सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ४५१ ते ४७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

451-18
आगीसी आगी झगटलिया । काय पोळे धनंजया । कीं शस्त्र रुपे आपणया । आपणचि ॥451॥
अर्जुना, अग्नी वर अग्नि पडला तर तो भाजतो का? किंवा शास्त्र आपणच आपल्याला कधी रुतेल काय? 451
452-18
तैसें आपणपयापरतें । जो नेणें क्रियाजातातें । तेथ काय लिंपवी बुद्धीतें । तयाचिये ॥452॥
त्याप्रमाणे, आपल्या स्वरूपाहून कोणतेही कर्म भिन्न नाही असे जो समजतो, तिथे कोणत्या पदार्थाने त्याची बुद्धी लिप्त होईल? 452
453-18
म्हणौनि कार्य कर्ता क्रिया । हें स्वरूपचि जाहलें जया । नाहीं शरीरादिकीं तया । कर्मी बंधु ॥453॥
म्हणून तो कार्य, कर्ता व क्रिया ही त्रिपुटी आपणच झाला आहे, तो शरीरादिकां पासून होणाऱ्या कर्मापासून बद्ध होत नाही. 453
454-18
जे कर्ता जीव विंदाणीं । काढूनि पांचही खाणी । घडित आहे करणीं । आउतीं दाहें ॥454॥
कारण जीवात्मा हा मोठेपणाने आपल्या कर्ता समजून दहा इंद्रियांच्या साधनांने पांच हेतू धारण करतो; 454
455-18
तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो । उभविता न लवी खेंवो । कर्मभुवनें ॥455॥
आणि त्या ठिकाणी न्याय किंवा अन्याय अशी दोन प्रकारची कर्मे करून एका क्षणात कर्माची भुवने तयार करतो. 455

456-18
या थोराडा कीर कामा । विरजा नोहे आत्मा । परी म्हणसी हन उपक्रमा । हातु लावी ॥456॥
पण या मोठ्या कृत्यात आत्मा हा सह्यकर्ता नाही व तो आरंभ करतो असेही म्हणू नको. 456
457-18
तो साक्षी चिद्रूपु । कर्मप्रवृत्तीचा संकल्पु । उठी तो कां निरोपु । आपणचि दे? ॥457॥
तो साक्षीभूत व ज्ञानस्वरूप आहे; तेव्हा कर्मप्रवृत्तीचा जो संकल्प उत्पन्न होतो, त्याला तो का आज्ञा देईन? 457
458-18
तरी कर्मप्रवृत्तीहीलागीं । तया आयासु नाहीं आंगीं । जे प्रवृत्तीचेही उळिगीं । लोकुचि आथी ॥458॥
तर जी जी कर्मे करण्याकरिता सर्व लोक श्रम करीत असतात, ती ती कर्मे करण्याविषयी त्यांच्या शरीरासआयास पडत नाहीत, 458
459-18
म्हणौनि आत्मयाचें केवळ । जो रूपचि जाहला निखिळ । तया नाहीं बंदिशाळ । कर्माचि हे ॥459॥
म्हणून जो केवळ शुद्ध आत्मरुपी झाला आहे, त्याला ही कर्माची बंदिशाळा नाही. 459
460-18
परी अज्ञानाच्या पटीं । अन्यथा ज्ञानाचें चित्र उठी । तेथ चितारणी हे त्रिपुटी । प्रसिद्ध जे कां ॥460॥
परंतु अज्ञानाच्या पटावर जो दैवज्ञानाचे चित्र काढतो तो तेथे चित्र, चित्र काढणारा व चित्रपट ही त्रिपुटी स्पष्ट आहे, ती तुला सांगतो. 460
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना ।
करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः ॥18.18॥

461-18
जें ज्ञान ज्ञाता ज्ञेय । हें जगाचें बीज त्रय । ते कर्माची निःसंदेह । प्रवृत्ति जाण ॥461॥
कारण ज्ञान, ज्ञाता व ज्ञेय ही त्रिपुटी जगास कारणीभूत असून, इच्यापासून कर्माची नि:संशय प्रवृत्ती होते, असे समज. 461
462-18
आतां ययाचि गा त्रया । व्यक्ति वेगळालिया । आइकें धनंजया । करूं रूप ॥462॥
हे धनंजया, आता ह्याच त्रिपुटी ची निरनिराळी स्वरूपी उघड करून सांगतो, ती ऐक 462
463-18
तरी जीवसूर्यबिंबाचे । रश्मी श्रोत्रादिकें पांचें । धांवोनि विषयपद्माचे । फोडिती मढ ॥463॥
तर जीव रुपी सूर्यबिंबाचे ज्ञानेन्द्रियादी पंचेंद्रियरुपी किरण विषयरुपी कमळाचे कळीवर पडून ती उमलवितात; 463
464-18
कीं जीवनृपाचे वारु उपलाणें । घेऊनि इंद्रियांचीं केकाणें । विषयदेशींचें नागवणें । आणीत जे ॥464॥
अथवा जीवरूपी राजा, हा शरीररूपी रुपी उपलाणी म्हणजे खोगीराशिवाय घोड्यावर बसून हातांत इंद्रियरुपी भाले घेऊन विषयरुपी देशातून लूट आणतात 464
465-18
हें असो इहीं इंद्रियीं राहाटे । जें सुखदुःखेंसीं जीवा भेटे । तें सुषुप्तिकालीं वोहटे । जेथ ज्ञान ॥465॥
फार काय, जो या इंद्रियांत वागत असून जीवाला सुख व दुःख भोगावयास देते व जे ज्ञान गाढ झोपेत जेथे नाहीसे होते, 465

466-18
तया जीवा नांव ज्ञाता । आणि जें हें सांगितलें आतां । तेंचि एथ पंडुसुता । ज्ञान जाण ॥466॥
त्या जीवाला अर्जुना, ज्ञाता असे म्हणतात, आणि जे आता सांगितले त्यालाच ज्ञान असे म्हणतात, असे तू समज.466
467-18
जें अविद्येचिये पोटीं । उपजतखेंवो किरीटी । आपणयातें वांटी । तिहीं ठायीं ॥467॥
अर्जुना,जे अज्ञानाच्या पोटात उपजताक्षणी आपल्यास तीन ठिकाणी वाटून घेते, 467
468-18
आपुलिये धांवे पुढां । घालूनि ज्ञेयाचा गुंडा । उभारी मागिलीकडां । ज्ञातृत्वातें ॥468॥
आपल्या वृत्ती पुढे जाणावयाचा विषयरुप ज्ञेयाचा दगड घालून आपल्या मार्गाचे बाजूस ज्ञात्याला उभे करते, 468
469-18
मग ज्ञातया ज्ञेया दोघां । तो नांदणुकेचा बगा । माजीं जालेनि पैं गा । वाहे जेणें ॥469॥
मग ज्ञाता ज्ञेय या दोघांच्या मधील व्यवहार होत असताना जे ज्ञानामध्ये राहते. 469
470-18
ठाकूनि ज्ञेयाची शिंव । पुरे जयाची धांव । सकळ पदार्थां नांव । सूतसे जें ॥470॥
ज्ञेयाला जाऊन पोचल्यावर ज्याची धाव खुंटते व जे सर्व पदार्थांना नाव ठेवते. 470

471-18
तें गा सामान्य ज्ञान । या बोअला नाहीं आन । ज्ञेयाचेंही चिन्ह । आइक आतां ॥471॥
त्याला सामान्य ज्ञान असे म्हणतात, यात संशय नाही. आता ज्ञेयाची लक्षणे सांगतो ती ऐक. 471
472-18
तरी शब्दु स्पर्शु । रूप गंध रसु । हा पंचविध आभासु । ज्ञेयाचा तो ॥472॥
तर शब्द, स्पर्श, रूप, रस, व गंध हे ज्ञेयाचे पाच प्रकारचे धर्म आहेत. 472
473-18
जैसें एकेचि चूतफळें । इंद्रियां वेगवेगळे । रसें वर्णें परीमळें । भेटिजे स्पर्शें ॥473॥
जसा एकच आंबा दृष्टीस पडल्यावर पाच इंद्रियांना निरनिराळ्या प्रकाराने भासतो; म्हणजे आंबा या शब्दाने कानात समजतो, रसाने जिभेस समजतो, रंगाने डोळ्यात समजतो, वासाने नाकास समजतो, आणि स्पर्शाने त्वचेस समजतो. 473
474-18
तैसें ज्ञेय तरी एकसरें । परी ज्ञान इंद्रियद्वारें । घे म्हणौनि प्रकारें । पांचें जालें ॥474॥
तसेच ज्ञेय तर एकच आहे, परंतु आपल्या इंद्रियांच्या द्वाराने त्यांजविषयी निरनिराळे ज्ञान उत्पन्न होते, म्हणून ते पाच प्रकारचे झाले आहे. 474
475-18
आणि समुद्रीं वोघाचें जाणें । सरे लाणीपासीं धावणें । कां फळीं सरे वाढणें । सस्याचें जेवीं ॥475॥
समुद्रास मिळाल्यावर नदीचा ओघ संपतो, मुक्कामास गेल्यावर चालणे संपते, अथवा फळ आल्यावर ज्याप्रमाणे धान्याची वाढ खुंटते; 475

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading