376-18
कर्म होतचि असे तेव्हांही । परी तें होणें नव्हे पाहीं । तो अन्यायो गा अन्यायीं । हेतु होय ॥376॥
तेव्हाही कर्म हे घडतच असते; पण बाबा रे, ते घडणे नव्हे; ते पाप कर्म असून पापकर्माला हेतू आहे. 376
तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः ।
पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः ॥18.16॥
377-18
एवं पंचकारणा कर्मा । पांचही हेतु हे सुमहिमा । आतां एथें पाहें पां आत्मा । सांपडला असे? ॥377॥
अशा प्रकारे, हे सुमहिमा, कर्माच्या पांच कारणास पांच हेतू आहेत. तर आता या ठिकाणी आत्मा हा कर्मास कारण आहे काय, सांग बरे? 377
377-18
भानु न होनि रूपें जैसीं । चक्षुरूपातें प्रकाशी । आत्मा न होनि कर्में तैसीं । प्रकटित असे गा ॥378॥
ज्याप्रमाणे सूर्य हा स्वत: विषय न होता नेत्रादी पांच इंद्रियांचे विषय प्रगट करतो, त्याप्रमाणे आत्मा कर्मे न होता करणाराकडून ती ती प्रकाशित करतो; 378
379-18
पैं प्रतिबिंब आरिसा । दोन्ही न होनि वीरेशा । दोहींतें प्रकाशी जैसा । न्याहाळिता तो ॥379॥
हे बघ अर्जुना, आरसा व प्रतिबिंब ही दोन्ही आपण न होता पाहणारा जसा दोहिला प्रकाशित करतो; 379
380-18
कां अहोरात्र सविता । न होनि करी पंडुसुता । तैसा आत्मा कर्मकर्ता । न होनि दावी ॥380॥
किंवा हे पंडुसुता, सूर्य हा दिवस व रात्र यास कारणीभूत असून ज्याप्रमाणे त्यापासून अलित असतो, त्याप्रमाणे आत्म्याच्या अधिष्ठानावर जरी कर्म होते, तरी तो कर्मकर्ता नाही असे दाखवितो. 380
381-17
परी देहाहंमान भुली । जयाची बुद्धि देहींचि आतली । तया आत्मविषयीं जाली । मध्यरात्री गा ॥381॥
परंतु मीपणाच्या भ्रमाने ज्याची बुद्धी देह हाच मी अशी पक्की खात्री झाली आहे, त्याला आपल्या स्वरूपाची मध्यरात्र झाली आहे. 381
382-18
जेणें चैतन्या ईश्वरा ब्रह्मा । देहचि केलें परमसीमा । तया आत्मा कर्ता हे प्रमा । अलोट उपजे ॥382॥
ज्याने चैतन्य, ईश्वर व ब्रह्म हे सर्व देहालाच मानले आहे, त्याला आत्म कर्ता आहे अशी बुद्धी होणे अगदी साहजिक आहे. 382
383-18
आत्माचि कर्मकर्ता । हाही निश्चयो नाहीं तत्वतां । देहोचि मी कर्मकर्ता । मानितो साचे ॥383॥
आत्मा हा कर्म कर्ता आहे असाही पक्का निश्चय जो करीत नाही, तो खरोखरच देहालाच कर्मकर्ता असे मानतो. 383
384-18
जे आत्मा मी कर्मातीतु । सर्वकर्मसाक्षिभूतु । हे आपुली कहीं मातु । नायकेचि कानीं ॥384॥
कारण मी आत्मा कर्मातीत असून सर्व कर्मांना साक्षीभूत आहे, अशी स्वस्वरूपाची गोष्ट तो कारणानेही कवी ऐकत नाही; 384
385-18
म्हणौनि उमपा आत्मयातें । देहचिवरी मविजे एथें । विचित्र काई रात्रि दिवसातें । डुडुळ न करी? ॥385॥
म्हणून सर्वव्यापक असा जो आत्मा, तो देहच होय असे तो मानतो. काय चमत्कार पहा, की घुबड हे आपले डोळे झाकून घेऊन दिवसालाच रात्र म्हणत नाही काय? 385
386-18
पैं जेणें आकाशींचा कहीं । सत्य सूर्यु देखिला नाहीं । तो थिल्लरींचें बिंब काई । मानू न लाहे? ॥386॥
हे पहा, ज्याने आकाशातील खऱ्या सूर्यास कधी पाहिले नाही, तो डबक्यातील पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबास सूर्य समजत नाही काय? 386
387-18
थिल्लराचेनि जालेपणें । सूर्यासि आणी होणें । त्याच्या नाशीं नाशणें । कंपें कंपू ॥387॥
डबक्यात पाणी साचले म्हणजे सूर्य जन्मास आला असे म्हणतो, तेच पाणी वाऱ्याने हालले म्हणजे सूर्यास कंप सुटला असे म्हणतो आणि डबके कोरडे पडले म्हणजे सूर्याचा नाश झाला असे समजतो, 387
388-18
आणि निद्रिस्ता चेवो नये । तंव स्वप्न साच हों लाहे । रज्जु नेणतां सापा बिहे । विस्मो कवण? ॥388॥
आणि निजलेला जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत त्याला स्वप्न खरे भासते; यालाही दोरी आहे हे कळत नाही, तो तिला समजून भितो, यात नवल ते कोणते? 388
388-18
जंव कवळ आथि डोळां । तंव चंद्रु देखावा कीं पिंवळा । काय मृगींहीं मृगजळा । भाळावें नाहीं? ॥389॥
जोपर्यंत काळी झालेली आहे, तोपर्यंत चंद्राचा रंग पिवळा दिसतो. अरे, मृगजलाला भुलू नये, तर मग कोणी भुलावे? 389
390-18
तैसा शास्त्रगुरूचेनि नांवे । जो वाराही टेंकों नेदी सिवें । केवळ मौढ्याचेनिचि जीवें । जियाला जो ॥390॥
त्याप्रमाणे शास्त्र व गुरू याची नावे उच्चारल्याबरोबर तो त्याचा वाराही आपल्या शिवेस लागू देत नाही. कारण तो मूर्खपणाच्या जोरावर वाचलेला असतो, 390
391-18
तेणें देहात्मदृष्टीमुळें । आत्मया घापे देहाचें जाळें । जैसा अभ्राचा वेगु कोल्हें । चंद्रीं मानीं ॥391॥
अभ्रे चालत असली म्हणजे ज्याप्रमाणे कोल्हे हे चंद्र चालतो असा त्याचेवर आरोप करतात, त्याप्रमाणे त्याने देहात आत्मा आहे, अशा दृष्टीने आत्म्याला देहरूप जाळे घातले आहे. 391
392-18
मग तया मानणयासाठीं । देहबंदीशाळे किरीटी । कर्माच्या वज्रगांठी । कळासे तो ॥392॥
मग अर्जुना, त्याच्या या समजुतीने देहरूपी बंदीशाळेत कर्माच्या बळकट गाठीने तो बंदिवान होतो
393-18
पाहे पां बद्ध भावना दृढा । नळियेवरी तो बापुडा । काय मोकळेयाही पायाचा चवडा । न ठकेचि पुंसा । ॥393॥
अरे, हे पहा, बिचारा राघो (पोपट) नळीवर वर बसलेला असतो, तो मी बांधला गेलो आहे, अशा दृढ कल्पनेने आपल्या मोकळ्या पायाचा पंजा मोकळा असूनही ती नळी सोडत नाही,
394-18
म्हणौनि निर्मळा आत्मस्वरूपीं । तो प्रकृतीचें केलें आरोपी । तो कल्पकोडीच्या मापीं । मवीचि कर्में ॥394॥
म्हणून निर्मळ अशा आत्मस्वरूपावर जो देहाने केलेल्या कर्माचा आरोप करतो, तो कल्प कोटीपर्यंत कर्मातच गुंडाळला जातो. येथून पुढच्या श्लोकास अवतरण देतात.
395-18
आता कर्मामाजीं असे । परी तयातें कर्म न स्पर्शे । वडवानळातें जैसें । समुद्रोदक ॥395॥
आता कर्म करीत असूनही ज्याला कर्माचा स्पर्श होत नाही, जसा वडवानळ हा समुद्रात असूनही त्याला समुद्र स्पर्श करीत नाही,
396-18
तैसेंनि वेगळेपणें । जयाचें कर्मीं असणें । तो कीर वोळखावा कवणें । तरी सांगो ॥396॥
तसे जो अलिप्तपणे कर्म करीत असतो, तो खरोखर कसा ओळखावा, ते सांगतो. 396
397-18
जे मुक्तातें निर्धारितां । लाभे आपलीच मुक्तता । जैसी दीपें दिसें पाहतां । आपली वस्तु ॥397॥
मुक्ताच्या स्वरूपाविषयी विचार करू लागले असता आपली स्वाभाविक असणारी मुक्तता आपल्यास प्राप्त होते. जसे दिव्याच्या उजेडाने पाहू लागल्यावर आपली वस्तू आपल्याला दिसते;397
398-18
नातरी दर्पणु जंव उटिजे । तंव आपणपयां आपण भेटिजे । कां तोय पावतां तोय होईजे । लवणें जेंवीं ॥398॥
अथवा आरसा स्वच्छ करू लागले असता आपले स्वरूप त्यात आपणास दिसते किंवा मिठ पाण्यात घातले असते त्याचे पाणी होते; 398
399-18
हें असो परतोनि मागुतें । प्रतिबिंब पाहे बिंबातें । तंव पाहणें जाउनी आयितें । बिंबचि होय ॥399॥
फार काय; प्रतिबिंब मागे परतून आपल्या बिंबाला जो पाहू लागते तो त्याचे पाहणेपणही जाऊन ते सहजच बिंबच बनते. 399
400-18
तैसें हारपलें आपणपें पावे । तैं संतांतें पाहतां गिंवसावें । म्हणौनि वानावे ऐकावे । तेचि सदा ॥400॥
तसे संतांच्या स्थितीचा विचार केला असता आपले हरवलेले स्वरूप आपल्यास मिळते; म्हणून संतांचे नेहमी वर्णन करावे व त्यांचेच गुण नेहमी श्रवण करावे. 400
Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण
[…] […]
[…] […]