सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ४२६ ते ४५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , ,

426-6
आंगी योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ । काय महदादि हें सकळ । आपु नोहे ॥426॥
जर योगसाधनांचे बळ अंगात असेल, तर मनाच्या चंचलतेची काय बिशाद आहे? महत्तत्वादिक स्वाधीन होत नाहीत काय?
427-6
तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती तें न चुके । साचचि योगबळेंसीं न तुके । मनोबळ ॥427॥
तेव्हां अर्जुन म्हणतो, ” देवा आपण जे म्हणतां ते खरे आहे; खरोखर योगबलापुढे मनाचे बल टिकणार नाही.
428-6
तरी तोचि योगु कैसा केवीं जाणों । आम्ही येतुले दिया याची मातुही नेणों । म्हणोनि मनातें जी म्हणों । अनावर॥428॥
तरी तो योग कसा आहे व कशा रीतीने जाणावा त्याची गोष्ट इतके दिवस आम्हांस माहीत नव्हती; म्हणून मन हे अनावर आहे असे आम्ही म्हणत होतो.
429-6
हा आतां आघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा । योगपरिचयो आम्हां । जाहला आजी॥429॥
पुरुषोत्तमा, तुमच्या प्रसादाने आमच्या सगळ्या जन्मांत आज योगाचा परिचय आम्हांस झाला.
अर्जुन उवाच –
अयतिः श्रध्दयोपेतो योगात् चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिध्दि कां गतिं कृष्ण गच्छति ॥6.37॥
कच्चित् नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्राह्मणः पथि ॥6.38॥
एतत् मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्दते ॥6.39॥

430-6
परि आणिक एक गोसांविया । मज संशयो असे साविया । तो तूंवांचूनि फेडावया । समर्थु नाहीं ॥430॥
परंतु, हे प्रभो, आणखी एक संशय सहज उत्पन्न झाला आहे, तो फेडण्यास आपल्याशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही.

431-6
म्हणोनि सांगे गोविंदा । कवण एकु मोक्षपदा । झोंबत होता श्रध्दा । उपायेंविण ॥431॥
म्हणून गोविंदा, मला सांग की, कोणी एक मनुष्य मोक्षप्राप्तीकरतां भक्तियुक्त अंतःकरणाने उपायाशिवाय इच्छा करीत होता.
432-6
इद्रिंयग्रामोनि निघाला । आस्थेचिया वाटा लागला । आत्मसिद्धीचिया पुढिला । नगरा यावया ॥432॥
इंद्रियरूपी गांवाहून निघून मोक्षरूपी गांवास जाण्याकरितां तो भक्तिरूप मार्गाला लागला
433-6
आत्मसिद्धी न ठकेचि । आणि मागुतें न येववेचि । ऐसा अस्तु गेला माझारींचि । आयुष्यभानु ॥433॥
तोच मोक्ष प्राप्त होत नाही, आणि परतही येववत नाही, अशा स्थितीत त्याचा आयुष्यरूपी सुर्य मध्येच मावळला;
434-6
जैसें अकाळीं आभाळ । अळुमाळु सपातळ । विपायें आलें केवळ । वसे ना वर्से ॥434॥
सहज अकाली आलेला लहान पातळ ढग ज्याप्रमाणे टिकत नाही व वृष्टीही करीत नाही,
435-6
तैसी दोन्ही दुरावलीं । जे प्राप्ती तंव अलग ठेली । आणि अप्राप्तीही सांडवली । श्रध्दा तया ॥435॥
त्याप्रमाणे, ज्याला दोन्ही अंतरली, म्हणजे मोक्षप्राप्ति तर दुरच राहीली, आणि श्रद्धेमुळे सोडलेल्या संसारासही तो मुकला.

436-6
ऐसा वोलांतरला काजीं (दोंला अंतरला) कां जी । जो श्रध्देचांचि समाजीं । बुडाला तया हो जी । कवण गति ॥436॥
असा दोन्ही गोष्टींना जो मुकला, परंतु भक्तीत निमग्न झाला, त्याला कोणती गति प्राप्त होते हे सांगा.
श्रीभगवानुवाच-
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।
न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति ॥6. 40 ॥

437-6
तंव कृष्ण म्हणती पार्था । जया मोक्षसुखीं आस्था । तया मोक्षावांचुनि अन्यथा । गती आहे गा ॥437॥
तेव्हां श्रीकृष्ण म्हणाले :-पार्था, ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे, त्याला मोक्षावाचुन दुसरी गति आहे काय?
438-6
परि एतुलेंचि एक घडे । जें माझारी विसवावें पडे । तेंही परि ऐसेनि सुरवाडें । जो देवां नाहीं ॥438॥
परंतु त्याला मध्यंतरी विश्रांति घ्यावी लागते एवढेच काय ते ! पण त्या विश्रांतीत त्याला जे सुख होते ते देवांना सुद्धा मिळत नाही !
439-6
एऱ्हवी अभ्यासाचा उचलतां । पाउलीं जरी चालतां । तरी दिवसाआधीं ठाकिता । सोऽहंसिध्दीतें ॥439॥
येरवी, जर ह्याने अभ्यासाचे पाउल उचलून मार्ग क्रमिला असता, तर दिवस (आयुष्य) मावळण्याच्या पूर्वीच हा मोक्षप्राप्तीच्या गांवाला पोहोचला असता.
440-6
परि तेतुला वेगु नव्हेचि । म्हणऊनि विसांवा तरी निकाचि । पाठीं मोक्षु तंव तैसाचि । ठेविला असे ॥440॥
परंतु तितका त्याचा वेग नसल्यामुळे त्याला विसावा घेणे भाग पडले. तथापि मागाहून तरी मोक्षप्राप्ति ही ठेवलेलीच आहे.
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते॥6.41॥

441-6
ऐसें कवतिक हें कैसें । जें शतमखा लोक सायासें । ते तो पावे अनायासें । कैवल्यकामु ॥441॥
अरे हे कौतुक पहा, ज्या लोकांची प्राप्ती व्हावयास शंभर यज्ञ करणार्‍या इंद्रालाहि सायास पडतात, ते या मोक्षेच्छू पुरूषाला अनायासे प्राप्त होतात.
442-6
मग तेथिंचे जे अमोघ । अलौकिक भोग । भोगितांही सांग । कांटाळे मन ॥442॥
मग तेथील निष्फळ न होणारे व अनुपम असे भोग भोगतां भोगता त्याच्या मनाला कंटाळा येतो.
443-6
हा अंतरायो अवचितां । कां वोढवला भगवंता । ऐसा दिविभोग भोगितां । अनुतापी नित्य ॥443॥
तेथ दिव्य भोग भोगत असता तेथे त्यास सुख मिळत नाही, व ” हे भगवंता, हे भोगाचे विघ्न माझ्यामागे का लागले?” असा तो सतत पश्चाताप करीत असतो.
444-6
पाठीं जन्मे संसारी । परि सकळ धर्माचिया माहेरीं । लांबा उगवे आगरीं । विभवश्रियेचा ॥444॥
नंतर तो फिरून मृत्युलोकी जन्म पावतो, पण सर्व धर्माचे माहेरघर अशा कुलात जन्म पावतो.आणि शेत कापल्यावर पडलेल्या भातगोट्याचे शेत जसे जोराने फोफावते, तशी त्याच्या ऐश्वर्याची वृद्धी होते.
445-6
जयातें नीतिपंथे चालिजे । सत्यधूत बोलिजे । देखावें तें देखिजे । शास्त्रदृष्टी ॥445॥
जे कुल नीतिमार्गाने चालणारे,सत्य आणि पवित्र भाषण करणारे आणि शास्त्र रीतीने वागणारे,

446-6
वेद तो जागेश्वरु । जया व्यवसाय निजाचारु । सारासारविचारु । मंत्री जयाते ॥446॥
ज्या कुलात वेद नित्य जागृत असतो व स्वधर्माचे आचरण हा ज्याचा कुलाचा व्यवसाय आणि सारासार विचार हाच मंत्री.
447-6
जयाचा कुळीं चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता । जयातें गृहदेवता । आदि ऋध्दि ॥447॥
ज्या कुलात चिंतेने ईश्वरास वरिले, ज्या कुलात ईश्वरावाचून दुसर्‍या कशाचेही चिंतन होत नाही, आणि ज्याला संपत्ती हिच गृहदेवता आहे.
448-6
ऐसी निजपुण्याची जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी । तिये जन्मे तो सुरवाडी । योगच्युतु॥448॥
असे ज्या कुलाने पुण्य जोडले आहे व जेथे सर्व सुखाची समृद्धी आहे, अशा कुलात तो योगभ्रष्ट पुरूष सुखाने जन्म घेतो.
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदिदृश्यम् ॥6.42॥
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥6.43॥

449-6
अथवा ज्ञानाग्निहोत्री । जे परब्रह्मण्य श्रोत्री । महासुखक्षेत्रीं । आदिवंत ॥449॥
अथवा ज्ञानरूप अग्नीमध्ये हवन करणारे, व अध्यात्मसिद्धांतांत निष्णात, आणि परब्रम्हरुप गावांचे वतनदार
450-6
जे सिद्धांताचिया सिंहासनीं । राज्य करिती त्रिभुवनीं । जे कूंजते कोकिल वनीं । संतोषाचां॥450॥
जे एकमेवाद्वितीय या सिद्धांतात नेहमीं निमग्न राहून त्रिभुवनाचे राज्य करतात, आणि संतोषरूप वनांत कोकिळेसारखा मधुर ध्वनि करतात.

, , , , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading