सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७०१ ते १७२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1701-18
स्वातीचेनि पाणियें । न होती जरी मोतियें । तरी अंगीं सुंदरांचिये । कां शोभिती तियें? ॥1701॥
स्वातीनक्षत्राचे पाणी जर मोत्यांच्या आकाराला न येतें तर, त्याला सुंदर स्त्रियांच्या अंगावरील शोभा कशी प्राप्त झाली असती? 1701
1702-18
नादु वाद्या न येतां । तरी कां गोचरु होता । फुलें न होतां घेपता । आमोदु केवीं? ॥1702॥
ध्वनि (नाद) जर वाद्यांचा आश्रय न करिता तर, श्रवण प्रत्यक्षता त्याला कशी येती? किंवा आमोद (सुगंध) फुलांचे रूप धारण न करिता तर त्याचा व्यक्तिगत भोग कसा घडता? 1702
1703-18
गोडीं न होती पक्वान्नें । तरी कां फावती रसनें? । दर्पणावीण नयनें । नयनु कां दिसे? ॥1703॥
गोडी पक्वान्नाच्या रूपाने अवतरती ना तर रसनेला तिचा भोग कसा घडता? किंवा आरशावांचून डोळ्याला डोळा कसा दिसता?
1704-18
द्रष्टा श्रीगुरुमूर्ती । न रिगता दृश्यपंथीं । तरी कां ह्या उपास्ती । आकळता तो? ॥1704॥
ब्रह्म (द्रष्टा) श्रीगुरूचे रूप घेऊन जर आकारास आले नसते तर त्याची उपासना कशी करितां आली असती? तसे अगणित जें ब्रह्मवस्तु ते सातशे श्लोकरूपाने (गीतारूपानें) प्रकट न होते तर त्याची जगात लोकांना कशी प्राप्ति होती? 4
1705-18
तैसें वस्तु जें असंख्यात । तया संख्या शतें सात । न होती तरी कोणा येथ । फावों शकतें? ॥1705॥
तसे अगणित जे ब्रम्ह ते गीतेच्या सातशे श्लोकांच्या रूपाने जर प्रगट झाले नसते, तर कोणाला तरी जाणता आले असते काय ?1705-18

1706-18
मेघ सिंधूचें पाणी वाहे । तरी जग तयातेंचि पाहे । कां जे उमप ते नोहें । ठाकतें कोण्हा ॥1706॥
मेघांतील पाणी समुद्राचेच असतें, पण लोकांची दृष्टि (आशा) तद्विषयकच असते. कारण जे अमर्याद तें (समुद्रस्वरूप) कोणालाही व्यवहारोपयोगी नसतें. 6
1707-18
आणि वाचा जें न पवे । तें हे श्लोक न होते बरवे । तरी कानें मुखें फावे । ऐसें कां होतें? ॥1707॥
आणि वाणी जेथे पोंचू शकत नाही असे ते ब्रह्मवस्तु ह्या उत्तम श्लोकांचे रूप न घेतें तर, श्रवणांना व वाणीला त्यांचा भोग कसा घेता आला असता?1707
1708-18
म्हणौनि श्रीव्यासाचा हा थोरु । विश्वा जाला उपकारु । जे श्रीकृष्ण उक्ती आकारु । ग्रंथाचा केला ॥1708॥
म्हणून श्रीकृष्णार्जुनसंवादाला गीताग्रंथाचें रूप देऊन ठेवण्यांत महर्षी व्यासांनी जगावर महान उपकार करून ठेविले आहेत. 8
1709-18
आणि तोचि हा मी आतां । श्रीव्यासाचीं पदें पाहतां पाहतां । आणिला श्रवणपथा । मऱ्हाठिया ॥1709॥
आणि तोच श्रीव्यासजींचा ग्रंथ त्यांतील पदांच्या अर्थाकडे लक्ष्य पोचवून, प्राकृत श्रोत्यांच्या श्रवणाला योग्य असा मराठी भाषेत आज लिहिला आहे.9
1710-18
व्यासादिकांचे उन्मेख । राहाटती जेथ साशंक । तेथ मीही रंक येक । चावळी करीं ॥1710॥
व्यासादिकांसारखे थोर ज्ञानीही (आत्मवेत्ते) जेथें वर्णनाच्या व्यवहारांत क्वचित् साशंक असतात (अवर्णनीय वस्तु वर्णानांत आणू गेल्यामुळे) तेथे मीही एक गरीब वाङ्मयसेवा करीत आहें. 1710

1711-18
परी गीता ईश्वरु भोळा । ले व्यासोक्तिकुसुममाळा । तरी माझिया दुर्वादळा । ना न म्हणे कीं ॥1711॥
(कारण, मला पूर्ण विश्वास आहे) की हा गीतेश्वर अत्यंत भोळा आहे; व्यासोक्ति रूप सुमनांच्या माळा त्याने गळ्यात जरी धारण केल्या असल्या, तरी माझ्या रंकाच्या दूर्वादळाचाही तो अव्हेर करणार नाहीं 11
1712-18
आणि क्षीरसिंधूचिया तटा । पाणिया येती गजघटा । तेथ काय मुरकुटा । वारिजत असे? ॥1712॥
पहा की, क्षीरसागराच्या किनाऱ्यावर हत्तींचे कळप पाण्यासाठी येत असले तरी मशकाला तेथे काय मज्जाव असतो? 12
1713-18
पांख फुटे पांखिरूं । नुडे तरी नभींच स्थिरू । गगन आक्रमी सत्वरू । तो गरुडही तेथ ॥1713॥
नूतन पंख फुटणारें पांखरू फार उडू शकले नाही तरी त्याला आकाशाचाच आश्रय असतो (आकाशांतच असतं) व भरारी सरसें (सत्वर) गगन आक्रमण करणारा गरुड घेतला तरी त्यालाही विश्रांतिस्थल आकाशच असतें 13
1714-18
राजहंसाचें चालणें । भूतळीं जालिया शाहाणें । आणिकें काय कोणें । चालावेचिना? ॥1714॥
जगांत राजहंसाची गति श्रेष्ठ ठरली असली तरी तेवढयासाठीं, इतरांनीं काय चालूच नये? 14
1715-18
जी आपुलेनि अवकाशें । अगाध जळ घेपे कलशें । चुळीं चूळपण ऐसें । भरूनि न निघे? ॥1715॥

कलशांत अधिक पाणी राहिलें तरी आधार कलशाकाशाच असतो; तसेच चुळींत कमी पाणी असले तरी आधार मुखाकाशाचाच असतो (यांत विशेष ते काय? ) 15

1716-18
दिवटीच्या आंगीं थोरी । तरी ते बहु तेज धरी । वाती आपुलिया परी । आणीच कीं ना? ॥1716॥
मशाल मोठी असली तर प्रकाश अधिक असतो व वात जरी लहान असली तरी ती आपल्या मानाने प्रकाशच देते नव्हे काय?16
1717-18
जी समुद्राचेनि पैसें । समुद्रीं आकाश आभासे । थिल्लरीं थिल्लरा{ऐ}सें । बिंबेचि पैं ॥1717॥
समुद्राच्या व्याप्ती प्रमाणं समुद्रांत आकाश प्रतिबिंबित झाले तर डबक्याच्या व्याप्तीच्या मानाने तेथेही ते तितकेच प्रतिबिंबित होतें, 17
1718-18
तेवीं व्यासादिक महामती । वावरों येती इये ग्रंथीं । मा आम्ही ठाकों हे युक्ति । न मिळे कीर? ॥1718॥
त्याप्रमाणे व्यासांसारख्या महान बुद्धिमंतांनी ह्या ग्रंथाचा उहापोह केला असला तरी, आम्हीही आमच्या शक्तीप्रमाणे तसें करावें ह्याला वरील दृष्टांत मिळत नाहीत काय? 18
1719-18
जिये सागरीं जळचरें । संचरती मंदराकारें । तेथ देखोनि शफरें येरें । पोहों न लाहती? ॥1719॥
ज्या समुद्रामध्ये मंदरपर्वतसारखी थोर जलचरें संचार करितात, तेणें तें पाहून लहान माशांनीं काय पोहूच नये? 19
1720-18
अरुण आंगाजवळिके । म्हणौनि सूर्यातें देखें । मा भूतळींची न देखे । मुंगी काई? ॥1720॥
सन्निध्या मुळे अरुण तेवढा सुर्याला पहातो असे म्हणावें तर पृथ्वीवरील मुंगीही काय त्याला पहात नाहीं? 1720

1721-18
यालागीं आम्हां प्राकृतां । देशिकारें बंधें गीता । म्हणणें हें अनुचिता । कारण नोहे ॥1721॥
यास्तव आम्ही प्राकृतजनांनीं देशभाषेत गीताप्रबंध आणिला तर ते अनुचित होय असे म्हणतां येणार नाही. 21
1722-18
आणि बापु पुढां जाये । ते घेत पाउलाची सोये । बाळ ये तरी न लाहे । पावों कायी? ॥1722॥
आणि पिता पुढे जात असून त्याच्याच मार्गे बालक चालत असले तर शेवटीं तें तेथेच पोचणार नाही काय? 22
1723-18
तैसा व्यासाचा मागोवा घेतु । भाष्यकारातें वाट पुसतु । अयोग्यही मी न पवतु । कें जाईन? ॥1723॥
व्यासांच्या मागोव्याने व भाष्यकार श्रीशंकराचार्यांना वाट विचारीत जाणारा माझ्या सारखा त्याप्रमाणे अल्पमतीही तेथेच पोचणार नाही तर कोठे जाईल? 23
1724-18
आणि पृथ्वी जयाचिया क्षमा । नुबगे स्थावर जंगमा । जयाचेनि अमृतें चंद्रमा । निववी जग ॥1724॥
आणि ज्याच्या सामर्थ्याने पृथ्वी स्थावरजंगम भूतांचा भार सहन करिते व ज्याच्या आधारावर अमृताच्या चंद्र जगाची शांति करितो,24
1725-18
जयाचें आंगिक असिकें । तेज लाहोनि अर्कें । आंधाराचें सावाइकें । लोटिजत आहे ॥1725॥
ज्याच्या अंगचे असलेले तेज घेऊन सूर्य अंधाराचा प्रतिबंध दूर करितो. 25

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *