सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

276-6
घोषाच्या कुंडी । नादचित्रांची रुपडीं । प्रणवाचिया मोडी । रेखिलीं ऐसीं ॥276॥
घोषच्या कुडीत ध्वनी व नादरूपी ओंकाराच्या आकाराची अनेक रूपे उमटतात.
277-6
हेंचि कल्पावें तरी जाणिजे । परि कल्पितें कैचें आणिजे । तरी नेणों काय गाजे । तिये ठायीं ॥277॥
याची कल्पना केली, तर अनाहत नादाचे स्वरूप जाणले जाते. कारण, या अवस्थेत कल्पना करणारे मन तरी कोठून आणावे?? अनाहत चक्राच्या ठिकाणी कशाची गर्जना होते, हे योगी पुरुषाशिवाय इतरांना कळत नाही.
278-6
विसरोनि गेलों अर्जुना । जंव नाशु नाही पवना । तंव वाचा आथी गगना । म्हणोनि घुमे ॥278॥
हे अर्जुना ! एक गोष्ट सांगावयाची राहून गेली. जोपर्यंत हृदय- आकाशातील प्राणाचा नाश होत नाही, तोपर्यंत नाद असतो, म्हणून तो आकाशात घुमत असतो.
279-6
तया अनाहताचेनि मेघें । आकाश दुमदुमों लागे । तंव ब्रह्मस्थानींचें बेगें । फिटलें सहजें ॥279॥
त्या अनाहतरूपी मेघागर्जनेने हृदय – आकाश दुमदुम लागते, तेंव्हा ते ब्रम्हस्थानाचे द्वार सहजच उघडले जाते,
280-6
आइकें कमळगर्भाकारें । जें महदाकाश दुसरें । जेथ चैतन्य आधातुरें । करुनि असिजे ॥280॥
अर्जुना, ऐक. त्याठिकाणी कमळगर्भाच्या आकारांचे जे दुसरे महादकाश आहे, ज्या ठिकाणी जीवचैत्यन्य सुखासाठी अतृप्त होऊन राहिलेले असते.

281-6
तया हृदयाच्या परिवरीं । कुंडलिनियां परमेश्वरी । तेजाची शिदोरी । विनियोगिली ॥281॥
त्या चैत्यण्याला हृदयाकशाच्या माजघरांत (हृदयाच्या गुप्तस्थानी) आणणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते.(ती कशी तर,)
282-6
बुध्दीचेनि शाकें । हातबोनें निकें । द्वैत जेथ न देखे । तैसें केलें ॥282॥
द्वैत ज्याला पाहणार नाही, असा बुद्धीच्या भाजीसह हातात असलेला उत्तम प्रकारचा नैवद्य अर्पण केला.
283-6
ऐसी निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहली । ते वेळी कैसी गमली । म्हणावी पां ॥283॥
अशा प्रकारे तिने आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणवायुरूपच झालेली असते. तेंव्हा ती कशी दिसते (किंवा कशी भासते) म्हणाल तर,
284-6
हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनेसळी । ते फेडुनियां वेगळी । ठेवली तिया ॥284॥
जणू काही ती वाऱ्याची पुतळी असावी व तिने पीतांम्बर नेसलेला असावा आणि नंतर तिने वस्त्र सोडून ठेवावे,
285-6
नातरी वारयाचेनि आंगें झगटली । दीपाची दिठी निमटली । कां लखलखोनि हारपली । वीजु गगनीं ॥285॥
किंवा वाऱ्याची झुळूक लागून दिव्याचा प्रकाश एकदम नाहीसा व्हावा अथवा आकाशामध्ये वीज चमकून ती अदृश्य व्हावी,

286-6
तैशी हृदयकमळवेऱ्हीं । दिसे सोनियाची जैशी सरी । नातरी प्रकाशजळाची झरी । वाहत आली ॥286॥
त्याप्रमाणे ती कुंडलिनी हृद्यकमलापर्यंत जणू काही सोन्याची सरी अथवा प्रकाशरुपी पाण्याचा झरा जसा वाहत आलेला असतो, त्याप्रमाणे दिसते.
287-6
मग ते हृदयभूमी पोकळे । जिराली कां एके वेळे । तैसें शक्तीचे रुप मावळे । शक्तीचिमाजीं ॥287॥
मग त्या कुंडलिनीचा प्रकाश रुपी झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरवा, त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्येच मावळते.
288-6
तेव्हां तरी शक्तीचि म्हणिजे । एऱ्हवी तो प्राणु केवळ जाणिजे । आतां नाद बिंदु नेणिजे । कला ज्योती ॥288॥
अशी स्थिती झाल्यानंतर तिला शक्ती असेच म्हणतात; परंतु वास्तविक तो प्राणच आहे, असे जाण. परंतु त्या वेळेस त्याला नाद, बिंदू, कला, ज्योती असे चारी धर्म नसतात.
189-6
मनाचा हन मारु । कां पवनाचा धरु । ध्यानाचा आदरु । नाहीं परी ॥289॥
त्या अवस्थेत मनाचा निग्रह, प्राणाचा निरोध, ध्यानाचा प्रयत्न हे काही प्रकार तेथे राहत नाहीत.
290-6
हे कल्पना घे सांडी । तें नाहीं इये परवडी । हे महाभूतांची फुडी । आटणी देखां ॥290॥
प्रारंभीच्या काळामध्ये अमुक घ्यावे, अमुक टाकावे, हा जो संकल्प असतो, तो त्या वेळी त्या अवस्थेत राहत नाही. त्या अवस्थेमध्ये पंचमहाभुतांची पूर्ण आटणी झालेली असते.

291-6
पिंडे पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतीचा दंशु । परि दाऊनि गेला उद्देशु । महाविष्णु ॥291॥
देहानेच देहातील पंचमहाभुतांचा नाश करणे, हे आदिनाथ जे शंकर संप्रदायाचे गुप्त वर्म आहे; परंतु महाविष्णू भगवान श्रीकृष्ण ते वर्म प्रकट करून दाखविले आहे.
292-6
तया ध्वनिताचें केणें सोडुनी । यथार्थाची घडी झाडुनी । उपलविली म्यां जाणुनि । ग्राहीक श्रोते ॥292॥
त्या संक्षेपरूपी कापडाच्या गठ्यावरचे दोर सोडून त्यातील कपड्याच्या घड्या साफ करून श्रोते हे गिर्हाईक आहे, असे जाणून उलगडून दाखविले, म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी संक्षेपाने जे ध्वनित केले, त्याचेच मी विवरण केले.(असे माऊली म्हणत आहेत)
युञ्जन्नेनं सदाऽत्मानं योगी नियतमानसः ।
शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति॥6.15॥

भावार्थ:- ज्याचे मन निग्रहयुक्त झाले आहे, असा योगी सतत चित्त एकाग्र केल्याने प्रमानंदाची पराकाष्ठा अशी शांती प्राप्त करून घेतो.
293-6
ऐकें शक्तीचें तेज लोपे । तेथ देहींचे रुप हारपे । मग तो डोळ्यांमाजी लपे । जगाचिया ॥293॥
अर्जुना ऐक. ज्यावेळी कुंडलिनी शक्तीचे तेज लोप पावते, त्यावेळी देहातील पंचमहाभूतांचे स्वरूप लय पावते. मग तो योगी जगाच्या डोळ्यामध्ये लपून बसतो. तो कोणाच्याही डोळ्याला दिसू शकत नाही.
294-6
एऱ्हवीं आधिलाची ऐसें । सावयव तरी दिसे । परी वायूचें कां जैसें । वळिलें होय ॥294॥
एरवी तो पूर्वी प्रमाणे सावयव दिसत असतो; परंतु जणू काहि पण जणू काही तो वाऱ्याचाच बनविलेला आहे, असा होतो.
295-6
नातरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनि उभा । कां अवयवचि नभा । निवडला तो ॥295॥
अथवा केळीची सोपटे काढून त्याचा गाभा उभा केला, तर काहीच उरत नाही; किंवा आकाशाला जसे अवयव फुटावेत, असे त्याचे अवयव असूनदेखील नसल्याप्रमाणेच असतात.

296-6
तैसें होय शरीर । तैं तें म्हणिजे खेचर । हें पद होतां चमत्कार । पिंडजनी ॥296॥
याप्रमाणे शरीर बनल्यावर त्याला खेचर म्हणजे गगणामध्ये संचार करणारा म्हणतात. देहधारी लोकांमध्ये अशा प्रकारचे शरीर बनणे म्हणजे एक प्रकारचा चमत्कार आहे.
297-6
देखें साधकु निघोनि जाय । मागां पाउलांची वोळ राहे । तेथ ठायी ठायी होये । हे अणिमादिक ॥297॥
असा साधक योगाचा अभ्यास करून पुढे निघून गेलेला असतो. त्या मार्गावर साधनरूपी पावलांची ओळ मागे राहते. त्या ठिकाणी अणिमादिक (अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इष्टत्व, वाशित्व इत्यादी) सिद्धी प्राप्त होतात. (म्हणजेच साधकाची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या सिद्धी प्राप्त होतात)
298-6
परि तेणें काय काज आपणयां । अवधारी ऐसा धनंजया । लोप आथी भूतत्रया । देहींचा देहीं ॥298॥
अर्जुना ! हे लक्षात ठेव की, या सिद्धिशी आपल्याला काय करायचे आहे? देहातल्या देहातच पृथ्वी, आप, तेज या तिनी भुतांचा लोप होतो.
299-6
पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी । तेजातें पवनु हरवी । हृदयामाजीं ॥299॥
पृथ्वीला पाणी नाहीसे करते. पाण्याला तेज नाहीसा करतो व तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो.
300-6
पाठीं आपण एकला उरे । परि शरीराचेनि अनुकारें । मग तोही निगे अंतरें । गगना मिळे ॥300॥
पाठीमागे वायू एकटाच उरतो. तो शरीराच्या आकाराने राहतो. मग तोही काही काळाने हृद्यकाशातून निघून मुर्धन्याकाशात जाऊन मिळतो.

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *