252॥
पण, गंगाप्रवेश झाल्या वर ओहोळ आणि महानदी हा जसा भेद उरत नाही त्याप्रमाणे, ज्याला माझ्या स्वरूपाचे ज्ञान झाले आहे त्याला शुभ व अशुभ दोन्हीं कर्मे तुल्य असतात 52
1253-18
कां बावनें आणि धुरें । हा निवाडु तंवचि सरे । जंव न घेपती वैश्वानरें । कवळूनि दोन्ही ॥1253॥
हा अस्सल चंदन आहे व हा धुर करणारा निंब आहे असा विचार, ती दोन्ही काष्ठे अग्नींत टाकलीं नाहींत तोपर्यंतच असतो. 53
1254-18
ना पांचिकें आणि सोळें । हें सोनया तंवचि आलें । जंव परिसु आंगमेळें । एकवटीना ॥1254॥
पांचकशी व सोळाकशी, असा भेद सोन्यांत तोंवरच असतो, कीं जपर्यंत हलक्या सोन्याला परिसाचा संबंध घडत नाही. (तो जडल्याबर हिणकट धातूचे उत्तम सुवर्ण होणारच). 54
1255-18
तैसें शुभाशुभ ऐसें । हें तंवचिवरी आभासे । जंव येकु न प्रकाशे । सर्वत्र मी ॥1255॥
सर्वत्र माझा एकाचच प्रकाश (व्याप्ति) आहे अशा बोधाचा जोंवर उदय झाला नाहीं तोंवर शुभ व अशुभ असे भेद बुद्धिपुढे उभे रहातात. 55

1256-18
अगा रात्री आणि दिवो । हा तंवचि द्वैतभावो । जंव न रिगिजे गांवो । गभस्तीचा ॥1256॥
अरे, रात्र आणि दिवस हा दैतभाव, ती दोघे, सूर्याच्या गांवाला गेली नाहींत तोंवरच नांदतो (तेथे रात्रही नाहीं व तत्सापेक्ष दिवसही नाहीं) 56
1257-18
म्हणौनि माझिया भेटी । तयाचीं सर्व कर्में किरीटी । जाऊनि बैसे तो पाटीं । सायुज्याच्या ॥1257॥
म्हणून, अर्जुना, माझ्या यथार्थस्वरूप प्रकाशापुढे, त्याच्या शुभाशुभ सर्व कर्माचेभस्म होऊन तो सायुज्यपदावर बसतो. 57
1258-18
देशें काळें स्वभावें । वेंचु जया न संभवे । तें पद माझें पावे । अविनाश तो ॥1258॥
देशानें, कालाने अगर निसर्गतः ज्याचा कधीही नाश संभवत नाहीं असे जे माझे अविनाशपद (सायुज्यपद) हे त्याला प्राप्त होते. 58
1259-18
किंबहुना पंडुसुता । मज आत्मयाची प्रसन्नता । लाहे तेणें न पविजतां । लाभु कवणु असे ॥1259॥
किंबहुना, अर्जुना, मी जो परमात्मा त्याची प्रसन्नता अथवा त्याचा प्रसाद त्याला प्राप्त होतो; आणखी कोणता असा लाभ असणार कीं, जो या प्रसादानंतरही मिळणे बाकी आहे? 59
चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः
। बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ॥18.57॥

1260-18
याकारणें गा तुवां इया । सर्व कर्मा आपुलिया । माझ्या स्वरूपीं धनंजया । संन्यासु कीजे ॥1260॥
यास्तव, धनंजया, तू आपलीं सर्वं कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण कर. 1260


1261-18
परी तोचि संन्यासु वीरा । करणीयेचा झणें करा । आत्मविवेकीं धरा । चित्तवृत्ति हे ॥1261॥
परंतु अर्जुना, तो कर्मसंन्यास अकृत्रिम असून चित्तवृत्ति आत्मविचाराकडे असू दे. 61
1262-18
मग तेणें विवेकबळें । आपणपें कर्मावेगळें । माझ्या स्वरूपीं निर्मळें । देखिजेल ॥1262॥
मग त्या आत्म- विचाराच्या सामर्थ्याने. तुला, कर्माहून अत्यंत वेगळे असलेल्या अशा आपल्या निर्मळ स्वरूपाचे माझ्या स्वरूपांत दर्शन होईल. 62
1263-18
आणि कर्माचि जन्मभोये । प्रकृति जे का आहे । ते आपणयाहूनि बहुवे । देखसी दूरी ॥1263॥
आणि कर्माचे जन्मस्थान जी प्रकृति किंवा अविद्या तिचा व आपला कांहीही संबंध नाहीं हें तुझ्या ध्यानीं येईल.63
1264-18
तेथ प्रकृति आपणयां । वेगळी नुरे धनंजया । रूपेंवीण का छाया । जियापरी ॥1264॥
( विचारा अंती तुला असेही कळून येईल कि) रूपावांचून छाया म्हणून जसा स्वतंत्र पदार्थ नसतो, त्याप्रमाणं स्वात्मसत्तेहून प्रकृतीला पृथक् सत्ताच नसल्यामुळे ती आपल्याहून वेगळीही नाही, असें,अर्जुना तुझ्या ध्यानांत येईल.64
1265-18
ऐसेनि प्रकृतिनाशु । जालया कर्मसंन्यासु । निफजेल अनायासु । सकारणु ॥1265॥
अशा अनिर्वचनीय स्वरूपाविष्करणाने प्रकृतीचा नाश (मिथ्यात्व) झाला म्हणजे, तीच कर्माचे जन्मस्थान किंवा कारण असल्यामुळे, कर्माचा कारणासहवर्तमान सहजच संन्यास होतो. 65

1266-18
मग कर्मजात गेलया । मी आत्मा उरें आपणपयां । तेथ बुद्धि घापे करूनियां । पतिव्रता ॥1266॥
अशा रीतीनें सर्वकर्मसंन्यास झाला असतां, मी आत्मा सहजच नित्य स्थित आहे. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं तुझी बुद्धि पवित्रतेप्रमाणे सदैव स्थिर असू दे. 66
1267-18
बुद्धि अनन्य येणें योगें । मजमाजीं जैं रिगे । तैं चित्त चैत्यत्यागें । मातेंचि भजे ॥1267॥
बुद्धि अनन्यभावाने मत्स्वरूपी रत आली म्हणजे चित्तही अन्य चिंतनाच्या विषयांच्या त्यागाने माझ्याच भजनीं लागेल. 67
1268-18
ऐसें चैत्यजातें सांडिलें । चित्त माझ्या ठायीं जडलें । ठाके तैसें वहिलें । सर्वदा करी ॥1268॥
याप्रमाणे विषय त्याग झालेले चित्त माझ्या स्वरूप नित्य जडून राहील असें सत्वर कर. 68
मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि ।
अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनण्‌क्ष्यसि ॥18.58॥

1269-18
मग अभिन्ना इया सेवा । चित्त मियांचि भरेल जेधवां । माझा प्रसादु जाण तेधवां । संपूर्ण जाहला ॥1269॥
मग अशा प्रकारच्या अभेद सेवेने तुझे चित्त जेव्हां मद्रूप होईल, तेव्हांच तुझ्यावर माझा पूर्ण प्रसाद झाला असें समज. 69
1270-18
तेथ सकळ दुःखधामें । भुंजीजती जियें मृत्युजन्में । तियें दुर्गमेंचि सुगमें । होती तुज ॥1270॥
ह्या प्रसादानें जन्मापासून मृत्यूपर्यंत जेवढी दुर्गम दुःखे भोगावीं लागतात ती सर्व तुला सुतर (सुगम) होतील. (भोगावी लागणार नाहीत) 1270

1271-18
सूर्याचेनि सावायें । डोळा सावाइला होये । तैं अंधाराचा आहे । पाडु तया? ॥1271॥
सूर्य प्रकाशाचे सहाय्य असलेला डोळा काय अधंकाराला भिणार आहे? 71
1272-18
तैसा माझेनि प्रसादें । जीवकणु जयाचा उपमर्दे । तो संसराचेनी बाधे । बागुलें केवीं? ॥1272॥
त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची जीवदशा उपमर्दित (नष्ट, बाधित) झाली आहे, त्याला संसाररूप बागुलाची (मिथ्या वस्तूची) कशी भीति वाटेल? 72
1273-18
म्हणौनि धनंजया । तूं संसारदुर्गती यया । तरसील माझिया । प्रसादास्तव ॥1273॥
म्हणून अर्जुना, माझ्या प्रसादाने तू हा इतरांस दुस्तर असलेला संसार सहज तरून जाशील. (तरून जाणं आहे इतकेंही सत्यत्व त्याचे ठिकाणी उरणार नाही) 73
1274-18
अथवा हन अहंभावें । माझें बोलणें हें आघवें । कानामनाचिये शिंवे । नेदिसी टेंकों ॥1274॥
अथवा, सर्वज्ञतेच्या किंवा अभिमानाच्या तोऱ्यात तूं हें माझे बोलणें नुसतें ऐकणारही नाहींस किंवा मनावरही घेणार नाहीस. 74
1275-18
तरी नित्य मुक्त अव्ययो । तूं आहासि तें होऊनि वावो । देहसंबंधाचा घावो । वाजेल आंगीं ॥1275॥
तर, वस्तुतः तू नित्यमुक्त व अविनाशी आहेस ते सर्व व्यर्थ होऊन, देहसंबधाने होणारे सर्व दुःखाघात तुला सोसावे लागतील. 75

, ,

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *